‘डिस्ग्रेस’ : अधःपतनाचे आख्यान

२१ जुलै २०२१

दक्षिण आफ्रिकेचे नोबेल पारितोषिक विजेते लेखक जे. एम. कुट्से यांच्या ‘डिस्ग्रेस’ या कादंबरीला १९९९ चे मॅनबुकर हे नामांकित पारितोेषिक मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट आणि ती संपल्यानंतरची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती यावर प्रकाश टाकणारे कथात्म साहित्य कुट्से यांनी लिहिले. त्याबद्दल एका समीक्षकाने म्हटले आहे की, कुट्से स्वत:बद्दल खोटे बोलत नाहीत आणि मानवाच्या आजच्या स्थितीबद्दलही ते कधी खोटे बोलत नाहीत. त्यांच्या व्यक्तिरेखांतही कधी खोटेपणा नसतो. माणसाच्या अंतरंगात खोल शिरून जे खरं ते मांडण्याचाच त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषोत्तर राजवटी संबंधातील त्याच्या ‘डिस्ग्रेस’मधील चित्रणावरून प्रचंड वादळ उठले होते. कदाचित त्यामुळे कुट्से २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाचे रहिवासी झाले आणि २००६ मध्ये त्यांना तिथले नागरिकत्वही मिळाले.

एखाद्या कादंबरीला ‘मास्टरपीस’ म्हणून गौरवले जाण्यासाठी तिच्या लेखकाला काळाच्या प्रवाहात घट्ट रुजलेले एखादे अस्सल कथाबीज वापरून मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्शणारे कालातीत सत्य वाचकांसमोर मांडावे लागते. अशी कलाकृतीच कालांतराने अभिजाततेचा दर्जा प्राप्त करू शकते. कुट्सेंची ‘डिस्ग्रेस’ ही अशी एक वाङ्मयीन कलाकृती आहे. स्त्रीवाद आणि वर्णद्वेष विचार या दोन्ही अंगांनी तिचा अभ्यास झालेला असला तरी स्त्रीवादी दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहिल्यास तिची कालातीत महत्ता जास्त प्रकर्षाने जाणवते, असे येथे मांडण्याचा प्रयत्न आहे. त्यातून ‘डिस्ग्रेस’चे एक व्यापक परिप्रेक्ष्य वाचकांसमोर येऊन तिचे जागतिक स्तरावरील महत्त्व अधोरेखित होऊ शकेल, असा विश्‍वास वाटतो.

‘डिस्ग्रेस’ची कथा वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वर्णद्वेषी राज्यसत्तेची अखेर झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत, विशेषत: तेथील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या पार्श्‍वभूमीवर घडते. केपटाऊन आणि इस्टर्न केप येथे सर्व घटना प्रामुख्याने घडतात. कथेचा वयस्कर नायक प्राध्यापक डेव्हिड लूरी केपटाऊन याच्या अधःपतित होण्याची ही कहाणी आहे. मेलनी नावाच्या आपल्या विद्यार्थिनीशी लैंगिक दुर्वर्तन करून तो गुन्हा कबूल करतो आणि शिक्षा भोगण्याची तयारी दाखवतो. त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होत नाही. अवमान, अप्रतिष्ठा व अवहेलना यांना सामोरे जाताना डेव्हिड आपला मानसन्मान टिकवण्याचा मुळीच प्रयत्न करीत नाही. विद्यापीठातून राजीनामा दिल्यावर तो त्याची मुलगी ल्यूसी हिच्या इस्टर्न केप येथील फार्महाऊसवर आश्रयासाठी जातो. समलिंगी ल्यूसी तिच्या हेलन नावाच्या पार्टनरबरोबर तिथे राहात असते. परंतु डेव्हिड जेव्हा तिथे येतो तेव्हा ल्यूसी एकटीच राहात असते. वडील व मुलगी यांचे परस्परसंबं फारसे प्रेमाचे नसतानाही ल्यूसी डेव्हिडला तिथे ठेवून घेते.

