'स्वातंत्र्याचे भय'
स्वातंत्र्य मिळणं आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण आज आधुनिक, सुशिक्षित आणि प्रगत समाजात राहतो, असं अभिमानाने सांगतो. मुंबईसारख्या महानगरात तर जात दिसत नाही, असा अनेकांचा अनुभव असतो. पण खरंच जात संपली आहे का, की तिने फक्त आपलं रूप बदललं आहे? लग्न ठरवताना जातीचा आग्रह, सोशल मीडियावर जातीच्या नावाने होणारं ट्रोलिंग, निवडणुकीत जात पाहून दिली जाणारी मतं आणि जातीच्या संघटनांमधून शोधली जाणारी सुरक्षितता, हे सगळं नेमकं काय सांगतं? रविंद्र झेंडे यांचा 'स्वातंत्र्याचे भय' हा लेख एरिक फ्रॉम यांच्या विचारांच्या आधारे भारतीय जातीव्यवस्थेचा मानसिक आणि सामाजिक वेध घेतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा संदर्भ देत लेखक माणूस स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जातीच्या चौकटीत स्वतःला का सुरक्षित समजतो, याचा शोध घेतात. स्वातंत्र्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी गुलामगिरीच्या सुरक्षिततेचा आधार घेणाऱ्या आपल्या मानसिकतेवर विचार करायला लावणारा हा लेख आहे.
बरेचसे स्वतंत्र, आणि पूर्वग्रहविरहीत आयुष्य जगल्यावर अचानक कुणीतरी आपल्याला विचारतं की तुझ्या आयुष्यात जातीचे काही अनुभव आले का? तेंव्हा बुचकळ्यात पडल्यासारखं होतं. मुंबईत कोस्मोपोलीटीन आयुष्य जगताना जात जणू अदृश्य झाली असावी किंवा झगमगत्या पडद्याआड झाकली गेली असावी. थोडं वय वाढल्यावर आणि समज पिकल्यावर काही जुन्या घटनांचे जातीशी निगडीत संदर्भ उलगडले.
दादरच्या भरचौकात आमचं सलून होतं त्यामुळे आमची जात लपून राहण्याची शक्यता शून्य होती. पण त्या हजारपगड माधववाडीमध्ये लोकांना जगण्याचे प्रश्न इतके निकडीचे होते की तुझी-माझी जात कोणती हा प्रश्न पिछाडीला पडला असावा. गावगाड्यात स्पष्ट असलेली जातउतरंड इथल्या बहुभाषिक-बहुप्रांतिक सरमिसळीत कोसळून पडली होती. इथले सगळेजण आपल्या मूळ गावातून उठून पोट भरायला मुंबईला येऊन ठेपले होते. त्यांच्या त्यांच्या गावात त्यांची जी ओळख आणि त्याला जोडलेला सन्मान किंवा अपमान ते आपल्या गावीच ठेवत असत. सणासुदीला कपाटातून काढून राखीव कपडे घालावे तसे जेवणात असलेल्या काही पाककृतीतून जात दिसली तर दिसली, नाहीतर ती ही नाही.
मग जाता जात नाही ती जात गेली कुठे? युरोपियन मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम (Erich Fromm) यांनी १९४१ मध्ये विसाव्या शतकातील फॅसिझम आणि नाझीवादाचे विश्लेषण करण्यासाठी 'The Fear of Freedom' (स्वातंत्र्याचे भय) हा सिद्धांत मांडला. दुसरीकडे, भारतात त्याच कालखंडात आणि त्यापूर्वी शतकानुशतके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांनी भारतातील 'जातीव्यवस्थेचा' (Caste System) एक अत्यंत क्रूर सामाजिक आणि मानसिक साचा उघडून दाखवला होता.
वरवर पाहता, एरिक फ्रॉम हे युरोपियन भांडवलशाही आणि नाझीवादावर बोलत होते, तर शाहू, फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे इथल्या धार्मिक आणि सामाजिक विषमतेवर बोलत होते. परंतु, जर आपण या दोन्ही विचारांचा सांधा जोडला, तर आपल्यासमोर एक भयाण वास्तव उभे ठाकते; आपली प्राचीन जातीव्यवस्था हे 'स्वातंत्र्याच्या भयाचे' जगातील सर्वात मोठे, सर्वात जुने आणि सर्वात यशस्वी उदाहरण आहे.
