वचनबद्ध संबंध : प्रौढ एकल व्यक्तींच्या एकटेपणावरील उपाय

२१ ऑक्टोबर २०२६

लग्न किंवा लिव्ह-इनच्या पलीकडे जाऊन, प्रौढ एकल व्यक्तींच्या एकटेपणावर उपाय ठरू शकणारा आणखी एक पर्याय म्हणजे ‘वचनबद्ध संबंध’. डॉ. हेमंत देवस्थळी यांनी या लेखात या वेगळ्या संकल्पनेची मांडणी केली आहे. आपापलं स्वतंत्र आयुष्य जगत एकमेकांना भावनिक आधार देणं, मैत्री आणि एकनिष्ठतेतून नातं जपणं, हा या संकल्पनेचा गाभा आहे. मात्र अशा नात्यांकडे कुटुंब आणि समाज कसं पाहतो, यासोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक मान्यतेचे प्रश्नही यात महत्त्वाचे ठरतात. वैवाहिक संबंधांची परंपरा बहुधा सर्व मानवी समाजांमध्ये आहे. सहजीवन संबंध किंवा लिव्ह-इनची चर्चा सध्या चालू आहे. वचनबद्ध संबंध ही त्याच्याआधीची अतिशय जवळची पायरी असू शकते व तो प्रौढएकल व्यक्तींच्या एकटेपणावर उपाय होऊ शकतो. या वेगळ्या संकल्पनेबद्दल बहुधा प्रथमच चर्चा करणारा लेख.

आजचा समाज स्त्री-पुरुषामधील वैषयिक मैत्रीला विवाहसंस्थेच्या चौकटीतच मान्यता देत असल्यामुळे समाजात एक असा मोठा वर्ग निर्माण झाला आहे की जो सतत मानसिक असमाधानाचं ओझं वागवत जगत आहे. या वर्गाला विवाहाच्या चौकटीत बद्ध होणं विविध कारणांमुळे शक्य होत नाही. पण त्यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक व शारीरिक एकाकीपणाला तोंड देताना या वर्गाची खूप दमछाक होत आहे. हा असा वर्ग मुख्यत: प्रौढ म्हणजे पन्नाशी ओलांडलेले विधवा, विधुर, विभक्त किंवा अविवाहित अशा एकल विनासहचरांचा आहे. या वर्गाच्या वैषयिक-भावनिक गरजांबद्दल त्यांचं स्वतःचं कुटुंब व एकूणच समाज कायम फटकून राहिलेला आहे. या एकल व्यक्तींना कागदोपत्री पुनर्विवाह करता येत असला तरी प्रत्यक्षात यात अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण होतात. मुलं, नातेवाईक, समाज काय म्हणेल यापासून नवीन माणसाशी या वयात आपलं जुळेल का? अशा शंका-कुशंकांपर्यंत वेगवेगळी रूपं या अडचणी घेत असतात. वैवाहिक जीवनात समाधान व आनंद न मिळालेले विभक्त ‘आगीतून फुफाट्यात जाण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं’ असा विचार करून एकटं राहणं पसंत करतात. पण एकटेपणामुळे येणारा मानसिक ताण ही मंडळी टाळू शकत नाहीत. कारण काही अपवाद सोडता बहुतेकांची आयुष्याची ती सर्वात महत्त्वाची मानसिक गरज आहे. मनुष्य प्राण्यानं एकटं राहावं यासाठी निसर्गानं त्याला जन्माला घातलेलं नाही. आधीच एकटेपण वाढत चाललेल्या आधुनिक समाजात आयुष्यात जोडीदारच नसेल तर ते एकटेपण अधिक तीव्र होतं यात शंका नाही. समाजातील एक मोठा वर्ग सतत अशाप्रकारे तणावाखाली असणं ही परिस्थिती समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनं खचितच योग्य नाही. या दृष्टीनं प्रौढ एकल व्यक्तींसाठी काय करता येईल याचा विचार या लेखात केला आहे.