ल्यूसीच्या घरी त्याची पेट्रस या कृष्णवर्णीय शेजार्‍याशी ओळख होते. पूर्वी ल्यूसीला ‘डॉगमॅन’ म्हणून मदत करणारा पेट्रस आता कृष्णवर्णीय सत्ता आल्यानंतर ल्यूसीच्या काही जमिनीचा मालक झालेला असतो. गोरे आणि काळे यांच्यातील नाती आता सर्वत्र बदलत्या स्वरूपात समोर येताना दिसतात. अशा नव्या वर्णद्वेषोत्तर दक्षिण आफ्रिकेत ल्यूसीच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडते. तिला बलात्काराला सामोरं जावं लागतं. ही घटना, त्यातून उभे राहणारे गुंते, डेव्हिड आणि ल्यूसीची मैत्रीण बेव्ह शॉ यांचं नातं या पार्श्वभूमीवर कादंबरी उलगडत जाते आणि एका अनपेक्षित वळणावर येऊन संपते.

कोणत्याही उत्तम कलाकृतीचा सारांश नेहमीच तोकडा असतो कारण त्यात कथावस्तू म्हणजे प्लॉटमधील गाभा आणि त्यातील खोली कधीही अभिव्यक्त होत नाही. लेखकाचे मानवी जीवनविषयक चिंतन घटनांपलीकडे असल्याने ते नेहमीच दोन ओळींमध्ये कुठे तरी लपलेले असते. त्यासाठी शब्दांपलीकडील आशय आणि लेखकाची कलात्मक मांडणी समजून घेण्याआधी प्रथम महत्त्वाच्या मानवी व्यक्तिरेखा समजून घेणे जरुरीचे ठरते. म्हणूनच डेव्हिड आणि ल्यूसी यांच्या चित्रणातील बारकावे आधी जाणून घेणे योग्य होईल.

‘डिस्ग्रेस’ची प्रमुख व्यक्तिरेखा न-नायक म्हणजे ‘अँटी हीरो’ म्हणता येईल अशा डेव्हिडची आहे. पूर्वार्धात प्रामुख्याने त्याच्याभोवती फिरणाऱ्या कथानकाची मांडणी उत्तरार्धातही डेव्हिड हाच केंद्रबिंदू आहे, अशा रीतीने केलेली आढळते - घटनांचा विचार करता तीत ल्यूसीला महत्त्व मिळालेले दिसले तरी. कादंबरीचे ‘डिस्ग्रेस’ हे शीर्षक डेव्हिड लूरीच्या अध:पतनाशी संबंधित असले, तरी ते ल्यूसीवर बलात्काराद्वारे ओढवलेल्या अध:पतानाशीही जोडले जाऊ शकते. डेव्हिड अध:पतित होतो तर ल्यूसीवर अध:पतन लादले जाते. परंतु या दोन्ही अध:पतनांची ‘गुणवत्ता’ मात्र भिन्न आहे. त्यातील पहिले सर्वार्थाने नकारात्मक असले तरी दुसरे गर्भित अर्थाने सकारात्मक ठरते. स्वत:च्या अध:पतनाचा कर्ता असलेला डेव्हिड आपले सर्वस्व गमावून बसतो; याउलट सर्वस्व गमावलेली ल्यूसी त्यातून फिनिक्स पक्ष्यासारखी वर येऊन सभोवती सुरू असलेल्या अध:पतनाला थोपवण्यासाठी एक स्त्री म्हणून सामोरी जाताना दिसते. पेंग्विन बुक्सने प्रकाशित केलेल्या १९९९ मधल्या कादंबरीच्या प्रथमावृत्तीच्या पांढर्‍याशुभ्र मुखपृष्ठावर Disgrace हे शीर्षक काळ्या अक्षरात, आकुंचित रूपात, छोट्या अक्षरात मध्यभागी छापलेले दिसून येते. त्यातून सूचित होणारे मानवाचे अध:पतन अर्थातच नकारात्मक आहे. म्हणजेच शीर्षकातील ‘डिस्ग्रेस’ ही पुरुषाची आहे, स्त्रीची नाही. अध:पतित झालेल्या मानवप्राण्याची तुलना कलात्मक सूचकता वापरून लेखकाने पूर्वार्धात ‘ल्यूसिफर’शी तर उत्तरार्धात ‘कुत्रा’ या प्राण्याशी केलेली आहे. त्यामुळे कादंबरीकडे वर्णद्वेषापेक्षा स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहणे जास्त सयुक्तिक ठरते.

