कोरोनाचे चार शिकार

चार? तुम्ही म्हणाल हजारो लाखो म्हणा. बरोबर आहे तुमचं म्हणणं! कोरोनाचे पेशंट्स हजारोंनी आहेत. एकट्या मुंबईत चार हजारच्या वर पेशंट झालेत. पण कोरोनाची ज्यांना लागण झाली नाहीये, कोरोनाचे जे पेशंट नाहीत तेही कोरोनाचे शिकार झालेत त्याचं काय? आपण कोरोनाचे पेशंट 'होऊ नये' म्हणून केलेल्या धडपडीमुळे, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मुळे आपण सगळे जे झालो आहोत, तेही कोरोनाचे शिकारचं ना? आता उदाहरणार्थ अनिता आणि तिचा नवरा…

अनिता आणि तिचा नवरा दोघेही एका आयटी कंपनीत संगणक इंजिनियर म्हणून नोकरीला आहेत. दोन लहान मुलं आहेत. दोन बेडरूमचा चांगला फ्लॅट आहे. खाली कार पार्क केलेली आहे. ‘उच्च’कडे झुकणारं मध्यमवर्गीय सुखी कुटुंब. मार्चच्या सुरूवातीलाच मुलांची शाळा बंद झाली आणि ती घरी बसली. आणि जवळजवळ तेव्हापासूनच ती दोघही घरूनच काम करायला लागली. त्यांच्याकडे दिवसभर कामासाठी येणाऱ्या शकुंतलाबाई त्यांचं घर आणि मुलं छान सांभाळत. झोपडपट्टीत राहतात आणि उगाच संसर्गाचा धोका नको म्हणून त्यांनी शकुंतलाबाईंना सुट्टी दिली. आता महिन्याच्या वर झाले दिवस. अनिता रोज सकाळी उठून नाश्ता करतेय. दुपारचं जेवण करतेय. भांडी घासतेय. रात्रीचं जेवण. दुपारचा चहा. परत भांडी. रोज रोज सगळ्यांना पाहिजे ते नवीन इंटरेस्टिंग चविष्ट जेवण. झाडून पुसून करतेय ते वेगळंच. नशीब कपडे धुवायचं मशीन आहे. तरी ते चालवायचं, मग कपडे वाळत घालायचे. त्यांना थोडी का होईना इस्त्री करायची. त्यात मुलांचा गोंधळ. त्यांना सांभाळायचं हे आणखी एक दिवसभराचं काम. त्यातून ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन्स. अनिताची पुरी वाट लागलीय. नवरा सुरूवातीला भांडी तरी थोडी थोडी घासत होता. आता नेमक्या त्या वेळेला ऑफिसच्या कामात गर्क होतो.

घरात इतकं काम असतं याची पुरेपूर जाणीव अनिताला होती. तिने तिच्या आईला इतकं काम करताना पाहिलं होतं. पण तिने मात्र एक कमावती स्त्री म्हणून तिची त्या सगळ्या कामातून  सुटका करून घेतली होती. आयटी कंपनीतलं काम त्यांनी 'आऊट सोर्स' करून दिलं होतं अनिताला. आणि घरातलं सगळं काम अनितानं दिलं होतं 'आऊटसोर्स' करून शकुंतलाबाईंना. दोघे नवरा बायको कमावणारे होते. दोघे प्रोफेशनल होते. पण त्यातल्या फक्त एकावर म्हणजे फक्त तिच्यावर घरकामाची सगळी सगळी जबाबदारी पडली होती. तिच्या नवऱ्याला स्वयंपाक येत नव्हता. स्वयंपाक त्याला कधी कुणी शिकवलाच नव्हता. भांडी पण घासावी लागतात जेवण झाल्यावर आणि तीही पुरूषाने, याची त्याला कल्पनाच नव्हती. अनिता बाहेरच्या जगात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून समान काम करत होती. पण तिच्या घरात तिच्या खांद्याला खांदा लावणारी फक्त बाईच असू शकत होती. तिला घरकामातून, मुलं संभाळण्यातून मुक्त करणारी फक्त एक दुसरी बाईच होती. तिच्या घरातल्या कामाचं, मुलांना सांभाळायच्या कामाचं विभाजन घरातल्या इतर कोणाबरोबर मुळी झालंच नव्हतं. अनिता स्वतःला 'फेमिनिस्ट' - स्त्री मुक्तीवाली समजत असे. कमावती होती म्हणून असेल. नवऱ्याच्या जोडीने काम करत होती म्हणून असेल. पण शकुंतलाबाई गेल्यावर तिच्या हळूहळू लक्षात यायला लागलं, तिची स्त्री-मुक्ती किती तकलादू होती ते.

