मातृसत्तेकडून पितृसत्तेकडे...

०१ सप्टेंबर २०२५

मानवजातीच्या इतिहासाचा मागोवा घेताना लक्षात येतं की आज आपल्याला सहज स्वीकारलेली पितृसत्ताक रचना ही तुलनेने नवी आहे. समाजशास्त्रज्ञ आणि इतिहास अभ्यासक डॉ. अशोक राणा यांच्या मते, एकेकाळी मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता या समाजव्यवस्था प्रस्थापित होत्या, ज्यात स्त्रियांना केवळ सन्मानच नव्हे तर सत्ता आणि संपत्तीचंही स्वामित्व होतं. या व्यवस्थेचा प्रवास, तिचं पतन आणि त्यातून उभी राहिलेली पुरुषप्रधान संस्कृती यांचा मागोवा घेताना ते इतिहासातील पुरावे, पुराणकथा आणि सामाजिक रचनेतील बदल यांचा शोध घेतात. त्यांचा हा अभ्यास वाचकाला मानवी संस्कृतीतील लिंगसंबंधांच्या गूढ प्रवासात घेऊन जातो. डॉ. अशोक राणा हे सामाजिक इतिहास आणि संस्कृतीचे प्रगल्भ अभ्यासक असून इतिहास आणि पुराणकथांच्या संगमावर संशोधन करतात. त्यांनी समाजव्यवस्थेच्या विकासाचा सखोल अभ्यास केला आहे.

आज जगातील बहुतांश देशांमध्ये पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. काही देश अपवादानेच स्त्रीप्रधान आहेत. परंतु प्राचीन काळी सर्वत्रच समाजाचे नेतृत्व स्त्रियांकडे होते. नेतृत्वासोबतच कुटुंबातील संपत्तीची मालकीही पूर्वी स्त्रियांकडे होती. त्यामुळे त्यांना समाजात अतिशय सन्मानाचे स्थान होते. सक्षमता आणि सन्मान यामुळे स्त्रियांचे शोषण करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. स्त्री सन्मानाचे प्रतीक म्हणून समाजातील कर्तबगार स्त्रियांना मातृदेवता मानले जाऊन त्यांची उपासना सुरु झाली. त्यामुळेच जगभर मातृदेवतांच्या उपासनांचे अवशेष आढळतात.

जगातील सर्वच प्राचीन संस्कृतींमध्ये मातृदेवतांची उपासना प्रचलित होती, हे पुरातात्विक अवशेष तसेच ग्रांथिक पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासूनच मातृसत्ताक समाज अस्तित्वात असल्याचे अभ्यासक मानतात. जगातील सर्वात प्राचीन मातृदेवतेची प्रतिमा सिरिया व इस्रायल या देशांमधील गोलन टेकड्यांमध्ये ‘बेरेखट राम’ या पुरातात्विक स्थळी 1981 मध्ये आढळली आहे. त्यामुळे तिला ‘व्हीनस ऑफ बेरेखट राम’ या नावाने संबोधले जाते. तिचा काळ साधारणपणे इ.स.पू.230,000 ते इ.स.पू.700,000 या दरम्यानचा असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यावरून सात लक्ष वर्षांपूर्वी मातृदेवतांची उपासना या भागात होत असावी असा निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढला आहे. ही प्रतिमा मातृदेवतेची आहे किंवा नाही याविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. प्राचीन मानवी समाजामध्ये धर्मकल्पनेचा उगम दोन लक्ष वर्षांपूर्वी झाला होता, असे अभ्यासक मानतात. त्यामुळे त्यापूर्वीच्या अवशेषांमध्ये धर्मकल्पना आढळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रागैतिहासिक काळातील मातृदेवतांच्या उपासनांचा संप्रदाय साधारणपणे तीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. या काळात तसेच या पूर्वीच्या काळातील मातृदेवतांच्या प्रतिमांना ‘व्हीनस’ या शब्दाने संबोधले गेले आहे (शर्मा, 1986:1).

मातृदेवतांच्या उपासना या प्राचीन मानवी समाजातील कर्तृत्ववान महिलांविषयी असलेल्या सन्मानाचे प्रतीक म्हणून प्रचलित झाल्या असाव्यात. पुढील काळात निर्माण झालेल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन त्यांच्या कर्तृत्वाला प्रतिबंध केला असल्याचे प्राचीन संस्कृतींमधील मिथके व परंपरांमधून दिसून येते. ही मिथके व परंपरांमधील तपशीलाचा अभ्यास व विश्लेषण आज जगभरातील स्त्रीवादी संघटना व विचारवंत करीत आहेत. मातृपूजनाच्या प्रेरणा व त्यांचे स्वरूप याविषयी मानवशास्त्रज्ञांनी जी निरीक्षणे नोंदविली आहेत, त्यांचा आधार घेऊन हा अभ्यास विकसित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कालांतराने स्त्रीसत्ताक समाजाची पीछेहाट होऊन पुरुषसत्ताक समाज निर्माण कसा झाला याविषयी माहिती पाहूया.