माणसाला स्वातंत्र्य हवे असते, अशी समाजमान्य समजूत आहे. स्वातंत्र्यासोबत एक गोष्ट येते—ती म्हणजे 'स्वायत्तता' म्हणजे 'स्वतःच्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी'. या जबाबदारीला घाबरून माणूस जेव्हा स्वातंत्र्यापासून पळून जातो, तेव्हा तो स्वतःभोवती गुलामगिरीचे पिंजरे तयार करतो. भारतातल्या संदर्भात हा पिंजरा म्हणजेच 'जात' आहे. जातीव्यवस्थेने भारतीय माणसाच्या मनातील स्वातंत्र्याची भीती ओळखून त्याला हजारो वर्षे एका मानसिक गुलामगिरीत ठेवले. आजच्या आधुनिक लोकशाहीतही हा खेळ सुरू आहे.
फ्रॉमच्या मते, माणसाच्या इतिहासात दोन प्रकारचे संघर्ष चालतात: 'Freedom From' (बंधनांपासून मुक्ती) आणि 'Freedom To' (सकारात्मक आत्म-विकास). जेव्हा एखादा समाज जुन्या रूढी, परंपरा किंवा हुकूमशाहीतून मुक्त होतो, तेव्हा त्याला तात्पुरता आनंद होतो. त्याला वाटते की तो मुक्त झाला. पण या मुक्तीनंतर एका अथांग, अनंत विश्वात व्यक्ती 'एकटी' पडते. मध्ययुगात किंवा जुन्या रचनेत माणसाला स्वातंत्र्य नव्हते, पण त्याला समाज आणि व्यवस्थेचे संरक्षण होते. आधुनिक जगात स्वातंत्र्य मिळाले, पण माणसाचे जगाशी असलेले जुने, भावनिक नाते तुटले. तो एकटा पडला. तो स्वतःला असुरक्षित, असहाय (Powerless) आणि नगण्य समजू लागला. फ्रॉम यांच्या मते, माणसाचे मन हा तीव्र एकटेपणा आणि असुरक्षितता जास्त काळ सहन करू शकत नाही. मानसिक संतुलन राखण्यासाठी माणसाकडे दोनच मार्ग उरतात. पहिला मार्ग प्रेमाने आणि सर्जनशील कामाच्या माध्यमातून जगाशी पुन्हा नव्या दमाने जोडून घेणे. पण हा मार्ग सोपा नाही. प्रेम करायचे म्हणजे स्व म्हणजे इगो बाजूला ठेवावा लागेल. इतरांच्या भावना समजावून घ्याव्या लागतील. त्यांचा आदर करावा लागेल. इतकं कोण करणार? मग सोपा मार्ग म्हणजे स्वातंत्र्यापासून पळ काढायचा (Escape from Freedom): स्वतःचे स्वातंत्र्य कोणाच्या तरी पायावर गहाण ठेवायचा, गुलामगिरीचा स्वीकार करायाचा, जेणेकरून निर्णयांचे टेन्शन संपेल आणि जुनी 'सुरक्षितता' परत मिळेल.हा जो पळ काढण्याचा मार्ग आहे, तोच नेमका जातीव्यवस्थेचा पाया आहे.
अन्हीलेशन ऑफ कास्ट मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, जात ही केवळ कामाची विभागणी (Division of Labour) नाही, जसे की —ती 'कामगारांची विभागणी' (Division of Labourers) आहे. पण त्याहून पुढे जाऊन, जात ही 'मानसिक सुरक्षिततेची एक क्रूर व्यवस्था' आहे. ही व्यवस्था माणसाचे वैयक्तिक स्वातंत्र्य पूर्णपणे गोठवून टाकले. जन्मण्यापूर्वीच माणसाचे सगळे निर्णय घेऊन टाकणारी ही जगातील एकमेव व्यवस्था आहे. तुम्ही काय काम करणार? तुम्ही कोणाशी लग्न करणार? तुम्ही काय खाणार, काय पिणार? हे सारंकाही जात ठरवणार.
