विज्ञानातील भारतीय तारका

अलीकडेच एका मैत्रिणीशी विज्ञान - तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या महिला शास्त्रज्ञांविषयी चर्चा करत होते. अचानक ती म्हणाली, "भारतात कुठे अशा वैज्ञानिक आहेत? आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेल्या तर अगदीच  कमी." तिच्या या प्रश्नावर मी अवाक झाले. कारण भारतीय महिला शास्त्रज्ञ म्हटलं की, इरावती कर्वे, कमला सोहोनी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यापुढे आपली यादी सरकत नाही. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या असीमा चॅटर्जीपासून वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या डॉ. सीता आचार्य, डॉ. पदमकुमारी अग्रवाल, डॉ. इंदिरा हिंदुजा, औषधी वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या डॉ. जानकी अम्मल, अ‍ॅना मणी, डॉ. रोहिणी गोडबोले, डॉ. अदिती डे अशी कितीतरी नावे नजरेसमोर तरळली. ही यादी सीमित असली तरी छोटेखानी नक्कीच नाही. या वैज्ञानिकांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. अनेक शोधनिबंध त्यांच्या नावावर प्रकाशित झाले आहेत आणि अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. पण विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मूठभर व्यक्ती सोडल्या, तर सामान्य जन या विभूतींच्या संशोधन कार्याशी परिचित नाहीत. त्या अर्थाने या ‘काळोखातील लेकी’ आहेत. त्यांचा जीवनसंघर्ष आणि त्यांचे संशोधन समजून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न. 

समाजातील सर्वच स्तरांवर महिलांच्या कामाची विशेष दखल घेतली जात नाही.  विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नाही.  जागतिक पातळीवर सर्वोच्च समजला  जाणारा  शास्त्र शाखेमधील नोबेल पुरस्कार केवळ 22 महिला शास्त्रज्ञांना देण्यात आला आहे. (१९०१ ते २०२० या कालावधीत एकूण ६२२ शास्त्रज्ञांना या पुरस्काराने गौरवण्यात आले). भारतातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने १९५८ ते २०२० या कालावधीत एकूण ५४२ पुरुषांना  गौरवण्यात आले, तर केवळ १८ महिलांनी या पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहर उमटवली आहे. मुळातच विज्ञान क्षेत्रात येणाऱ्या मुलींची संख्या तुलनेने कमी असते. याचे कारण सामाजिक जडणघडण आणि एकूणच समाजाच्या मानसिकतेत दडलेले आहे. ‘मुलींकडे गणिती कौशल्याचा अभाव असतो. त्यांच्याकडे अंगभूतच कलागुण आणि सौंदर्यदृष्टी असते,’अशी सरधोपट विधाने केली जातात. स्वतःला प्रगत आणि प्रगल्भ समजणार्‍या तथाकथित विकसित युरोपियन राष्ट्रांमध्ये सुद्धा १९२० पर्यंत हायस्कूलपर्यंतचे शिक्षण मुलींसाठी अंतिम मानले जात असे. विज्ञान, गणित या विषयांचा समावेश मुलींच्या अभ्यासक्रमात केला जात  नसे. अनेक उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये मुलींना प्रवेश नव्हता. या पार्श्वभूमीवर विज्ञान संशोधन क्षेत्रात महिला शास्त्रज्ञांनी मारलेली भरारी कौतुकास्पद आहे. या क्षेत्रात येणाऱ्या महिलांना करावा लागणारा संघर्ष एकेरी किंवा दुहेरी नसून अनेक पातळ्यांवर असतो. वैज्ञानिक म्हणून पुरुष वैज्ञानिकांना ज्या अडचणी येतात (उदा. संशोधनासाठी आवश्यक सुविधांचा अभाव) त्या तर असतातच, पण त्याच्या जोडीला पात्रता असूनही केवळ स्त्री म्हणून संधी नाकारण्यापासून प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडताना करावी लागणारी  कसरत या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. हे जग पुरुषांचं आहे. या जगात स्त्रीला प्रथम आपलं स्थान पक्क करून अस्तित्व सिद्ध करावं लागतं आणि त्यानंतर तिचे ध्येय, स्वप्न आणि ध्येयाप्रती नेणारा प्रवास या गोष्टी येतात. म्हणून या स्त्री वैज्ञानिकांच्या प्रवासाची विशेष दखल घेणं आवश्यक ठरतं.  या स्त्री वैज्ञानिकांच्या जीवन संघर्षावर आधारित साहित्याचा अभ्यास करताना अनेक रोचक (?) किस्से (खरं तर मन विषण्ण करणारे) समोर आले.

