दाक्षायणी वेलायुधन : अ चाइल्ड ऑफ सोशल चेंज

१५ ऑगस्ट २०२०

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटना संसदेत सादर करण्यात आली. २६ जानेवारी १९५० पासून ती अंमलात आली. संविधान समितीची पहिली सभा ९ डिसेंबर १९४६ ला झाली. यामधे एकूण ३८९ सभासद होते. त्यापैकी १५ महिला होत्या. दाक्षायणी वेलायुधन, अम्मूकुट्टी स्वामीनाथन, अ‍ॅनी मस्कारीन, बेगम एजाझ रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, सरोजिनी नायडू, विजयालक्षमी पंडित, सुचेता कृपलानी, रेणुका राॅय, राजकुमारी अमृत कौर, कमला चौधरी आणि लीला राॅय या त्या पंधरा महिला आहेत. यापैकी भारतातील पहिली दलित महिला पदवीधर, तीही शास्त्र विषयात, पुलाया या मागास जमातीतील स्तन झाकणारी पहिली महिला, कोची विधानपरिषदेतील पहिली दलित महिला सदस्य, संविधान सभेतील पहिली दलित महिला सदस्य अशा अनेक पहिलेपणाचा मान मिळवणारी महिला आहे केरळमधील दाक्षायणी वेलायुधन.

केरळमधील त्रावणकोर संस्थानातील पुलाया ही सर्वात मागास जमात. या जमातीतील लोक शेतमजूर म्हणून काम करत. त्या बदल्यात त्यांना जे धान्य मिळे तेच धान्य त्यांना घ्यावे लागे‌‌. स्त्री-पुरुषांना कमरेच्या वरील शरीर झाकण्याची बंदी होती. महिलांनी स्तन न झाकता दगडांच्या माळा गळ्यात व हातात घालण्याची पद्धत होती. कोणालाही शिक्षणाचा अथवा केस कापण्याचा अधिकार नव्हता. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रस्त्यावर, बाजारात, दवाखान्यात, विहिरीवर, शाळेत जायची त्यांना बंदी होती. उच्चवर्णीयांकडे मान वर करून पाहता येत नसे. नायर लोकांच्या ६४ पावले तर नंबुद्रींच्या १२८ पावले मागून चालावं लागे.

पुलाया जमातीत २८ ऑगस्ट १८६३ मधे महात्मा अय्यंकळी यांचा जन्म झाला. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ‘साधुजन परीपालम संघम’ या संघटनेची स्थापना केली. ते जाणूनबुजून नायर लोकांप्रमाणे पोशाख परिधान करीत. त्यांनी स्वत़:च्या पैशांनी बैलगाडी विकत घेतली व भर रस्त्यावरून एकट्याने चालवली. हा फार मोठा विद्रोह होता. अय्यंकळी यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं. त्यांनी आपल्या लोकांसाठी शाळा काढल्या. लाकूड व झावळ्यांनी बनवलेल्या या शाळा सवर्ण जाळत असत. परंतु अय्यंकळी त्या पुन्हा बांधत. त्यांच्या शाळांमध्ये फळे नव्हते. पण म्हणून ते थांबले नाहीत. वाळूत बोटांनी अक्षरं काढून त्यांचं शिकवणं चाले. सरकारी शाळा पुलायांना खुल्या कराव्यात यासाठी अय्यंकळी यांनी शेतमजूरांचा संप घडवला. ‘आमच्या मुलांना तुमच्या शाळेत येऊ दिले नाही तर तुमच्या शेतात फक्त तण उगवेल’ असं सांगून हा संप दीड वर्ष चालवला. शेतमजुरांची उपासमार होऊ नये म्हणून कोळ्यांची मदत घेतली. प्रत्येक बोटीवर एकेका पुलायाला काम देऊन माशांचा वाटा मिळण्याची सोय केली. शेवटी संप यशस्वी झाला. १ मार्च १९१० रोजी सरकारी शाळांमध्ये पुलायांना प्रवेश देण्यास संमती मिळाली. अय्यंकळी यांनी दक्षिण त्रावणकोरमधे घेतलेल्या सभेत महिलांना गळ्यातील दगडांच्या माळा काढून ब्लाऊज घालण्याचं आवाहन केलं.

