भाग १ : विषयप्रवेश

आपल्या सौरमालेत पृथ्वी हा एकमेव ग्रह जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अनुकूल आहे. गेल्या साडेचार अब्ज वर्षांत वातावरण, भूपृष्ठ, आणि जीवसृष्टी यांच्या परस्पर संबंधांमधून इथे अनेक घडामोडी घडल्या आहेत. उदा. जीवाणूंमध्ये सौरऊर्जा, कार्बन डायॉक्साइड आणि पाणी वापरून स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याची क्षमता (प्रकाशसंश्लेषण) उत्क्रांत झाल्यामुळे हवेतील कार्बन डायॉक्साइड झपाट्याने वापरला गेला, व वातावरणात ऑक्सिजन वायूचे (जो प्रकाशसंश्लेषणात टाकाऊ म्हणून बाहेर फेकला जातो) प्रमाण वाढले. आपल्यासारख्या गुंतागुंतीच्या व ऑक्सिजन वायूवरच जगू शकणाऱ्या सजीवांच्या उत्क्रांतीचा मार्ग यामुळे मोकळा झाला. अब्जावधी वर्षांच्या जीवसृष्टीच्या प्रवासात मृत सजीवांची कलेवरे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली दबून आपल्या आजच्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेली खनिज इंधने तयार झाली. बाहेरून झालेल्या आघातांनीही पृथ्वीच्या इतिहासाला कलाटणी दिली आहे. उदा. एका मोठ्या ग्रहसदृश गोलाबरोबर पृथ्वीच्या टकरीत चंद्र तयार झाला. एका महाकाय अशनीच्या आघातामुळे वातावरणीय व भूपृष्ठीय परिस्थिती प्रतिकूल झाली, आणि डायनोसॉरस प्रजाती नामशेष झाल्या.

पृथ्वीवरच्या सर्वच सजीवांनी पृथ्वीवर काहीना काही बदल घडवून आणले, मग माणूस ही सर्वात उत्क्रांत प्रजाती त्याला अपवाद कशी असणार? विशेषतः आपण शेती करायला लागून एका जागी स्थिरावलो, तेव्हापासून आपण पृथ्वीवरील बऱ्याचशा बदलांचे सूत्रधार बनलो आहोत. म्हणून या युगाला मानवप्रभावित युग – अंथ्रोपोसिन – असे म्हणावे, असे बऱ्याच वैज्ञानिकांचे मत आहे.

माणसाने सामुदायिक शहाणे होण्याची क्षमता विकसित केली आहे. इतर प्रगत प्रजातींमध्ये प्रत्येक जीव बालपणापासून अनुभवातून शहाणा होत जातो, पण त्याचे ज्ञान त्याच्या मृत्यूबरोबर संपून जाते. या प्रजातींमध्येही वरची पिढी खालच्या पिढीला काही जीवनावश्यक कौशल्ये शिकवत असतेच. पण आपल्या आयुष्यात कमावलेले अनुभवसिद्ध ज्ञान एका जीवाकडून दुसऱ्याकडे किंवा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची, वेगवेगळ्या विषयांच्या सैद्धांतिक मांडणीसाठी आणि विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आवश्यक ज्ञानाच्या पायऱ्या एकावर एक रचण्याची क्षमता या प्रजातींमध्ये नाही. आपण एकमेकांना एकमेकांच्या अनुभवातून आलेले शहाणपण शिकवतो, आणि प्रत्येक पिढी पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या सामूहिक ज्ञानाच्या नोंदी मागे ठेवते. याच कौशल्यामुळे माणसाची वाटचाल इतर प्रजातींपेक्षा वेगळी झाली आहे. आपल्या कृती, त्यांचे पर्यावरणीय परिणाम, आणि त्यांमुळे आपले होणारे फायदे-तोटे, इ. तील कार्यकारणभाव आपण समजू शकतो, समजायला हवा, व त्यानुसार आपले वागणे, आपल्या आशा-आकांक्षांना विधायक वळण द्यायला हवे. आपण हे नाही केले, तर पृथ्वीचे काही फारसे बिघडणार नाही. बरेचदा पर्यावरण रक्षण, पृथ्वी धोक्यात आहे, इ. शब्दप्रयोग केले जातात. माणसाच्या दोन हातांमध्ये जपलेली पृथ्वी असे एक चित्र पर्यावरण दिनाच्या दिवशी मिरवले जाते. पण ही सर्व दिशाभूल आहे. डायनोसॉरस पृथ्वीवरचे सर्वात प्रगत जीव होते, पण ते इतिहासजमा झाल्यावरच सस्तन प्राण्यांना संधी मिळाली, आणि माणसाची उत्क्रांती झाली. उद्या अणूयुध्द करून आपण सगळी पृथ्वी बेचिराख करून टाकली, तरी पृथ्वी निर्माण झाली तेव्हा तिच्यावर अशीच काहीशी परिस्थिती होती. गेल्या सुमारे चार अब्ज वर्षांच्या कालावधीत त्यात बदल होत होत तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली. जोपर्यंत सूर्य जळतो आहे, तोवर म्हणजे अजून साधारण सहा अब्ज वर्षे पृथ्वीपण असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्यावर नवे सेंद्रीय रेणू जुळून येतील, आणि नवी जीवसृष्टी निर्माण होऊ शकेल. तेव्हा आपण पृथ्वीचे रक्षण वगैरे करत नसून, आपल्या प्रजातीच्या रक्षणासाठी आणि उन्नतीसाठी झटतो आहेत, हे स्पष्टपणे म्हणूया, स्वीकारूया.