पूर्वार्धात लॉर्ड बायरनची ‘लारा’ ही कविता वर्गात शिकवत असताना डेव्हिड विचारतो, ‘ल्यूसिफर हा प्राणी कसा आहे?’ (What sort of a creature is Lucifer?) मेलनीच्या वर्गात घुसून तिच्याशेजारी बसलेला तिचा बॉयफ्रेंड उत्तरतो, "ल्यूसिफर हा असा प्राणी आहे, जो त्याला हवे तेच करतो. चांगले काय, वाईट काय याची तो फिकीर करीत नाही." लेखक अप्रत्यक्षपणे डेव्हिडची तुलना 'ल्यूसिफर' म्हणजेच सेटन (सैतान) या देवाविरुद्ध बंड केलेल्या स्वार्थी, आत्मकेंद्री ‘आर्च एंजल’शी करतो. ‘ल्यूसिफर’चा मूळ अर्थ प्रकाश देणारा / आणणारा असा आहे. परंतु स्वर्गातून बहिष्कृत झालेला अध:पतित सेटन एक प्रकारे पृथ्वीवर डेव्हिडचे रूप घेऊन आल्यासारखा वाटतो. प्रकाश देण्याऐवजी पृथ्वीवरील हा मनुष्यप्राणी सदसद्विवेकबुद्धी सोडून अध:पतित होतो. काही समीक्षकांच्या मते महाकवी मिल्टनने लिहिलेल्या ‘पॅरेडाइज लॉस्ट’ या महाकाव्याचा सेटन हा नायक आहे. कुट्सेंचा डेव्हिड मात्र शोकांतिकेचा नायक होऊच शकत नाही कारण त्याच्यात मानसिक आणि वैचारिक पातळीवरील पापक्षालन वा स्वचुकांची जाणीवच दिसत नाही. या संदर्भात प्रसिद्ध आंग्ल कवी टी. एस. एलियट यांनी मानवी जीवनासंबंधी सांगितलेल्या सूत्रांची आठवण होते. ‘जन्म, संभोग आणि मृत्यू’ या तीनच गोष्टी जीवनात अंतिमत: महत्त्वाच्या ठरतात. या सूत्राच्या स्पष्टीकरणासाठी एलियटने स्वीनी (Sweeney) या पात्राचे आपल्या ‘स्वीनी कविता’ समूहात चित्रण केले आहे. हा स्वीनी ‘नैसर्गिक मानव’ आहे, म्हणजे फक्त कामवासना हीच त्याची जीवनधारणा आहे. वासना आणि त्याची परिणती म्हणजे समागम यासाठीच तो जगतो. मानवावरील कामवासनेचा हा प्रभाव आधुनिक मनोविज्ञानाचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांनीही मानवी सुप्त मनाची संकल्पना मांडताना एक प्रकारे अधोरेखित केला आहे. स्वप्नांची उत्पत्ती प्रामुख्याने या सुप्त मनाच्या तळातील गाभार्‍यातूनच होते, हेही त्यांनी मांडले. तरीही सेक्स हा मूलाधार माणूस सामाजिक जीवनात सतत नाकारत असतो. सारांश 'स्वीनी' ही संकल्पना नाही; ते माणसाचे वास्तव आहे. प्रत्येक माणूस जाणिवा-नेणिवांच्या खोल स्तरावर 'स्वीनी'च असतो. डेव्हिड हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण येथे सापडते. मेलनीवर लैंगिक अत्याचार करणारा डेव्हिड हा त्याच्याच वासनेचा बळीही आहे. हाच विचार कादंबरीच्या उत्तरार्धात येतो, जेव्हा त्याची तुलना कुत्रा या प्राण्याशी केलेली आढळते.

