तिची सूर्याची भाषा
“बाई, भाजी घेताय का?” मी म्हटलं, “थांब. मी पांच मिनिटांत येते. एक महत्वाचा फोन आहे.” तर ती मला म्हणाली, “बाई तुमच्याबरोबर बोलाक थांबलू, तर माझी भाजी खपाची नाय. काल माका भाजी अशीच घराक परतून न्हेवची लागलू.” मी म्हटलं, तुझ्याशी मला बोलायचं आहे. तर म्हणाली, “माका बोलाक येळ नाय. आम्ही अशी भाजी नाय तर मासे विकतलू, तेव्हा आमचा घर चलतलू. उद्या मी मासे घेवण येतू, मासे खपल्यावर मी बोलतलू.”
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती बाई दुपारी एकच्या सुमारास आमच्या दारात हजर झाली. जुजबी बोलणं झाल्यानंतर मी तिला बोलतं केलं. “तुला मी कोणत्या नावानं हाक मारू?”” “लता. मला तुम्ही लताच म्हणा.” “तू कुठल्या गावची?” “मळगावची?”
“हा मासे विक्रीचा व्यवसाय केव्हापासून करतेस?” “कोरोंनातता लॉकडाऊन झालानू तेव्हापासून.” लता घरोघरी फिरून भाजी विकणारी बाई. अंगावर घट्ट लपेटलेलं पाचवारी पातळ आणि कपाळावर लालभडक ठसठशीत कुंकू! आमच्या भागात ती मला नव्यानं दिसली. सुरुवातीला भाजीविक्री करणारी लता, शेजारच्या बाईबरोबर शिरोडयाच्या समुद्रावर शिंपले म्हणजे तिसरे काढायला जाऊ लागली. त्यात तिला जास्त पैसे मिळू लागले. तिचा अधू नवरा घरकामात लक्ष घालत असे. त्यामुळं तिनं बाहेरचं काम करणं सुरू केलं.त्यात एकुलता एक मुलगा. तोही बऱ्याच वर्षांनी जन्माला आलेला. त्याच्या संगोपनात लतानं आई म्हणून आणि त्यानं बाप म्हणून कधी कुचराई केली नाही.
काही वर्षांतच जेमतेम लिहायला वाचायला शिकलेली लता, लग्नानंतर घरचा आर्थिक भार पेलण्याइतपत सक्षम बनली खरी, पण एका अल्लड मुलीचं बाईत रूपांतर होताना ती रडली नसेल का? आणि रडली असेल तर, आपलं रडणं तिने कुणाला ऐकवलं असणार? जर घराच्या भिंतीनीच तिला सावरायला हात दिले नसतील तर तिनं नेमकं कुणाकडे हात पसरले असतील? की रोज रडून मरून, तडफडून तिनं आपल्या मनाच्या खिडक्याच बंद करून घेतल्या असतील? इतर स्त्रियांच्या बाबतीत असं काहीतरी घडत जातं. ज्यांना माहेर तुटलेलं असतं आणि सासरचा मांडव कुरकुरत असतो, त्यांच्यासाठी रोजचं जगणं हे चुलीवरच्या जाळाइतकंच भाजून पोळून टाकण्यासारखं असतं.
माझ्या मनात अनेक प्रश्न मालिका सुरू झाल्या.
लता पुढे सांगू लागली, ती जिथे तिसरे काढायला जायची, त्या किनाऱ्यावर एक मुलगी रोज तिच्या शेजारी येऊन बसायची. तिचे केस ओढ, साडीला हात लाव केसांतली फुलं काढून घे असे चाळे करायची.तिलाही लळा लागला त्या पोरीचा. रोज कामाला जाताना ती चुरमुऱ्याचे लाडू, चणे, शेव घेऊन जाऊ लागली.
मी म्हटलं, “कमाल आहे लता तुझी?”
लता म्हणाली, “ कमाल कसली आमचा पॉट तसा तेचा पॉट. बाई, एक दिवस तेनी माजो हात धरल्यान आणि आणि माझ्या पायात लोळण घातल्यान.” लता तिला टाळून कशीबशी घरी जायला निघाली. तिची साडी अडकल्यासारखी वाटली, म्हणून तिनं मागे वळून बघितलं तर, ती मुलगी डोळ्यात पाणी आणून लताकडे एकटक बघत होती. त्या रात्री लताला फक्त तिचे डोळेच दिसत होते. दुसऱ्या दिवशी ती मुलगी स्वच्छ आंघोळ करून आपलं एक बारीकसं बोचकं बांधून लताच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. लतानं मागचा पुढचा विचार न करता तिला आपल्या घरी नेलं.
आपल्याच घराला धड पायपोस नसताना एखाद्या अशिक्षित बाईनं एका अनाथ मुलीला उचलून घरी आणणं, ही माणुसकी लतामध्ये कुणी रुजवली असेल? स्वत:च्या फाटक्या संसाराला ठिगळ लावत जगणाऱ्यालताच्या मनात त्या मुलीच्या भवितव्याविषयीची चिंता डोकावली नसेल का? नवनवीन प्रश्न आपल्या रोजच्या जगण्यात उभे राहतात. त्यातीलच हा एक प्रश्न उत्तरांसाहित लतानं आपल्या जीवन नोंदवहित नोंदवून घेतला. लता तर आधुनिक सावित्रीबाई ठरल्या. वडाला पूजणाऱ्या नव्हे तर माणसाला माणूस बनवणाऱ्या सावित्रीबाई फुले!