स्त्रीसत्ताक समाज व्यवस्था

प्राचीन भारतात स्त्रीसत्ताक समाज अस्तित्वात होता आणि ‘स्त्रीसत्ताक’ व ‘मातृसत्ताक’ या दोन वेगवेगळ्या व्यवस्था होत्या असे कॉ.शरद पाटील यांनी म्हटले आहे. आपल्या जडण-घडणीत मातेचे स्थान सर्वोच्च आहे, या वास्तवाची जाणीव ठेवून तिला पूजनीय मानणाऱ्या पुरुषांची सत्ता असा ‘मातृसत्ता’ शब्दाचा अर्थ होतो. याच भावनेतून स्त्रीसत्तेचा उदय झाला, असा त्यांच्या विधानांचा आशय आहे. स्त्रीसत्ता ही आकस्मिक व अपवादात्मक नसून मानवसमाजाच्या नॉर्मल विकासाचे अपत्य आहे. स्त्रीसत्तेचे महत्त्व वर्तमानसंदर्भात तिच्या ऐतिहासिक अपरिहार्यतेपुरते मर्यादित नाही, तर स्वातंत्र्य, समता व लोकशाही ही त्रयी पितृवंशक दासप्रथाक गणसमाजात वा भांडवलशाही लोकसत्ताक समाजात उद्भवलेली नसून स्त्रीसत्ताक गणसमाजात उदयाला आलेली आहे, जिच्यात ती निमित्तमात्र नसून अंगभूत होती, असे ते (पाटील, 2018:46) म्हणतात. जगात पूर्वी स्त्रियांची सर्वंकष सत्ता होती या वास्तवाचा स्वीकार करणे आपणास आजही सहज शक्य होत नाही. त्यामुळे असे कधीच अस्तित्वात नव्हते, असे काही अभ्यासकांना वाटते. त्यांच्यासाठी भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये आजही स्त्रियांच्या हातीच सर्व सत्ता असल्याचे वास्तव उभे आहे. तेथील खासी, गारो इ. आदिवासी जमातींचे उदाहरण ताजे आहे. केरळमधील नायर जमातसुद्धा स्त्रीसत्ताक असल्याचे दिसून येते.

नवाश्मयुगातील मानवामध्ये कालांतराने पुरुषांचे वर्चस्व वाढायला लागले. पशुपालन आणि शेतीच्या आरंभामुळे पुरुषाचे महत्त्व वाढले. तो बैल किंवा घोड्यासारख्या जनावरांच्या मदतीने शेती करायला लागला आणि शेतीत जी स्त्रियांची जागा होती, ती तो घ्यायला लागला. लोकांचा वंश मातृपक्षावरून नव्हे तर पितृपक्षावरून ठरविला जाऊ लागला. वडिलांच्या नंतर त्याच्या संपत्तीचा उत्तराधिकारी त्याचा मुलगा होऊ लागला. कुटुंबाचे प्रमुख पुरुष व्हायला लागले आणि आपापल्या कुटुंबासाठी संपत्ती गोळा करू लागले. अशा समाजाला पितृसत्ताक समाज म्हणतात. अशा समाजाचा उदय नवाश्मयुगाच्या शेवटी झाला असावा. कारण की, या काळात मातेचे महत्त्व असल्याचे अनेक पुरावे आजही आढळतात. इजिप्त, सीरिया, इराण भूमध्यसागराच्या चारही बाजूला आणि दक्षिण-पूर्व युरोपमध्ये तसेच इंग्लंडमध्ये माती, दगड किंवा हाडांपासून बनवलेल्या नवाश्मयुगातील स्त्री मूर्त्या मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यांना मातृदेवता म्हटले गेले. त्यानंतरच्या काळात मेसोपोटामिया, सिरीया आणि भारत अशा ऐतिहासिक समाजामध्ये आपल्याला मातृदेवतांची पूजा आढळते. मोठ्या प्रमाणातील मातृदेवतांची पूजा होण्यामागे नवाश्मयुगात मातेचे महत्त्व कमी झाले नव्हते, हे कारण आहे (शर्मा,2010:17).

खासी व गारो जमातीतील स्त्रीसत्ताक परंपरा

खासी किंवा खासिया या नावाने ओळखली जाणारी एक आदिवासी जमात असून भारताच्या मेघालय, आसाम तसेच बांगलादेशमधील काही भागात या जमातीच्या लोकांची वस्ती आहे. या जमाती खासी आणि जयंतिया पर्वतरांगांमध्ये असून त्यांच्यामध्ये आजही स्त्रीसत्ताक समाजपद्धती अस्तित्वात आहे. विवाह झाल्यावर पती सासऱ्याकडे राहायला जातो. खासी परंपरेप्रमाणे पतीच्या विवाहापूर्वीच्या संपत्तीवर त्याच्या मातृपरिवार आणि विवाहानंतरच्या संपत्तीवर पत्नीपरिवाराचा हक्क असतो. त्यांची वंशावळ स्त्रीपासून मानली जाते आणि संपत्तीची स्वामिनीही तीच असते. खासी जमातीमधील संयुक्त कुटुंबाची संरक्षिका कनिष्ठ कन्या असते. अलीकडे काही खासी लोक शेतीशिवाय स्वतंत्रपणे व्यापार, नोकरी इ. व्यवसाय करू लागले आहेत. परंपरागत संपत्ती विकण्यास या जमातीत मनाई आहे. विवाहासाठी त्यांच्यात विशिष्ठ असा विधी नाही. मुलगी आणि माता-पित्यांच्या परवानगीने विवाहोत्सुक तरुण सासरी जाण्यास प्रारंभ करतो आणि संतती झाल्यावर कायमचा तेथेच राहायला लागतो. आपसात कोणत्या कारणाने बेबनाव झाल्यास सहजपणे विभक्त होण्याची सोय या जमातीमध्ये आहे. परंतु संततीवर पित्याचा कोणताही अधिकार नसतो. खासी, सिंतेंग, वार आणि लिंग्गम या त्यांच्या चार मुख्य शाखा आहेत. खासिया अनेक शाखांमध्ये विभक्त असून त्यांच्यामध्ये परस्पर विवाह संबंध होतात. फक्त आपल्या कुटुंब किवा टोळीमध्ये विवाह करणे या जमातीत निषिद्ध आहे. टोळीची प्रमुख स्त्री हीच सर्वांवर नियंत्रण ठेवते आणि ती आपला पुत्र किवा भाचा यांना लिंगडोह म्हणजे मुख्यमंत्री बनवून त्याच्या आधारे शासन करते. खासी जमातीप्रमाणेच गारो जमातीतही स्त्रीसत्ताक पद्धती अस्तित्वात आहे. त्यांच्या बऱ्याच परंपरा सारख्या आहेत.

