फेसबुक, व्हॉट्सअॅपवरील संवाद आणि नातेसंबंध
फेसबुक, व्हॉट्सअॅपसारखी समाजमाध्यमं आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाली आहेत. पण या माध्यमांचा वापर करताना छोट्या छोट्या गोष्टींवरूनही किती मोठे गैरसमज निर्माण होतात आणि नातेसंबंधात दुरावा येतो, हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. ऑनलाईन दिसणं, मेसेजला उशिरा उत्तर येणं, प्रोफाईल फोटो दिसणं-न दिसणं किंवा स्टेटस पाहणं अशा साध्या गोष्टींवरून लोक लगेच निष्कर्ष काढतात आणि नात्यात ताण निर्माण होतो. अशाच काही अनुभवांच्या माध्यमातून समाजमाध्यमांकडे थोड्या समजुतीने आणि विश्वासाने पाहण्याची गरज अधोरेखित करणारा हा लेख आहे. हा लेख बसवंत विठाबाई बाबाराव, प्रकल्प समन्वयक, वनराई, पुणे यांनी लिहिला असून तंत्रज्ञान आणि मानवी नातेसंबंध यांच्यातील सूक्ष्म नातेसंबंधांचा विचार करायला लावणारा आहे.
अगदी तंत्रज्ञानात नवखे लोकच नाही, तर जवळजवळ एक दशकापासून फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरणारी व्यक्तीसुद्धा या बाबतीत अनेकदा चुका करताना दिसतात. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या एका मैत्रिणीशी संवाद साधताना तिने तिच्यासोबत घडलेली एक घटना सांगितली. तिच्या कामाचा भाग म्हणून तिला सतत ऑनलाईन राहावे लागते. लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप उघडून अनेक गटांमधील माहिती एकत्र करणे, कामाचे संदेश इतर गटांमध्ये पाठवणे असे तिचे काम असते. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या एका मित्राने तिच्याशी भांडून मैत्री संपवण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतली. ‘ऑनलाईन असणे’ म्हणजे सतत संवादासाठी उपलब्ध असणे, अशी त्याची समज झाली होती. त्यातून त्याने मैत्रिणीसोबतची आपली दीर्घकालीन मैत्री संपवली.
व्हॉट्सअॅप व इतर समाजमाध्यमे आपल्याला नीट समजली नसतील, तर आपणही आपली मैत्री अशीच गमावू शकतो. तंत्रज्ञान हा नात्यात दुरावा निर्माण करणारा मुख्य घटक नाही; नात्यात एकमेकांप्रती किती विश्वास आहे, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तरीसुद्धा हा विश्वास तयार होण्यात किंवा कमी होण्यात तंत्रज्ञानातील अशा सूक्ष्म गोष्टी भर घालत असतात. तंत्रज्ञान आपल्या हातात आले, मात्र त्याच्या वापराचे शिक्षण आपल्याला नीट मिळाले नाही. हिरवा बिंदू दिसतो म्हणजे मित्र ऑनलाईन आहे. आपण त्याला किंवा तिला संदेश पाठवतो, पण प्रतिसाद मिळत नाही. त्यावरून लगेचच “तो मला दुर्लक्ष करतो”, “तो मला किंमत देत नाही” असा निष्कर्ष आपण काढतो. असे करणारे फक्त टीनएजर्सच असतात असे नाही. मी काही दिवस एका अशा गावात गेलो होतो जिथे फक्त एका पाण्याच्या टाकीवर गेल्यानंतरच नेटवर्क मिळत असे. गावात अशी नेटवर्कची ठिकाणे दोन-तीनच होती. तिथे गावातील तरुणांची गर्दी असायची.
