बहीण-भाऊ नाते: रक्षाबंधन व भाऊबीजेचे बदलते सामाजिक परिप्रेक्ष्य

१० नोव्हेंबर २०२६

रक्षाबंधन आणि भाऊबीज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो राखीचा धागा, ओवाळणी, भेटवस्तू आणि भाऊ-बहिणीमधलं प्रेम. पण या सणांकडे आपण कधी चिकित्सक नजरेने पाहिलं आहे का? बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी नेहमी भावाचीच का असते? स्त्रीला कायम पुरुषाच्या संरक्षणाची गरज असणारी म्हणून का पाहिलं जातं? या परंपरांमागे जात, धर्म, पुरुषसत्ता आणि स्त्रीच्या स्वातंत्र्याशी जोडलेला मोठा सामाजिक इतिहास आहे. प्रा. सचिन गरुड यांचा हा लेख रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या परंपरांचा ऐतिहासिक व सामाजिक मागोवा घेत, त्यातील पुरुषसत्ताक आणि जातीय मानसिकतेचे विविध पैलू उलगडतो. त्याचबरोबर या सणांकडे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि परस्पर आदराच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित करतो. परंपरा जपायच्या असतील, तर त्यातील विषमता नाकारून नात्यांना समानतेचा नवा अर्थ देण्याची वेळ आली आहे.

रक्षाबंधन आणि भाऊबीज हे कौटुंबिक आपुलकी व स्नेहाचे प्रतीक मानले जाणारे हिंदू संस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय सण आहेत. परंपरेने या सणांचे स्वरूप 'भावाने बहिणीचे रक्षण करणे' या मध्यवर्ती कल्पनेभोवती रचले गेले. मात्र, या पारंपरिक भूमिकेचा सखोल अभ्यास केल्यास असे दिसते की, यामागे स्त्रीला स्वयंपूर्ण न मानता ती अबला वा अगतिक तसेच पुरुषावर अवलंबून असणारी आश्रित आहे, अशी पुरुषसत्ताक धारणा कार्य करत असते. स्त्री ही पुरुषाच्या ताब्यातील मालमत्ता असून पुरुष हाच तिचा एकमेव स्वामी व संरक्षक आहे, या पितृसत्ताक समजूतीची जोड या परंपरेला लाभलेली आहे. विशेष म्हणजे, या धारणा केवळ लिंगभेदापुरत्या मर्यादित नसून, त्या तत्कालीन जातीय चौकटीशी जोडलेल्या 'जाती-संलग्न पितृसत्ताकतेचे' रूप आहेत.

मात्र, आधुनिक काळात हा विचार वेगाने बदलत आहे. आजची स्त्री सक्षम आणि स्वतंत्र आहे. तिला कोणाच्या संरक्षणापेक्षा नात्यात परस्पर आदर, सहकार्य आणि समानतेचे नाते अधिक महत्त्वाचे वाटते. कुटुंबातील चौकटीतही भाऊ आणि बहीण हे दोघेही एकमेकांच्या सुख-दुःखातील समान साथीदार असतात; त्यामुळे या नात्यात मालकी हक्क किंवा दुय्यमत्वाला स्थान नसून निःस्वार्थ प्रेम, मैत्री आणि बंधुभाव महत्त्वाचा ठरतो. बहीण ही कोणत्याही अर्थाने दुय्यम नसून भावाच्या बरोबरीची समान भागीदार आहे. असा प्रागतिक विचार मोठ्या सामाजिक संघर्षानंतर रुजत आहे. त्यामुळे या सणांचा गाभा आता एकतर्फी संरक्षणाऐवजी परस्परावलंबित्व आणि सहभागाच्या मूल्यांमध्ये परिवर्तीत व्हावा अशी अपेक्षा केली जाणे स्वाभाविक आहे.अनेक ठिकाणी बहिणी एकमेकींना किंवा भाऊ-बहीण परस्परांना राखी बांधून या नात्यातील समता प्रतीकात्मकरित्या साजरी करताना दिसतात. अशा प्रकारे रक्षाबंधनाचा पारंपरिक पुरुषसत्ताक अर्थ गळून पडून त्याकडे स्त्री-पुरुष समता, परस्पर स्वाभिमान आणि निखळ प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाणे, ही आधुनिक आणि प्रगल्भ समाजव्यवस्थेची एक अत्यंत सकारात्मक दिशा आहे, असे म्हणता येईल.

