इन्क्लुजन यात्रा : एका प्रवासाची नोंद- भाग २
इन्क्लुजन यात्रेला सुरुवात होऊन तीन दिवस झाले होते. शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधताना समावेशनाबद्दल अनेक नवे प्रश्न समोर येत होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि त्यांच्या निरागस प्रश्नांमुळे आत्मविश्वासही वाढत होता. पण चौथ्या दिवसापासून यात्रेने काहीसं वेगळं वळण घेतलं. प्रवासात अनपेक्षित अडचणी आल्या आणि पुढची काही नियोजनं बदलली. त्याच वेळी काही अनोळखी माणसांनी निःस्वार्थपणे मदतीचा हात पुढे केला. या लेखमालेच्या दुसऱ्या भागात दीक्षा दिंडे सातारा आणि कराडमधील अनुभव, संकटाच्या काळात भेटलेली माणसं आणि समावेशनाकडे नव्या दृष्टीने पाहायला लावणारे काही प्रसंग सांगत आहेत.
दिवस चौथा : सातारा, ११ सप्टेंबर २०२६
आज आम्हाला साताऱ्याला वेळेत पोहोचायचं होतं. त्यामुळे सकाळी लवकर आवरून सर्वांची रजा घेऊन आम्ही फलटणहून निघालो. आजच्या सत्रासाठी मी फार उत्सुक होते. डिसॅबिलिटी आणि लॉ यांच्या आंतरछेदावर मोलायचं होतं. कायद्याच्या विद्यार्थ्यांशी फॅसिलिटेशन पद्धतीने संवाद साधण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.
परंतु वाठार स्टेशनपर्यंत पोहोचताच आमची गाडी अचानक बंद पडली. सकाळचे साधारण पावणे नऊ वाजलेले. नेमकं एका गॅरेज समोर गाडी पडली, पण ते अजून उघडलं नव्हतं. तेवढ्यात तिथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या एका दादांनी मदत केली आणि स्वत:च फिटरला बोलावून घेतलं.
फिटरने आल्यावर तपासून पाहिलं आणि सांगितलं की गाडीचा टायमिंग बेल्ट तुटला आहे. त्यांनी सांगितल की हा बेल्ट साधारण एक लाख किलोमीटर गाडी फिरल्यानंतर बदलावा लागतो, पण सर्विसिंग करताना वेळ कमी असल्याने नेमकं त्याकडे दुर्लक्ष झालं आणि तो बदलला गेला नाही. बेल्ट तुटल्याने इंजिनच्या इतर भागांचही नुकसान झालं होतं. अचानक गाडीचं असं मोठं काम समोर आलं होतं. प्रवासात असं काहीतरी कधीनकधी होईल हे आम्हाला ठाऊक होतंच; परंतु ते यात्रेच्या चौथ्याच दिवशी होईल, हे आम्हाला माहीत नव्हतं.
आजतर आम्हाला दहा वाजेपर्यंत साताऱ्यात पोहोचायचं होतं, पण आता ते शक्य होणार नाही हे स्पष्ट दिसत होतं. तिकडे साताऱ्यात आम्ही सुचित्राताईंना फोन करून कळवलं असं असं झालं आहे आणि आम्हाला यायला थोडा वेळ लागेल. किती ते आम्हालाही माहीत नव्हतं. पण ताईंनी अकराचं सेशन पुढे ढकलून बाराला ठेवलं खरं, पण गाडी लगेच दुरुस्त होईल अशी चिन्हं काही आम्हाला दिसत नव्हती.
आम्ही दोघेही खूप घाबरलो होतो. एवढं की रडू येईल म्हणून एकमेकांकडे न पाहत बसलो. आम्हा दोघांमगे अशी काही टीम नव्हती त्यामुळे आम्हालाच परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागत होते. शेवटी आम्ही आजच्या दिवसाचा प्लॅन कॅन्सल करायचं ठरवलं. त्यानुसार आधी सातारा,नूने येथील एका शाळेचं सत्र रद्द केलं.
