Damaged goods एक विलक्षण पुस्तक

०२ मार्च २०२६

Damaged Goods हे वैयक्तिक अनुभवांमधून उभे राहिलेले आणि व्यापक सामाजिक संदर्भ मांडणारे आत्मकथन आहे. Damaged Goods या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका अनघा कावळे असून, मराठी रूपांतर वृंदा टिळक यांनी केले आहे. या पुस्तकात वैवाहिक आयुष्यातील कठीण प्रसंग, परदेशात स्वतःचे आयुष्य नव्याने उभे करण्याचा प्रवास आणि मातृत्वाची जबाबदारी यांचा संयत व स्पष्ट आढावा घेतला आहे. ही कथा संघर्ष नोंदवते आणि स्वनिर्णय, आत्मसन्मान तसेच नव्याने सुरुवात करण्याची क्षमता अधोरेखित करते. मराठी आवृत्तीमुळे हा अनुभव अधिक सुलभ स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचतो.

काही दिवसांपूर्वी एका नातलगांच्या ग्रुपवर या एका इंग्रजी/ मराठी पुस्तकाची माहिती कळली. त्या पुस्तकाचा विषय कळल्यापासूनच वाचण्याची उत्सुकता होती. मूळ पुस्तक इंग्रजीत आहे. लेखिका आहेत अनघा कावळे. एका सुशिक्षित, सुस्थित घरातल्या तीन मुलींपैकी एक. शिक्षणाने वकील.

विवाह संबंधी दोन क्लेशदायक अनुभव आणि आयुष्याची उमेदीची अनेक वर्षं जी पोळून काढणारी होती ती सहन करुन उभारीने आपल्या मुलीसाठी स्वतःच विश्व परदेशात निर्माण करुन आपली एक वेगळी ओळख समाजापुढे, जगापुढे ठेवणारी एक अशी मुलगी जिने स्वतःला ओळखण्यासाठी, जोखण्यासाठी, उभं करण्यासाठी तो परदेशच स्वदेश मानला. पुस्तकाच्या मराठीतल्या रुपांतराची प्रत आधी हातात आली आणि दोन दिवसात दोन तास रोज असं शब्द न् शब्द वाचूनच पुस्तक खाली ठेवलं.

आपल्याला सामाजिक भान आहे असं आपण म्हणतो पण कुठलेही अंदाज बांधताना आपलं भान कुठे असतं? आपण किती अनभिज्ञ असतो आणि तरीही मतप्रदर्शनाला तयार असतो याचा प्रत्यय आला. खरं तर तो हक्क आपण स्वतःच स्वतःला देतो जे रास्त नाही. आपल्या चौकटीबाहेरचं जग आपण जाणतो हा भ्रम आहे. विशेषतः चार भिंतींमधलं सुरक्षित आयुष्य जगताना आपण भान हरपलेले असतो असं बरेचदा लक्षात येतं. असो...

पुस्तक वाचून झाल्यावर----

प्रत्येक स्त्रीची एक कहाणी असते, प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचा एक लढा असतो, प्रत्येक कहाणी आपल्या परीने एक स्वतंत्र अनुभव असतो. काही कहाण्यांमधे एकच कॉमन सूत्र असतं ते म्हणजे स्वतःला सिध्द करणं. सगळ्या नात्यांसकट, जबाबदा-यांसकट आणि ते ही सर्वोत्तम प्रकारे! जे मुळातच पटणारं नाही पण बहुतेक स्त्रिया ते स्वीकारुन चालत रहातात.

पण चालत रहाणंही जेव्हा अशक्य होतं आणि फक्त ठेचकाळत रहाणं झेलावं लागतं तेव्हा सर्वांग विध्द होत असूनही वेदना सहन करत जगत रहाण्याचं आव्हान पुढे उरतं आणि ते स्वीकारार्ह नसूनही एखादी स्त्री त्या अग्निदिव्यातून चालत रहाते. अनघाच्या कथेत शब्दशः अग्निदिव्य आहे, प्रलय आहे, वादळ आहे, गिळणारे भोवरे आहेत, खोल गर्तेत नेणा-या द-या आहेत, अक्राळविक्राळ श्वापदं आहेत आणि बुडवणारा काळा समुद्रही आहे.

