नायक खलनायक झाले... का?

११ नोव्हेंबर २०२५

माध्यमांतर

मालवणी कॉलनीच्या गल्ल्यांमधून दिसणारी ही कथा म्हणजे आपल्या समाजाचं वास्तव आहे. ‘नायक खलनायक झाले... का?’ या प्रमोद निगुडकर यांच्या लेखात अशफाक, मिलिंद, पप्पू यांसारख्या तरुणांची कहाणी आहे. एकेकाळी ते सगळ्यांचे आवडते, वस्तीतले नायक होते. पण हळूहळू परिस्थिती, बेरोजगारी आणि आधाराचा अभाव यांनी त्यांना चुकीच्या वाटेवर नेलं. हा लेख त्यांच्या चुका दाखवतो, पण त्याचबरोबर आपला समाज, आपली व्यवस्था आणि आपणही त्यात कुठे कमी पडलो हेही दाखवतो. या लेखात निगुडकर साध्या शब्दांत प्रत्येक खलनायक कधीकाळी आपल्या गल्लीतला नायक होता, हे एक कठोर सत्य मांडतात. निगुडकर विप्ला फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तसेच ते केशव गोरे स्मारक ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. (पुरुष उवाच, दिवाळी 2024 मधून साभार.)

मालवणी कॉलनी ही मुंबईतील पश्चिम उपनगरात खाडी मध्ये 1970 दरम्यान बसवलेली वसाहत. आजूबाजूला छोटी छोटी गावं, भरतीचं पाणी भरणारी मैदानं, तुरळक झुडपं असणारी मिठागरांचं पठार, काही ताडामाडाची झाडं आणि गावकऱ्यांच्या वाड्या. दहा बाय पंधराच्या खोल्यांची दहा दहा खोल्या असणाऱ्या चाळींनी तयार केलेली ही जवळपास 1500 खोल्यांची कॉलनी. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नगरपालिका किंवा शासनाच्या विविध खात्यांमध्ये निम्न स्तरावर काम करणारे अन्य कर्मचारी रहात असत.

पुढील वीस वर्षांत आजूबाजूचे पठार जाऊन तिथे वस्त्या आल्या, मुंबईचं सिंगापूर करायचं म्हणून दक्षिण मुंबईतील म्हणजे मुख्य शहरातील झोपडपट्ट्या हटवून शहराबाहेरील गावं सदृश्य मालवणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर हजारो झोपड्यांचं नवं शहरी गाव बसवण्यात आलं. गावं, वाड्या, मिठागरं जाऊन घरं, चाळी येऊ लागली. शहरीपणात असलेला भकासपणा सर्वदूर पसरू लागण्याचे ते दिवस होते. त्यादरम्यान याच वस्तीत राहून मला खूप जवळून पाहता आलेल्या या गल्ल्यांमधल्या नायकांची ही गोष्ट.

मुंबई पोलीसमधून शिपाई म्हणून निवृत्त झाल्यावर सैयदभाई आपली आठ मुलं, एक मुलगी आणि त्यांची आम्मा यांच्यासहित मालवणी कॉलनीमधल्या 150 चौरस फुटाच्या पुढं मागं थोडं वाढविलेल्या घरात राहायला आले. आपला पहिला नायक अशफाक हा भावंडांतील वरून पाचवा. सर्व कुटुंब हसत खेळत राहणारं. तसाच अशफाक सुद्धा लहानाचा मोठा मुंबईतील डोंगरी पायधूनी विभागात झालेला. सुंदर मराठी बोलणारा आणि स्टाईलमध्ये राहणारा अशफाक थोडा आखडू वाटायचा पण जॉली होता. अशफाक अंजुमन इस्माईल या प्रथितयश शाळेतून त्यांच्या क्रिकेटच्या टीममधून खेळत असे. तो चांगला बॅट्समन आणि जलद गती गोलंदाजही होता. मालवणी कॉलनीत येताच त्याने क्रिकेट टीमची स्थापना केली. सर्वांबरोबर तो खेळू लागला. सगळ्यांची मनं जिंकू लागला. मॅचेस जिंकू लागला आणि अशफाक हळूहळू विभागांमध्ये एक चांगला खेळाडू आणि मित्र म्हणून परिचित झाला. डे नाईट मॅचेसचा काळ अजून यायचा होता त्याचवेळी मालवणी कॉलनीसारख्या विभागामध्ये रात्री आणि दिवसांचा क्रिकेटचा महोत्सव या पठ्ठ्याने इतर मित्रांबरोबर मिळून घडवून आणला होता. त्यासाठी सिनेसृष्टीतील लाईट बॉय म्हणून काम करणाऱ्या आपल्या मित्रांना सोबत घेऊन अख्खं मैदान दिव्यांनी भरून टाकलं होतं.