समाजात हे बदल घडत असताना ४ जुलै १९१२ ला एर्नाकुलम जिल्ह्यातील कोचीजवळील मुलावुकाड या गावात दाक्षायणी वेलायुधन यांचा जन्म झाला. दाक्षायणी म्हणजे पार्वती. हे नावही सवर्ण समाजातील. नावापासून बदलाला सुरूवात झाली. त्यामुळे दाक्षायणी यांना ‘अ चाइल्ड ऑफ सोशल चेंज’ म्हटलं जातं. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना अतिशय प्रेमाने वाढवलं. त्यांना कुटुंबियांचा कायम पाठिंबा मिळाला. नवव्या वर्षी जेव्हा त्यांची मासिक पाळी सुरू झाली तेव्हा त्यांच्या आईने त्यांना चित्र काढून शरीरात होणारे बदल समजावून सांगितले. शाळेत जाताना त्यांना काळजी घ्यायला शिकवलं. सभोवताली असं सुधारणेचं वातावरण अनुभवत त्या वाढल्या. त्यांचे वडील गावातील शाळेत शिक्षक होते. त्यांचे दोन भाऊ शाळेत जात, केस कापत, शर्ट घालत म्हणून त्यांना लोक शिव्या देत-दगड मारत.

दाक्षायणी यांचे दोन भाऊ व काका यांनी ‘पुलाया महाजन सभा’ या संघटनेची स्थापना केली. परंतु त्रावणकोरच्या राजाने ‘माझ्या जमिनीवर सभा भरवायची नाही’ असं म्हणून सभेला परवानगी नाकारली. तेव्हा कोळ्यांची मदत घेऊन बोटी एकमेकींना बांधून केलेल्या तराफ्यावर ही सभा घेण्यात आली. याविषयी दाक्षायणी म्हणतात, “समुद्राला जात नव्हती!”. सरकारी शाळेत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी एर्नाकुलमच्या महाराजा कॉलेजमधे प्रवेश घेतला तेव्हा पत्रकारांनी त्यांचे फोटो काढले, कारण उच्च शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला होत्या. पदवीसाठी शास्त्र शाखा निवडणाऱ्या त्या एकमेव विद्यार्थीनी होत्या. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना कोची सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या अस्पृश्य असल्याने त्यांना प्रयोगशाळेत रसायनशास्त्राचे प्रयोग करू दिले जायचे नाहीत. त्यावेळी त्या लांबून प्रयोग पाहत आणि त्याचा अभ्यास करीत. इतक्या दिव्यातून जाऊन त्यांनी १९३५ मधे त्यांनी उत्तम गुण मिळवून पदवी मिळवली.

१९४० मधे दलित नेते आर.वेलायुधन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात गांधी व कस्तुरबा यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे पुरोहित महारोगी होते. आर. वेलायुधन हे समाजवादी असून राममनोहर लोहिया यांचे अनुयायी होते. दाक्षायणी या कॉंग्रेस पक्षाच्या होत्या. गांधीजींच्या अनुयायी होत्या. दाक्षायणी आणि आर.वेलायुधन हे दोघे पती-पत्नी दोन वेगळ्या पक्षाचे सभासद होते आणि दोघेही हंगामी संसदेचे सदस्य होते. १९४५ मधे दाक्षायणी यांची कोची विधानपरिषदेवर नेमणूक करण्यात आली पण त्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. तिथे त्यांनी इंग्रजीमधून भाषण केलं. अस्पृश्यांसाठीच्या अपुऱ्या निधीचा प्रश्न त्यांनी मांडला. राजकारणाचा वापर दाक्षायणींनी जातीयता, विषमता यांचे निराकरण करण्यासाठी केला. १९४६ मध्ये त्यांची संविधान सभेत नेमणूक झाली. तिथे त्या एकमेव दलित महिला सदस्य होत्या. संविधान सभेत दाक्षायणी अनेक प्रश्र्न विचारीत. दलितांच्या शिक्षणाविषयी त्या आग्रही होत्या. अस्पृश्यता व वेठबिगारी हे गुन्हे ठरवून त्यासाठी शिक्षा करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. त्या आंधळेपणाने कोणाचेही अनुकरण करीत नसत. त्या गांधींच्या अनुयायी होत्या, पण त्या म्हणत, ‘अस्पृश्यता राहिली तर हरिजन हा शब्द अर्थहीन आहे. हे म्हणजे कुत्र्याचे नाव नेपोलियन ठेवण्यासारखं आहे.’