नात्यांची उत्क्रांती: अगम्यगमन निषिद्धता ते पितृसत्ताक पुनर्बांधणी

भाऊ-बहिणीच्या नात्याची उत्क्रांती हा मानवाच्या जैविक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या तिन्ही क्षेत्रांत जवळच्या रक्ताच्या नात्यांमधील लैंगिक संबंधांवरील सामाजिक बंदीचा (Incest Taboo) अत्यंत गांभीर्याने आणि सार्वत्रिक पातळीवर विचार केला गेला आहे. जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये आई-मुलगा, वडील-मुलगी आणि बहीण-भाऊ अशा जवळच्या रक्ताच्या नात्यांमधील लैंगिक संबंधांवर कडक सामाजिक व नैतिक बंदी ही वैश्विक स्वरूपाची आहे. मानवशास्त्र (Anthropology) आणि उत्क्रांतीवादी विज्ञानानुसार या नात्याची वीण प्रामुख्याने जवळच्या रक्ताच्या नात्यांमधील लैंगिक संबंधांवरील सामाजिक बंदीचा म्हणजेच 'अगम्यगमन निषिद्धता' (Incest Taboo) आणि‘संबंध जोडण्याचा सिद्धांत' (Alliance Theory) या दोन घटकांवर आधारलेली दिसते. फिनिश मानसशास्त्रज्ञ एडवर्ड वेस्टमार्क यांच्या सिद्धांतानुसार, लहानपणापासून एकत्र वाढलेल्या मुला-मुलींमध्ये एकमेकांबद्दल लैंगिक आकर्षण निर्माण न होता एक प्रकारची अलिप्तता तयार होते. त्यामुळे जैविक किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, बहुतांश मानवांसाठी हा विचारच मुळात नैसर्गिकरीत्या विकर्षक (Repulsive) असतो; हा टॅबू मोडून संबंध प्रस्थापित करण्याची उतावळी प्रवृत्ती ही सामान्य मानवी वर्तनात नसते. मानवी मेंदूतील ही एक नैसर्गिक जैविक संरक्षण यंत्रणा असून, यामुळे जवळच्या रक्ताच्या नात्यात प्रजनन टळून भावी पिढीतील जनुकीय दोष (Genetic Disorders) रोखले जातात. या प्रकारचे आंतरशाखीय विश्लेषण मांडले जाते.