नायर जातीतील स्त्रीसत्ताक परंपरा

केरळमधील नायर जातीमध्येही स्त्रीसत्ताक समाज अस्तित्वात होता. त्यांच्या कुटुंबव्यवस्थेत भाऊ आणि बहिणी तसेच बहिणींची मुले व त्यांच्या मुलींची मुले यांचा समावेश होत असे. कुटुंबाच्या संपत्तीची मालकी संयुक्त स्वरुपात राहत असे. सर्वात वृद्ध पुरुष या व्यवस्थेचा कायदेशीर प्रमुख असे. विवाह व निवासविषयक नियम मात्र विविध राज्यांमध्ये वेगवेगळे होते. 16 ते 18 व्या शतकांच्या मधील काळात कालीकत म्हणजेच आजच्या कोझीकोड, वालूवनाड, पालघाट आणि कोचीन अर्थात आजचे कोच्ची या भागातील नायरांमध्ये प्रचलित असलेल्या वैवाहिक परंपरांचा अभ्यास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कन्या वयात आली की, धार्मिक विधींनी नायर म्हणजेच नम्बुदिरी ब्राह्मणासोबत तिचा विवाह करवून दिला जात असे. तिचा पती तिच्याकडे अर्थात आपल्या सासरी राहायला जाऊ शकत असे परंतु, त्यासाठी त्याला सक्ती केली जात नसे. काही बाबतीत विवाह समारंभानंतर लगेच काडीमोड घेतला जाई. वयात आलेल्या कन्येच्या आयुष्यात आपल्या किंवा एखाद्या उच्च जातीचे अनेक पती येऊ शकत असत. नायर पुरुषसुद्धा आपल्या इच्छेनुसार आपल्या योग्य वर्गातील महिलांशी संबंध ठेवूशकत. महिलांना त्यांच्या स्त्रीसत्ताक परंपरेनुसार वागविले जाई आणि पित्याचा आपल्या मुलांवर कोणताही अधिकार नसे.

ब्रिटिशांनी 1930 मध्ये कायदा करून नायर जमातीतील बहुविवाह परंपरा संपुष्टात आणली. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी पित्यावर आली. त्याचबरोबर म्हातारपणी त्याची देखभाल व अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी त्याच्या अपत्यांवर आली. 1930 च्या दशकात नायरांमध्ये एकल विवाह पद्धती सुरू झाली. त्यामुळे पुरुष व महिलांच्या मधील मातृसत्ताक संपत्तीच्या विभाजनाची परवानगी मिळाली आणि मुलांच्या पालन-पोषणाचा अधिकार पित्याला प्राप्त झाला. या अलीकडील वास्तवाचा विचार करता प्राचीन काळी भारतात स्त्रीसत्ताक समाज अस्तित्वात असल्याची जाणीव आपणास होते. त्याविषयी असलेले संदर्भ आता पाहूया.

स्त्रीसत्ताक समाजाचा प्रभाव

स्त्रीसत्ताक समाजाचे अवशेष आपणास प्राचीन तंत्र संप्रदायात आढळतात. तंत्र संप्रदाय हे स्त्रीप्रधान होते. त्यामुळेच कदाचित वैदिकांनी त्यांची निंदा करण्याची मोहीम बराच काळ राबविल्याचे दिसून येते. तंत्राचा उगम स्त्रीराज्याच्या स्मृतीतून झाला हे निर्विवादपणे सिद्ध होते, असे कॉ. शरद पाटील म्हणतात. माया हा शब्द वैदिकांनी नकारात्मक अर्थाने वापरून तिचे अस्तित्व नाकारले. परंतु या शब्दाला स्त्रीसत्ताक परंपरेचा संदर्भ आहे. माया हा शब्दच स्त्रीसत्ताक कृषक गणसमाजातून आलेला आहे. ‘मा’ म्हणजे मापणे वा मोजणे. काय मापणे व मोजणे? गणभूमी व गणधन. कोणी मापणे व मोजणे? ‘मा’ ने, गणमातेने. गणश्रमाचे साफल्य ‘मां’नी श्रम प्रक्रियेचे मंत्रगान, नर्तन, चित्रण, शिल्पन इ. नी अनुकरण केले तरच प्राप्त होते असा या समाजाचा विश्वास होता (पाटील, 1982:119).

स्त्रीसत्ताक समाजाने भारतीय संस्कृतीची सारी अंगे व्यापून टाकली होती. तत्त्वज्ञान हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. सांख्य तत्त्वज्ञान हे तंत्र या नावानेही ओळखले जात असे. त्याची निर्मिती स्त्रीसत्ताक समाजाच्या विचारसरणीवर आधारित आहे. तंत्राचा प्रभाव तिसऱ्या ते चौथ्या शतकापासून वाढत चालला असल्याचे दिसून येत असले तरी त्याआधीच सांख्यांनी त्याला तत्वज्ञानाच्या माध्यमातून अधिष्ठान दिले होते. त्यामुळेच स्त्रीसत्तेच्या अस्तापासून तंत्र धर्म संघ रुपात प्रचलित होते असे कॉ. पाटील म्हणतात. स्त्री सत्तेच्या विनाशास कारणीभूत अशा पुरुषी वर्चस्वाच्या भावनेमागे कोणती कारणे आहेत, याचा शोध घेताना कॉ.पाटील म्हणतात - ‘‘पुरुषाने पुरुषाला गुलाम करण्याआधी सर्व पुरुषांनी मिळून स्त्रीसत्ता नष्ट केली होती. वैराज्य वा स्त्रीराज्य हे जसे मग विद्रोह्यांचे ऐहिक उद्दिष्ट राहिले, त्याप्रमाणे तत्वज्ञानात स्वातंत्र्य हे स्त्री तत्त्व बनले.’’ मातृसत्ता व स्त्रीसत्ता या दोन संज्ञा वरकरणी सारख्या वाटत असल्या तरी त्यात फरक आहे. या दोनही समाजपद्धती आजही आपल्या संस्कृतीवर प्रभाव गाजवीत आहेत हे मात्र निश्चित.