एकदा आमचा एक सहकारी टाकीवर जात होता, तेव्हा आम्ही सर्वांनी आमचे मोबाईल फोन त्याच्याकडे दिले. तो थोडा वेळ टाकीवर थांबून खाली आला. तेव्हा आमच्याकडे अनेकांचे मेसेज पोहोचले होते. ते वाचून घेतले. पण त्यांना प्रतिसाद द्यायचा तर पुन्हा टाकीवर जावे लागणार होते. त्या दिवशी पुन्हा जाणे झाले नाही. आलेल्या मेसेजेस मध्ये, एका सामाजिक संस्थेच्या प्रमुखांचा संदेश होता. त्यांनी त्यावरून असा समज करून घेतला की “हा आपल्याला प्रतिसाद देत नाही, आपल्याला किंमत देत नाही, दुर्लक्ष करतो.” एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळत नाही याचे अनेक अर्थ, अनेक संदर्भ आणि अनेक कारणे असू शकतात. माझ्या दोन मित्रांचा काही कारणावरून व्हॉट्सअॅपवर वाद झाला. त्यापैकी एकाने ठरवले की “व्हॉट्सअॅपवर बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटून बोलूया.” म्हणून त्याने प्रतिसाद देणे टाळले. पण दुसऱ्या मित्राला तिथेच चर्चा करायची होती. तो सतत प्रश्न विचारत राहिला. पहिल्याने काहीही उत्तर दिले नाही.
मग तो दुसरा मित्र माझ्याकडे येऊन म्हणाला, “ह्याने मला ब्लॉक केले आहे. असे कसे करू शकतो?” मी त्याला शांत केले आणि संपूर्ण प्रकरण समजून घेतले. मी त्याला सांगितले की “त्याने तुला ब्लॉक केलेले नाही, तो फक्त प्रतिसाद देत नाही आहे.” त्याच्या फोनवर त्या मित्राचे प्रोफाईल पिक्चर दिसत नव्हते, म्हणून त्याला शंका आली की त्याला ब्लॉक केले गेले आहे. मग त्याने माझ्या फोनमध्ये त्या मित्राचे प्रोफाईल उघडून पाहिले. तिथे मात्र प्रोफाईल पिक्चर दिसत होते. त्यामुळे त्याची खात्री झाली की, ‘मला नक्कीच ब्लॉक केले आहे.’
मी पुन्हा एकदा नीट पाहिले. मी बराच काळ त्या पहिल्या मित्राशी व्हॉट्सअॅपवर संवाद केला नव्हता. त्यामुळे माझ्या फोनवर आधी त्याचे प्रोफाईल पिक्चर दिसले, पण पुन्हा पाहिल्यावर ते दिसले नाही. तेव्हा मला लक्षात आले की प्रोफाईल फोटो दिसणे किंवा न दिसणे हे कधी नेटवर्कवर, तर कधी सततच्या संवादावर अवलंबून असते. यावरून कुणी आपल्याला ब्लॉक केले आहे किंवा आपल्याला किंमत देत नाही असे निष्कर्ष काढून स्वतःच विसंवादाला खतपाणी घालने कितपत योग्य आहे? अलीकडे अनेकदा फॉरवर्ड केलेल्या संदेशांवर “Forwarded many times” असे लिहून येते. असा संदेश तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवलात तर त्यातून ‘तुम्ही हा मेसेज अनेकांना पाठवला आहे, म्हणजे तुम्ही मला विशेष मानत नाही’ असा गैरसमज होऊ शकतो. त्यातूनही नात्यात ताण निर्माण होऊ शकतो. पण समोरच्या व्यक्तीने हे लक्षात घ्यायला हवे की “Forwarded many times” याचा अर्थ तो संदेश अनेक लोकांनी अनेक वेळा शेअर केला आहे, असा होतो; तो तुम्हाला पाठवणाऱ्या व्यक्तीनेच अनेकांना पाठवला आहे असा नव्हे.