२१ व्या शतकापल्याड माणसाच्या तगण्यामध्ये जे काही अडथळे आज दिसत आहेत, ते आपणच आपल्या कर्माने निर्माण केले आहेत. शोषणावर (माणसांचे व संसाधनांचे) आधारित अशी अर्थव्यवस्था आपण निर्माण केली, आणि वाढवली. पण त्यामुळे एकीकडे मानवी समाजातील विषमता वाढते आहे, तर दुसरीकडे निसर्गातील जैवविविधता धोक्यात आली आहे. अजूनही काही लोकांना असे वाटते, की वाढती लोकसंख्या ही आपली सर्वात मोठी समस्या आहे. पण जागतिक पातळीवरील आकडेवारी दाखवते, की या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जगाची लोकसंख्या दहा अब्जच्या आसपास असेल आणि तोपर्यंत  लोकसंख्येची  झपाट्याने होणारी वाढ थांबेल. म्हणजे लोकसंख्येची वाढ हा समस्येवर गेल्या शंभरेक वर्षांतल्या प्रयत्नांमधून नियंत्रण मिळवले गेले आहे,  ही वाढ आता थांबू घातली आहे. पण आता जगातील केवळ दहा टक्के लोक जगातील जवळजवळ ऐंशी टक्के संसाधने वापरतात. म्हणजेच या लोकांनी जर संसाधनांचा उपभोग कमी केला, आणि सर्वांना समानतेने संसाधने उपलब्ध झाली, तर दहा अब्ज माणसेही या ग्रहावर सन्मानपूर्वक जगू शकतात. याचाच अर्थ आता लोकसंख्येतील वाढीपेक्षा श्रीमंतांच्या उपभोगातील वाढ ही आपली खरी मोठी समस्या बनली आहे.

मानवी समाजाच्या जगभरातील विस्तारातून आपण जमिनीचे स्वरूप व योगदानही बदलले आणि स्थानिक पातळीवर हवा व पाणी दूषित केले. यातून सुटका करून घेण्यासाठी आपण अधिकाधिक तंत्रज्ञान आणि ऊर्जेच्या वापरावर अवलंबून आहोत. उदा. शहरांमध्ये अती काँक्रिटीकरण झाल्याने शहरे म्हणजे उष्णतेची बेटे बनली, आणि यावर उपाय म्हणून आपण भरपूर ऊर्जा खाणाऱ्या वातानुकूलन यंत्रांचा वापर वाढवला. आपल्या कारखान्यांच्या उत्सर्जनामुळे आपले पाणी दूषित होते आहे, म्हणून पाणीपुरवठा करण्यापूर्वी त्यावर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून ते शुद्ध करून घ्यावे लागते आहे, इ. या साऱ्यातून आपण आपल्या स्थानिक परिसंस्थांशी असलेले आपले नाते तोडले आहे, आणि त्यातून आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत.

