कोव्हिड आणि बहुजनांची शिक्षणकोंडी

०७ डिसेंबर २०२१

मार्च २०२० नंतर तब्बल वीस महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळांच्या घंटा या ४ तारखेला पुन्हा वाजल्या. लाखो विद्यार्थी उत्साहाने शाळेकडे धावत निघाले. शिक्षकांनी उत्साहानी त्यांचे स्वागत केलं. त्याच्या बातम्या अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून बघितल्यात. मुलामुलींच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद हा कोणालाही उत्साहित करायला पुरेसा असतो. या सगळ्या उत्सवात काही गोष्टी सुटून गेल्यात. यावेळी जेव्हा सकाळी शाळेची घंटा वाजली ती लाखो मुलामुलींच्या कानावर पडलीच नाही. अनेक मुलांनी शाळेच्या दप्तराऐवजी कधीच शेणाची पाटी उचललेली आहे. अनेक मुलं शाळेच्या घंटेऐवजी हॉटेलमध्ये कपबशांचे आवाज ऐकताहेत. कित्येक मुलं आईवडिलांच्या आधीच मोडकळीला आलेल्या संसाराला ठिगळ लावण्यासाठी मिळेल ते काम करायला शिकलीत. शाळा सुरु असताना ज्या मुली आता आपण नववीत जाणार असं स्वप्न बघत होत्या त्यापैकी कित्येक मुली बोहल्यावर चढून शाळाच काय तर बालपणापासूनही दूर निघून गेल्यात. आत्ता या क्षणी हे लिहित असतानाही हजारो मुले आपापल्या पालकांसोबत हातात कोयते घेऊन ट्रकमध्ये अख्खा संसार भरुन उसतोडणी करण्यासाठी कारखान्यांच्या वाटेला लागलेली असतीलच. वीट भट्ट्या, आता येऊ घातलेला कापूस वेचणीचा हंगाम, आपल्या दिवाळीच्या आनंदासाठी लागणारे फटाके बनवणे हे सगळे मुलांच्या हातांसाठी आसुसलेले उद्योग आहेत. मागच्या दोन हंगामात तिथे हजारो नव्या मुलांची भर पडलेली आहेच. 

कोव्हिडच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सगळीकडे गोंधळ असताना जेव्हा संपूर्ण संचारबंदी लागली तेव्हा शाळांसाठी तो एवढा मोठा काळ असेल याचा कुणालाही अंदाज नव्हता. पण या शाळाबंदीने २०१९ चा परीक्षाकाळ, २०-२१ चे पूर्ण वर्ष आणि २१-२२ चं पहिलं सत्र पूर्ण गिळून टाकलं. या उण्यापुऱ्या एकवीस महिन्याच्या शाळेपासून दूर असण्याच्या काळात मुलांच्या आयुष्यात काय काय घडलं? मुलांवर त्याचा नेमका काय परिणाम झाला असेल याचा आपण नीट विचारही करु शकत नाही. मुलांनी या काळात काय गमावलं, तर स्वातंत्र्य! दिवसभर गावात, शहरातल्या वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये, आसपासच्या परिसरात निर्धास्तपणे वावरणारी पोरं अचानक पहिले किमान तीन महिने घरात बंदिस्त झाली. एका जागी बसू न शकणं हे जे त्यांच्या वयाचं वैशिष्ट्य आहे ते पूर्णपणे मारलं गेलं. ज्याना नीट घर आहे आणि वावरायची जागा आहे त्यांचं जरा तरी बरं होतं; पण ज्यांना स्वत:ची हक्काची घरं नाहीत, ज्यांना घरंच नाहीत, ज्यांच्या घरांचा आकार दहा बाय दहाचा आहे, ज्यांच्या घरात एकावेळी चार माणसं राहणं शक्यच नाही अशा सगळ्या मुलांची घुसमट शब्दात पकडून मांडता येणं ही अशक्य बाब आहे. बाहेर खेळायला जायचं नाही, मित्रमैत्रिणी दिसणार-भेटणार नाहीत हे सगळं सहन करणं किती त्रासाचं असेल या मुलांना? हातापायांची पुरेशी हालचाल न करु शकणं, दिवसेंदिवस एकाच जागी बसून राहणं हे घुसमटून टाकणारं असतं सगळ्याच मुलांसाठी. ही फक्त मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी किंवा शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्वाची गोष्ट नाही तर ती एक प्रॅक्टिकल गरजही असते. अनेक घरात जागा अपुरी असल्याने वयात आलेली मुलं देवळात किंवा शाळेच्या आवारात झोपायला जात असतात. ती त्यांच्या पालकांची आणि मुलांचीही सोय असते. व्यक्त होण्याची गरज ही फक्त पालकांनाच नसते तर ती मुलांनाही असते.