काही लोक इतक्या पटकन संदर्भ जोडतात याची कल्पनाही न केलेली बरी. माझा एक मित्र त्याच्या मैत्रिणीबद्दल सांगत होता. तो म्हणाला, “अरे यार, काय करू हिचे कळतच नाही.” मी विचारले, “नेमके काय झाले?” ती त्याला सतत फेसबुकवर फॉलो करत राहते. तो कुणाची पोस्ट लाईक करतो, कुठे कमेंट करतो, किती वाजता करतो, हे सगळे ती पाहते. त्याच वेळेत तिने काही विचारलेले असते आणि त्याने उत्तर दिले नाही, तर लगेच आरोप सुरू होतात, “तू माझ्यावर प्रेम करत नाहीस.” एकदा तर हद्दच झाली. त्याने तिला कारण सांगितले, पण तिला त्यावर विश्वास नव्हता. तिने कोण कोण ऑनलाईन आहेत हे तपासले. त्यात त्याची एक दुसरी मैत्रीण ऑनलाईन दिसली. मग तिने पक्का समज करून घेतला की, ‘हा तिच्याशीच बोलत आहे’. रागात तिने त्याला म्हणाले, “मला माहिती आहे तू कशात बिझी आहेस, आता माझ्याशी बोलू नको.”
तो म्हणाला, “मला सतत स्पष्टीकरणे द्यावी लागतात. एखाद-दोन दिवस बोलता आले नाही तर लगेच आरोप होतात की तू मला विसरलास, तुला दुसरेच कुणीतरी आवडते.” काही दिवसांनी तो मित्र पुन्हा भेटला. मी विचारले, “आता काय सुरू आहे?” तो म्हणाला, “ब्रेकअप झाले.” पण त्याला ब्रेकअपचे दु:ख नव्हते. कारण नंतर नवा प्रश्न निर्माण झाला.
आता व्हॉट्सअॅपमध्ये स्टेटसची सुविधा आहे. ती मैत्रीण म्हणू लागली की “तू माझे स्टेटस पाहू नकोस.” मी त्याला म्हणालो, “ठीक आहे, पाहू नकोस.” त्याने सांगितले की स्टेटस एकदा पाहिले की पुढचे स्टेटस आपोआप उघडते, व्हिव्ह होते. मुद्दाम उघडण्याची गरज नसते. मी त्याला समजावले की स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीकडे पर्याय असतो की कुणाला दाखवायचे आणि कुणाला नाही. जर सर्वांसाठी ठेवले असेल, तर कुणी पाहिले म्हणून भांडण्याचे काही कारण नाही. त्याने तिला सुचवले, “तुला माझा स्टेटस दिसू नये असे वाटत असेल तर माझा नंबर डिलिट कर.” त्यावर तिचा प्रतिसाद असा होता की, “मी कुणाचा नंबर डिलिट करायचा हे तू मला सांगू नकोस.”
तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांनी संवाद सोपा केला आहे, पण त्याबरोबर अनेक गैरसमजही निर्माण केले आहेत. नात्यात विश्वास नसेल तर अशा माध्यमांमुळे ते लवकर तुटू शकते किंवा त्यात विसंवाद वाढू शकतो.
एखादी मोठी पोस्ट केली म्हणजे ती त्याच वेळी लिहिली असेल असेही नाही. “तुला उत्तर द्यायला वेळ नव्हता पण फेसबुकवर भला मोठा पोस्ट करायला वेळ होता” असे आरोप अनेकदा होतात. एका माध्यमावरील कृतीचा संदर्भ दुसऱ्या माध्यमाशी जोडला जातो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळी सांगणे शक्य नसते. म्हणून स्टेटस किंवा पोस्टद्वारे शेअर करणे हा नवा संवादप्रकार आहे. पण या जागा नात्यातील ताण व्यक्त करण्यासाठी वापरल्या तर अडचणी वाढतात. एखादे गाणे शेअर करताना फक्त आवड म्हणूनच शेअर केले जाते असे नाही. त्या गाण्यातील काही ओळी प्रिय व्यक्तीला सांगायच्या असतात. पण धावपळीच्या जगात त्या व्यक्तीने ते गाणे पूर्ण ऐकून अर्थ लावावा आणि तसे वागावे, ही अपेक्षा अवास्तव आहे. माध्यमांचा वापर नातेसंबंध दृढ करण्यासाठी व्हायला हवा. नातेसंबंध संशयास्पद करून तोडण्यासाठी झाला, तर आपण माध्यमांच्या हातात गेलो आहोत, असेच म्हणावे लागेल.
बसवंत विठाबाई बाबाराव प्रकल्प समन्वयक, वनराई, पुणे मो. 8956080218, 9422205929