साताऱ्यातलं लॉ कॉलेजचं सत्र उद्यावर ढकलता येईल का असा विचार झाला, पण ते शक्य नव्हतं. दरम्यान अनेक फोन येत होते, पण गाडीचं काय करायचं हे ठरत नव्हतं. तेवढ्यात सुचित्राताईंचा फोन आला आणि त्यांनी अॅड. अश्फाक यांचा नंबर दिला. त्यांचे भाऊ गाडी बंद पडली तिथे जवळच गॅरेज चालवत होते. त्यांच्याशी बोलणं झालं. ते आले आणि त्यांनी आमची गाडी त्यांच्या शहा मोटर्सकडे टो करून नेली. आता ही गाडी म्हणजेच रखुमाई आम्हाला पाच ते आठ दिवसांनी मिळणार होती.
याच वेळी मनीषा पाटील मॅडमने फोन केला. सकाळीच कोल्हापूरच्या संदर्भात बोलताना मी त्यांना माझा नंबर दिला होता. आमची अडचण समजताच त्यांनी लगेच वाठारहून साताऱ्यापर्यंत जाण्यासाठी एका गाडीची सोय करून दिली.
लॉ कॉलेजमधलं अकराचं सेशन बाराला, बाराचं एकला आणि एकचं दोनला शिफ्ट झालं. मनीषाताईंच्या मदतीने अखेर पावणे दोनला आम्ही साताऱ्यात पोहोचलो. कॉलेजच्या स्टोअर रूम मध्ये गाडीतलं सामान अमोलने उतरवून ठेवलं.
गेल्या गेल्या कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वैशाली जाधव यांनी काळजीपूर्वक विचारलं, "तुमची फार दगदग झाली असेल, आधी जेवून घेताय का?"
हे ऐकून डोळ्यात पाणी आलं. सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, बाथरूमलाही जाऊ शकलो नव्हतो. गाडीचा अनपेक्षित खर्च, ताणतणाव यामुळे मन खूप अस्वस्थ होतं. पण कॉलेजमधले सर्वजण आमच्यासाठी जेवायचे थांबले होते. आम्ही सगळे मिळून जेवलो आणि मग विद्यार्थ्यांशी संवादासाठी निघालो.
उशिरा आल्याबद्दल विद्यार्थ्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि मग सत्र सुरू झालं. विद्यार्थ्यांशी चर्चा करताना पुन्हा सगळा उत्साह परत आला.
यानंतर आमची आणखी एक महत्त्वाची बैठक साताऱ्यातील मुलामुलींच्या बालगृहात झाली. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बालकल्याण समिती, समाजकल्याण विभाग अशा विविध शासकीय यंत्रणा उपस्थित राहिल्या होत्या. बालकांसाठी काम करताना येणाऱ्या अडचणी, कुटुंबांना भेडसावणारे प्रश्न, तसेच साताऱ्यात होणाऱ्या डिसॅबिलिटी कॅम्पचं नियोजन यावर सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली.
माझ्या lived experience च्या आधारे आम्ही आमची मतं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायमूर्ती निना बेदरकर, बाल न्याय मंडळ साताऱ्याच्या प्रमुख न्यायदंडाधिकारी डिंपल सैंदणे आणि इतर विभागीय अधिकाऱ्यांसमोर मांडली. या चर्चेतून सरकार अपंग मुलांसाठी कोणत्या योजना राबवतं, त्या प्रत्यक्षात कशा कार्यरत होतात, तसेच साताऱ्यातील संस्था कशा प्रकारे काम करतात याची माहिती मिळाली.
आज आयुष्यात पहिल्यांदाच मी बालगृहात गेले. इथली मुलं कशी येतात, त्यांचा बॅकग्राऊंड काय असतो, त्यांच्यासाठी नेमकं काय काम केलं जातं, हे जवळून पाहता आलं. हा अनुभव खूप वेगळा आणि भावनिक होता. अॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर (अध्यक्ष, बाल कल्याण समिती, सातारा) आणि सुजाता देशमुख (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, सातारा) यांनी ही माहिती आम्हाला समजावून सांगितली.
यादरम्यान मनीषा पाटील मॅडम यांनी आम्हाला त्यांची स्वत:ची गाडी दोन दिवसांसाठी देऊ केली. त्यामुळे दोन दिवसांची काळजी मिटली.