मुलं काय काय बघत होती या सगळ्या काळात? तर पालकांचे हातातून निसटून जाणारे रोजगार, घरातला संपत आलेला शिधा, जमेल तिथून जमेल तसं कसंबसं धान्य आणून खायला करणाऱ्या आईची तगमग, कामासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना मार खाऊन घरात आलेले पालक, दिवसेंदिवस खचत जाणारे, मनातून हताश होत जाणारे आईबाप. या सगळ्यांचा मुलांवर काय ताण पडत असेल? मुलं ही कुठे पुस्तकात लिहून ठेवल्याप्रमाणे देवाघरची फुलं नसतात ना त्यांच्या मनाची पाटी कोरी असते. ती एक वय न वाढलेली पूर्ण माणूस असतात ज्याला सगळ्या कळा आणि आईबापाच्या संसाराच्या झळा पोहचत असतात. या सगळ्या काळात अशी मनाने अवेळी मोठी झालेली, करपून गेलेली, हसताना डोळ्याने खिन्न असणारी कित्येक मुलं तुमच्या-माझ्या भवतालात आपण बघत आलोय. त्यांचं हे अवेळी मोठं होणं ही उलटी फिरवता येणारी बाब नाही. या सगळ्यात आधी काय संपतं तर आशा, सगळ्यात आधी काय नष्ट होतात तर स्वप्नं. बरं या मुलांची स्वप्नं तरी काय असतात? तर बहुतांश मुलींना शिक्षिका व्हायचं असतं आणि मुलांना पोलीस किंवा सैन्यात जायचं असतं. सगळ्यांना पटकन शिकून, मोठं होऊन आईबापांना मदत करायची जी घाई असते ती फक्त 'शाळकरी मुलांची स्वप्नं' अशी नसते तर घराच्या चिंतांची काजळी असते त्यांच्या मनावर चढलेली. ती सगळी स्वप्नं, त्या आशा या एकवीस महिन्यांच्या शाळाबंदीने हिरावून घेतल्या.

या सगळ्या कोव्हिड काळाच्या सुरुवातीला शिक्षक कुठे होते? तर पेशंट्सचा सर्व्हे करत होते, चेकपोस्ट वर ड्युटी करत होते, रेशन धान्य दिलं जातं आहे की  नाही हे तपासत होते, गावात कुणी नवी व्यक्ती आली आहे का हे बघत होते. या सगळ्यातून बाहेर पडत अनेक शिक्षकांनी २०२० च्या पहिल्या सत्रापासून ऑनलाईन शिकवण्याचे प्रयत्न आपणहून सुरु केले. मुलांना शिक्षणाशी जोडून ठेवण्याचा तो एक महत्वाचा प्रयत्न शिक्षकांनी केला. पण किती मुलांच्या घरात मोबाईल आहेत? स्मार्ट फोन किती घरात आहेत? किती घरात एकापेक्षा जास्त मुलं असताना त्यांना देता येतील असे फोन उपलब्ध आहेत? जिथे 'जगणं' ही पहिली गरज बनली आहे त्या काळात या फोनसाठी लागणारा डेटा रीचार्ज करणं हे किती पालकांना शक्य झालं? किती पालकांचे फोन हे असे पाच पाच तास चालतील अशा क्षमतांचे आहेत? कामाच्या रगाड्यात आपला फोन पाच पाच तास मुलांच्या जवळ देणं हे किती पालकांना शक्य होतं? ज्या घरात एक फोन आणि दोन भावंडं आहेत तिथे पहिलं प्राधान्य हे मुलांना मिळालं की मुलींना?