मुंबईत राहून, मुंबईत वाढून, शिकून सवरून, नोकरी धंदा करून मी आणि माझे सारे मुंबईकर मित्र, शेजारी जातीच्या या मिठीतून बाहेर पडलो होतो का? माझ्या गुजराती शेजार्यांमधले फरक थोडे जाणते झाल्यावर समजायला लागले. वैष्णव असलेले देसाई पूर्ण शाकाहारी. पटेल कुटुंबीय खरंतर मटन खाणारे, पण ते लपून-छपून खायचे. आमचे शेजारी नायडू यांच्या साऱ्या सुना दक्षिणेतून आल्या. शिंपी असलेल्या कुटुंबातल्या मुला-मुलींची लग्न त्यांच्या नात्यातच झाली. मुंबईत राहून काहीच फरक पडला नाही. जात सोडली तर काय होईल या विचाराने तेंव्हा थरकाप होत असावा. ज्या व्यवस्थेत व्यक्तीला स्वतःचा जोडीदार निवडायचा नाही, स्वतःचा व्यवसाय निवडायचा नाही, स्वतःची जीवनशैली निवडायची नाही, तिथे व्यक्तीवर कोणतीही 'वैयक्तिक जबाबदारी' उरत नाही. तिचे निर्णय चुकण्याची भीतीच उरत नाही. जर एखाद्या व्यक्तीचे आयुष्य अपयशी ठरले, तर ती स्वतःला दोष देत नाही; ती म्हणते, "माझ्या नशिबात किंवा माझ्या जातीच्या कर्मात हेच लिहिले होते."
हा जो 'वैयक्तिक जबाबदारीचा अभाव' आहे, तो माणसाला मानसिक शांतता देतो. स्वातंत्र्य माणसाला विचार करायला लावते, निर्णय घ्यायला लावते, आणि निर्णय चुकल्यास अपराधीपणाची भावना देते. जातीव्यवस्थेने माणसाला या अपराधीपणाच्या भावनेपासून आणि स्वातंत्र्याच्या भयापासून कायमची मुक्ती दिली. माणसाने आनंदाने आपले वैयक्तिक स्वातंत्र्य जातीच्या चरणी अर्पण केले, कारण त्याला त्या मोबदल्यात 'चिंतेपासून मुक्ती' आणि 'सुरक्षिततेचा आभास' मिळतो
स्वातंत्र्यापासून पळ काढण्याचा जो मार्ग आहे, यात दोन भावना एकत्र काम करतात: सॅडिझम (Sadism - दुसऱ्यावर नियंत्रण मिळवून त्याला त्रास देणे) आणि मसोखिझम (Masochism - स्वतःला एखाद्या मोठ्या शक्तीसमोर पूर्णपणे शरण आणणे). जातीव्यवस्था या सॅडिझम आणि मसोखिझमच्या सिद्धांतावरच उभी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याला 'श्रेणीबद्ध असमानता' (Graded Inequality) म्हटले आहे. जातीव्यवस्था ही सरळ रेषेत नाही, तर तो एक जिना आहे. या जिन्याची रचना अशी आहे की, सर्वात वर असलेल्या जातीला सोडून प्रत्येक जातीच्या डोक्यावर एक जात बसलेली आहे, आणि सर्वात खालच्या जातीला सोडून प्रत्येक जातीच्या पायाखाली एक जात दाबलेली आहे.
हा साचा हुकूमशाही प्रवृत्तीचे सर्वात भयानक रूप स्पष्ट करतो. प्रत्येक जातीला (जरी ती स्वतः शोषित असली तरी) आपल्यापेक्षा खालच्या जातीवर अन्याय करण्याचा, त्यांना तुच्छ लेखण्याचा, त्यांच्यावर नियंत्रण गाजवण्याचा सामाजिक अधिकार मिळतो. हा अधिकार त्या जातीला एक 'अहंकार' आणि 'ताकद' देतो. ती स्वतःचा एकटेपणा आणि असहायता विसरून जाते, कारण तिच्या हाताखाली कोणीतरी चिरडण्यासाठी उपलब्ध असते. तीच जात आपल्यापेक्षा वर असलेल्या जातीसमोर निमूटपणे मान झुकवतो. त्यांच्या श्रेष्ठतेला दैवी मानतो. स्वतःच्या शोषणाला आपले नशीब समजून स्वीकारतो. मुंबईत शेजार्याची जात माहित असेल तर सार्वजनिक गणपतीत ही अरेरावी किंवा शरणागती जाणवून येत असे.