पुरुषी वर्चस्वाचा प्रारंभ

कांस्ययुगामध्ये सामाजिक संरचना बदलण्याच्या प्रक्रियेस वेग आला. नांगराने शेती सुरू झाल्यामुळे समाजातील पुरुषाचे महत्त्व वाढले. स्त्रियांनी नांगर आणि बैलांवर ताबा ठेवणे कठीण होते. त्यामुळे हे काम प्रामुख्याने पुरुषांच्याकडे आले. धातूंची हत्यारे आणि उपकरणांच्या वापराने ताम्रयुगातील गावांचे रुपांतर शहरात झाले. उत्पादनाची नवीन साधने आल्यामुळे श्रमविभाजन होऊ लागले. काही लोक शिल्पकार, सुतार, कारागिरी, गवंडीकाम इत्यादी कामे करायला लागले. त्यांच्या उपजीविकेकरिता शेतकऱ्यांना शेतात काम करणे आवश्यक होते. सर्वांची संपत्ती आता सामुदायिक होऊ लागली. कुळांचे रूपांतर गावांमध्ये झाले. या समुदायातील सदस्यांना सामुदायिक शेतकरी म्हटले जाते. जमिनीवर त्यांची सामुदायिक मालकी होती. पण प्रत्येकजण आपापला व्यवहार स्वतंत्रपणे करीत असत. कुळाच्या सामूहिक व्यवहाराचे वेगवेगळ्या परिवारामध्ये विभाजन झाल्यामुळे समुदायाच्या सदस्यांमधील समानता संपुष्टात येऊ लागली. त्यामुळे कुळ अथवा गणांचे प्रमुख आणि सेनापती श्रीमंत होऊ लागले. इतर लोक मात्र गरीबीत खितपत पडायला सुरुवात झाली. अशा रीतीने कुळ व गणातील आपापसातील व्यवहार संपल्यामुळे त्यांच्यातील समतेची भावना नाहीशी झाली. लोकांमधील असमानता वाढीस लागल्यामुळे आदिम सामुदायिक व्यवस्था संपली. कुळ व गणांच्या संरक्षणासाठी नियम व कायदे तयार होऊ लागले आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी शासक आणि योद्ध्यांवर आली. त्यांच्याकडे हत्यारे आणि सैनिक होते. अशा परिस्थितीत योद्ध्यांना युद्धासाठी प्रोत्साहित आणि सर्वसामान्य जनतेला सांत्वन देण्यासाठी पुरोहितवर्ग पुढे आला. त्यामुळे समाजाचे विघटन झाले. शिल्पकार, व्यापारी, योद्धे, पुरोहितवर्ग शहरात राहत. सर्वांना आवश्यक अशा उत्पादन साधनांच्या निर्मितीत आणि अन्ननिर्मितीत त्यांचा सहभाग नव्हता. इ.स.पू.3000च्या दरम्यान उदयाला आलेल्या कांस्ययुगात मेसोपोटामिया, इजिप्त आणि भारतात आपणास नागरी संस्कृतीची भरभराट झालेली दिसते. त्यामागील कारणे मात्र वरील परिस्थितीत आढळतात (शर्मा,2010:20). नागरी संस्कृतीच्या भरभराटीचे बरे-वाईट परिणाम समाजाच्या जडण-घडणीवर झालेत.

गणांमध्ये सामूहिकपणे निर्णय घेण्याची पद्धत होती. म्हणून गणपद्धतीला आत्यंतिक लोकशाहीवादी संस्था (Ultra Democratic System) असे समाजशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. गणप्रमुख सर्वांच्या संमतीने निवडला जाई व त्याला गणपती असे म्हणत. आर्य येथे आले व त्यांनी येथील गणसंस्था नष्ट केली. त्यांनी राज्यसंस्था प्रस्थापित केली. त्यामुळे गणसंस्थेचा विरोध करून राजव्यवस्था आणणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाच्या पूर्ततेकरिता गणसंस्थेची निंदा करणे ही त्यांची गरज होऊन बसली होती. त्यामुळेच ब्राह्मणग्रंथामध्ये गण व गणपती निंदा आढळते. त्यामुळे गणांच्या नेतृत्वस्थानी असलेल्या गणिका व गणपतींना हीन लेखले जाऊ लागले. त्याचे पडसाद वैदिक वाङ्मयात उमटले आहेत.