दुसरीकडे, प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ क्लॉड लेव्ही-स्ट्रॉस यांनी Exogamy/गोत्रबाहेर विवाह करण्याचा सिद्धांत कसा विकसित झाला याचे विवरण देताना म्हटले की, भाऊ-बहिणीमधील विवाहाला निषिद्ध मानण्यामागे केवळ जैविक कारणे नव्हती, तर ती एक सामाजिक गरजही होती. स्वतःच्या टोळीतील स्त्री दुसऱ्या टोळीला देणे आणि त्यांच्याकडून स्त्री घेणे, या देवाणघेवाणीमुळे (Reciprocity) दोन शत्रू किंवा अनोळखी टोळ्यांमध्ये मैत्री, व्यापार आणि संरक्षणाचे राजकीय व सामाजिक नातेसंबंधव्यूह (Social and Political Alliance) निर्माण झाले. ज्यामध्ये भाऊ हा बहिणीचा रक्षक आणि दुसऱ्या टोळीशी संबंध जोडणारा महत्त्वाचा दुवा बनला. लेव्ही-स्ट्रॉस यांच्या सिद्धांतात स्त्रीला स्वतःची स्वायत्तता किंवा निर्णयक्षमता असलेली 'घटक' (Agent) न मानता, दोन पुरुषसमूहांमधील देवाणघेवाणीची केवळ एक 'वस्तू' किंवा 'माध्यम' (Object of Exchange) मानले गेले आहे. स्त्रीला एका टोळीतून दुसऱ्या टोळीत पाठवताना "भाऊ हा तिचा रक्षक आहे" अशी संकल्पना रूढ केली गेली. यामुळे नकळतपणे स्त्री ही 'अगतिक व संरक्षणाची गरज असणारी' आणि पुरुष हा 'संरक्षक' अशी एक विषम लैंगिक उतरंड तयार झाली.खरे तर, कोणत्याही संकटाच्या प्रसंगी किंवा सामाजिक संरचनेत स्त्री ही स्वतःचे, कुटुंबाचे आणि इतरांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम असते. परंतु, लेव्ही-स्ट्रॉस यांची ही मांडणी पितृसत्ताक चष्म्यातून आलेली असल्याने त्यातून स्त्रीच्या स्वयंभू क्षमतेचे दर्शन घडण्याऐवजी पुरुषाच्या वर्चस्ववादी भूमिकेचेच समर्थन झाले.

प्रारंभिक मानवी समाजातील स्त्रीसत्ताक, मातृसत्ताक किंवा मातृवंशीय टप्प्यात वंश स्त्रीच्या नावाने चालत असे. त्यामुळे संपत्ती, जमीन आणि सामाजिक ओळख आईकडून थेट मुलीकडे हस्तांतरित होत असे. या व्यवस्थेत बहिणीचा भाऊ म्हणजेच 'मामा' हाच कुटुंबातील प्रमुख पुरुष म्हणून भूमिका बजावत असे. बहिणीची मुले ही एकाच मातृकुळाची म्हणजेच त्याच्या स्वतःच्या रक्ताची मानली जात असल्याने, त्यांच्या संगोपनाची, सुरक्षेची आणि मालमत्तेची संपूर्ण जबाबदारी मामावरच असायची. याउलट, पती हा दुसऱ्या कुळातून आलेला असल्यामुळे त्याचा स्वतःच्या मुलांवर किंवा पत्नीच्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर वा सामाजिक अधिकार नसे. याची उदाहरणे आपल्याला केरळमधील पारंपरिक 'मरुमक्कथायम्' पद्धतीत किंवा मेघालयातील 'खासी' व 'गारो' जमातींमध्ये अद्यापही पाहायला मिळतात. मानववंशशास्त्र आणि प्राचीन इतिहासातील संशोधनानुसार, अश्मयुगातून नवअश्मयुगात (Neolithic Era) प्रवेश करताना शेतीचा शोध लावण्याचे मुख्य श्रेय स्त्रीलाच दिले जाते. त्या काळी शेती करणे, धान्याची साठवणूक करणे, मातीची भांडी तयार करणे आणि गणातील सर्व सदस्यांमध्ये अन्नाचे समन्यायी वाटप करणे या सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्त्रीकडेच होत्या. यामुळेच सुरुवातीच्या प्रारंभिक गणव्यवस्थेत (Gana system) स्त्रीचे स्थान सर्वोच्च आणि अत्यंत आदराचे होते, ज्याचे ठोस अवशेष आपल्याला सिंधू संस्कृती आणि इतर प्राचीन संस्कृतींमध्ये सापडलेल्या मातृदेवतांच्या मूर्तींमधून पाहायला मिळतात. काळाच्या ओघात पुढे जेव्हा धातूंचा शोध (विशेषतः लोखंड) लागला, नांगराचा वापर सुरू झाला आणि खाजगी मालमत्तेची (Private Property) संकल्पना रूढ झाली, तेव्हा शेतीतील कष्टाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. मालमत्ता बळकावण्यासाठी टोळ्यांमधील युद्धप्रवृत्ती वाढीस लागली आणि शारीरिक शक्तीला अधिक महत्त्व आले. या आर्थिक आणि सामाजिक बदलांमधूनच पुढे स्त्रीप्रधान गणव्यवस्थेचा ऱ्हास झाला आणि पुरुषसत्ताक किंवा पितृसत्ताक (Patriarchal) सामाजिक रचनेचा उदय झाला. या बदलांमुळे कुटुंबातील व्यवस्थापक म्हणून असलेली भावाची जागा बहिणीच्या नवऱ्याने (पतीने) घेतली आणि कौटुंबिक नात्यांचे स्वरूप पार बदलून गेले. असे असले तरी, प्राचीन स्त्रीसत्ताक आणि मातृसत्ताक व्यवस्थेचे काही सांस्कृतिक अवशेष आजही आपल्या कौटुंबिक व सामाजिक विधींमध्ये स्पष्टपणे टिकून राहिल्याचे दिसते. म्हणूनच आजच्या भारतीय जातीव्यवस्थाक विवाहपद्धतीत भाच्याला किंवा भाचीला लग्नाच्या मांडवात आणणे, ब्राह्मणी विधींमधील सीमांत पूजन किंवा सप्तपदीच्या वेळी 'मामा'ची उपस्थिती अनिवार्य मानणे, या परंपरा पाळल्या जातात. सर्वच बहुजन, दलित जातींपासून ते अगदी आदिवासी जमातींपर्यंत मामाच्या कुळाला दिला जाणारा हा विशिष्ट मान आणि आदर या प्राचीन मातृसत्ताक संस्कृतीचेच अवशेष आहेत.