प्रौढ एकल व्यक्तींनी आपलं एकाकीपण पुनर्विवाहाच्या मार्गानं कमी करण्याचं ठरवलं तर त्यात मालमत्ता, मुलांशी संबंध, वाढत्या वयातील दोघांची मानसिकता, खालावणारी प्रकृती, विवाहाबरोबर येणाऱ्या दोन्ही बाजूच्या नातेवाईकांसंबंधित जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टींबाबत गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्या प्रश्नांची व्यवस्थित सोडवणूक करता आली तर अर्थातच त्यासारखं उत्तम काही नाही. पण हे प्रश्न सुटले नाहीत तर उरलेल्या थोड्या आयुष्यात आनंदापेक्षा क्लेश आणि दुःख वाट्याला येण्याचीच शक्यता असते. कारण विवाह झाल्यानंतर तो कायदेशीर करार असतो व त्यातून बाहेर पडणं अत्यंत त्रासदायक ठरू शकतं.

यावर उपाय म्हणून सध्या सहजीवन संबंधांची (लिव्ह-इन रिलेशनशिप) चर्चा चालू आहे. या संबंधांत स्त्री, पुरुष विवाह न करता पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. अशा बाबतीतही विवाहसंबंधात वर उल्लेखलेले सर्व प्रश्न निर्माण होऊ शकतात पण सहजीवन संबंधात कायदेशीर करार करण्याचं बंधन नसतं. किंवा जरी असा करार दोघांनी केलेला असला तरी त्यातून बाहेर पडणं विवाहातून बाहेर पडण्यापेक्षा सोपं व कमी त्रासदायक असतं.

पण वचनबद्ध संबंध (कमिटेड रिलेशनशिप) हा पर्याय त्यापेक्षाही सोपा आहे. या संबंधांमध्ये संबंधीत स्त्री-पुरुष एकत्र, एका घरात राहात नाहीत. दोघंही आपापल्या घरात राहातात, पण दोघे वारंवार भेटून, लिहून वा फोनद्वारे बोलून एकमेकांमधील मैत्री व सौहार्द जपतात. या संबंधांमध्ये मालमत्तेबाबत वाद निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मुलांशी संबंध, वाढत्या वयातील दोघांची मानसिकता, प्रकृती याबाबत काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण हे प्रश्न खूप कठीण झाले तर त्यातून सहजपणे दोघांना बाहेर पडणं सोपं असतं.

प्रौढ एकल स्त्री-पुरुषांनी आपल्या वयाच्या या टप्प्यात एकदम विवाहाचा किंवा लिव्ह-इनचा निर्णय घेण्याऐवजी प्रथम वचनबद्ध संबंधांचा प्रयोग करावा असं मुख्यत्वे या लेखात सुचवलेलं आहे. वचनबद्ध संबंधात स्त्री-पुरुष एकत्र राहात नसले तरी वारंवार भेटी व संभाषण यांच्यामार्फत त्यांना एकमेकांच्या स्वभावाचा परिचय होत असतो व पुढे लिव्ह-इन वा विवाह झालाच तर ते सहजीवन वा वैवाहिक जीवन आनंददायी होण्याची अधिक शक्यता निर्माण होते. वचनबद्ध टप्प्याची लांबी दोघांनी एकमेकांशी परस्पर विचार विनिमय करून ठरवावी. ती जन्मभर टिकू शकते किंवा लिव्ह-इन वा विवाहामध्येही तिचं रूपांतर होऊ शकतं.