एका प्रसंगात आगीच्या लोळात जळतं सोडून निघून जाणारा नवरा तर दुस-या एका प्रसंगात परदेशात, अनोळखी आणि निर्जन ठिकाणी सोडून देणारा दुसरा नवरा. Tip of an iceberg अशा या दोन घटना उदाहरण म्हणून लिहील्या इथे.

आपल्या जवळच्या नात्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलीच्या आयुष्यात सुरक्षाचक्रातून बाहेर पडल्यावर असं आणि इतकं विपरीत घडू शकतं यावर विश्वास बसेना. या कथेसदृश काही घटना घडलेल्या आपण ऐकतोच पण एकाच स्त्रीच्या बाबतीत इतकं काही विपरीत इतकी वर्षं घडत रहावं याचा नुसता खेद करावा की त्याने सुन्न व्हावं की संवेदना बोथट करुन नुसतंच वाचन केल्याची पावती द्यावी?

अजूनही चपखल शब्दांमधे व्यक्त होणं कठीण आहे. एक नक्की, सशक्त अनघाची गोष्ट अनेक पातळ्यांवर डोळे उघडायला लावणारी आहे. जगापुढे आली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी जाणली पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रसार झाला तर अनेक पालक, स्त्रिया आणि पुरुष यांना ब-याच पातळ्यांवर बरंच काही शिकणं शक्य आहे.

आजकाल आपण अनेक महिला व्यक्तिरेखांवर आणि त्यांच्या लढ्यांसंबंधी, जीवनाविषयी, करियर संबंधी अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले पहातो. उदा- सिंधूताई सपकाळ, सावित्रीबाई फुले, डॉ आनंदीबाई जोशी वगैरे. अशा चित्रपटांचा सकारात्मक परिणाम एकूणच प्रेक्षकांच्या विचारप्रणालीवर होताना दिसतो, भले कमी प्रमाणात असेल पण होतो नक्की. निर्भया केसवरील मालिकेनंतर तो मुद्दा खूप सजगतेने आता हाताळला जातो असं दिसतं. निलूची ही कथा ही एक प्रतिकात्मक रुपात अनघाने ज्या प्रकारे लिहीली आहे ते वाचल्यावर एक उत्तम चित्रपट बनू शकेल अशी ही कथा आहे. परदेशात सगळं काही गुलाबी, सोनेरी, चंदेरीच असतं हे खरं नाही. लग्न हीच एखाद्या स्त्रीच्या जीवनाची परिसीमा नाही हे खूप प्रकर्षाने स्पष्ट होतं या कथेत. दोन फसलेली लग्नं, मृत्यू पासून सुटका होण्यासाठी केलेला आगीशी सामना, वैद्यकीय उपचारांच्या मागे राहिलेल्या खुणा, अंगावर बेतला गेला असता असा प्रसंग जेव्हा निर्जन ठिकाणी मध्यरात्री तिला सोडून देण्याची हिंमत केली गेली. प्रसंग काटा आणणारे आहेत. कथेच्या उत्तरार्धात ही निलू एखाद्या फिनीक्स पक्ष्यासारखी झेप घेते आणि स्वतःला सिध्द करण्यासाठी काय काय करते, मिळालेल्या संधीचा कसा उपयोग करुन घेते. पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा हरवून बसलेली ही आई दुस-या लग्नापासून झालेल्या कन्येला कशी सक्षम बनवते हे वाचनीयच नाही तर प्रेरणादायी आहे.

अनघाने हे पाऊल उचललं आणि कथा लिहीली यासाठी कौतुक- हा शब्द तोटका आहे! सलाम आहे तिला.

वृंदा टिळकने केलेलं रुपांतर फार उच्च पातळीवरचं आहे. लेखनाचा अनुभव आहे नाही यापेक्षा एक मैत्रिण दुस-या महिलेचं मन किती जाणून, टिपून शब्दांकन करु शकते त्याचं उत्तम उदाहरण आहे हे मराठी पुस्तक. तिचं अभिनंदन आणि धन्यवाद हा विडा उचलल्या बद्दल.