सस्नेह नमस्कार!

ऑगस्ट २०१९ मध्ये 'मिळून साऱ्याजणी' मासिकाने ३० वर्षं पूर्ण केली. त्यानिमित्तानं आम्ही आपल्या या मासिकाच्या संदर्भात नवनवीन कल्पना आणि उपक्रम आखले. 

आपल्या भोवतीच्या मुख्य प्रवाहाकडे, त्यातल्या गलबल्याकडे बघताना आपला स्वर वेगळा आहे हे लक्षात येतंच आणि तो जपण्याचीही गरज भासते. ऐकणं, बघणं, वाचणं, बोलणं यांच्या बहुतेक पातळ्यांवर इतका देखावा आणि उथळपणा जाणवतो की तिथे थांबावंसं वाटत नाही. पण असं निरीक्षण फक्त नोंदवून काय होणार? या जाणिवेतूनच 'साऱ्याजणी' आपली भूमिका, आपला ध्यास, घट्टपणे जपण्याचा प्रयत्न करते आहे. त्यासाठी नवनवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न करते आहे.

वाचकांनी स्वतःशी आणि परस्परांशी संवाद करावा यासाठी नवीन काही करू इच्छिते आहे.

विचार, संवेदनशीलता, सामाजिक न्याय, माणुसकी, समता या साऱ्यांचं अस्तर असणारं, विचार करायला लावणारं आणि तरी वाचनीय असं साहित्य सातत्यानं देता येईल अशी आमची धडपड आहे. या सगळ्यासाठी सान्याजणीविषयी आस्था बाळगणाऱ्या तुमच्यासारख्या सर्वांची साथसोबत अतिशय आवश्यक वाटते. म्हणूनच आपल्या परस्परांबद्दलच्या आपलेपणातून हे आवाहन करत आहोत की, 'मिळून सान्याजणी' च्या विकासासाठी आहे ते सांभाळत, नाविन्याची भर घालण्यासाठी, तुम्ही जमेल तेवढा आर्थिक हातभार लावावा. तुमच्या-आमच्यामधल्या नात्यामुळेच या हातभाराला 'अनुबंध निधी' असं नाव दिलं आहे. सध्याच्या कोविड-१९ च्या संकटात तर आमच्या विविध उपक्रमांसाठी आपल्या भरीव आर्थिक सहकार्याची अधिकच गरज आहे. आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.

धन्यवाद, 

गीताली वि. मं.

संपादक, मिळून साऱ्याजणी