जगणे गोंदून घेताना

११ नोव्हेंबर २०२५

डॉ. अदिती काळमेख यांच्या ‘जगणे गोंदून घेताना’ या कवितासंग्रहात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जाणवणाऱ्या भावना, नात्यांचा ओलावा, मनातील घुसमट आणि जगण्याची जिवट ओढ अशा सगळ्या संवेदनांचा तरल प्रवास दिसतो. डॉ. राजेंद्र माने यांनी या कवितांमधून उमटलेल्या स्त्रीमनाच्या गाभ्यातल्या लहरींना, विचारांना आणि अनुभूतींना ज्या संवेदनशीलतेने शब्द दिले आहेत, त्यामुळे हा आलेख केवळ समीक्षण न राहता एक भावनिक सहप्रवास ठरतो.

जगणे गोंदून घेताना म्हणजे जगण्याच्या संवेदनांचा तरल प्रवास. प्रत्येक कवयित्रीची व्यक्त होण्याची एक शैली असते. मनाची घुसमट, पाहिलेला निसर्ग त्याविषयी चिंतन, घडलेल्या घटना, त्याचा झालेला मनावर परिणाम, आयुष्यातील आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण हे सगळं कुठेतरी साचून आल्यानंतर एक प्रगल्भ व्यक्तता होते. डॉ अदिती काळमेख यांचा 'जगणे गोंदून घेताना' हा कवितासंग्रह काही अंशी त्याचीच साक्ष आहे.

त्यांनी मनोगतात लिहिलेलं आहे- "सद्य परिस्थितीत जीवन व्यवहारात झालेली पडझड, उभे राहिलेले वेगवेगळे प्रश्न, अपरिहार्य ताण, छोटे-मोठे अटळ संघर्ष, झपाट्याने बदलत चाललेली मूल्यव्यवस्था, माणसांमधले परस्पर संबंध, जगण्याची जिवट ओढ, विचारी व्यक्तींचा स्वतःची सतत चाललेला लढा.. हे सारं मन टिपून घेत असतं."

या सर्वातून निर्माण झालेलं नवनीत म्हणजे या संग्रहातल्या कविता आहेत. जगण्याच्या प्रवासात स्वतःला शोधताना बऱ्याच वेळा मनाची घुसमट होते. जगणं म्हणजे नक्की काय? असा प्रश्न स्वतःच स्वतःशी निर्माण होतो,तेव्हा त्या लिहितात- "मनाचं तिळ तिळ मरणं आणि कायमसाठी अस्तित्व संपणं यात तसा अर्थाअर्थी फरक असतो?"

आणि हे सगळं घडत असतानाही मनातली कविता मात्र जन्म घेत राहते. हे मनातल्या संवेदनशीलतेचं लक्षण असतं. कदाचित या कवितेच्या व्यक्ततेमुळे कविच्या जगण्याला आश्वस्तपणा मिळतो. रोजच्या जगण्यातसुद्धा नात्यांमध्ये खूप बंध - अनुबंध असतात. काही क्षणांचे ताणही असतात पण नात्यातला ओलावा कायम शाबीत असतो आणि त्यातून एकमेकांना जपण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.

सहजीवन या कवितेमध्ये त्या लिहितात- "प्रेम असं भिनत जातं ना तनामनात तेव्हा चौकटी मोडून जातात संसारातल्या हिशोब होतात विरळ धुसर उत्कट काही नात्यात गवसते अन् सहजीवनाचे गाणे होते !"

हे निर्माण गाणेच माणसाला जगवत असते. ही सगळीच जगणं गोंदून घेण्याची प्रक्रिया आहे.

"कौरवांच्या या राजकारणात पांडवासह कृष्णही दाखवतो निराळेच रंग , तेव्हा भयकंपाचे उसळणारे कल्लोळ मोजायला कोणते एकक वापरावे?"

आलेख या कवितेत त्या यापुढे लिहितात-

"आपण बोललेलं आपल्याच माणसांपर्यंत पोहोचतच नाही तेव्हा अंतर्मनाने फोडलेले हंबरडे किती डेसिबलचे असतात?"

जगण्याचा आलेख जेव्हा संवेदनशील बनतो आणि मग भोवतालचा सगळा परिसर माणसासहित बदलत राहतो. मनासारखं फारसं घडत नाही, तेव्हा मनाचा दगड बनवायचा की मनालाच बळ देत पुढे चालत रहा असं म्हणायचं? असा प्रश्नही त्या निर्माण करतात.

'ओळख'सारख्या कवितेत त्या वेगळं प्रमेय मांडतात. एखादं रोप आणून ते मोठं होताना पाहणं, हा एक वेगळा आनंद असतो. हळूहळू ते डौलात फुलत जातं. पण अचानक त्याला कुठलीशी कीड लागते किंवा आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग हळूहळू ते कोमेजत जातं. नष्ट व्हायला लागतं तेव्हा त्या म्हणतात- "ओळखीचं नातं आपल्या असण्यापेक्षा अनुभवाला येणाऱ्या प्रसंगाशी जास्त घट्ट आणि प्रसंग नेहमीच अनोळखी

ओळखीला वयच काय आयुष्य सुद्धा असतं रे !"