गणपती स्तुती व निंदा

ऋग्वेदाच्या पाचव्या व सहाव्या मंडलातील ऋचांमध्ये (ऋ.6-56-5,5-44-12) गणांचे महात्म्य वर्णन केलेले आहे. अथर्ववेदात व वाजसनेयी संहितेत गण, व्रात, संघ, पूग या संज्ञांचे सन्मानाने उल्लेख आलेले आढळतात. वैदिक आर्यांना गणसंस्थेबद्दल फारसा आदर नसला तरी त्यांच्या प्रभावाची जाण होती. त्यामुळे गण व गणपतीचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. पण हा गौरव वैदिक समाजात समाविष्ट झालेल्या गणसमाजातील अनार्य ऋषींनी केलेला आहे, हे अधिक तपशिलात गेल्यावर दिसून येते. या गौरवामागे गण-व्रातांचे वाढते वैभवही कारणीभूत असावे. पुढे हे वैभव लुप्त झाल्यावर मात्र ब्राह्मण स्मृतीकारांनी गण व गणपतीची निंदा सुरू केली. गणसंस्थेच्या विघटनानंतर राज्यसंस्था उदयास आली. लोकशाही व्यवस्थेविरूद्ध राजेशाही प्रस्थापित झाली. ही वर्गीय व्यवस्था ब्राह्मण स्मृतिकारांना प्रतिष्ठा देणारी होती. त्यामुळे तिचे गोडवे गाणे व गणसंस्थेची निंदा करणे त्यांना सोयीचे वाटू लागले. पण पुढे गणसंस्थेचा जनमानसात प्रभाव असल्याचे ध्यानात आल्यावर पुराणिकांनी गण व गणपतीची स्तुती करणे सुरू केले. पुराणनिर्मितीत शूद्रांमधील सूत, मागध, बंदी, चारण, कुशीलव इत्यादी जमातींचा बराच मोठा वाटा होता. त्यामुळेच कदाचित पूर्वकालीन अवैदिक अनार्यांप्रमाणे त्यांनी आपल्या आराध्य दैवताची स्तुती करणे स्वाभाविक होते. ही स्तुती केवळ गणपतीच्या वाट्याला आली. गणिकांना मात्र वैदिकांनी नेहमीच हीन लेखले आहे.

गणिका व गणपती

गणप्रमुख पुरुष असला तर त्याला ‘गणपती’ व स्त्री असेल तर तिला ‘गणिका’ असे म्हणत असत. गणपती हा कालांतराने पूजनीय ठरला. गणिकेला मात्र तशी प्रतिष्ठा मिळाली नाही. पुरुषप्रधान गणांनी आर्यांच्या भूमिकेतून स्त्रियांकडे पाहिल्यामुळे तसे झाले असावे. मातृसत्ताक व पितृसत्ताक गणांच्या आपसातील संघर्ष व त्यातून उद्भवणाऱ्या वैमनस्याचीही परिणती म्हणून ‘गणिका’ हीन लेखल्या गेल्या असाव्यात. गणप्रमुख पुरुषाला ‘गणनायक’ किंवा ‘गणपती’ तर त्यापेक्षा मोठ्या गणाच्या नेत्याला ‘महागणपती’ किंवा ‘बृहस्पती’ तसेच ‘ब्रह्मणस्पती’ या शब्दाने संबोधले जात असे. गणचिन्ह डोक्यावर धारण करण्यातून त्यांची ओळख होत असे. हत्ती हे ज्या गणाचे चिन्ह होते, तो गण प्रभावी ठरल्यामुळे आज ‘गजमुख गणपती’ पूजनीय ठरला आहे. पण पूर्वी बैल लांडगे, कोल्हे, वाघ, सिंह, कावळा, अस्वल इ. गणचिन्हे व ते धारण करणारेही गणपती होते. बैल ज्याचे गणचिन्ह आहे असा ‘शिव’ हाही एक गणपतीच होता. तसेच नृसिंह, हनुमान, जांबुवंत, काकभृशुंडी इ. नावाने ओळखले जाणारे पशु-पक्ष्याचे मुखवटे धारण करणारे गणपती रामायण-महाभारत ही महाकाव्ये तसेच पुराणग्रंथांमध्ये आढळतात. त्यांच्या विषयीची माहिती मात्र संदर्भ बदलून आपल्यापर्यंत आली व प्रचलित झाली. तसेच गणिकेचेही झाले.

गणप्रमुख स्त्रियांना गणमाता किंवा गणिका म्हणून संबोधले जात असे. सप्तमातृका या नावाने प्रसिद्ध असलेल्या गणमातांमध्ये ‘वाराही’ म्हणजेच वराह अर्थात डुक्कराचे मुख असलेली गणमाता समाविष्ट आहे. ‘वराह’ हे ज्या गणाचे कुलचिन्ह होते, त्या गणाची ती गणमाता असावी. दशावताराच्या संकल्पनेत वराह हा एक अवतार गणला गेला आहे. त्याचप्रमाणे त्यात कूर्म, मत्स्य, नरसिंह हेही गण-चिन्हसूचक अवतार समाविष्ट आहेत. अर्थात ही गणचिन्हे गणिका ही धारण करीत असतील यात शंका नाही. बौद्ध साहित्यामध्ये गणिकांना अतिशय सन्मानाने संबोधले आहे. वज्जी गणाची गणिका अम्बपाली किंवा आम्रपाली ही एक गणमाता होती. कॉ.शरद पाटील याविषयी अधिक माहिती देतात. ते म्हणतात. (पाटील, तत्रैव : 63) : ‘‘अम्बपालीला लिच्छवींनी ‘अम्बका’ असे संबोधले आहे. हा शब्द ‘अम्बा’चा पर्यायवाची असून त्याचा अर्थ आई असा होतो. ती केवळ वेश्याच असती तर तुच्छतेने वा चेष्टेतही लिच्छवी तिला ‘अम्बका’ म्हणाले नसते. निष्कर्ष अपरिहार्य आहे. अम्बपाली वास्तवात वज्जींची गणमाता होती. तिचे नाव वज्जी गणाच्या पुरोहितेचा किताब होता. त्याचा अर्थ ‘अम्बेची’, (मातृदेवतेची) पुरोहिता’ असा होतो. मुळात गणिकेचाही अर्थ गणाची शासनकर्ती असाच असावा. कारण, बुद्धाच्या काळातल्या धार्मिक संप्रदायांच्या तीर्थंकरांना बौद्ध व जैन धर्म ग्रंथांमध्ये गणी, गणधर, गण आचरिय व संघी-अर्थ, धार्मिक गणांचे वा संघांचे मुख्य - असे म्हटले आहे. बुद्धाचा भिक्षु संघ घटना व कारभार याबाबतीत गणसमाजाची प्रतिकृती होता, हे सुप्रसिद्ध आहे. महावीरांचा जैन भिक्षुसंघ वज्जी गणांची हुबेहूब प्रतिमा होता.’’

