ती...

१६ मार्च २०२६

मुंबईच्या लोकल प्रवासात रोज हजारो चेहरे भेटतात. काही क्षणभर दिसतात आणि विसरलेही जातात, तर काही अनपेक्षितपणे मनात घर करून बसतात. गर्दी, धावपळ आणि रोजच्या जगण्याच्या गडबडीतून उमटणाऱ्या अशाच एका साध्या आणि छोट्या अनुभवाची ही नोंद आहे. तृतीयपंथीयांच्या आयुष्याकडे नव्या संवेदनशील नजरेने पाहायला लावणारा हा लेख हिमनील बोरसे यांनी लिहिला आहे. त्या पेशाने वकील आहेत. त्यांच्या अनुभवातून उलगडणारा हा छोटासा प्रसंग आपल्याला माणुसकीच्या उबदार स्पर्शाची जाणीव करून देतो.

मुंबईत येऊन १५ वर्ष झालीत आणि मुंबई लोकलची सवय होऊनही जवळपास तितकीच. सुरवातीला बिचकवणाऱ्या, डब्बेच्या डब्बे माणसांच्या गर्दीने भरून वाहणाऱ्या लोकल्सला पाहून भांबावून प्लॅटफॉर्मवरच खिळून उभी राहणारी मीही कधी त्या गर्दीत सामावून गेले कळलंही नाही. रोजचा कधी अगदीच रटाळ, घामेजला, दमवणारा तर कधी अनाहूत अनुभवांनी अचंबित करणारा हा लोकल प्रवास आता सरावाचा झालाय. ह्या लोकल सोबत मग सरावाचे होतात फेरीवाले, देवाधर्माच्या नावाने मदत मागणारे, गरिबीच्या माराने पिडलेले तरीही सूर लावून गाणी गात झोळीत टाकले जातील त्या पैशाच्या बदल्यात मनोरंजन देऊ पाहणारे पिचलेले लोक. आणि ह्या सोबत ह्याप्रवासाचा अविभाज्य भाग म्हणजे मधूनच एखाद्या स्टेशनला गर्दी कापत आत चढत, जिथे एका जागी धड उभं राहणं कठीण त्या गर्दीत कंपार्टमेंटभर सहज फिरत बायकापोरांच्या डोक्यावर हात ठेवत, देतील ते आंनदाने स्वीकारत कधी उगाच चरफडत चिडून बडबड करत आले तसेच भर्रकन गायब होणारे तृतीयपंथी. ह्यांचा लोकलमधला वावर, हावभाव, स्नेहाने दुआ देणं तर कधी वैतागाने वाद घालणं प्रसंगी शिव्याही देणं आताशा कितीही सवयीचं झालेलं असलं तरी दरवेळी आपल्याही नकळत ह्या बेफिकीर वाटणाऱ्या चेहऱ्यांना न्याहाळत नजर काहीतरी शोधू पाहते. निसर्गाचा अन्याय स्वीकारत, सहन करत माणूस म्हणून जगण्याची हि जिवंत धडपड पाहून इवल्या इवल्या प्रश्नांनी नाउमेद होणाऱ्या स्वतःच्या स्वभावाची मग लाज वाटू लागते.