कॉ. शरद पाटील यांच्या ऐतिहासिक विश्लेषणानुसार, आदिम स्त्रीसत्ताक किंवा मातृसत्ताक समाजात कुळाची व वंशाची ओळख मातेच्या नावाने होत असे आणि स्त्री ही संपूर्ण कुटुंबाची व समाजाची कुलप्रमुख म्हणून केंद्रस्थानी असे. या काळात उत्पादनाची साधने आणि शेतीचा शोध स्त्रीनेच लावलेला असल्यामुळे नात्यांचा पाया रक्ताचा, प्रेमाचा आणि आदराचा होता. संपत्तीवर पुरुषांची व्यक्तिगत मालकी नसल्याने सत्तेसाठी किंवा मालमत्तेसाठी भावा-बहिणींमध्ये संघर्ष, भेदभाव अथवा राजकारणाला जागा नव्हती; भाऊ हा कुटुंबाचा एक महत्त्वाचा घटक असला तरी तो सर्वसत्ताधीश अथवा मालक नव्हता. मात्र, समाजव्यवस्था जशी पितृसत्ताकतेकडे झुकली, तसा वारसाहक्क पुरुषांकडे गेला आणि बहीण कुटुंबाच्या मालकी हक्कातून पूर्णपणे बाहेर फेकली गेली. तिला केवळ माहेरकडून मिळणारे 'दान' किंवा 'आदरातिथ्य' यापुरतेच मर्यादित केले गेले. या प्रक्रियेत बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी भावावर सोपवली गेली, पण या संरक्षणाच्या बदल्यात भावाला बहिणीच्या स्वातंत्र्यावर, विवाहावर आणि तिच्या देहावर नियंत्रण ठेवण्याचा अप्रत्यक्ष अधिकार मिळाला. सगोत्र विवाह बंदी आणि पितृप्रधान गोत्र प्रणाली लादल्यामुळे बहिणीचे सामाजिक अस्तित्वही पिता व भावाच्या गोत्राशी बांधले जाऊन तिचे स्वतंत्र अस्तित्व पुसले गेले. कॉ. पाटील यांच्या या दृष्टिकोनातून पाहिल्यास, ज्या सणांमध्ये किंवा रीतीरिवाजांमध्ये भावावर संरक्षणाचा भार टाकला जातो आणि बदल्यात बहीण त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, ते सण नकळतपणे याच पितृसत्ताक सामाजिक बांधणीला बळकट करतात. परिणामी, अशा संकल्पनांमधून भावाला श्रेष्ठ आणि बहिणीला दुय्यम स्थान देणारी विषमतावादी सामाजिक रचना दृढ होत गेली.

