बालविवाह

बालविवाह ही केवळ जुन्या काळातील किंवा मागासलेल्या समाजातील समस्या राहिलेली नसून आजही भारतात आणि पुरोगामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेली एक भयावह सामाजिक वास्तवता आहे, याचा अस्वस्थ करणारा वेध हेरंब कुलकर्णी यांच्या ‘बालविवाह’ या पुस्तकातून घेतला आहे. नीना भेडसगावकर यांनी लिहिलेल्या या परीक्षणात ग्रामीण भाग, शहरी झोपडवस्त्या, गरिबी, शिक्षणाचा अभाव, स्थलांतर, मुलींच्या सुरक्षिततेची भीती आणि स्त्रियांकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन यांसारख्या कारणांमुळे आजही मुलींवर लहान वयात संसार आणि मातृत्व लादलं जात असल्याचं वास्तव समोर येतं. बालविवाहाची कारणं, त्याचे आरोग्य आणि शिक्षणावर होणारे परिणाम, कायदेशीर बाजू, प्रत्यक्ष कामातील अनुभव आणि मुलींच्या शिक्षणासाठीच्या शासकीय योजनांची माहिती या पुस्तकात मांडली असून, सामाजिक संवेदनशीलता आणि जागृतीची गरज अधोरेखित करणारा हा लेख वाचकांना या प्रश्नाकडे अधिक गंभीरपणे पाहायला भाग पाडतो.

हेरंब कुलकर्णी यांचे बालविवाह या विषयावरील महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वास्तव सांगणारे हे पुस्तक आहे.

या पुस्तकाचे लेखक हे पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते, समाजअभ्यासक आणि लेखक आहेत. बालविवाह, वंचितांचे शिक्षण, एकल महिला, भटके-विमुक्त, दारुबंदी अशा अनेक विषयांवर ते काम करतात.

महिलांसाठी ‘साऊ’ एकल महिला समितीद्वारे महाराष्ट्राच्या ७० तालुक्यांत विविध संस्थांचे नेटवर्क उभारून एकल महिलांच्या पुनर्वसनाचे त्यांचे काम सतत चालू आहे.

प्रस्तुत बालविवाह हा विषय बोलण्यात आला की लोक म्हणतात, “आता कुठे होतात बालविवाह? ते दिवस गेले आता.” परंतु या विषयातील वास्तव इतके चिंताजनक व भयानक आहे की, आजही भारतात आणि सुधारणेचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात दर पाच लग्नांमागील एक लग्न हा बालविवाह असतो. यात प्रामुख्याने ग्रामीण भाग व शहरातील झोपडवस्त्यांचा भाग येतो.

खेळण्या-बागडण्याच्या वयात लग्न होऊन मुलींवर संसार व मातृत्व लादले जाते. मग ती मुलगी आणि तिला होणारी मुले दोन्हीही कुपोषित राहून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

या विषयावर जाणीवजागृती व्हावी म्हणून लेखक हेरंब कुलकर्णी यांनी राजस्थान, बिहार, तेलंगणा, प. बंगाल आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये फिरून बालविवाहविरोधासाठी काम केले आहे व करत आहेत.

प्रस्तुत पुस्तकात या संबंधीचा सर्व लेखाजोखा ते आपल्या पुढे ठेवतात. बालविवाहाची कारणे आणि तो थांबविण्यासाठीचे उपाय, त्यातील यश-अपयश अशा दोन्ही अंगांनी निरनिराळ्या प्रकरणांतून ही माहिती त्यांनी दिली आहे.

ते म्हणतात की, एकीकडे महिला सक्षमीकरणाचे ढोल वाजत आहेत, तर दुसरीकडे लाखो मुलींचे आयुष्य करपून जाताना या पाहणीतून आपल्या लक्षात येते आहे.

महाराष्ट्रात ३२% बालविवाह ग्रामीण भागात व १८% शहरी झोपडवस्तीत होतात. यावरून मुलींच्या आई-वडिलांमध्ये शिक्षणाचा अभाव, गरिबी, परंपरेचे बळी, स्थलांतरित मजूर कामावर जाताना मुली सुरक्षित राहाव्यात म्हणून मुली १०/१२ वर्षांच्या असतानाच त्यांची लग्ने करून त्यांना सासरी पाठवून आपली जबाबदारी कमी करणे, या गोष्टी दिसून येतात. एकूणच मुलींकडे व स्त्रियांकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन ही बालविवाहामागची कारणे दिसतात.

पुस्तकातील एकूण १९ प्रकरणांमध्ये ‘कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाह’, ‘बालविवाह थांबवण्यासाठी काय करायला हवे’, ‘प्रत्यक्ष बालविवाह कायद्याचा विकास होऊन लग्नाचं वय २१ करण्याचा स्वागतार्ह विचार’ अशी महत्त्वाची माहिती आहे. तसेच गावोगावी मुली व त्यांच्या पालकांबरोबर घेतलेल्या बैठकींचे फोटोसह अहवालही आहेत.

शेवटच्या प्रकरणात भारतातील निरनिराळ्या प्रांतांत मुलींच्या शिक्षणासाठी व महिलांसाठी ज्या विविध शासकीय योजना आहेत, त्या योजनांची तपशीलवार माहिती दिली आहे. या योजनांमुळे मुलींच्या शिक्षणातील प्रमाण वाढून बालविवाहाचे प्रमाण काहीसे कमी होत आहे, असे आशादायक निरीक्षणही लेखकाने नोंदवले आहे.

--

‘बालविवाह’ - हेरंब कुलकर्णी पृष्ठसंख्या : १७० प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे किंमत : रु. २५०/-