या संदर्भात ल्यूसी आणि डेव्हिडचे एक संभाषण फार महत्त्वाचे आहे. वडिलांचे न ऐकता आपल्यावर झालेल्या बलात्कारासाठी कायदेशीर न्याय न मागता पोटातील जिवाला जन्म देण्याचा निर्णय जेव्हा ल्यूसी घेते, तेव्हा ती वडिलांना म्हणते, ‘‘कदचित हे असंच काहीसं मी स्वीकारायला शिकलं पाहिजे. मी अगदी मुळापासून म्हणजे काहीही नसल्यापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे काहीही नसल्यापासून नव्हे, तर अगदी प्रारंभापासून. म्हणजे काहीही ओळखपत्रे नसताना, शस्त्रे नसताना, स्थावर मालमत्ता नसताना, काहीही अधिकार नसताना, काहीही सन्मान नसताना.’’ ‘‘म्हणजे एखाद्या कुत्र्यासारखं...’’ ‘‘होय, एखाद्या कुत्र्यासारखं.’’

शीर्षकाद्वारे सुचवलेल्या ‘डिस्ग्रेस’च्या दोन बाजू आहेत. डेव्हिडचे अध:पतन आणि बलात्कार झाल्यामुळे ल्यूसीवर ओढवलेली मानहानी. कादंबरीच्या अखेरच्या भागात कुट्से कुत्रा या प्राण्याचा रूपकात्मक व प्रतीकात्मक वापर करत वेगळा अर्थ सुचवू पाहातात. ल्यूसी कुत्र्यासारखा प्राणी म्हणून जगली असती, तर तिच्यावर बलात्कारित होण्याची मानहानी आली नसती. परंतु मानवी स्त्री म्हणून जगताना मात्र तशी वेळ तिच्यावर आली, कारण ओळखपत्रे, शस्त्रे, मालमत्ता, अधिकार आदी मानवनिर्मित सामाजिक, सांस्कृतिक संदर्भांमुळे स्त्रीला पुरुषाकडून ‘डिस्ग्रेस्ड’ होण्याची वेळ येते. पुरुषाची काही प्राणीरूपे लेखक येथे सुचवतो. ल्यूसीचे संरक्षण करणार्‍या कुत्र्यांना हिंसक बलात्काराच्या प्रसंगी ठार केले जाते. पेट्रस हा कृष्णवर्गीय मदतनीस ल्यूसीचा ‘डॉगमॅन’ होता. आता तो तिचा संरक्षक व उद्धारकर्ता होऊ पाहतो आहे. वर्णद्वेषोत्तर दक्षिण आफ्रिकेत अत्याचारी आणि बळी यांच्या फक्त जागा बदललेल्या दिसतात. डेव्हिड ल्यूसीला म्हणतो, ‘‘मला भिंतीकडे तोंड करून उभे करा आणि गोळी घाला. ते मला चालेल. माझी केस ही वासनेवर आधारित आहे. मला कुत्र्यासारखं ठार केलंत, तरी चालेल.’’ हाच डेव्हिड अखेरीस प्राण्यांच्या दवाखान्यात कुत्र्यांना मरणाच्या दारात समर्पित करण्याचे आणि नंतर त्यांची कलेवरे विल्हेवाट लावण्यासाठी वाहून नेण्याचे काम करतो. डेव्हिडचे हे अध:पतन सहजी सुचवते की, माणसात माणूसपण कमी आणि प्राणी प्रवृत्ती जास्त आहे. यातील एक भयंकर सत्य ल्यूसीला अखेर नकळत उमगते. तिच्यावर झालेल्या बलात्कारात तीन कृष्णवर्णीय तरुणांबरोबरच अप्रत्यक्षपणे पेट्रस तर सामील असतोच, पण दूरान्वयाने तिचा बाप डेव्हिडही जबाबदार ठरतो. म्हणूनच ती बापाला सांगते, ‘‘या क्षणी, तू मला मार्गदर्शक म्हणून नको आहेस.’’ जणू ओठ शिवल्याने गप्प राहिलेली ल्यूसी जमिनीच्या बदल्यात पेट्रसचा तिच्याशी लग्न करून तिच्या उदरातील बाळाला संरक्षण देण्याचा सौदा त्यामुळे स्वीकारते. यातून हे जाणवते की, वर्ण-वंशभेद ही प्रामुख्याने लिंगभेदातूनच व्यक्त होणारी समस्या आहे.