अशीच एक कथा आहे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश आर्मीमध्ये काम करणाऱ्या डॉ. जेम्स मिरांडा स्टुअर्ट बेरी यांची. १८०९ मध्ये एडिंबरा विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आपली ओळख लपवली आणि पुरुष विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. १८१२ मध्ये त्यांनी एम. डी. ही पदवी घेतली आणि शल्यविशारद म्हणून नाव कमावले. १८६५ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे हे गुपित उघडकीस आले. 

भारतातील  परिस्थिती तर अजूनच  विदारक होती. भारतात स्त्री-शिक्षण सुरू होऊन १७० वर्षे झाली. 'लिहिता वाचता आले आणि हिशेब करता आला तरी पुरे’, पासून सुरू झालेला हा प्रवास शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी अशा पायर्‍या चढत पंतप्रधान, राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचला आहे. या प्रत्येक टप्प्यावर लिंगाधिष्ठित भेदभाव ठळक करणारी वर्गवारी दिसून येते. संख्यात्मक विचार करता बालवाडी शिक्षक ते प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी असा स्त्रियांचा उतरता क्रम लागतो. त्यातही विज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रातील स्त्रियांची संख्या फारच कमी. कारण ‘गरजेपुरतं शिकावं’ ही मानसिकता. नोकरी करायची असेल तर शिक्षक किंवा एखाद्या बँकेत, कचेरीत लिपीक. कारण मुलगी कितीही शिकली तरी तिची मुळं स्वयंपाकघरातच! प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून, नव्हे - चोख बजावून तिने तिचा काय तो विकास करावा ही धारणा! 'संसारसुखाचा मार्ग पोटातून जातो’ हे आपले ब्रह्मवाक्य!  या महान तत्त्वाने अगणित तरुणींच्या स्वप्नाचा चुराडा केला. (मध्यंतरी पेप्सिकोच्या कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांच्या इंटरनेटवर प्रकाशित झालेल्या पत्राची खूपच चर्चा झाली आणि त्याची प्रशंसाही (?) झाली). 

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर मुलींनी शाळेत प्रथम पाऊल टाकले आणि लवकरच वैद्यकीय क्षेत्रात स्त्रीने  चंचुप्रवेश केला. लवकरच ती विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उतरली आणि तिचा हा प्रवास अव्याहतपणे चालू आहे. अल्पावधीतच तिने खूप मोठी झेप घेतली. त्या काळातील रूढी परंपरांना चिकटून असलेल्या समाजरचनेचा विचार करता, या मुलींनी दाखवलेले धारिष्ट्य आणि त्यांनी केलेला संघर्ष शब्दातीत आहे. कारण शिक्षण घेत असतानाच बाल विवाहासारख्या अनिष्ट रूढी परंपरांचा सामना त्यांना करावा लागला. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून डॉ. आनंदीबाई जोशी परिचित आहेत. १८८६ मध्ये त्यांनी पेनसिल्व्हेनियामधून वैद्यकीय पदवी घेतली. पण दुर्दैवाने त्यांचे लवकर निधन झाल्याने त्यांना वैद्यकीय सेवा करता आली नाही. त्याच वेळी, म्हणजे १८८६ मध्ये डॉ. कादंबिनी गांगुली यांनी कलकत्ता येथून वैद्यकीय पदवी घेतली. डॉ.कादंबिनी गांगुली कलकत्ता मेडिकल कॉलेजमधून पदवी घेणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर! पण औषधशास्त्र या विषयात अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना एम. बी. (बॅचलर ऑफ मेडिसीन) ही पदवी घेता आली नाही. असं म्हटलं जातं की, स्त्री शिक्षणाला विरोध असणाऱ्या प्राध्यापकांनीच जाणीवपूर्वक त्यांना अपयशी ठरवलं. पण प्राचार्यांनी त्यांना Graduate of Medical College of Bengal - GMCB ही पदविका प्रदान केली आणि त्यांचा वैद्यकीय सेवा करण्याचा मार्ग सुकर झाला. डॉ. रखमाबाई  राऊत यांचा विवाह वयाच्या अकराव्या वर्षी अशिक्षित अशा दादाजी भिकाजी यांच्याशी झाला. विवाहाच्या वेळी मान्य करूनही दादाजींनी शिक्षण पूर्ण केले नाही म्हणून रखमाबाईंनी सासरी जाण्यास नकार दिला. तेव्हा समाजाने त्यांना पूर्ण विरोध केला. प्रकरण कोर्टात गेले.पण रखमाबाई ही कायदेशीर लढाई जिंकल्या. या प्रकरणी समाजातून प्रखर टीका झाली. लोकमान्य टिळकांनी 'मराठा' मधून 'हिंदू धर्मातील रूढी परंपरांचे पावित्र्य जपले जात नाही, हे हिंदू धर्मावरील आक्रमण आहे', अशी टीकेची झोड उठवली.  पण रखमाबाई खचल्या नाहीत. त्यानंतर १८९४  मध्ये त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ मधून वैद्यकीय पदवी घेतली आणि पुढे आयुष्यभर त्यांनी वैद्यकीय सेवा केली. डॉ. हैमबती सेन यांची कहाणीदेखील अगदी करुण आहे. वयाच्या नवव्या वर्षी विवाह आणि दहाव्या वर्षी  त्यांना वैधव्य प्राप्त झाले. सासरच्या मंडळींनी संपत्तीचा वाट्यातून त्यांना बेदखल केल्याने हिंदू विधवा महिलांचे आश्रयस्थान असलेल्या वाराणसीमध्ये त्यांना आसरा घ्यावा लागला. तिथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यावेळी सरकार वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलींना महिना सात रुपये शिष्यवृत्ती देत असे,  म्हणून त्यांनी  सिल्दा, कलकत्ता येथील कॅम्पबेल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि १८९४ मध्ये त्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. पण इथेही त्यांचे स्त्रीत्व आडवे आले. महाविद्यालयातील मुलांनी याविरुद्ध संप केल्याने द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पुरुष विद्यार्थ्यास हे पदक देण्यात आले आणि हैमबतीना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