ही व्यवस्था केवळ शोषक आणि शोषित अशी दोनच भागांत असती (जसा मार्क्सचा वर्गसंघर्ष सांगतो), तर शोषितांनी कधीच बंड करून ती तोडून टाकली असती. पण जातीव्यवस्थेने शोषितांनाच 'अंशतः शोषक' (Partial Exploiter) बनवून टाकले. मधल्या जातींना वरच्या जातीकडून मिळणाऱ्या अपमानाचे, शरणागतीचे (Masochistic pain) दुःख होत नाही, कारण त्यांना खालच्या जातीला पायदळी तुडवण्याचा (Sadistic pleasure) परपीडक आनंद मिळत असतो. या मानसिक चक्रामुळे भारतीय माणसाला स्वातंत्र्याची भीती वाटू लागली. त्याला वाटले की जर आपण स्वतंत्र झालो, तर आपल्या पायाखाली असलेली जातही स्वतंत्र होईल, आणि मग आपण कोणावर हुकूमत गाजवणार? स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा सॅडिस्टिक आनंद टिकवण्यासाठी माणसाने स्वतःच्या गुलामगिरीचा (मसोखिझमचा) स्वीकार केला.
जेव्हा जेव्हा बंडाचे प्रयत्न झाले, तेव्हा या 'स्वातंत्र्याच्या भयाने' त्या चळवळीला गिळून टाकले. संतांनी भक्ती परंपरेत अध्यात्मिक समता मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की ईश्वराच्या दरबारात जात नाही, सर्व माणसे समान आहेत. हा एक प्रकारे माणसाला जातीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढून 'स्वातंत्र्याचा' अनुभव देण्याचा प्रयत्न होता. सत्य असत्याशी केले मन ग्वाही म्हणत तुकोबांनी लढाई मांडली पण, तत्कालीन बहुतांश समाजाने या विचारांचा स्वीकार केल्यानंतरही आपली जात सोडली नाही. संतांना देव्हाऱ्यात बसवले गेले, पण त्यांनी दिलेला स्वातंत्र्याचा विचार नाकारला गेला. संतांनी दिलेले स्वातंत्र्य माणसाला नैतिक जबाबदारी घ्यायला सांगत होते. ते सांगत होते की आता तुम्ही स्वतःचे आध्यात्मिक निर्णय स्वतः घ्या. सामान्य समाज या स्वातंत्र्याला घाबरला. त्यांना मंदिराच्या पुजाऱ्याची, जातीच्या पंचांची हुकूमशाही अधिक सोयीची वाटली, कारण तिथे स्वतःची बुद्धी चालवावी लागत नव्हती.
१९ व्या शतकात महात्मा जोतीराव फुले यांनी 'गुलामगिरी' या ग्रंथातून आणि 'सत्यशोधक समाजाच्या' माध्यमातून शूद्र आणि अतिशूद्रांना ब्राह्मणी वर्चस्वाच्या मानसिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन केले. फुलेंनी लग्नकार्यातून पुरोहितांना हद्दपार केले आणि सत्यशोधक विवाह पद्धती आणली, जिथे वधू-वर स्वतः शपथा घेतात.
हा प्रयोग म्हणजे माणसाला धार्मिक स्वातंत्र्याकडे (Freedom To) नेणारा होता. पण इतिहास साक्षी आहे की, तत्कालीन बहुजन समाजातील एका मोठ्या वर्गाने फुलेंच्या या चळवळीला विरोध केला किंवा त्यापासून अंतर ठेवले. याचे कारण केवळ उच्चवर्गीयांचा दबाव नव्हता; तर बहुजन समाजाला पुरोहितांशिवाय, जुन्या विधींशिवाय जगण्याची 'भीती' वाटत होती. शतकानुशतके पुरोहितांवर अवलंबून राहण्याची जी 'मसोचिस्टिक' सवय झाली होती, ती तोडून स्वतःच्या लग्नाची, आयुष्याची जबाबदारी स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना असुरक्षित करत होते.
तोच माणूस आधुनिक शहरांमध्ये आल्यावर, भांडवलशाहीच्या स्पर्धेत उतरल्यावर त्याला तीव्र असुरक्षितता जाणवू लागली. शहरी गर्दीत तो एकटा पडला. मग या भीतीपासून पळ काढण्यासाठी आधुनिक, सुशिक्षित माणसाने काय केले? त्याने पुन्हा एकदा 'जातीचा' आसरा घेतला. आज शहरांमध्ये आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे इंजिनिअर्स मॅट्रिमोनिअल साईट्सवर जाऊन आधी आपली 'जात' शोधतात. आज शिकलेला मध्यमवर्ग फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर आपापल्या जातीचे ग्रुप्स बनवून त्या सामूहिक ओळखीत सुरक्षितता शोधतो आहे. निवडणुका आल्या की, लोक विकासाच्या मुद्द्यावर स्वतंत्र विचार करण्याऐवजी आपल्या जातीच्या उमेदवाराला डोळे झाकून मत देतात. हा काय प्रकार आहे? हे एरिक फ्रॉम यांच्या 'स्वयंचलित अनुरूपतेचे' (Automaton Conformity) भारतीय रूप आहे. आधुनिक जगात माणसावर उघडपणे कोणीही जातीचे बंधन लादत नाहीये. तुम्ही स्वतंत्र आहात. पण या स्वातंत्र्यामुळे येणारा एकटेपणा सहन होत नाही, म्हणून माणूस स्वतःहून जाऊन जातीच्या राजकारणाचा, जातीच्या संघटनांचा गुलाम बनतो आहे. तो विचार करतो की, "जर मी माझ्या जातीसोबत राहिलो, तर राजकीय पक्षात मला पद मिळेल, समाजात मला वजन मिळेल, आणि मी एकटा पडणार नाही." माणसाने लोकशाहीच्या स्वातंत्र्याला नकार देऊन 'जातीची हुकूमशाही' (Caste Dictatorship) स्वतःवर लावून घेतली आहे.