हे सगळे झाले प्रॅक्टिकल मुद्दे. आता शैक्षणिक भाग बघूया. एवढ्या सगळ्या गोंधळात ज्या मुलांना हे ऑनलाईन शिक्षण घेता आलं त्यांची अवस्था काय होती? शिक्षकांनी उत्साहाने हे ऑनलाईन शिकवणं सुरु केलं पण ते शिकवण्यासाठी लागणारं कौशल्य किती शिक्षकांकडे होतं? वर्गात मुलं डोळ्यांसमोर हजर असताना शिकवणं आणि आपल्यासमोर फक्त मोबाईलचा स्क्रीन आहे आणि पलीकडच्या बाजूला आपल्याला नीट न दिसणारी मुलं असताना शिकवणं हे पूर्ण वेगळं कौशल्य आहे. आपल्या शिक्षकांना हे कौशल्य देण्याची कुठली व्यवस्था शिक्षण विभागाने उपलब्ध केलेली आहे? तर बहुतांश वेळा स्क्रीनसमोर फळा ठेऊन शिकवत असलेले शिक्षक, 'म्यूट करा रे, म्यूट करा रे' चा जप, मुलांना कळतं आहे की नाही याचा कोणताही अंदाज नसलेले शिक्षक असं चित्र समोर येतं. मुलांच्या बाजूने चाळीस चाळीस मिनिटं स्क्रीनकडे बघत ऐकण्याचा प्रयत्न करणारी मुलं ते समजून घेऊ शकत होती का? मुलांचा लक्ष देऊन एखादी गोष्ट समजून घेण्याचा मानसिक कालावधी किती असतो? एकटक त्या मोबाइलकडे बघायचं, पलीकडून सर काय बोलतात त्याचा अंदाज घेत राहायचं, आपल्याला हा मुद्दा समजला की नाही हे कळून घेईपर्यंत शिकवणं पुढे गेलेलं. जी मुलं प्रत्यक्ष वर्गात बसलेली असताना 'सर, मला हे समजलं नाही' असं म्हणण्याचं धाडस करु शकत नाहीत त्यांना हे स्क्रीनवर विचारता आलं असेल का? ऑनलाईन शिकण्याकरता लागणारी शांतता हा प्रिव्हिलेज आहे, एका छोट्याश्या खोलीत सगळं घर कोंडलेलं असताना किती मुलांना ती शांतता मिळाली असेल? 

जी सगळी मुले या काळात अंगणवाडीतून पहिलीत आणि आता दुसरीत आलीत त्या मुलांचं काय झालं असेल? एका जागी बसण्याचं कौशल्य, सामाजिकीकरणाचं कौशल्य, घरापासून लांब एका ठिकाणी किमान काही वेळ घालवण्याचं कौशल्य अंगणवाडी देत असते. ती काही फक्त पोषण आहार देण्याची जागा नाही तर शाळेत जाण्याच्या मोठ्या प्रवासाची पूर्वतयारी असते. ज्या मुलांनी हा घरापासून ते अंगणवाडीपर्यंतचा प्रवासच नीट केलेला नाही, जी मुलं अजूनही घरातच आहेत आणि कदाचित पुढच्या काळात शाळेची पायरी चढतानाच आपोआप दुसरीत गेलेली असतील त्यांच्या मनावर किती ताण असेल? किती पालकांकडे मुलांना शिकवण्याचं कौशल्य असतं? वेळ असतो? आपल्याला काहीच येत नाही ही भीती या मुलांना कुठल्या कुठल्या त्रासातून नेत असेल? अंगणवाडी - जी एक श्वास घेण्याची नीट जागा म्हणून या मुलांच्या आयुष्यात असते त्या मुलांना आता थेट शाळेत सामावून घेताना शिक्षकांना किती आटापिटा करावा लागेल? या सगळ्या प्रश्नांचा आवाका आणि मुलांच्या भीतीची  खोली कळून घ्यायची क्षमता आपल्याकडे अजून म्हणावी तशी दिसत नाही.

या सगळ्या काळात जी मुलं पदवीच्या अभ्यासक्रमात आहेत आणि ज्यांच्याकडे मोबाइल आहे अशा मुलांना तरी काय दर्जाचं शिक्षण मिळालं आहे? जे कोणी इंजिनियरिंग किंवा तत्सम शिक्षण घेत आहेत, जिथे प्रत्यक्ष प्रयोगातून शिकणं जास्त महत्वाचं असतं तिथे फक्त मोबाइलमध्ये बघून पुढच्या वर्षात गेलेल्या मुलांच्या शिक्षणाचा दर्जा, त्यांनी मिळवलेले गुण आणि त्याना कळलेल्या गोष्टी याचा ताळेबंद जुळतो का? ही मुले येत्या दोन वर्षात जेव्हा नोकरीच्या बाजारात येतील तेव्हा काय भीषण चित्र असेल? आत्ताच '२०२०-२१ च्या पदवीधारकांनी अर्ज करु नयेत' अशा जाहिराती समोर येताहेत. एका विशिष्ट प्रकारचे शिक्षण घेऊन त्या क्षेत्रात नोकरी करत असताना प्रत्यक्ष ज्ञानच नसेल तर त्यामुळे किती मोठा गोंधळ उडू शकतो? ही मुलं फक्त वयाने मोठी आहेत आणि त्यांच्याकडे मोबाईल असलाच तर आहे ही जमेची बाजू जरी म्हटली तरी त्यावर शिकायचं कसं हे ज्ञान कसं मिळणार? उलट मोबाइल एका पातळीवर सतत भरकटवण्याचं काम करणारं महत्वाचं अस्त्र असताना मिळणाऱ्या माहितीचं समजेत रुपांतर करण्याचं कोणतं शास्त्र आपल्या शिक्षण समाजात निर्माण झालेलं आहे? 