आयुष्यातील एकटेपण कमी होण्यासाठी सूर छान जुळले तर एकापेक्षा अधिक व्यक्तींची गरज पडण्याचं कारण नाही. मनातील सर्व बोलता येईल अशी एक जरी व्यक्ती आयुष्यात लाभली तरी मानसिक एकटेपण कमी होतं. त्यासाठी दोघांनी सतत चोवीस तास एकत्र राहण्याची गरज नाही. किंबहुना त्यामुळे वाद होण्याची शक्यताच अधिक. वेगवेगळं राहून दोघं एकमेकांना अधिक चांगली स्पेस (म्हणजे मोकळीक) देऊ शकतात, दैनंदिन जीवनातील संघर्षाचे बारीक सारिक प्रसंग टाळू शकतात व परिणामी मनातील प्रेम व सौहार्द अधिक चांगल्या प्रकारे जपू शकतात. त्यामुळे वचनबद्ध संबंध या एकाच टप्प्यावर राहूनही व्यक्ती आयुष्यात फारशी गुंतागुंत न करता आपले एकटेपण संपवू शकते. त्यासाठी प्रत्यक्ष सहजीवनाची किंवा लिव्ह-इनची गरज नाही.

यात अनैतिक असे काही नाही

दोन प्रौढ एकल स्त्री-पुरुष यांचे विवाहाशिवाय भावबंध जुळले तर त्यात अनैतिक असं काही आहे असं वाटण्याचं कारण नाही. त्यांनी लिव्ह-इन किंवा विवाह केला पाहिजे असा आग्रह धरण्याचं कारण नाही. असे संबंध बेकायदेशीर तर नाहीतच पण ते असंस्कृत वा विकृतही नाहीत. या संबंधांमध्ये कोणीही कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय केलेला नसतो. इथं कोणी आपल्या पती किंवा पत्नीचा विश्वासघात केलेला नाही. अपत्ये असल्यास ती बहुधा सज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालेली असतात. त्यामुळे त्यांच्या संगोपनाचा प्रश्न नाही. तसेच, नवीन अपत्ये निर्माण होण्याची शक्यता पण नसते. या संबंधांना कोणतेही आर्थिक परिमाण नाही. (अर्थात वाजवी प्रमाणात ते असले तरी काही बिघडत नाही). त्यामुळे कोणी कोणाचे आर्थिक शोषण करण्याचा प्रश्न येत नाही. केवळ आपले मानसिक एकाकीपण कमी करण्यासाठी ते दोघे जवळ आलेले असतात.

या ठिकाणी प्रौढ हा शब्द महत्त्वाचा आहे. तरुण स्त्री-पुरुषांनी असे संबंध निर्माण केल्यास समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ते योग्य असेल किंवा नाही याची स्वतंत्रपणे चर्चा करावी लागेल.

एकनिष्ठतेला पर्याय नाही, छचोरपणाला स्थान नाही

वचनबद्ध संबंध विवाहाच्या चौकटीत बसत नसले तरी संबंधित व्यक्तींची एकमेकांबद्दलची एकनिष्ठता हा या संबंधांचा गाभा असला पाहिजे. या संबंधातून बाहेर पडणं लिव्ह-इन किंवा विवाहातून बाहेर पडण्यापेक्षा सोपं असलं तरी त्याला काहीही झालं तरी छचोरपणाचे स्वरूप येता कामा नये. ही जबाबदारी असे संबंध सुरू करणाऱ्या स्त्री-पुरुषांची, विशेषत: आपल्यासारख्या पुरुषप्रधान समाजात पुरुषांची, आहे. स्त्रियांनी या बाबतीत अधिक जागरूक राहाणं महत्त्वाचं आहे. दोघांनीही अशा संबंधांची सुरुवात करताना त्यांच्या सर्व संभाव्य परिणामांचा विचार करणं आवश्यक आहे. तसं न केल्यास पुढे हे संबंध तुटतील. समाजात असं अनेकांच्या बाबतीत वारंवार झाल्यास ते समाजस्वास्थ्याला हानिकारक ठरेल व समाजदेखील ही कल्पना उचलून घेणार नाही. हे संबंध निर्माण करताना हे संबंध सहज तुटू शकतात हे स्त्री व पुरुष या दोघांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे व त्यानुसार त्यांना मनाची कायम तयारी ठेवावी लागेल. त्यामुळे दुर्दैवाने हे संबंध तुटलेच तर त्यांना कोलमडायला होणार नाही.