छोट्यांसोबतच मोठ्या मुलांमध्ये सुद्धा अशफाक प्रसिद्ध होऊ लागला. गल्लीतील सणांमध्ये, मित्रांच्या घरातील गणपतीमध्ये असा सगळीकडे त्याचा वावर असायचा. सर्वच ठिकाणी सगळ्यांना मदत करायला आणि त्यांच्या बरोबरीने राहायला त्याला आवडत असे. कॉलर वर करून छाती पुढे करून चालताना सगळं जग आपल्याकडे बघतंय आणि आपण हिरो आहोत असं त्याला वाटायचं.

घरात दहा बारा माणसं, मनानं छान असणारी आई सर्वांचं करताकरता चीड चीड करायला लागलेली, छोट्या मोठ्या कारणानं घरात भांडणं, पैशाची चणचण, अशफाककडून अपेक्षा, त्याची होणारी घुसमट आणि बोलायला कोणीच नाही, अशा वातावरणात अशफाकचं तरुणपण त्याला खुणावत होतं. अधूनमधून कधीतरी कोपऱ्यावरती विडी ओढताना किंवा चाळीच्या मागे मोठ्या मुलांबरोबर जुगाराचे पत्ते खेळताना अशफाक दिसायला लागला. कुणीतरी सांगितले की अशफाकने शाळा सोडली. तो आता दिवसभर इकडे तिकडे फिरू लागला आणि जो कोणी असेल त्याची संगत करू लागला. मला हे सगळं आवडत नाही, मला आता सुधारायचं आहे असं म्हणून कधीतरी त्यानं एक कामही धरलं आणि तो नियमित कामाला जाऊ लागला. घरात पैसे देऊ लागला. याच दरम्यान शेजारच्या चाळीत असणाऱ्या एका सुषमा नावाच्या मुलीबद्दल त्याला प्रेम वाटू लागलं होतं. याच्या प्रेमाची तिला कदाचित कल्पनाही नव्हती. तो तिच्यासाठी चाळीच्या प्रदिक्षणा मारू लागला. विड्याची बंडलं संपवू लागला. त्याला दोन मोलाच्या गोष्टी सांगणारं कोणी नव्हतं आणि तो कोणाकडे गेला नाही.

मुंबईत उसळलेल्या दंगली मालवणीतही डोकं वर काढत होत्या. अशाच एका दंगलीच्या वेळी संशयावरून पोलिसांनी त्याला खूप चोपलं. पोलिसांचा मार शारीरिकपेक्षा मानसिकदृष्ट्या अशफाक सहन नाही करू शकला आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. तो आता दिवसेंदिवस घराबाहेर रस्त्यावर एकटक बघत बसे. कोणाशी बोलत नसे. एक दोन वेळा तो नाहीसा झाला मग काही दिवसांनी त्याला कोणीतरी कोठेतरी लांब पाहिलं आणि परत घराजवळ आणलं. शेवटचा तो लापता झालेल्याला आता बरीच वर्षं झालीत. तो कदाचित परत येणार नाहीय आता.

दुसरा नायक मिलिंद. मिलिंदची आई नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षिका. मोठा भाऊ कॉलेजला जाणारा आणि बहीण नोकरी करणारी. मिलिंद शाळेत असल्यापासून अभ्यासात जेमतेमच, पण हुशारीने पास होणारा आणि वर्गात काही एक मुलांच्या गटाचं नेतृत्व करणारा, खेळात पुढे असणारा आणि गरज पडल्यास मारामारीतही पुढे असणारा मुलगा. आपल्या वस्तीमध्ये सर्वांची कामं करून देणे. सर्व मुलांना एकत्र करून महोत्सव घडवून आणणं. त्याने त्याच्या वस्तीमध्ये कबड्डीचे सामने सुद्धा खूप हिमतीने घडवून आणले होते. एक नाही तर अनेक वर्षं या सामन्यांचं आयोजन त्याने केले. कबड्डीबरोबर क्रिकेट, खो-खो असे अनेक खेळ त्यांनी आपल्या वस्तीमध्ये सुरू केले. त्याच्या स्पर्धा भरवल्या आणि अनेक वर्षं नेमाने चालवल्यासुद्धा. तो सर्वांबरोबर सर्वांना सोबत घेऊन काम करणारा अशी त्याची ख्याती होती.