डॉ. कमला सोहोनींची ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स’ येथील प्रवेशाची कहाणी तर प्रसिद्धच आहे. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. ही पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला. त्यांनी दूध आणि डाळींमधील प्रथिनांचा अभ्यास केला. भारतीय खाद्यसंस्कृती आणि त्यातील पोषणमूल्य यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. याचा उपयोग बालकांमधील कुपोषण अभ्यासण्यासाठी आणि कमी करण्यासाठी झाला. नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉ. हॉपकिन्स यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. शांतीस्वरूप भटनागर पारितोषिकाच्या मानकरी आणि रसायनशास्त्र विषयातील पदवी घेणाऱ्या कलकत्ता विद्यापीठातील पहिल्या महिला डॉ.असीमा चॅटर्जी एका सनातनी हिंदू परिवारातून आल्या होत्या. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी घरातील ज्येष्ठांचा विरोध होता.  पण सुदैवाने त्यांचे आई-वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींचा त्यांनी अभ्यास केला. ‘आयुष - ५६’ हे अपस्मार या आजारावरील प्रभावी औषध त्यांनी विकसित केले. ‘पेशीजननशास्त्र’ विषयाच्या संशोधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य नाव म्हणजे डॉ. जानकी अम्मल एडेलवाथ कक्कट. त्यांनी गोड उसाचे देशी वाण विकसित केले. 'ऊसामध्ये गोडवा भरणाऱ्या शास्त्रज्ञ' म्हणून त्या परिचित आहेत. त्यापूर्वी भारतातील ऊसाचे उत्पादन मुबलक असले तरी त्यास गोडवा नसल्याने दक्षिण-पूर्व आशियातून ऊस आयात  केला जात असे. जनुकीय शास्त्रात संशोधन करणाऱ्या महाराणी चक्रवर्ती यांची प्रयोगशाळा हेच त्यांच्या बाळाचे दुसरे घर होते. प्रयोगशाळेत जाताना त्या  आपल्या  बाळालाही बरोबर नेत असत. त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी त्या शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होत्या. बाळाच्या जन्मानंतर दहाव्याच दिवशी त्या प्रयोगशाळेत हजर! 

कार्बन रसायनशास्त्रज्ञ डॉ. दर्शन रंगनाथन यांनी जैविक प्रक्रियांचा रेण्विय पातळीवर अभ्यास केला. डीएनए ला ठराविक ठिकाणी छेद देणारे रासायनिक विकर विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले; पण आयआयटी कानपूरमध्ये त्यांना कायमस्वरूपी नेमणूक मिळाली नाही. निरनिराळ्या संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यातच त्यांना समाधान मानावे लागले. 