खरा प्रश्न समाजमनाचा

या संदर्भात एकंदरीत समाजाचे मानस अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः कुटुंबातील तरुण पिढी आणि शेजार यांच्या याबाबतच्या दृष्टीकोनाला खूप महत्त्व आहे. तरुण पिढी रक्ताच्या नात्याने तर आजूबाजूचा समाज म्हणजे शेजारी भौगोलिकदृष्ट्या संबंधित स्त्री-पुरुषांच्या जवळ असतात. आपले वडील, आई, सासू किंवा सासरे किवा बहीण-भाऊ असे संबंध ठेवून आहेत याबाबत कुटुंबातील तरुण पिढीला वा इतर सदस्यांना अवघडल्यासारखं होणं किंवा त्याबाबत त्यांच्या मनात राग असणं समजण्यासारखं आहे. असे संबंध त्यांना अनैतिक वाटतात व त्यामुळे त्यांच्या मनात संबंधित व्यक्तींबाबत असलेल्या प्रतिमेला धक्का पोचतो. त्याच बरोबर अशा संबंधांबाबत ते जरी उदार असले तरी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींसमोर अशा संबंधांचं ते उघडपणे समर्थन करतील याची खात्री देता येणार नाही.

याबाबत दुसरा प्रश्न म्हणजे वारसाहक्कामुळे मिळणाऱ्या संपत्तीचा. आपल्या आई वडिलांच्या मालमत्तेवर आपला नैसर्गिक हक्क आहे अशी आपल्या समाजातील तरुण पिढीमध्ये सर्वत्र भावना आहे. त्यामुळे अशा संबंधांमधून आई/वडिलांनी पुढे विवाह केला किंवा आपल्या मित्र/मैत्रिणीवर ‘मोठा’ खर्च करू लागले तर आपल्याला वारसाहक्कानं विनासायास मिळणाऱ्या मालमत्तेत नवीन भागीदार निर्माण होईल की काय अशी भीती वाटून त्यांच्या मनात कमालीची असुरक्षिततेची भावना येते. ती समजण्यासारखी आहे. त्यासाठी संबंधित स्त्री-पुरुषांनी आपली मुलं किंवा नातेवाईक यांना विश्वासात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे कदाचित अशा संबंधांना त्यांचा असलेला विरोध कमी होऊ शकतो.

याचबरोबर आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर आई/वडिलांना सोबतीची गरजच काय असा अतिशय असमंजस प्रश्न तरुण पिढी व अन्य लोक करताना दिसतात. वयानुसार माणसाच्या वैषयिक इच्छेचं प्रमाण घटण्याची शक्यता असते, पण भावनिक सोबतीची गरज आयुष्यभर असते या महत्त्वाच्या गोष्टीकडे ही मंडळी दुर्लक्ष करत असतात. यासाठी तरुण पिढीने याबाबतीत आपल्या आई/वडिलांकडे किंवा असे संबंध ठेवू इच्छिणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहायला व त्यांच्या भूमिकेत जाऊन त्यांच्या आनंदात आनंद मानायला शिकलं पाहिजे. त्यांच्या एकाकी अखेरच्या टप्प्यातील आयुष्यात त्यांनी अशा वेळेस एखादा सोबती निवडला तर ते समजून घेतलं पाहिजे. आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकांसमोर अशा संबंधांचं समर्थन करणं त्यांना अवघड होत असलं असं तरी 'हा आई/वडिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो त्यांच्यावर सोडून दिला पाहिजे.' असं या मित्रमंडळी, नातेवाईकांना सुनावण्याचं त्यांनी धैर्य दाखवलं पाहिजे. तसेच, यामुळे आई/वडिलांची (विशेषतः वडिलांची) थोडी संपत्ती खर्च झाली तरी त्यात त्यांनी काही गैर मानता कामा नये.