शकुंतलाबाई आज महिनाभर घरात होत्या. एक तारीख होऊन गेली तरी त्यांना मागच्या महिन्याचा पगार मिळेल की नाही याची गॅरेंटी नव्हती.  तसं जाताना मॅडमनी दिले होते हजार रुपये, पण तो काही पूर्ण पगार नव्हता. त्या हजार रूपयातून त्यांनी रेशन भरलं होतं. पण कोरोनाने केलेल्या महागाईत ते कुठवर पुरणार? शकुंतलाबाई अनिताच्या बिल्डींगपासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर एका दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीत आपल्या मुलीबरोबर राहत होत्या. त्या दोघी आणि मुलीचा एक मुलगा, असे तिघेच एकत्र राहत असत. शकुंतलाबाई गेली कितीतरी वर्ष अनिताबाईंच्या घरी काम करत होत्या. ‘अनिताबाईंना काय, पगाराची धास्ती नाय’ त्यांना वाटत असे. होईल बँकेत जमा. आपलं वेगळं आहे, दिला विचार करून पगार तर दिला. दिवसभर घरात बसून त्यांचे गुढघे दुखायला लागले होते. पुढे कसं होणार या विचारांनी त्यांची झोप उडाली होती. जेवण- भाकरी करायची तर जेमतेम मिळवलेलं घासलेट. त्यांनी वाण्याकडून आधीच उधारी घेतली होती.

त्यांनी स्वतःच अनिताबाईंनी आणून भरलेलं इतकं सगळं सामान पाहिलं होतं. तांदूळ, वेगवेगळ्या डाळी, आटा, डोश्याचं पीठ, साखर, चहा, कॉफी, मुलांचे खाऊ, दूध, तेल, बटर, ब्रेड, अंडी, टॉयलेट पेपर, कपडे धुवायचा साबण, भांडी घासायचा साबण, अंघोळीचा वेगळा साबण, मॅगीची पाकिटं, कांदे बटाटे, सगळ्या भाज्या. त्यांनी स्वतःच सगळं सगळं भरून ठेवलं होतं. केवढं सामान. फ्रिज उघडला तर बदाबदा खाली पडेल इतकं होतं. त्यांनी आपल्या घरात पाहिलं. ज्वारी संपत आली होती. तांदूळ तर एक हफ्ता झाले संपले होते. कालवणाला बटाटेच थोडे शिल्लक होते. आलं आणि लसूण त्यांनी शेजारच्या सुरेखाकडन घेतली होती थोडी.

त्यांच्याकडे अनिताबाईंचा नंबर होता. करावा का त्यांना फोन? थोडे पैसे पाहिजे होते. घासलेट तरी काळ्या बाजारातून आणलं असतं. त्या रोज खायच्या तो तंबाखू पण आता संपायला आला होता. त्यांच्या झोपडपट्टीच्या जवळच एक कोरोनाचा पेशंट सापडला होता. म्हणून सगळी झोपडपट्टी बंद करून बाहेर पोलीस उभे होते. पैसे - पगार आणायला जाणार तरी कसं?

शकुंतलाबाईंची मुलगी पारू – पार्वती.  नवरा गेल्यावर पार्वतीने जवळच्या आंबेडकर चौकात वडापाव आणि चहाची गाडी टाकली होती. आईची थोडी फार मदत असे, पण घरातली ती खरी कमावणारी.  तिचा धंदा तसा चांगला चालत असे. सकाळी लवकर उठून ती बटाटे उकडून ठेवायची. बेकरीतून पाव आणून ठेवायची. चहासाठी दूध साखर आणून ठेवायची. वीस मार्चच्या सकाळी पोलिसांनी तिला गाडी लावायला बंदी केली. तसे तिच्या गाठीशी होते थोडे पैसे. पंचवीस-सव्वीस मार्चला तिने आईबरोबर घरात रेशन भरून ठेवलं. चौदा एप्रिलला - आंबेडकर जयंतीला तिने आता पुढे काय होणार म्हणून शेजारी पाजारी विचारलं, आता तीन मे पर्यंत सगळं बंद. त्यानंतर पण आणखी किती आठवडे बंद राहील ते सांगतील म्हणे नंतर. म्हणजे एकूण चाळीस दिवस. हातात पैसा नाही. घरात धान्य नाही. खाणार तरी काय? गावाकडे जाऊया का? पार्वतीच्या मनात विचार आला. पण जाणार तरी कसं? आणि तिथे तरी कुठे जमीन आहे? घरची माणसं शेतावर अर्धपोटी काम करतात आणि तिने पाठवलेल्या मनीऑर्डरची वाट पाहतात. पार्वतीच्या पोटात गोळा आला. तंबाखू मागायला ती शेजारी तिच्या मैत्रिणीकडे गेली. तिची मैत्रीण सुरेखा कचरा वेचून पोट भरत असे.