लेखकाची या संदर्भातील भूमिका आणि कादंबरीचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी ही कलाकृती अखेरीस काय सुचवते हे पाहणे महत्त्वाचे ठरते. येथे निर्माण होणारा महत्त्वपूर्ण, कळीचा मुद्दा असा आहे - अखेरीस डेव्हिड बदलतो, तो पश्‍चात्ताप झाल्याने प्रायश्‍चित्त घेण्यासाठी तयार होतो की त्याच्यातील बदल वरवरचा असल्याने त्याची मूळ प्रवृत्ती बदलत नाही आणि तो पूर्वीसारखाच स्वार्थी, लालसी आणि आत्मकेंद्री राहतो. याचे अंशत: उत्तर कादंबरीच्या अखेरच्या महत्त्वपूर्ण घटनेत जरी सापडत असले, तरी तिचा अर्थ लावणे सोपे दिसत नाही. डेव्हिडला अतिशय प्रिय असलेल्या एका कुत्र्याला बराच काळ मायेपोटी तो वाचवतो आणि मृत्यूच्या दारी त्याला सोपवत नाही. पण अखेरीस तो त्याला बेव्ह शॉच्या हवाली करतो. या कृतीचे दोन अर्थ निघू शकतात : एक - डेव्हिड स्वत:ला त्या बेवारस कुत्र्याच्या जागी पाहतो आणि त्याच्याद्वारे प्रतीकात्मक स्वरूपात स्वत:ला मृत्यूच्या पायाशी समर्पित करतो, किंवा दोन - स्वत:ऐवजी त्या कुत्र्याचा बळी देऊन पूर्वीसारखे जगण्यास मोकळा होतो. या प्रश्‍नाचे उत्तर मिळवताना लक्षात घेतले पाहिजे की, या कादंबरीत संभ्रम (confusion) नाही. येथे अर्थसूचक संदिग्धता (ambiguity) आणि जाणीवपूर्वक पेरलेली/योजलेली अर्थ दडवून ठेवणारी अव्यक्तता (ambivalence) यांचा कलात्मक वापर केलेला आहे. असा विचार केल्यास वरील प्रश्‍नाचे उत्तर कदाचित कादंबरीच्या अभिव्यक्तीत आणि कुट्सेंच्या भाषाशैलीत सापडू शकेल.

‘डिस्ग्रेस’चे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने अभिव्यक्त होण्यासाठी संपूर्ण कादंबरीत तृतीय पुरुषी एकवचनी निवेदन (third person narrative technique) आणि भाषिक दृष्ट्या वर्तमानकाळाचा 'टेन्स' म्हणून उपयोग केलेला आहे. यात प्रयोगशीलता नसून वाङ्मयीन शैलीचा जाणीवपूर्वक कलात्मक वापर आहे. संपूर्ण कथानक वर्तमानात घडते आहे, असा काळ (tense) वापरल्याने मानवाचे, मानवी मूल्यांचे आणि मानवी जीवनाच्या एकूण गुणवत्तेचे अध:पतन झाले ‘होते’ असा अर्थ न निघता ते अध:पतन आजही चालू ‘आहे’ असा अर्थ ध्वनित करण्यात ही कादंबरी यशस्वी झाली आहे. वर्णद्वेषी आणि वर्णद्वेषोत्तर दक्षिण आफ्रिकेत ‘Disgrace still continues’ असे ही कादंबरी ध्वनित करते. शिवाय माणूस या अध:पतनाला आणि अवमूल्यनाला आजही जबाबदार आहे, हेही सुचवते. सभोवती घडत असलेल्या घटनांवर भाष्य करण्याची लेखकावर त्यामुळे वेळच येत नाही, कारण तो असतो वर्तमानाचा फक्त एक साथीदार. लेखक कादंबरीतील कथात्म निवेदनापासून स्वतला दूर ठेवून जे कलात्मक distancing निर्माण करतो, त्यामुळे कथावस्तूचा अर्थ लावण्याची जबाबदारी वाचकांवर येऊन पडते. लेखकाचा आवाज (voice) वा दृष्टिकोन न मांडण्याची कलात्मक चलाखी लेखक म्हणून जे. एम. कुट्से यांनी करून दाखवल्यामुळेच ही कादंबरी एक ‘मास्टरपीस’ ठरते, यात संशय नाही.

विलास साळुंके
vilasalunke@gmail.com