अम्बपालीचा संस्कृत अवतार आम्रपाली हा शब्द आज वेश्या या शब्दाचा पर्याय झाला आहे. वेश्यांच्या संघटनाही मोठ्या सन्मानाने तो वापरतात.
राजेशाही शासन व्यवस्थेने गणमाता गणिकेचे स्वातंत्र्य हिरावून तिला वेश्येगत हीन ठरविले होते. गणमाता गणिका यांना गणसमाजातील कोणत्याही पुरुषांशी शरीरसबंध करण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे उत्तरकालीन वैदिक व पौराणिक साहित्यात वेश्या या अर्थाने त्यांचा उल्लेख आला असावा. गणसभेतील कृ्षिमायेसाठी पौरोहित्य करताना करावयाचे नृत्य ही एक विधिनाट्यातील आवश्यक बाब असल्यामुळे त्यांना नर्तकी ठरविण्यात आले. त्याचबरोबर आर्यपूर्व भारतीय लोकांकडे पाहण्याचा वैदिकांचा विकृत दृष्टिकोनही त्यांना हीन ठरविण्यास कारणीभूत होता. या सर्वांचा परिणाम होऊन गणिकेप्रमाणेच ‘कुलटा’ या शब्दाचाही अर्थ बदलून तो अर्थच्युतीस कारण ठरला. शब्दकोश व ज्ञानकोशांनी तो तसाच नोंदविला. कुलटा हा शब्द ‘कुल’ पासून तयार झाला आहे.

कॉ. शरद पाटील याविषयी (पाटील तत्रैव : 51) म्हणतात:
‘‘निरुक्त या वैदिक शब्दांचा अर्थ सांगणाऱ्या ग्रंथात (6.22) कुल (कुटुंब) हा शब्द कुषब (या धातू) पासून निघाला आहे. त्याचा अर्थ मळणे (तिंबणे) असा होतो.’’ पुढे ते म्हणतात- (पाटील तत्रैव : 54) .....असे काही यज्ञ होते की, जे ख्रिस्तपूर्व 500 पर्यंत केवळ स्त्रियाच करू शकत. भरघोस हंगामाचे फळ मिळवण्याच्या हेतूने केला जाणारा सीता-यज्ञ हा त्यातलाच एक होता. या यज्ञांशी केवळ स्त्रियांचा संबंध असण्याचे कारण त्यांची उद्दिष्टे भरघोस हंगाम व सुपीकता ही असल्याने त्यांची साक्षात प्रतीके असलेल्या स्त्रियांनीच ते संपन्न केले पाहिजेत; ही धारणा असणे शक्य आहे.’’

विविध क्षेत्रातील संशोधकाच्या आधारे शेती व स्त्रियांचा संबंध याविषयी पुरावे देऊन कॉ. पाटील यांनी अथर्ववेदातील एका सूक्ताचा (1.14)जे ‘कुल-पा’ कन्येच्या विरुद्ध असे मायामंत्र समजले जाते, त्याविषयी म्हटले आहे की, ‘कुलपा’ हा शब्द कुटुंबप्रमुख म्हणून योजला गेला आहे. कुलाचे पालन वा अधिपत्य करणारी स्त्री असा या शब्दाचा शब्दश: अर्थ होतो. पुढे ते (पाटील तत्रैव : 55) म्हणतात : ‘‘याचा अर्थ असा होतो की, स्त्री ही कुलाची मुख्य होती. ती कुलाची पुरोहिता या नात्याने कुल जमिनीची सुपीकता व उत्पादकता संवर्धित करण्यासाठी कृषी-मायेचे विधी करी. स्मृतीकारांना कुलपा ही ब्रह्म-वादिनी या नावाने परिचित होती.’’

कुलस्त्रियांना केवळ एक भोग्य वस्तू या दृष्टीने दुय्यम स्थान दिले गेले. त्यातून कुलटा म्हणजे कामासक्त स्त्री हा अर्थ पुढे आला व तो वेश्या या शब्दाचा पर्यायवाची झाला. गणसमाजाच्या काळात गणिका ही समस्त राष्ट— किंवा गण यांची संपत्ती मानली जात होती. बौद्ध ग्रंथावरून ही गोष्ट कळते. संस्कृत नाटकात तिला नगरश्री म्हटले आहे. शूद्रकाने आपल्या मृच्छकटिकात वसंतसेना या एका गणिकेला नायिका बनविले असून तिच्याविषयी अत्यंत आदर दाखविला आहे. वैशाली येथील अंबपाली ही गणिकाही वसंतसेनेप्रमाणेच समस्त नगरीची अभिमान वस्तु होती. पण गणराज्यांचा ऱ्हास झाला व भारतात प्रबल साम्राज्यसत्ता प्रभाव गाजवू लागली, तेव्हा गणिकेचाही मान-आदर लुप्त झाला. त्यापुढच्या काळात गणिका आणि वारांगना हा भेद नष्ट झाला. गणिका ही वारांगनेइतकीच दूषणीय ठरली. तिच्याकडे अन्न घेऊ नये, असा निषेध मनूने घातला (जोशी 1964 : 724 ).