सुरेखा तिथेच शेजारी राहत होती. तीन मोठी मुलं. नवरा बेभरवशी. रोज सकाळी लवकर उठून सगळं आवरून ती आपलं कचऱ्याचं मोठं पोतं घेऊन घराबाहेर पडे आणि जिथून जिथून मिळेल तिथून सुका कचरा गोळा करून आपल्या पोत्यात भरे. प्लॅस्टिकच्या बाटल्या, शॅम्पूच्या रिकाम्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या, अल्युमिनियम आणि पत्र्याचे डबे, पेपर, पुठ्ठे जे जे मिळेल ते ते ती आपल्या पोत्यात भरे. फुटपाथवर पडलेला, कचरापेटीतला आणि कचरापेटीच्या बाहेर पडलेला कचरा हाच तिच्या उत्पन्नाचा स्रोत. मग उशीरा दुपारपर्यंत घरी येऊन झोपडीच्या बाहेर बसून ती जमवलेल्या सगळ्या कचऱ्याचं वर्गीकरण करे. प्लॅस्टिक एका बाजूला, कागद एका बाजूला, काचा एका बाजूला, पुठ्ठा एका बाजूला. मग त्यांना वेगळ्या वेगळ्या पिशव्यांतून भरून संध्याकाळी ती ते सगळं भंगाराच्या दुकानात विकायला घेऊन जात असे. प्लॅस्टिकचे एका किलोमागे तिला दहा बारा रुपये मिळतं. कागद आणि पुठ्ठ्याचे पण असेच मिळत; पण काचेला मात्र किलोमागे फक्त एकच रुपया मिळत असे. कचरा भंगाराच्या दुकानात विकला की तिच्या हातावर दिवसामागे शंभर ते दीडशे रुपये पडत. कधी थोडे जास्त, कधी थोडे कमी.

हीच तिची रोजची कमाई. दोन तीन दिवसाची कमाई गोळा झाली कि ती थोडं तेल, थोडे तांदूळ, थोडी ज्वारी, एखादी भाजी, चहापत्ती, थोडी साखर एका रेशनच्या दुकानातून आणत असे. साबण कपड्याला तोच आणि अंगाला पण तोच. दुसऱ्या मोठ्या दुकानात जायची सुरेखाला लाज वाटत असे. तिथे मोठी गिऱ्हाइकं ...चांगले कपडे घातलेल्या बायका. त्यांना बघून ती बावचळत-घाबरत असे.

मार्चच्या चोवीस तारखेला लॉकडाऊननंतर भंगारची दुकान बंद झाली. कचरा गोळा करायला गेलं तर आधी रस्त्यावरून पोलीस हाकलतात आणि मग गोळा करून विकणार तरी कोणाला? तिचं उत्पन्नच अचानक थांबलं. बरं तिच्याकडे गाठीला थोडे रुपये होते, त्याचं सामान थोडं आणलं. आता पुढे खाणार काय? त्यात तो नवीन आजार होऊन मरण्याची धास्ती. मग मुलांचं काय?

या नव्या आजाराची कुणाला भीती संसर्गाची, तर कुणाला भीती भुकेने मरण्याची. आजार पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी केलेला लॉकडाऊन. पण या लॉकडाऊनमुळे छोट्या छोट्या उत्पन्नाचे स्रोत एका झटक्यात बंद झाले. हातावर पोट, रोज कमावणार तेव्हाच खाणार अशी हजारो लाखो कुटुंबे आहेत या देशात. त्यांच्याकडे 'बाजूला काढून ठेऊ' अशी रक्कम कधीच नसते. बरं, असं आणखी किती दिवस चालेल, काही कल्पना नाही, त्यामुळे भविष्याच्या भीतीशिवाय दुसरा काही मार्गच समोर नाही. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये - जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आहे - तिथे हा लॉकडाऊन केव्हा संपेल याची काहीच गॅरेंटी नाही.