स्त्रीसत्तेकडून पुरुषसत्तेकडे झालेला हा प्रवास केवळ राजकीय किंवा सामाजिक बदल नव्हता, तर तो आर्थिक व्यवस्था आणि मालमत्तेच्या मालकीशी थेट जोडलेला होता; म्हणूनच यात सामाजिक-आर्थिक असा दुहेरी विचार अनुस्यूत आहे. मालमत्तेची मालकी स्त्रीकडून पुरुषाकडे हस्तांतरित झाली, तशीच कुटुंबातील निर्णय घेण्याची सत्ता आई आणि 'बहिणीच्या भावा'कडून (मामा) हिरावून 'बहिणीच्या नवऱ्याच्या' (पती) हातात केंद्रित झाली. अशा प्रकारे, आज आपण ज्याला 'पारंपरिक कौटुंबिक मूल्ये' मानतो, ती प्रत्यक्षात मानवी इतिहासातील याच आर्थिक आणि सामाजिक बदलांच्या द्वंद्वप्रक्रियेतून आकारास आलेली आहेत.

अगम्यगमन निषिद्धता ते ब्राह्मणी पितृसत्ता

मानवी संस्कृतीच्या विकासात स्त्रीसत्तेकडून पुरुषसत्तेकडे झालेले स्थित्यंतर हे केवळ राजकीय किंवा सामाजिक बदल नव्हता, तर तो तत्कालीन अर्थोत्पादन व्यवस्था आणि मालमत्तेच्या मालकीशी थेट जोडलेला एक ऐतिहासिक टप्पा होता. यात स्त्री-पुरुष संघर्षाचा मोठा पट हा गणसमाजाच्या चातुर्वर्ण्य आणि गुलामगिरीच्या व्यवस्थेकडे झालेल्या संक्रमणातील संघर्षात दिसून येतो. या आर्थिक आणि सामाजिक बदलांना धार्मिक व सैद्धांतिक अधिष्ठान देण्याचे काम वैदिक साहित्यापासून ते स्मृती ग्रंथांपर्यंतच्या परंपरेने केले. या काळात वर्ण-पितृसत्ता आणि पुढे जात-पितृसत्ता आकारास येत असताना, भाऊ-बहिणीच्या नैसर्गिक व साध्या नात्याला एक विशिष्ट ब्राह्मणी, धार्मिक आणि पितृसत्ताक चौकट आखून दिली गेली.

ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, सत्ता, संपत्ती आणि 'रक्ताची शुद्धता' एकाच कुटुंबात नियंत्रित ठेवण्याच्या हेतूने प्राचीन समाजात भाऊ-बहिणींमधील किंवा जवळच्या रक्ताच्या नात्यांतील विवाहांना प्राधान्य दिले गेले. इजिप्तचे फॅरो, पर्शियाची सम्राट घराणी, तसेच विविध संस्कृतींतील पौराणिक कथा (उदा. वैदिक साहित्यातील यम-यमी संवाद) या रचनेची साक्ष देतात. तथापि मानवी संस्कृतीचा विकास होत असताना आणि विशेषतः पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था व कडक वर्ण-जातीरचना स्थिरावल्यानंतर अशा विवाहांवर सामाजिक बंदी घालण्यात आली. अशा प्रकारे, सुरुवातीच्या काळात 'वंश आणि संपत्तीचे केंद्रीकरण' करण्यासाठी सुरू झालेली ही प्रथा नंतरच्या काळात पितृसत्ताक व जातीय नियमावलीनुसार पूर्णपणे बदलून गेली.