लता त्या मुलीला ‘कल्पी’ म्हणून हाक मारू लागली दुसऱ्या दिवशी ती कल्पीला घेऊन बाजारात गेली. तिच्यासाठी नवीन कपडे, चप्पल, छत्री, पुस्तकं आणि वह्या घेतल्या. पांच जुलैला कल्पी लताच्या घरी रहायला आली. तिला शाळेत दाखल करण्याची लताला घाई लागून राहिली होती. पण तिच्या अंगावरील खरूज, केसांतील उवासाफ केल्याशिवाय पोरी तिला जवळ करणार नाहीत म्हणून लतानं कल्पीसाठीशांपु विकत घेतला, बारीक दातांचा कंगवा घेतला. घरी पोहोचताक्षणीच तिनं कल्पीच्या केसांत हात घातला. तर तिच्या साडीवर ऊवांचा खच पडला. केसांतून खरूज फुटल्यानं दुर्गंधी येत होती. कल्पी जोरजोरात रडायला लागली. कंगव्यांच्या दातांनी तिच्या जखमांमधून घाण निचरू लागली. केसांना मलम लावून लतानं तिलां आंघोळ घातली. तशी कल्पी शांत झोपी गेली. लताच्या घरातील पहिली रात्र म्हणजे कल्पीसाठी पुनर्जन्म ठरला. दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेत गेल्या. बाईंनी विचारलं नाव कुणाचं लावायचं? लता म्हणाली,“ ता काय सांगाक होया? आमचाच नाव लावा.” बाईना आपल्या डोळ्यातील आसूआवरणं कठीण झालं.
लताचं वास्तव्य असलेली वस्ती ही एकाच जात समूहाची होती. लतानं त्यांची पर्वा केली नाही. तिने नवऱ्याला आणि मुलाला सांगून ठेवलं,“कुणी विचारलं तर सांगा, मी पोसग्या चेडू आणलंय.” लताच्या नवऱ्यानं त्या मुलीला आपल्या पोरीसारखी माया दिली. लताचा मुलगा तिच्या पेक्षा वयानं लहान असल्यानं त्यानंही तिला बहीण म्हणून स्वीकारलं.
लताला मी जेव्हा कल्पीच्या जन्मदात्यांबद्दल विचारलं तेव्हा लता म्हणाली. “बापूस वसांडतोंडो दारू पिवन बायलेक मारी, म्हणून त्या पोरान आंगार रॉकेल ओतून जाळून घेतल्यान आणि पोरा उगात पडली. ह्या पोरं जगलू आणि हेचो धाकलो भाव हिरीत पडान मेलू.”हे सांगत असताना लताच्या चेहऱ्यावर अस्पष्टशी देखील रेषा दिसत नव्हती. ती आपल्या धारदार मालवणी भाषेत बोलत होती, जणू काही तिला सूर्याचीच भाषा ठाऊक होती. त्यातल्या प्रखर किरणात माझ्या मेंदूतील सडक्या विचारांची राख राख होत होती.
कुठल्याही अनाथ मुलीला दोन घास खायला घालून घरकाम करून घेणाऱ्या उच्चभ्रू बायका आपण बघतो. पण त्यांचं शिक्षणदेखील आईच्या मायेनं पूर्ण करणाऱ्या सावित्री दुर्मिळच! लतानं कल्पीला बारावीपर्यंत शिकवलं. तिच्या मनावर पूर्वायुष्याचाओरखडादेखील उमटता नये याची काळजी घेतली. बारावीपर्यंतचं शिक्षण देऊन तिनं कल्पीचं लग्न लावून दिलं. हे सगळं सांगत असताना लताच्या चेहऱ्यावर आपण कर्ती असल्याचा कुठलाच भाव दिसत नव्हता.
बोलता बोलता लता म्हणाली, “बाई मी जा भोगलू ता माझ्या पोरांक भोगूक नकू म्हणाण मी घरदार आणि घरातली माणसा बघून तेचा लगीन लावण दिलू.” त्याशिवाय तिच्या सासुला आणि नवऱ्याला दोघांनाही तिनं तंबी दिली,“जर काय खाटखूट झाला तर तेकां उचलतलूआणि घरांक घेवण जातलू. आणि नुसता नेवचू नाय, पोटगी देवक लावतलू.” लताचा कारारीपणा आणि निश्चयीपणा थक्क करून सोडणारा होता. “खूप उशीर झालु बाई, मी जातू,” म्हणत तिनं पटदिशी टोपली डोक्यावर घेतली. आणि नजरेआड झाली. माझ्या मनात चटकन आलं, लतासारख्या बायका जागोजागी असतील तर स्त्रियांच्या चळवळीची गरजच उरणार नाही. ना दत्तक विधान ना अनाथाश्रमाची वाट, लता अनाथ मुलीची आई झाली.
प्रा. श्वेतल अनिल परब, सावंतवाडी shwetalparab2551971@gmail.com