आपल्या देशात श्रम करून पोट भरणारी दोनच प्रकारची माणसं आहेत. एक - ज्यांना त्यांच्या नोकरीची / कामाची हमी आहे, आणि दुसरे ज्यांना कामाची हमी कमी तरी आहे किंवा अजिबातच नाही. या दुसऱ्या प्रकारचे श्रमिक आपल्या देशाच्या श्रम बाजारात मोठ्या प्रमाणावर आहेत. एकूण रोजगाराच्या जवळजवळ ९०% ते ९३% रोजगार हा या असंघटित स्वरूपाचा आहे.. हा श्रम बाजार जरी छुपा दिसत असला तरी एकूण अर्थव्यवस्थेचा एक मूलभूत घटक आहे. त्यांच्या श्रमावर आपली अर्थव्यवस्था चालते.. पुष्कळशा स्त्रिया या दुसऱ्या प्रकारच्या - कामाची काहीच गॅरेंटी नसणाऱ्या कॅटेगरीत मोडतात म्हणून त्यांना खूप जोराचा फटका बसणार आहे.

स्त्रिया घरकाम तर करतातच. त्याचे त्यांना कोणी पैसे तर देत नाहीतच पण  या  मूलभूत  कामाला  काही  किंमतच नाही. घर, मुलं, घरातली वयस्कर माणसं सांभाळून बायका काम करतात आणि काहीतरी उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात.  भाजी विकतात. विटांच्या कारखान्यात कडक उन्हात विटा भाजतात. रस्त्यावर चहा-खाण्याचे पदार्थ विकतात. पापड लाटतात. रस्त्यावर झाडू मारतात. सार्वजनिक संडास धुतात. कचरा उचलतात. वेश्याव्यवसाय करतात. विड्या वळतात. छोट्या छोट्या कारखान्यातून नोकऱ्या करतात. कपडे शिवतात. कुंभाराची माती मळतात. फुलं विकतात. मुलं सांभाळतात. मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतात. भांडी धुणी करतात. लोकल ट्रेनमध्ये फुटकळ वस्तू विकतात. केस कापतात. मसाज करतात. गावाकडे शेतमजुरी करतात. शाळेतून शिकवतात. डॉक्टर आणि नर्स स्त्रिया आहेत. संगणक इंजिनियर स्त्रिया आहेत. त्या राजकारणात आहेत समाजकारणात आहेत. यादी मोठी आहे. पण यातल्या खूपशा स्त्रिया या असंघटित किंवा अनौपचारिक श्रम बाजारात आहेत. काँट्रॅक्टवर काम करणाऱ्या, सेल्फ एम्प्लॉइड, घरात केलेल्या उत्पादनाच्या कामगार स्त्रिया, डेली वेजर. एक तर  त्यांच्या  कामाची काही गॅरेंटी  नाही. त्यांनी जर काम केलं नाही तर त्यांना कुठलंच वेतन मिळत नाही.

कोरोनाचा फटका सगळ्या जगाला बसलाय. अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला. प्रत्येक आर्थिक व्यवस्थेला तो बसलाय आणि अजून बसणार आहे. परंतु भारतासारख्या देशात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या खूप खूप मोठी आहे. संघटित श्रम बाजारात जे काम करतात, त्यांना पगाराची हमी आहे. त्यांना अनिताला होतोय तसा त्रास होईल. पण त्यांचे फ्रिज भरलेले आहेत. त्यांचे बँक बॅलन्स गुबगुबीत आहेत. एकदा लॉकडाऊन संपला की त्यांचं जीवन पुन्हा होतं तसं होईल कदाचित. त्यांना पुढेही ज्या अ‍ॅडजस्टमेंट्स कराव्या लागतील, त्यासुद्धा त्यांच्या सोयीने करता येतील कदाचित. अनितासारख्या असंघटित - अतिशय मोलाच्या पण कमी वेतनाच्या बायकांवर ते किती विसंबतात हे कळून ते त्यांचे पगार तरी वाढवतील का? ज्यांची आयुष्यच कोलमडली, ज्यांची उपासमार होते आहे, सावकाराकडून कर्जबाजारी झाल्याशिवाय ज्यांना गत्यंतर नाही, त्यांचं काय? 'जे पुढे होईल त्याच्यावर काही कंट्रोल नाही' अशांचं काय? खरा प्रश्न त्यांचा आहे.

रोहिणी भट-साहनी (rohinisahni2000@yahoo.com)

व्ही. कल्याण शंकर (vkalyanshankar@yahoo.co.in)

(रोहिणी भट साहनी या पुणे विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या, आता सेवानिवृत्त आहेत.  व्ही. कल्याण शंकर हे सिम्बियोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)