आज आपण डिजिटल युगात, म्हणजेच सोशल मीडियाच्या युगात जगत आहोत. वरवर पाहता इंटरनेट आणि सोशल मीडियाने माणसाला अमर्याद स्वातंत्र्य दिले आहे. कोणत्याही भौगोलिक मर्यादांशिवाय, जात-पात न पाहता कोणीही कोणाशीही जोडू शकते असे हे आभासी जग आहे. पण एरिक फ्रॉम यांच्या 'स्वातंत्र्याच्या भयाचा' चष्मा लावून जेव्हा आपण या डिजिटल विश्वाकडे पाहतो, तेव्हा एक अत्यंत अस्वस्थ करणारे वास्तव समोर येते: सोशल मीडियाने जातीव्यवस्थेला नष्ट करण्याऐवजी, तिला अधिक आक्रमक, अदृश्य आणि मानसिकदृष्ट्या अधिक घट्ट करण्याचे नवे हत्यार दिले आहे.
एरिक फ्रॉम यांनी सांगितलेली 'परपीडक प्रवृत्ती' (Sadism) आज सोशल मीडियावरील 'ट्रोलिंग'च्या (Trolling) रूपात प्रकट झाली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा विशेषतः शोषित वर्गातील, दलित किंवा महिला चळवळीतील कार्यकर्ता सोशल मीडियावर आपले स्वतंत्र विचार मांडतो, तेव्हा जातीवादी मानसिकतेचे लोक संघटित होऊन त्याच्यावर तुटून पडतात.
त्याला शिवीगाळ करणे, त्याच्या जातीचा उल्लेख करून त्याला हिणवणे, त्याचे चारित्र्यहनन करणे, यातून या ट्रोलर्सना एक प्रकारचा 'सॅडिस्टिक' आनंद मिळतो. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात अपयशी आणि असहाय असलेला माणूस जेव्हा जातीच्या नावाखाली सोशल मीडियावर कोणालातरी ट्रोल करतो, तेव्हा त्याला तात्पुरता शक्तिशाली असल्याचा भास होतो. हे जातीव्यवस्थेच्या मानसिक शोषणाचे डिजिटल रूप आहे.
एरिक फ्रॉम यांच्या 'ऑटोमॅटन कॉन्फॉर्मिटी'चे (रोबोट बनण्याचे) सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आजच्या आधुनिक मॅट्रिमोनिअल साईट्स (Matrimonial Sites). स्वतःला अत्यंत प्रगत समजणारे डेटा सायन्स आणि एआय (AI) च्या युगात जगणारे तरुण-तरुणी, लग्नाची वेळ आली की याच वेबसाईटवर 'Caste No Bar' ऐवजी आपापल्या जातीचे फिल्टर्स लावतात.
समाज काय म्हणेल, कुटुंब काय म्हणेल, या भीतीने ते स्वतःच्या पसंतीचे स्वातंत्र्य नाकारतात आणि गुपचूप समाजाने ठरवून दिलेल्या साच्यात फिट होतात. हा डिजिटल युगातील माणसाने स्वातंत्र्याच्या भयापोटी घेतलेला 'स्वातंत्र्यापासूनचा पळ' आहे. मुंबईमध्ये मला जात दिसत नव्हती आणि आत्ताही ती तशी दिसत नाही. असे असले तरीही स्वातंत्र्यापासून पळ काढून सुरक्षित जिवन जगण्याची निकड मुंबईला वरकरणी निर्विकार राखत अंतरंगी विदीर्ण आणि छिन्न विच्छिन्न करत आहे.