मिलिंद अभ्यासात जेमतेमच असल्यामुळे असेल कदाचित किंवा अन्य कारणांमुळे त्याने पुढील शिक्षण घेतले नाही. कामधंद्याच्या बाबतीतही तो पुढे फार काही करू शकला नाही. छोटासा व्यवसाय करण्याचाही प्रयत्न त्यानी केला पण जमला नाही. नंतर सर्वचजण करतात त्याप्रमाणे नगरपालिका किंवा शासनाच्या एखाद्या कचेरीत शिपाई किंवा अन्य काही काम करता येईल का अशी धडपड त्यानी केली. पण फार काही पुढे झाले नाही. घरात अन्य कमावणारे सदस्य असल्यामुळे घरच्या आर्थिक बोजाची फार काळजी त्याला नव्हती. त्याच्याकडून फार तशा अपेक्षाही नव्हत्या. मिलिंद सतत एक पुढारी म्हणून किंवा गल्लीतला का होईना नायक म्हणून ताठ मानेने वावरलेला व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावरती हे दडपण नक्कीच आले असेल. मिलिंदचा मित्र परिवारही खूप मोठा होता. पण वैयक्तिक प्रश्न किंवा अडचणी मोकळेपणे बोलाव्यात आणि त्यातून मार्ग काढावा अशी चर्चा त्यामध्ये होत होती की नाही कळायला मार्ग नाही. नसावीच बहुतेक. शिक्षिका असणारी आई दरम्यानच्या काळात गेली होती. घरामध्ये आणि बाहेरही मोकळेपणाने बोलायला किंवा मनातील काही सांगायला कोणी नसल्यामुळे मिलिंदची घुसमट झाली असावी.

एक दिवस कळले की मिलिंद खूप दारू पित असे. त्याने नोकरी धंदा सोडून तो रस्त्याने येईल त्याच्याशी भांडत कोठेही पडून राही. त्यातच त्याचा ऐन तिशीत शेवट झाला. ओळखीच्या एका मित्राला विचारले की नेमके काय झाले त्यावेळी कळलेली हकीगत अशी. मिलिंद ज्या चाळीत राहत असे त्या चाळीत अनेक वर्षं किंबहुना त्याच्या लहानपणापासून राहणारे कुटुंब ज्याला ते आणि तो सुद्धा त्यांना आपल्या घरच्यासारखेच मानत असे त्या कुटुंबातील मोठ्या मुलीबद्दल मिलिंदला आकर्षण वाटायला लागले होते. त्याने तसे एकदा तिच्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला पण त्या मुलीने आणि तिच्या घरच्यांनी त्याला दाद दिली नाही. यानंतर मिलिंद अधिक ढासळला आणि भरकटल्यासारखा वागू लागला. दरम्यानच्या काळात मागील चाळीतील एका अल्पवयीन मुलीला मिलिंदनी हात लावला आणि अधिक प्रसंग करण्याचा प्रयत्न केला अशी आवई उठवली गेली. आता त्याच्याकडे सगळे संशयाने पाहू लागले यामुळे मिलिंद अधिकच खंगला. दारू पिण्यातच त्याचा अखेर रस्त्यावर झाला.