अजून एक अडसर एकंदरीत प्रतिकूल सामाजिक वृत्तीचा आहे. यात शेजारपाजारचे लोक महत्त्वाची भूमिका बजावतात. भौगोलिक सानिध्यामुळे त्यांना अशा संबंधांमध्ये फाजील रस घेणं व त्यांची संबंधित स्त्री-पुरुषाच्या नातेवाईक व मित्रमंडळींबरोबर वाच्यता करून ते हाणून पाडणं सहज शक्य होतं. वैयक्तिक स्वातंत्र्याची कल्पना आपल्या समाजात पाहिजे त्या प्रमाणात रुजलेली नाही व दुसऱ्यांच्या खासगी गोष्टींची विशेषतः स्त्री-पुरुष संबंधांची आपल्या समाजात अतिशय चविष्टपणे चर्चा होत असते. लिव्ह-इन प्रमाणेच वचनबद्ध संबंध निर्माण करण्यात कायद्याचा कुठेही अडसर नाही. खरा अडसर आहे तो समाजाचा. असे संबंध समाज जेवढ्या लवकर मान्य करेल तेवढ्या या कल्पना पुढे जातील.

वैयक्तिक धार्ष्ट्य

या सर्व अडचणींवर संबंधित स्त्री-पुरुषांचं वैयक्तिक धार्ष्ट्य व मनोबलच मात करू शकतं. म्हणून शेवटी वैयक्तिक धीटपणाला पर्याय नाही. संबंधित स्त्री व पुरुषानं त्यांच्या संबंधांबाबत असं वैयक्तिक धार्ष्ट्य काही किमान प्रमाणावर तरी दाखवणं आवश्यक आहे. आयुष्यातील प्रत्येक दिवस एकदाच येत असतो. तो एकट्यानं घालवायचा का आपल्याला समजून घेणाऱ्या आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर घालवायचा हा निर्णय प्रत्येक एकल व्यक्तीनं घ्यायचा आहे. अन्यथा समाजमान्यतेची वाट पाहताना उर्वरित आयुष्य हातातून केव्हा निसटून जाईल ते कळणारही नाही. एकल व्यक्तींच्या आयुष्यातील एकटेपणाचं त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना किंवा एकंदरीत समाजाला काहीही सोयरसुतक नसतं. खरं म्हणजे त्याबाबत आस्था दाखवण्यापलीकडे त्यांना फार काही करता येणं शक्यही नसतं. मग त्यांच्या टीकाटिप्पणीची एवढी दखल कशाला? त्यासाठी संबंधित स्त्री-पुरुषानं धीटपणा दाखवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यांच्या टीकेची त्यांना भीती वाटते त्यांना विश्वासात घेतलं तर कित्येक वेळा गोष्टी अधिक सोप्या होतात हेही लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटी मुलं, नातेवाईक अधिक महत्त्वाचे का आयुष्यातील एकटेपण कमी करण्याची संधी अधिक महत्त्वाची हे संबंधित स्त्री-पुरुषानं साकलिक विचार करून ठरवायचं आहे.

यासाठी संबंधित स्त्री-पुरुषानं संबंधांबरोबर येणाऱ्या धोक्यांना स्वीकारण्याची तयारीही दर्शवली पाहिजे. जरी संबंध अपयशी झाले तरी त्यामुळे खचून जाऊ नये व आपल्या हातून मोठा प्रमाद झाला असं मानू नये, त्यासाठी आपल्याला दोषी धरू नये.

वरील लेख आपला समाज आनंदी झाला पाहिजे या आस्थेपोटी लिहिला आहे. त्याला अर्थात अनेक मर्यादा असू शकतात. पण स्त्री-पुरुषांचं सहजीवन हा आनंदी समाजजीवनाचा पाया मानला तर त्या संबंधांचा एक पैलू घेऊन विवाह किंवा लिव्ह-इनपेक्षा कमीतकमी गुंतागुंत करणाऱ्या वचनबद्ध संबंधांचा पुरस्कार या लेखात केला आहे.

डॉ. हेमंत देवस्थळी पुण्यातील नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून ‘आनंदयात्रा एकल स्वमदत गटा’चे संस्थापक-अध्यक्ष आहेत. hemantdevasthali36@gmail.com