डॉ. राधा पंत या दिल्ली विद्यापीठातून बी. एससी. पदवी घेणाऱ्या पहिल्या स्त्री विद्यार्थी. पुण्यातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या परिवाराने दिल्ली येथे स्थलांतर केले. १९३० मध्ये दिल्ली येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणतेही महाविद्यालय प्रवेश देण्यास तयार नव्हते. राधा यांच्या वडिलांनी अनेक महाविद्यालयांना भेट दिल्यानंतर सरतेशेवटी 'हिंदू कॉलेज' ने प्रवेश देण्याचे मान्य केले. पुढे राधा यांनी 'सोयाबीनमधील प्रथिने आणि एकूणच त्याचे पोषणमूल्य' यांचा सखोल अभ्यास केला. तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्यांच्या संशोधनाचा खूप उपयोग झाला. 

जैवरसायनतज्ञ डॉ. मेहताब सोहराब बामजी यांनी ‘ब - जीवनसत्वाची कमतरता’ ओळखण्याची चाचणी शोधली. तसेच स्त्रिया आणि बालकांच्या आरोग्याचा अभ्यास केला. 'इंटरनॅशनल युनियन ऑफ न्यूट्रीशनल स्टॅटस' कडून त्यांना सन्मानित करण्यात आले.  वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अर्चना शर्मा यांनी कीटकनाशकांचा शरीरावर होणार परिणाम अभ्यासला. विषाणूतज्ञ डॉ. आशा माथुर  यांनी 'जपानी एन्सेफलायटीस' (एक प्रकारचा मेंदूविकार) या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण कसे होते याचा अभ्यास केला. तसेच या रोगाचे निदान लवकर होण्यासाठी 'इम्युनो फ्लुरोसंट' हे तंत्र विकसित केले. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा ‘टेस्ट ट्यूब बेबी' या तंत्राच्या तज्ज्ञ समजल्या जातात. या तंत्राचा उपयोग करून भारतातील दुसऱ्या  टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म मुंबई येथे १९८६ मध्ये झाला, याचे श्रेय पूर्णपणे डॉ. इंदिरा हिंदुजा यांना जाते. याचबरोबर त्यांनी स्त्रीबीजदान तंत्र विकसित केले. यामुळे रजोनिवृत्ती आलेल्या आणि ज्या स्त्रियांमध्ये अंडाशयाची काही समस्या आहे, त्या स्त्रियांनादेखील मातृत्वाचा आनंद घेणे शक्य झाले.

डॉ. टेस्सी थॉमस यांना 'अग्निपुत्री' म्हणून ओळखलं जातं. भारतीय क्षेपणास्त्र प्रकल्पाची धुरा त्यांनी सांभाळली. क्षेपणास्त्र निर्मिती क्षमता असणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन या राष्ट्रांच्या पंक्तीत बसण्याचा मान भारताला मिळाला. यामध्ये डॉ. टेस्सी यांचे योगदान खूप मोठे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये 'अग्नी' या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाले. 

विख्यात गणितज्ञ डॉ. राजिंदर जीत हंस - गील यांचे बालपण पंजाबमधील खेडेगावात गेले. सुरुवातीला त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था घरीच करण्यात आली. पुढे  त्या बालाचौर येथे काकांकडे गेल्या. पण तिथेही त्यांना ‘मुलगा’ म्हणून शाळेत प्रवेश घ्यावा लागला. हे गुपित फक्त त्यांच्या घरच्या व्यक्तींना आणि मुख्याध्यापकांना माहीत होते. 'डोक्याला टर्बन (फेटा) बांधून भावाबरोबर शाळेत जाताना मजा येत होती’, असे त्यांनी नमूद केले आहे. पुढे त्या गुज्जरवाल येथील हायस्कूलमध्ये दाखल झाल्या. पण तिथेही गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जात नसत. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यासाठी विशेष शिकवणी सुरू केली. 

सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. राधा बालकृष्णन यांनी शाळेतील एक आठवण सांगितली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या मुख्याध्यापकांनी मुलींना असे आवाहन केले की 'मुलींनी शास्त्र शाखेची निवड करू नये, जेणेकरून ती संधी होतकरू मुलांना मिळेल. कारण मुलींना शेवटी लग्नानंतर स्वयंपाकघरच सांभाळायचे आहे.' पुढे जेव्हा त्यांनी पदार्थविज्ञान विषयाची निवड केली तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना, ‘या विषयात मुली कमी असल्याने तू एकटी पडशील आणि तुला तो विषय जड जाईल’ असा सल्ला दिला. डॉ. राधा यांनी अमेरिकेत पीएचडी पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांचे मार्गदर्शक प्रा. रॉबर्ट लेंग यांनी त्यांना इशारा दिला होता, 'भारतात पुरुषांपेक्षा दुप्पट काम करूनसुद्धा तुला अपेक्षित यश मिळणार नाही. स्त्रियांविषयीचा दूषित पूर्वग्रह आणि पुरुषसत्ताक रचना यांचा तुला सामना करावा लागेल.' पुढे त्यांना या शब्दांची चांगलीच प्रचिती आली. भौतिकशास्त्रातील मूलकणांचा अभ्यास करणाऱ्या डॉ. रोहिणी गोडबोले गेल्या दशकातील सर्न (CERN) च्या ‘लार्ज हॅड्रोन कोलायडर’ या प्रकल्पात सहभागी झाल्या होत्या. त्यांना फ्रान्स सरकारने ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट’ हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवले.