या सगळ्या गोंधळात आपला हेतू साध्य करण्याच्या प्रयत्नात जणू, शाळा या येत्या डिजिटल काळात कालबाह्य होणार आहेत, शिक्षकांना  पर्याय म्हणून घरात असणारा मोबाइल पुरेसा असू शकतो आणि उलट मुलं जास्त आनंदाने शिकतात, आता येत्या काळात मुलांना लहानपणापासून कोडिंग शिकवा या आणि तत्सम गोष्टी आपल्या माथी मारणारा बाजार आपला कावा साधतोय हेही एक वास्तव आहे. एका बाजूला पालकांना बेसावध गाठणाऱ्या बाजारातील कंपन्या, तर दुसऱ्या बाजूला सरकारी शाळांना आपलं कुरण मानून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपले उघड छुपे हेतू पुढे नेणाऱ्या संस्था यांचं जाळं फार ताकदीने विणलं जातं आहे. अर्थात डिजिटल शिक्षणाच्या सगळ्याच पर्यायांचा हेतू वाईट नाही किंवा अजूनही शिक्षकांनी फक्त खडू फळा वापरूनच शिकवावं असंही नाही. पण आजही देशभरातील लाखो मुलांना त्यांच्या भवतालात असणारी शाळा हा एकमेव मार्ग आहे शिकण्याचा. माझ्या घरातील मुलांपासून ते माझ्या आसपासच्या मुलांपर्यंत सगळे या शाळाबंदीला कंटाळून गेले आहेत. त्यांना त्यांच्या शाळेत जायचं आहे. त्यांना त्यांची मित्रमंडळी हवी आहेत. त्यांना रोज शाळेत जायचं आहे आणि इकडे रोज नवे आदेश, नवनवे गोंधळ शाळा उघडण्याच्या शक्यता धूसर करताना दिसत आहेत.

शासनाने आणि अधिकारी वर्गानेही हे लक्षात घ्यायला हवंय की मुलं शाळेत येतात ती फक्त त्या इयत्तेतलं शिकण्यासाठी नाही. ती अनेक इतर गोष्टीही शिकत असतात. मैत्री, सहवेदना, शेअरिंगची क्षमता, आपला भवताल समजून घेणे, आपल्या हातात नसलेल्या परिस्थितीसोबत जुळवून घेणे यासारखी अनेक कौशल्यं मुलं शाळेत शिकत असतात. मागच्या एकवीस महिन्यांनी मुलांचं हे शिक्षण हिरावून घेतलं आहे. फक्त एवढंच नाही तर शाळा मुलांना बालमजुरीच्या चक्रात अडकण्यापासून वाचवत असते. मुलींवर अवेळी पडणाऱ्या घरच्या जबाबदारीपासूनही वाचवत असते. ती त्यांना मोकळा श्वास घ्यायला शिकवत असते. कष्टकरी, वंचित, शोषित समाजातली मुलं घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास करतात तो कधीच फार सोपा नसतो. ती एक मोठी लढाई असते. पालकांनी आपल्या परिस्थितीसोबत केलेली. जिथे घरातली प्रत्येक व्यक्ती एक रोजगाराची संधी असते तिथे कामाला येणारा एक हात कमी करून शाळेत पाठवणं कधीच सोपं नसतं. तरीही पालक मुलांना शाळेत पाठवतात. आपली मुलगी किंवा मुलगा नीट शिकावा म्हणून जिवाचा आटापिटा करतात. एक मूल शिकतं तेव्हा अख्खं घर स्वप्न बघत असतं. या सगळ्या स्वप्नांना मागच्या एकवीस महिन्यांनी चूड लावली आहे.

मागे एकदा डॉ. शांता सिन्हांसोबत बोलत होतो, तेव्हा त्यांना विचारलं की मुलं शाळेत येतात आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही तर काय करायला हवं?  तर त्या म्हणाल्या की शाळा असणं, ती कशीही असो, मोडकी, गळकी, घराजवळ, घरापासून लांब, मास्तर प्रेमळ असो नाहीतर मारकुटे - पण शाळा असायला हवी. शाळा असणं आणि आपल्याला शाळेत जायला मिळणं ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पहिली पायरी आहे. हे त्या वेळी फारसे पटलं नव्हतं पण मागच्या वीस महिन्यांनी ते भान नक्की दिलंय!

परेश जयश्री मनोहर
paresh.jm@gmail.com