संध्याकाळी आम्ही आमचे मित्र सुजित काळंगे यांच्या घरी गेलो. त्यांच्या काकूंच्या हातच पोटभर जेवण आणि मनमोकळ्या गप्पांमधून दिवसाचा सगळा थकवा निघून गेला.
अशा प्रकारे आमचा चौथा दिवस अनेक अडचणींनी आणि नवीन अनुभवांचं संचित घेत संपला.
काही गोष्टी आपल्या हातात नसतात; त्या फक्त वेळेवर सोडायच्या असतात, हे आजच्या दिवसाने आम्हाला शिकवलं.
दिवस पाचवा : सातारा, १२ सप्टेंबर
कालच्या गोंधळामुळे आजचा दिवस निवांत सुरू केला. अमोलची तब्येत कालपासून थोडी बिघडायला सुरुवात झाली होती. कणकण, सर्दी आणि खोकला यामुळे आवरून नाश्ता करून डॉक्टरकडे जाणं हीच आजची प्रायोरिटी होती.
कालची रात्र आम्ही सुजित यांच्या घरीच थांबलो होतो. त्यांनीही आमची व्यवस्थित काळजी घेतली. रात्री घरात ठेवलेलं सामान पुन्हा एकदा अमोलने गाडीत टाकलं आणि तिथून आम्ही आमची मैत्रीण भाग्यश्रीकडे गेलो. तिथे थोडा वेळ गप्पा मारल्या, फ्रेश झालो (वेस्टर्न टॉयलेट : एक शोध मोहीम – या आगामी चित्रपटामधून!) आणि अमोल डॉक्टरकडे जाऊन आला. मित्र सुजित हेही यावेळी सोबत होते.
दुपारी बारा वाजता सुचित्रा ताईंनी आम्हाला यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सातारा येथील कम्युनिटी रेडिओ रयतवाणी येथे जाऊन यायला सांगितलं होतं. तिथे आमची भेट प्रवीण कोळपे यांच्याशी झाली. त्यांच्याकडून कॉलेजमधील अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा, रयतवाणीचं काम आणि तिथली कार्यपद्धती याविषयी समजून घेता आलं.
सातारा शहराच्या साधारण पंचवीस-तीस किलोमीटरच्या परिसरात हा रेडिओ श्रोते ऐकतात. रयतवाणी हा रयत शिक्षण संस्थेचा उपक्रम आहे. प्रवीण आणि त्यांची एक सहकारी पूर्णवेळ तिथे काम करतात. शिवाय कॉलेजचे विद्यार्थी ‘कमवा आणि शिका’ योजनेतून इथे रेडिओ जॉकीचं प्रशिक्षण घेतात आणि विविध कार्यक्रम हाताळत प्रत्यक्ष कामाचाही अनुभव घेतात.
रयतवाणीमध्ये प्रवीण यांनी माझी छोटीशी मुलाखत घेतली आणि ती अतिशय भन्नाट झाली! प्रवीण यांनी मुलाखतीसाठी अतिशय संवेदनशील प्रश्न विचारले होते. त्यांना मला माझं अपंगत्व कसं आलं, मी कशी राहते किंवा माझ्या आयुष्यातील नकार, हे काही विचारायचं नव्हतं. त्यांना अपंगत्व म्हणजे काय, कायदा काय सांगतो, शासनाच्या योजना कोणत्या आहेत आणि अडथळे दूर करणं का महत्त्वाचं आहे, हे जाणून घ्यायचं होतं.
यशवंतराव चव्हाण कॉलेजने सुगम्यतेवर केलेलं काम पाहतच मी रेडिओ स्टेशनवर पोहोचले होते. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं देताना योग्य संदर्भांसह अनेक गोष्टी त्यांना समजावून सांगता आल्या. मुलाखत झाल्यावर प्रवीणचे आभार मानून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
पुढचं ठिकाण होतं यशवंतराव चव्हाण एम.एस.डब्ल्यू. कॉलेज. हे कॉलेज १९९४ साली ‘उपरा’कार लेखक, पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सुरू केलं. साधारण सात वर्षांपूर्वी मी इथे नेहरू युवा केंद्राच्या कार्यक्रमासाठी माझे मेंटॉर यशवंत मानखेडकर सर, मैत्रीण पूजा आणि मित्र सौरभ, निहाल यांच्यासोबत आले होते. सात वर्षांनी कॉलेजच्या प्राचार्या शॅली मॅडम यांना भेटून खूप आनंद झाला.