ज्येष्ठा व ज्येष्ठराज

ऋग्वेदात ‘निऋर्ती’ या आर्यपूर्व मातृदेवतेचा उल्लेख येतो. तिला याठिकाणी मृत्यू व विनाशाची देवता म्हटलेले आढळते. भारतातील सर्वात मोठा सण दिवाळी असून त्याला निऋर्ती अमावस्या असेही म्हणतात. अर्थात हा सण मुळात निऋर्तीच्या सन्मानार्थ होता. ती भूमाता होती व तिच्यामुळेच आपणास अन्न मिळते, या भावनेतून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता या सणाची निर्मिती झाली असावी. परंतु, आर्यपूर्व गणसमाजी भारतीयांच्या पिछेहाटीनंतर तिची जागा विष्णुपत्नी लक्ष्मीने घेतली. लक्ष्मीच्या विरुद्ध ‘अलक्ष्मी’ म्हणून निऋर्तीला दिवाळीच्या मध्यरात्री घराबाहेर काढण्याचा विधी या सणाशी जोडला गेला. दुर्गा सप्तशतीमध्ये ‘असुरलक्ष्मी’ या शब्दाने निऋर्तीचा उल्लेख येतो. (5.11) याठिकाणी अंबेला ‘राक्षसांची लक्ष्मी जी निऋर्ती ती तूच आहेस’ असे म्हटले आहे. याचा अर्थ अंबा किंवा लक्ष्मी या मातृदेवता निऋर्ती या तथाकथित राक्षसांच्या मातृदेवतेपासूनच विकसित झाल्या असाव्यात, हे सिद्ध होते. दुर्गा सप्तशतीमध्ये तिला ‘असुरलक्ष्मी’ म्हणून संबोधण्यामागे तिचे स्थान त्याकाळात दुय्यम होऊन ती तिरस्करणीय झाली होती, हे दिसून येते. तिलाच ‘ज्येष्ठा’ या शब्दानेही संबोधले गेले आहे. डॉ.रा.चिं.ढेरे यांनी आपल्या ‘ज्येष्ठा व ज्येष्ठराज’ या शोधनिबंधात यावर विस्तृत माहिती दिलेली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की (ढेरे,1996:29) - ‘‘ज्येष्ठा देवी ही लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी असूनही लक्ष्मीविरोधी गुणांनी युक्त असल्यामुळे तिला अलक्ष्मी म्हणतात.’’ महाभारतातील एका संदर्भानुसार (म.भा.वन.94.10) लक्ष्मी देवांकडे गेली आणि अलक्ष्मी असुरांकडे. ज्येष्ठा या प्राचीन आर्यपूर्व मातृदेवतेतूनच लक्ष्मी ही मातृदेवता विकसित झाली आहे, हे पुढे त्यांनी सिद्ध केले आहे. ज्येष्ठेचे मूर्तिविधान ‘अंशुमदभेदागम ‘या मूर्तिविज्ञानविषयक ग्रंथात सांगितले आहे. त्यात तिला वीर वंदन करतात असेही म्हटले आहे. मध्ययुगात सारा दक्षिण भारत तिच्या उपासनेने भरला होता. त्यामुळे तिच्या मूर्ती दक्षिणेत वैपुल्याने आढळतात, असे डॉ. ढेरे म्हणतात. तिचेच उत्तरकालीन रूप म्हणजे शीतलादेवी होय, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘सटवी’ म्हणून उल्लेखिलेली मातृदेवता ‘षष्ठी’ या शब्दानेही संबोधिली गेली आहे. तिची पूजा उत्तरप्रदेश, बिहार इत्यादी उत्तरेकडील राज्यांमध्ये ‘छठपूजा’ या नावाने केली जाते. हा निऋर्तीचा उत्सव होय.

महाराष्ट्रात ‘ज्येष्ठागौरी’ या नावाने घरोघरी साजरा होणारा कुळाचार हा तिच्याच सन्मानाचा सण होय. ‘महालक्ष्म्या’, ‘गौरी’, लक्ष्म्या या शब्दांनीही काही भागात तिचा उल्लेख केला जातो. काही ठिकाणी तिच्या एका मूर्तीची पूजा होते, तर काही ठिकाणी तिच्या दोन मूर्ती असतात. त्यापैकी एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. ज्येष्ठेची सर्वात प्राचीन मूर्ती राजस्थानातील ‘रायर’ या पुरातत्त्वीय स्थळी आढळली असून ती पक्वमृदा अर्थात भाजलेल्या मातीची आहे. तिचा काळ सुमारे इ.स.पू.पहिले ते इ.स.पहिले शतक या दरम्यानचा असल्याचे पुरातत्त्व संशोधक के.एन.पुरी यांनी निश्चित केले (पुरी,1941:29) आहे. ‘रायर’ येथे पुरातत्त्वीय उत्खनन करताना त्यांनाच ती आढळली. तिला हत्तीची सोंड असून संशोधकांनी ‘विनायकी’ या शब्दाने तिला संबोधले (असीरुरश्रर, 1978:5) आहे. विनायकी ही मातृदेवता अनेक मातृस्थानांमध्ये पूजिली जाते. मध्यप्रदेश व ओरिसामधील चौसष्टयोगिनी मंदिरात तिच्या मूर्ती आहेत. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील ‘यवत’ येथील ‘भुलेश्वर’ या शिवमंदिरात तिची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील अनेक मंदिरात ती पूजनीय आहे. यावरून हत्तीमुखी गणपतीचे मूळ रूप ‘विनायकी’ आहे हे सिद्ध होते. तिला ‘ज्येष्ठा’ म्हणून संशोधकांनी संबोधले आहे. ‘ज्येष्ठराज’ म्हणून प्राचीन साहित्यात उल्लेखिलेला ‘गणपती’ हा तिच्याच रूपावरून बेतला असावा, असा निष्कर्ष यातून निघतो. पुरुषसत्ताक व स्त्रीसत्ताक गणांमधील संघर्षातून पराभूत झालेली गणिका किंवा ज्येष्ठा आज दुय्यम स्थानी गेली आहे. तरीही वेगवेगळ्या रुपात तिची पूजा व सण-उत्सव साजरे होता. त्याचप्रकारचा संघर्ष दोन पुरुषसत्ताक गणांमध्ये होऊन त्यापैकी पराभूत पुरुषगण दुय्यमस्थानी पोचल्याचे प्रतीक म्हणजे गणपतीच्या पायाखाली असलेला उंदीर होय. गणपतीच्या प्रचलित मूर्तीमध्ये तो उंदरावर बसलेला दिसतो. त्यामागील कारणमीमांसा संशोधकांनी केलेली आहे. तिचा परामर्श याठिकाणी घेऊ या.