माणसांच्या नात्याचंसुद्धा काही वेळा असंच असू शकतं. आपल्याला ओळखीचा वाटणारा कधी आपल्याला अनोळखी होऊन जातो हे माणसाला कळत नाही. अदिती काळमेख यांच्या या सगळ्या कविता जगण्याचा गुंता सोडवत जाणाऱ्या आहेत. कधी त्या वैयक्तिक असतात पण त्याचं सूत्र सार्वभौम होऊन जातं आणि यातच कवितेचं यश असतं.

आयुष्यात वस्त्र विणत जाताना लहानपणापासून मोठेपणापर्यंत अनेक प्रसंग घडतात. अनेक माणसं आयुष्यात येतात आणि जातात. काही प्रसंग मनावर कोरले जातात. त्या संवेदनांच्या कविता बनवून राहतात. कधी मनाच्या पटलावर तर कधी कागदावर ते व्यक्त होताना त्या म्हणतात- "कागद आणि पेन असेल तरच लिहिली जाते कविता असं कुठे आहे ?"

अमृता प्रीतम यांनी त्यांच्या आत्मचरित्राला दिलेलं 'रसिदी टिकट' हे नाव यातील कविता वाचताना उगाचच मला आठवून गेलं. तसंही माणसाचं आयुष्य कितीसं असतं हे जाणवून देणारं.

यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. त्या सहजीवनाच्या आहेत, स्त्री जाणिवेच्या आहेत, काही आयुष्यात आलेल्या माणसांच्या संबंधित आहेत. मग ती 'आजी ' असो 'बापमूर्ती 'असो. यामध्ये ग्रामीण लहेजापण आहे, लयपण आहे त्यामुळे त्या वाचकांचही मन उसवणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ दळाण या कवितेत- "किती कोंडलं मालनी माझ्या हुरुदात सल न्हायी इसरले कंदी त्वा जे मला शिकवलं"

सर्वात महत्त्वाचं असतं ते लेखक किंवा कवयित्रीने आपल्या कवितेमधून वाचकांना दिलेली दृष्टी. स्वतःच्या नजरेच्या चौथर्‍यावर घडलेल्या घटना टिपता टिपता त्या घटनेचं सार इतरांना जगण्याचं सूत्र सांगून जातं तेव्हा त्या कविता सार्वभौम होत जातात. आज-काल भवताल बदलायला लागलेला आहे. स्त्री अत्याचाराची ,स्त्री शोषणाची उदाहरणं आजूबाजूला घडत आहेत. अशावेळी मग घरच्या मुलीलाही वेगवेगळी बंधन घातली जातात. तेव्हा 'कृष्णसखा' या कवितेमध्ये डॉक्टर अदिती म्हणतात- "स्त्रीचे संरक्षण करणं म्हणजे चौकटीत बद्ध करणं आधार देणं म्हणजे मर्यादा आवळणं नसतं रे !"

शेवटी त्या म्हणतात-

"लक्ष्मणरेखा आखण्याऐवजी कृष्णसखा बनवा तो यासाठी तिचं सुजाण आईपण धडपडत राहते !"

हे वाचताना उगाचच पद्मा गोळे यांची 'पाठीशी कृष्ण हवा' ही कविता आठवून गेली. या संग्रहातल्या कविता स्त्री संवेदनांचे पदर अलवार उघडतात, त्याचप्रमाणे सहजीवनाचे अर्थ विशद करतात, निसर्गाचं वेगळं सौंदर्य दाखवत जगण्याच्या वेगळ्या प्रतिमा निर्माण करतात आणि वेगळ्या प्रकारची जीवनदृष्टी देतात हे जास्त महत्वाचं आहे .

यातल्या काही कविता दीर्घ आहेत त्या वाचकांशी संवाद साधतात.प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं पण हे जगतानाचा त्याचा प्रवास खूप वेगवेगळे अनुभव त्याला देत असतो आणि ते अनुभव मनात मुरवत अशा पद्धतीचं कवितेचे वस्त्र जाणकार कवी विणत असतो. डॉक्टर अदिती काळमेख यांच्या जगणे गोंदून घेताना मधील कविता असा समृद्ध अनुभव देतात. वाचक कविने लिहिलेल्या कवितेमधून त्याच्या जगण्याशी समांतर अनुभव वेचत असतात, वेगळ्या अर्थाने तेही अनुभव गोंदून घेतात. हे या कवितासंग्रहाचे यश आहे.

डॉक्टर वंदना बोकील यांची प्रस्तावना व श्रीकांत देशमुख यांची पाठराखण संग्रहाला पूरक अशी आहे. डॉ अदिती काळमेख यांना पुढील साहित्य प्रवासास खूप शुभेच्छा...