गर्दी कितीही सवयीची झाली तरी ह्या गर्दीतलेच काही चेहरे काही क्षणांच्या असण्यानेही मनात ठसून राहतात, काहीतरी दरवळत ठेऊन जातात आपल्या आत. तशीच ती. देखणा रेखीव चेहरा, त्यावर शोभणारे करारी डोळे... त्यात थिजल्यासारखं काही डोकावणारं. कुठल्याशा स्टेशनला लोकलच्या पोलला धरून ऐटीत गिरकी घेत आत येते. चोपून नेसलेली साधीशी साडी, तिच्यासोबतच्या इतर जणींपेक्षा हलकासा पण नेटका मेकअप. तिचं अस्सल नैसर्गिक सौंदर्य मेकअप ने अजूनच हायलाईट झालेलं. जीव गुदमरवून टाकणाऱ्या गर्दीतून सहज सरसर पुढे सरकत, आपली खास टाळी वाजवत एकेकाच्या डोक्यावर हात ठेवत ती डबाभर फिरून निघून जाते. कोर्ट कामाच्या निमित्ताने ३-४ वेळा एकाच रुटवरच्या लोकलने एकाच ठराविक वेळेला जाणं झालं आणि योगायोगाने दरवेळी तीही दिसली त्याच लोकलला. दरवेळी मी तिला नव्यानेच पाहत असल्यासारखं न्याहाळत बसलेली आणि दरवेळी तिची न माझी नजरभेट...इतकीच काय ती ओळख. पण दरवेळी तिला पाहिल्यावर उगाचच फार जुनी ओळख असल्यासारखं काहीतरी तेवढे काही क्षण वाटून जायचं मग ती तिच्या मार्गाला नि मी माझ्या. मुंबईत रहायला आल्यापासून आणि विशेषतः लोकल प्रवास अंगवळणी पडल्यापासून तृतीयपंथी असा काही वेगळा वर्ग आहे हे मनातही येत नाही. पूर्वी ते काही ठराविक प्रसंगीच दिसायचे आणि तेंव्हाही त्यांच्या हावभावामुळे दचकायला व्हायचे. आणि त्यांची ती टाळी किती कर्कश वाटायची कानाला, आता मात्र जाणवतं कि ती टाळी टाळी नाही निसर्गाने त्यांच्या झोळीत टाकलेल्या आयुष्यभराच्या वेदनेचा आवाजच आहे तो. आपल्यासारखंच किंबहुना त्याहून कितीतरी अधिक तेही घुसमटून जात असतील समाजाच्या चौकटीत स्वतःला बसवत बसवत आयुष्याच्या ह्या अनाकलनीय प्रवासात.

अशीच एका दमलेल्या दिवशी नेमक्या त्याच वेळेला मी कोर्टात चालले होते. पाणावली नजर खिडकीबाहेर शून्यात लावून बसली होती. अचानक डोक्यावर हात फिरला, दचकून पाहिलं तर समोर ती उभी. उगाच माझे केस सारखे केल्यासारखे करत काहीतरी बडबडली. मी नुसतीच कोऱ्या नजरेने तिच्याकडे बघत होती, तिच्या डोळ्यात पाणी चमकलं...तिचं कि माझ्याच डोळ्यातलं ?...खरच कळलंच नाही. एरवी सफाईने आतली गर्दी आत सारत बाहेर यांत्रिक अलिप्त वागणारी-वावरणारी मी…त्या नजरेनं, त्या स्पर्शाने वितळलं काहीतरी नि सावरायची संधीही न मिळता निखळलीच चार दोन आसवं टपटप. ती पटकन जागा करत शेजारी बसली. "पगलट, दो रुपये निकाल", मी भानावर येत हाताला आली ती नोट तिच्या हातावर ठेवली. मी चिडले होते स्वतःवरच, का अशी कमजोर पडले म्हणून? कि तिच्यावर? काय केलं तिने कि मी अशी अस्थानी अवेळी विरघळले म्हणून? तिला मात्र त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं…माझ्या चिडण्याशी, हतबल होण्याशी कशाशीच. तिने हक्काने माझे बेशिस्त केस पुन्हा सारखे केले, माझ्या हातात पाच रुपयांचं नाणं ठेवत मूठ वळली नि बोलली, "संभालकें रख इसे और अपने आप को भी”, मी निमूटपणे बंद मुठीकडे बघत तिच्या भाबड्या श्रद्धेला चाचपडत राहिले, तळव्यात नी मनातही उब जाणवली. डोक्यावर टपली मारत आपल्याच धुंदीत तिच्या स्पेशल लहेज्यात ती बोलू लागली, “बच्ची, ये सपनो का शहर है। तेरे मेरे हम सबके सपने गोदी मे लेके सहलाता है। कुछ ले दे के हि सही कुछ हसीं पल झोली में डाल ही देता है। बस थोडा सब्र, थोडी मुस्कुराहट साथ लेके चला चल।" असं बोलून "सदा खुश रह" म्हणत ती ऐटीत आलेली तशीच चपळाईने गर्दीत नाहीशीही झाली आणि मी तिच्याकडे बघत विचार करत राहिले कुणाला समजावत होती ती, मला? स्वतःला? कि ह्या गर्दीच्या संबंध चेहऱ्यालाच?

मी पुन्हा हरवून जात स्वतःशीच म्हंटल, "इस शहर का तो पता नहीं पर ये खूबसूरत पल मेरी झोलीमे डालकर तुम्हे भी नहीं पता और शायद मैं भी कभी शब्दोमें ना बता पाऊ के तुमने मुझे क्या दे दिया पगली..."