पितृसत्तेची प्रस्थापना

पुरुषसत्ताक गणांना संपविण्याआधी वैदिकांनी मातृसत्ताक गणांना संपविले व त्यांची बदनामी करण्याची मोहीम आपल्या ग्रंथांमधून चालविली. याविषयी डॉ.गाडगीळ यांनी विस्तृत विवेचन केले आहे. ते (गाडगीळ, तत्रैव : 71) म्हणतात- ‘‘पुरुषप्रधान वैदिक आर्यसमाजाने अनेक क्रूर चालीरीतीच्या साहाय्याने या जमातीच्या जीवनातील मातृसत्ताकाचे महात्म्य नष्ट करण्याचा प्रयत्न करून पाहिला. बालविवाह, बहुपत्नीकत्व, विधवांना दिली जाणारी अमानुष वागणूक आणि सतीची चाल या सर्वच गोष्टी या दृष्टीने उद्बोधक आहेत. स्त्रीच्या तुलनेने पुरुष हाच श्रेष्ठ आहे, ही पुरुषप्रधान समाजाची कल्पना येथील मातृसत्ताक-प्रभावित समाजमनावर बिंबवण्यासाठी वैदिक आर्यपरंपरेत वाढलेल्या विचारवंतांनी या चाली रूढ केल्या. स्त्री-महात्म्याचे अवमूल्यन करण्याचा इतका कठोर आणि आग्रही प्रयत्न जगात अन्यत्र कोठे झालेला आढळत नाही. एहरनफेलच्या मते याचे एकच स्पष्टीकरण संभवते. आर्यपूर्व भारतात मातृसत्ताकाचा असलेला विलक्षण प्रभाव कृत्रिमरीत्या नाहीसा करण्यासाठी अशा कठोर मार्गाचीच आवश्यकता वैदिक आर्यांना भासली असावी. आर्थिक जीवनात विकास होऊन प्राथमिक शेतीच्या अवस्थेतून भारतीय समाज जर बाहेर पडला असता तर सामाजिक बदल सुलभपणे झाला असता. ही प्रक्रिया 100 वर्षांत सुरू झाली आहे, परंतु तत्पूर्वी शेकडो वर्षे आर्थिक जीवनात कोणताही मोठा बदल न झाल्याने त्याच प्राचीन विचारविश्वात आपला समाज स्थिर होऊन राहिला होता. प्राचीन भारतातील गणजीवी समाजाचा विध्वंस करण्यासाठी शासनसंस्थेच्या पुरस्कर्त्यांनी अशाच कठोर आणि आग्रही मार्गाचा पुरस्कार केल्याचे महाभारत आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथांमधून दिसून येते. कृत्रिम मार्गांनी समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी होत नाही. प्राचीन भारतातील गणजीवी समाज नष्ट झाला हे खरे, परंतु नव्या समाजामध्ये गणजीवी समाजाचे (Tribal Society) अनेक अवशेष मागे राहिले. तीच गोष्ट मातृसत्ताक समाजाची. मातृसत्ताक समाजपद्धती जवळ जवळ नाहीशी झाली हे खरे; परंतु शेकडो वर्षांत आर्थिक जीवनात फारसा बदल न झाल्याने येथील बहुजन समाजाच्या जीवनात गणजीवी समाजाच्या विशेषांप्रमाणेच मातृसत्ताकाचे विशेष अद्यापही मागे राहिलेले आढळतात.

प्राचीन भारतातील गणजीवी समाजाचा आणखी एक महत्त्वाचा विशेष म्हणजे काही गणांमध्ये अस्तित्वात असलेली मातृसत्ताक समाजपद्धती हा होय. जगात ज्या ज्या ठिकाणी मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती त्या त्या ठिकाणी कृषिजीवी समाज होता. समाजाच्या आर्थिक विकासक्रमात प्राथमिक कृषिजीवी समाजातच मातृसत्ता संभवते; एवढेच नव्हे तर नांगरपूर्व हस्तव्यवसायात्मक शेतीचा शोधही स्त्रीनेच लावला असला पाहिजे. हा शेवटचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तर स्त्री आणि प्राथमिक अवस्थेतील कृषिकर्म यांचा नैसर्गिक संबंध सर्व मानवशास्त्रज्ञांनी मान्य केला आहे. यातूनच प्राचीन मानवाच्या कृषिविषयक यातुकर्मातील स्त्रीचे महात्म्य प्रस्थापित झाले.’’

डॉ.स.रा.गाडगीळांनी पितृसत्ताक समाज आज जगभर प्रस्थापित झाला असला तरी गणजीवी आणि मातृसत्ताक समाजाचे अवशेष आजही शिल्लक असल्याची ग्वाही दिली आहे. जगातील सर्वच संस्कृतींमध्ये आपणास या वास्तवाचा परिचय होतो.