आंबेडकरांशी दाक्षायणी अनेक मुद्द्यांवर सहमत असत, पण राखीव मतदारसंघांना त्यांचा विरोध होता. अस्पृश्यांसाठी, महिलांसाठी वेगळे मतदार संघ नसावेत असं त्यांचं म्हणणं होतं. जातीयवाद, मग तो हरिजन, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा शीख कुठलाही असो, त्या आधारे मतदारांना विभागणं हे राष्ट्रीयत्वाच्या विरोधी आहे. सामाजिक किंवा राजकीय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय सक्षम झाले तरच त्यांची प्रगती होईल असं त्यांचं मत होतं. शिक्षणातून जातीय भेदभाव दूर करण्याची तजवीज करावी, संविधानाने लोकांच्या आयुष्याला नवी चौकट द्यावी ही त्यांची अपेक्षा होती. स्वतंत्र, समाजवादी प्रजासत्ताकच सामाजिक विषमता दूर करेल. गरिबांना स्वतंत्र, समानतेचे व प्रतिष्ठेचे जीवन जगायला मिळेल असा त्यांना विश्वास होता.

२९ नोव्हेंबरला कलम ११ या जातीय विषमतेबाबतच्या कलमाच्या मसुद्यावर बोलताना त्यांना भाषणासाठी मर्यादेपेक्षा अधिक वेळ देण्यात आला. राज्यपालांच्या नेमणुकीविषयी त्यांनी मांडलेलं मत अनुभवांती पटतं. राज्याचा राज्यपाल एका पक्षाचा व केंद्रात दुसरा पक्ष असल्यास राज्यपाल व राज्य सरकार यांच्यात वाद होतील. केंद्रातील सत्तेच्या विकेंद्रीकरणावर त्यांचा भर होता. राज्यांना पुरेशी सत्ता असावी असं त्यांचं मत होतं. त्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी उपाय सुचवला होता. ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स, ज्या ठिकाणी हंसा मेहतांनी महिलांच्या हक्कांसाठी जाहिरनामा सादर केला, त्या संस्थेत-ती उच्चभ्रू महिलांची असल्याने-दाक्षायणी यांनी त्याचं सभासदत्व घेतलं नाही. ८ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा मांडला तेव्हा दाक्षायणी यांनी त्यांचं कौतुक केलं. ब्रिटिशांनी दलितांसाठी खूप काही केलं या विन्स्टन चर्चिल यांच्या विधानाला त्यांनी तीव्र विरोध केला.

या जोडप्याला चार मुलगे आणि एक मुलगी झाली. डॉ. रघू (जे इंदिरा गांधी यांचे डॉक्टर होते), प्रल्हादन, धृवन, भगीरथ (जनरल सेक्रेटरी – द इंडियन ओशन रीम असोसिएशन) आणि मीरा – ही धोरण विश्लेषक आहे आणि महिलांसाठी सामाजिक कार्य करते. अन्याय व जुलमाचा वैयक्तिक आयुष्यातील सवयींवर कसा परिणाम होतो हे सांगताना मीराने एक आठवण सांगितली आहे. एकदा मीरा वाकून बसून अभ्यास करत होती, तेव्हा दलितांना पूर्वी कसे वाकून चालावं लागत असे याची आठवण सांगून दाक्षायणी यांनी मीराला ताठ बसायला सांगितलं.

कालांतराने दाक्षायणी सक्रिय राजकारणातून दूर झाल्या. मद्रासमधील आंबेडकरवाद्यांच्या ‘जय भीम’च्या संपादक, ‘द कॉमन मॅन’च्या डायरेक्टर, ‘द डीप्रेस्ड क्लासेस युथस् फाइन आर्ट्स क्लब’च्या अध्यक्ष अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलं.

१९७७ मधे दाक्षायणी यांनी दलित महिलांची राष्ट्रीय परिषद भरवली आणि ‘महिला जागृती परिषदे’ची स्थापना केली. या सभेस २०० हून जास्त महिला उपस्थित होत्या. या संस्थेद्वारे त्यांनी दक्षिण दिल्लीतील भंगी महिलांसाठी शिक्षण व इतर रोजगाराची कौशल्य शिकवण्यास सुरूवात केली. २० जुलै १९७८ रोजी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. दाक्षायणी वेलायुधन यांच्या सन्मानार्थ केरळ सरकारने २०१९ मध्ये राज्यातील महिलांना सक्षम बनवणाऱ्या महिलेसाठी ‘दाक्षायणी वेलायुधन’ पुरस्कार जाहीर केला व त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली.

जातीयतेशी लढत संविधानाला आकार देणाऱ्या सभेपर्यंतचा दाक्षायणी यांचा प्रवास संस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे.

सुनीता भागवत