सात वर्षांपूर्वी इथे बोलायला आलेली दीक्षा किती घाबरलेली होती! तेव्हा माझं बोलणं फक्त माझ्या गोष्टीपुरतंच मर्यादित होतं. पण आजची दीक्षा भारतातल्या २.६ कोटी अपंग व्यक्तींची गोष्ट सांगत होती.
माझ्यातला हा बदल पाहून मलाच फार वेगळं वाटत होतं. हा सात वर्षांमधला बदल आपण कसा मोजू शकतो, याचं परिमाण मात्र सापडत नव्हतं.
एम.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांसाठी अपंगत्व आणि त्याचा आंतरछेद या विषयावर आम्ही हे सत्र नियोजित केलं होतं.
डेव्हलपमेंट प्रोफेशनल म्हणून जेव्हा तुम्ही गावोगावी, वस्त्यावस्त्यांत लोकांमध्ये काम करायला जाणार आहात, तेव्हा प्रत्येक व्यक्तीशी सहसंवेदनेने वागणं आणि त्यांच्या अडचणी, गरजा व हक्क समजून घेणं किती महत्त्वाचं असतं, हे आम्ही विविध उदाहरणांद्वारे समजून घेतलं.
सगळी चर्चा झाल्यावर विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची रजा घेतली. तेवढ्यात पुढील प्रवासासाठी सुनील दादा आम्हाला कराडला न्यायला आला. मग पुन्हा मनीषा मॅडमच्या गाडीतलं सामान सुनील दादाच्या गाडीत टाकलं. सुजित आणि गणेश यांचा निरोप घेत आम्ही कराडला निघालो.
घरी पोहोचल्या-पोहोचल्या माझी छोटी मैत्रीण गरिमाने गालगुच्चे घेत आणि मिठी मारत आमचं स्वागत केलं. खूप महिन्यांनी अमृता वहिनी, गरिमा आणि सुनील दादा यांच्याशी भेटता आलं. छान गप्पा झाल्या.
एकमेकांच्या घोरण्याचे आवाज ऐकत आम्ही मस्त झोपून गेलो.
दिवस सहावा : कराड, १३ सप्टेंबर
आज सकाळची शाळा असल्याने आम्ही सकाळी लवकर उठलो. आवरून झाल्यावर अमृता वहिनींच्या हातचा छानसा नाश्ता करून आम्ही सगळे सैदापूरच्या जिल्हा परिषद शाळेकडे निघालो.
ही आमच्या गरिमाची शाळा.
आज शनिवारी असल्या कारणाने शाळेत आनंदीदायी शनिवार साजरा होणार होता. शनिवार म्हणजे मुलांना विविध उपक्रम करण्याची मोकळीक होती. याचा फायदा घेत आज मी विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणार होते.
शाळा प्रचंड सुंदर आणि प्रसन्न होती. तिथे पोहोचताच मला माझी स्वतःची शाळा आठवली. एका क्षणात कात्रजच्या महानगर शाळेपासून ते यूकेमधील IDS पर्यंतचा माझा प्रवास डोळ्यासमोरून झरझर सरकून गेला.
इथले शिक्षक, विशेषतः मुख्याध्यापक बागुल सर, अत्यंत उत्साही आणि प्रयोगशील आहेत. गोष्ट सांगून झाल्यावर मुलं आणि शिक्षकांसोबत थोड्या गप्पा झाल्या. त्यानंतर आपले अनुभव सांगताना बागुल सर म्हणाले, "मॅडम, आजचा पहिला असा आनंदीदायी शनिवार आहे जेव्हा आमच्या मुलांना आम्ही 'शांत बसा' हे सांगितलं नाही. आम्ही पहिल्यांदाच त्यांना इतकं गुंग झालेलं पाहिलं आणि त्यामुळे आम्ही तुमच्या शेजारी निवांत बसून गोष्ट ऐकू शकलो." हा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
शाळेबद्दल सांगताना बागुल सर त्यांनी अपंग विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रयत्नांविषयीही बोलत होते.