आधी युरोपात आणि मग जगभरात आपले जीवन अधिकाधिक खनिज इंधनांच्या उपलब्धतेशी आणि वापराशी जोडले गेले. यातून आपण जागतिक वातावरण बदलाची समस्या निर्माण केली. ही आजची  मनुष्य समाजापुढील सर्वात मोठी व सर्वात घातक समस्या आहे. कारण वातावरण बदल जर एका पातळीच्या पलिकडे गेला, तर पृथ्वीचे सरासरी तापमान खूप जास्त वाढेल, आणि पृथ्वीचे सर्व हवामानचक्र पूर्णपणे बदलून जाईल. याचा परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या स्वरूपावरही होईल – किनारपट्टीचे भाग महासागरांच्या वाढत्या पातळीमुळे पाण्याखाली जातील, तर काही ठिकाणी नद्यांचे पाणी आटून जाऊन वाळवंटे निर्माण होतील. हे सारे बदल इतक्या झपाट्याने होतील, की बदलांशी अनुकूलन करणारी आपली उत्क्रांती तर होऊ शकणार नाहीच, पण तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना करण्यासाठीही आपल्याला पुरेसा वेळ मिळणार नाही.

आणि आता ही वेगवेगळी संकटे एकत्रितपणे आपल्यावर चालून येत आहेत (खालील तक्ता पहा). यातूनच एका नव्या विषाणूजन्य रोगाची जागतिक साथ उद्भवली. भारतात या साथीचा आणि ती थोपवण्याच्या अतिजालीम प्रयत्नांचा सर्वात मोठा फटका हातावर पोट असलेल्या शहरी कष्टकऱ्यांना व छोट्या व्यावसायिकांना बसला. भारतातील शहरांच्या झगमगटामागची विषमता यातून अधोरेखित झाली. याच काळात जागतिक वातावरण बदलामुळे बलशाली बनलेली दोन चक्रीवादळे एकापाठोपाठ एक आपल्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्ट्यांवर येऊन धडकली, आणि त्यांच्या मार्गातील वसाहतींमध्ये खूप नासधूस झाली. आता पावसाळ्यात ठिकठिकाणी पुराचे तडाखेही बसतील. शहरीकरण, औद्योगीकरणाद्वारे जलस्रोतांवर आपण केलेली आक्रमणे आणि वातावरण बदलामुळे बदलेले पर्जन्यचक्र यांचा हा एकत्रित परिणाम असेल.

२०२० साल हे आघातांचे वर्ष आहे, असे सर्वजण म्हणत आहेत, पण ही आघातांच्या मालिकेची सुरूवात आहे. आपण निर्माण केलेल्या दीर्घकालीन समस्या हे वर्ष उलटून गेल्यावर नाहीशा होणार नाहीत. २१ वे शतक मानवी समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचे शतक आहे. २२ व्या शतकात प्रवेश करतेवेळी मानवी समाज एक शाश्वत आणि समानतापूर्ण समाज बनलेला असेल. पण आपण योजनाबद्ध  पावले टाकत स्वेच्छेने त्या टप्प्यावर पोहचणार, की ही अभाव आणि अपरिहार्यतेची शाश्वतता आणि समानता असेल, इतकाच प्रश्न आहे.

भविष्याबाबतच्या सर्वात वाईट भाकितानुसार या शतकाच्या उत्तरार्धात लोकसंख्या नैसर्गिकरित्या दहा अब्जकडे जाण्याऐवजी दोन-तीन अब्ज इतकीच उरेल. विविध आपत्तींच्या आघातामुळे मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडतील. याचाच अर्थ असा की आत्ता जन्माला येणारी आणि त्यापुढची पिढी यामधील बहुसंख्य लोक अकाली मरतील. आपल्या पुढच्या पिढीला या खाईत ढकलायचे, की वेळीच सावरायचे – निर्णय आज ज्यांच्या हातात जगाची सूत्रे आहेत, त्या जाणत्या पिढीच्या हातात आहे. आपण आपल्याच जीवनदायी अशा ग्रहाच्या संरचनेशी केलेल्या छेडछाडीतून ही परिस्थिती ओढावून घेतली आहे. आपले पृथ्वीवरील विविध नैसर्गिक यंत्रणांवर असलेले अवलंबित्व समजून घेणे, आणि ढासळलेला समतोल सावरणे, यातूनच आपण या संकटांवर मात करू शकू.

यासाठी सेवा, उत्पादने व ऊर्जा यांचे विकेंद्रीकरण व स्थानिकीकरण, आणि स्थानिक ते जागतिक पातळीवर परस्पर सहकार्य, या तत्त्वांची कास धरणे आवश्यक आहे. पण म्हणजे नेमके काय करायचे, याचा उहापोह करूया, पुढील लेखांमध्ये.

प्रियदर्शिनी कर्वे

समुचित एन्व्हायरो टेक, पुणे 

pkarve@samuchit.com 

(Image credit : Designed by rawpixel.com / Freepik)