 'नंबर थिअरी आणि टोपोलॉजी' वरील अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या गणितज्ञ डॉ. परिमला रामन यांना ‘द वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’ पुरस्काराने २००५ मध्ये गौरवण्यात आले. मागील वीस वर्षातील गणित आणि पदार्थविज्ञान विषयासाठी हा सन्मान मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला होत. 'क्वांटम कम्युनिकेशन' वरील संशोधनासाठी डॉ. अदिती सेन डे यांना २०१८ च्या पदार्थविज्ञान या विषयातील शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवण्यात आले. पदार्थविज्ञान या विषयातील शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला. पदार्थविज्ञान आणि गणित या विषयात संशोधन करणाऱ्या मुलींची संख्या आजही कमीच आहे, याचे हे द्योतक. २०१९ मध्ये विज्ञान दिनादिवशी हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. त्या वेळी एकूण ३३ शास्त्रज्ञांना गौरवण्यात आले, त्यामध्ये डॉ. अदिती या एकमेव महिला होत्या. त्यावेळी न्यूज १८ शी बोलताना अदिती म्हणाल्या, "लग्न आणि मातृत्वाची जबाबदारी आल्यानंतरही संशोधनासाठी निधी आणि रजा मिळू शकते. निधी मिळवणं अवघड नाही, तर पुन्हा प्रयोगशाळेत येऊन नव्याने काम सुरु करणं अवघड असतं." 

२०१५ च्या वैद्यकीय शास्त्रातील शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ. विदिता वैद्य म्हणतात, "मातृत्वाची जबाबदारी आली आणि त्याचवेळी तुमचे करिअर देखील बहरात असेल, तर या दोन गोष्टींमधील संघर्ष अटळ असतो. त्यामध्ये समन्वय साधणं कठीण असतं." नीती आयोगाचा अहवाल असं सांगतो की, मुलींचं विज्ञान क्षेत्रात येण्याचं प्रमाण वाढत आहे. पण, त्या पुढे टिकून राहात नाहीत. बाळाच्या जन्मानंतर पुन्हा त्या परत येत नाहीत. 

शुभा टोळे, राजेश्वरी चॅटर्जी, चारुसिता चक्रवर्ती, मंजू शर्मा, सुदिप्ता सेनगुप्ता, अदिती पंत अशी ही यादी खूप लांब आहे. अनेक प्रेरणादायी घटना यातून पुढे येतात. या सर्वजणींनी केलेले कार्य रोमांचकारी आहे. त्यांची जीवनकथा आणि कार्य विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी एक प्रेरणास्त्रोत बनून राहील. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती अशीच वृद्धिंगत होईल आणि भविष्यात लवकरच नोबेल पारितोषिकावर एका भारतीय महिलेचे नाव कोरले जाईल अशी आशा करूया!

तेजस्विनी देसाई

tejaswinidesai1970@gmail.com

(लेखिका के. आय. टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त), कोल्हापूर येथे पदार्थविज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या महिला वैज्ञानिकांवर अभ्यास करत आहेत.)

संदर्भ -

  1. ‘Women Scientists in India – Lives, Struggles, Achievements’ by Anjana Chattopadhyay, National Book Trust, India.
  2. ‘Lilavati’s Daughters – The women Scientists in India’ Edited by Rohini Godbole, Ram Ramaswamy, The Indian Academy of Sciences, Bangalore, India.
  3. ‘Women Scientists in India: Nowhere near the Glass Ceiling’, Bal Vineeta, Economic and Political Weekly, Vol. 39, No. 32 (Aug. 7-13, 2004), pp. 3647- 3653
  4. Asima Chatterjee: Biog. Mem. Fell. NSA, N. Delhi 32 179-215 (2007)
  5. https://www.ias.ac.in/Initiatives/Women_in_Science
  6. https://www.indiaeducation.net/
  7. https://www.indiascience.in/videos/the-journey-of-women-in-science-e
  8. https://en.wikipedia.org/