ते म्हणाले, "बऱ्याचदा इथले इतर शिक्षक शाळेत एखादं अपंग मूल आलं की त्यांच्या पालकांना 'यांना विशेष मुलांच्या शाळेत पाठवा' असं सांगायचे. पण मी माझ्या सहकाऱ्यांशी बोललो आणि त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अपंग मुलं इथेच शिकायला आली तर त्याचा फायदा फक्त त्यांनाच नाही, तर इतर मुलांनाही होतो. आज आमची मुलं एकमेकांशी मिळून-मिसळून राहतात. अपंग नसलेली मुलंही अपंग मुलांना सोबत घेतात, त्यांची मदत करतात, त्यांच्याशी खेळतात. आम्ही अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून समावेशन घडवून आणतो."
अशा छोट्या कृतीतून हे शिक्षक समावेशन खरंच जगत होते आणि अमलात आणत होते, हे पाहून खूप भारी वाटलं.
आता आम्हाला पुढच्या मुक्कामाला न्यायला मित्र स्वप्निल आला होता. पुन्हा एकदा सुनील दादाच्या गाडीतलं सामान स्वप्निलच्या गाडीत टाकलं आणि पुढे आम्ही वडगाव हवेलीच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाकडे निघालो.
खरं सांगायचं तर या आठवड्यातला सर्वांत अवघड, पण तितकाच भन्नाट संवाद इथे घडला. अमोलची वर्गमैत्रीण शैलजा इथे शिक्षिका आहे. तिच्यामुळे हा संवाद सहज शक्य झाला.
परंतु विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुरुवात केल्यावर जाणवलं की त्यांना या विषयात विशेष रस नव्हता. वर्गातील काही मोजके विद्यार्थी सोडले तर बाकीचे आपापसात गप्पा मारत होते.
शैलजा रोज या विद्यार्थ्यांना कसं हाताळत असेल, या विचारानेच आम्ही मनोमन तिला हॅट्स ऑफ केलं.
या सगळ्या मुलांमध्ये ओमराजे नावाचा मुलगा त्याच्या उत्तरांमुळे विशेष उठून दिसत होता. संवादाच्या सुरुवातीलाच मी काही प्रश्न विचारले होते. त्यामध्ये मुख्य प्रश्न होता, "अपंग म्हणजे काय आणि ते आपल्या आयुष्यात कधी येऊ शकतं?" त्याने दिलेल्या उत्तराने माझ्या पूर्ण संवादाचा शेवट झाला.
तो म्हणाला, "दीदी, अपंग म्हणजे मानसिक असतं, शारीरिक असतं. पण ते काय फक्त जन्मताच नसतं. ते कधीपण होऊ शकतं. अपघात झाला तरी माणूस अपंग होऊ शकतो की." एवढ्या लहान वयातली त्याची समज ऐकून मला खूप आनंद झाला.
पुढे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत ही संकल्पना मुलांना समजावून सांगण्यात मी थोड्याफार प्रमाणात यशस्वी झाले होते.
अशा प्रकारे हा शनिवार दुपारी साधारण एकच्या सुमारास संपला.
त्यानंतर आम्ही कुंडलला अंकुश दादांना भेटलो आणि पुढच्या टप्प्यासाठी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालो.
यात्रेचा हा टप्पा पुढे जात होता. गाडी बदलत होती, मुक्काम बदलत होते, माणसं बदलत होती; पण एक गोष्ट कायम होती—प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात समावेशनावर विश्वास ठेवणारी काही माणसं नक्की भेटत होती. आणि कदाचित हीच या यात्रेची खरी ताकद होती. पुढचा प्रवास आता कोल्हापूरच्या दिशेने सुरू होणार होता…
क्रमशः
- दीक्षा : diksha.d.30@gmail.com