पप्पू म्हणजे प्रताप जाधव या तिसऱ्या नायकाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही बातमी जेव्हा वस्तीमध्ये पसरली तेव्हा सगळ्यांना आश्चर्यच वाटले. पप्पू तसा खूप बिनधास्त आणि मोकळ्या मनाचा मुलगा. वस्ती मधल्या सगळ्या लहान थोरांना आपला वाटणारा. पडेल ते काम करणारा. सतत इकडून तिकडे धावणारा हा पप्पू गावावरून आपल्या मोठ्या भावाकडे जेव्हा राहायला आला, त्यावेळेला बावळट, धड कपडे न घालता येणारा पप्पू होता. म्हणूनच की काय त्याला पप्पू म्हणत असावेत. पण हाच पप्पू नंतर एक स्टायलिस्ट युवक म्हणून वस्तीमध्ये ओळखला जाऊ लागला. पप्पूनेही अनेक चांगल्या गोष्टी वस्तीमध्ये केल्या. व्यायामशाळा चालवली. कबड्डीचे सामने खेळवले. दहीहंडी, गणपती यासारखे सार्वजनिक उपक्रमही राबवले. काय झाले कोणास ठाऊक पण पप्पूने असे करायला नको होते असे सर्वांनाच वाटले. काय झाले असावे. जे कळले ते असे होते पप्पू मागच्या चाळीत राहणाऱ्या रीना सावंत नावाच्या अतिशय सुंदर आणि हुशार सुद्धा असणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला होता. रीना खूप सुंदर, हुशार असल्यामुळे तिच्यावर चाळीतील अनेक मुलांचा डोळा होता. चाळीतील भाषेत सांगायचे तर अनेक मुलं रांगेत उभे होते आणि तिच्यावर लाईन मारत होते. रीनाही हे सगळं ओळखून होती. रीनाचा एक मानलेला भाऊ होता जो तिला काय चांगलं काय वाईट, काय करावं आणि काय करू नये याची आठवण करून देत असे. मार्गदर्शन करत असे त्याच्यामुळे रीना कोणाच्याही हाताला लागत नव्हती. तर रीनाच्या मोकळ्या स्वभावामुळे आणि गमतीजमती करण्यामुळे अनेक मुलांचे गैरसमज होत असत. तसेच काहीसे कदाचित पप्पूचेही झाले असावे. पप्पू आणि रीनाची खूप चांगली मैत्री होती. खूप वर्षं ते मित्र म्हणून एकत्र होते. गप्पा मारायचे. एकत्र खेळायचे. वस्तीमध्ये चक्करही मारायला इतर मित्रांबरोबर एकत्र जायचे. यातूनच पप्पूला तिचं अधिक आकर्षण वाटू लागले असेल आणि जेव्हा रीनाने त्याला पसंती न दाखवता इतर मुलाबरोबर जाणे पसंत केले तो धक्का कदाचित पप्पू पचवू शकला नाही आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे.

अशफाक, मिलिंद, पप्पू, सादिक, चंद्रशेखर, मयूर अशी अनेक नावं घेता येतील. मुलंच नाही मुलींच्या बाबतीतही अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांना कदाचित चांगले मार्गदर्शन समुपदेशन किंवा सल्ला मिळाला असता तर ही मुलं कदाचित आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे गेली असती आणि एवढेच नव्हे तर ते त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी सुद्धा भरीव कामगिरी केली असती. चांगले, बोलणारे मित्र, युवकांना त्यांच्या स्वतःची ओळख, भूमिकांची जाणीव, भावभावनांचा मेळ घालण्याचं कौशल्य आणि मोकळं होता येईल असा अवकाश देणारं व्यासपीठ जर असतं तर हे सगळे नायक आज आपल्यात असते असं सारखं वाटतं राहतं.

हे नायक असे खलनायक झाल्यासारखे का झाले किंवा वागले असतील. वरवर पाहता हा त्या त्या व्यक्तींचा वैयक्तिक प्रश्न वाटू शकतो. ते नीट नाही वागले त्याला आपण काय करणार असंही काही म्हणू शकतात. पण हा खरंच वैयक्तिक प्रश्न आहे की याला अधिक गुंतागुंतीचे इतर पदर आहेत हेही पाहणं आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आणि काही शास्त्रीय अभ्यासातून आपल्याला जी समजतात ती कारणं फक्त वैयक्तिक स्वरूपाची नाहीत. त्याला त्या त्या व्यक्तीची जैव रासायनिक म्हणता येईल अशी परिस्थिती हे एक कारण असू शकेल पण त्या पलीकडे जाऊन त्याचे भवताल, आजूबाजूचे वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती त्यातून निर्माण होणारे ताणतणाव, शैक्षणिक आणि अन्य अपेक्षा, कौटुंबिक समस्या, उपलब्ध असलेला आधार आणि अलीकडच्या काळात पुरुषत्त्वाचा गंड तयार करणारी माध्यमांचा खूप मोठा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही.

अशफाक, संदीप, पप्पू यांना नायक करणारा समाज त्यांना खलनायक बनवतो किंवा बनू देतो कसा, हे पाहायला हवं. सर्व काही भव्य दिव्य असावं, मोठं असावं असं मानणाऱ्या या काळात आपल्या गल्ल्या, वस्त्या आणि छोटे छोटे समाज घटक हे मानसिक आरोग्याची आणि चांगलेपणा जपण्याची छोटी छोटी ठिकाण झाली पाहिजेत. अन्यथा चांगल्या वाईटाचा तोल सांभाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या 10 ते 12 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणातील तरुणाईला आपणच वाईटाच्या खाईत लोटण्याचं पातक करू.