इतिहासकार आणि संशोधक वि. का. राजवाडे यांनी 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या ग्रंथातून प्राचीन आर्य समाजातील विवाहपूर्व कालीन आचार-विचार आणि सामाजिक संरचनेचे समाजशास्त्रीय विश्लेषण केले आहे. वैदिक साहित्य, पुराणे आणि महाभारतातील पुराव्यांचा धांडोळा घेत त्यांनी मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा प्रवास उलगडून दाखवला. या प्रवासात सुरुवातीच्या टोळीजीवनातील कौटुंबिक नियमांचा अभाव, अनियंत्रित रूढी-परंपरा आणि पुढे होत गेलेला बदल अभ्यासत, आधुनिक विवाहसंस्थेच्या निर्मितीपर्यंतचा इतिहास त्यांनी एका एका अभ्यासक व समाजशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून मांडला आहे. या पुस्तकात त्यांनी प्राचीन ग्रंथांच्या (उदा. हरिवंश पुराण आणि महाभारत) आधारे एक महत्त्वाचा निष्कर्ष मांडला आहे. त्यांच्या मते, अतिप्राचीन काळात जेव्हा समाजात विवाह संस्थेचे कोणतेही निश्चित नियम किंवा 'अगम्यगमन निषिद्धता' अस्तित्वात नव्हती, तेव्हा पिता-कन्या किंवा भाऊ-बहीण यांच्यातील शारीरिक संबंधांना पूर्ण समाजमान्यता होती आणि तत्कालीन समाजात ते निंद्य किंवा चुकीचे मानले जात नव्हते. भाऊ-बहीण यांच्या नात्याबद्दल बोलताना ऋग्वेदातील 'यम आणि यमी' यांच्या प्रसिद्ध संवादाची चर्चा प्रस्तुत होते. हा संवाद मानवी कुटुंबसंस्थेच्या आणि नीतिमत्तेच्या निर्मितीतील एका अत्यंत महत्त्वाच्या संक्रमणाचा साक्षीदार आहे. ऋग्वेदात यमी ही तिचा भाऊ यम याच्याकडे लैंगिक संबंध आणि प्रजननाची मागणी करते; परंतु यम "आता काळ बदलला आहे, भावाने बहिणीशी असा संबंध ठेवणे अधर्म आहे" असे सांगून तिला स्पष्ट नकार देतो. रक्ताच्या नात्यातील लैंगिक संबंधांवर (Incest) पूर्णपणे बंदी घालून नात्यांची एक नवीन पवित्रता स्थापन करण्याचा हा प्रयत्न होता. हा नकार म्हणजे मानवी संस्कृतीत जुन्या टोळीजीवनाकडून नवीन अलैंगिक कुटुंबसंस्थेकडे झालेल्या प्रवासाची कथा आहे, असे त्यांनी नोंदले आहे.

पुढे ऋग्वेदातील ही लैंगिक संबंधांची चर्चा स्मृती आणि पुराणांच्या काळात पूर्णपणे बदलून यम-यमीचे नाते निखळ आणि अलैंगिक भाऊ-बहिणीच्या रूपात स्थिर झालेले दिसते. हा बदल सहजासहजी झाला नाही; वैदिक परंपरेने वर्णव्यवस्थेवर आधारित पुरुषसत्तेची मुहूर्तमेढ रोवली, तर स्मृती व पुराणांनी तिला अधिक कठोर करत जात-पितृसत्तेचे रूप दिले. याच ऐतिहासिक घडामोडींमुळे तत्कालीन साहित्यातील मानवी नात्यांचे बंध आणि समाजाचे नैतिक नियम आमूलाग्र बदलत गेले.

याच सामाजिक संरचनेचा विस्तार म्हणून 'गोत्र' ही संकल्पना पुढे आणली गेली आणि एकाच गोत्रातील नातेसंबंधांना 'सगोत्र भाऊ-बहीण' मानून त्यांच्यातील विवाहाला कडक निर्बंध लादले गेले. यामागे केवळ जनुकीय शुद्धता राखणे हा हेतू नव्हता, तर आपल्या समूहाची जातीय चौकट अबाधित ठेवणे आणि इतर कुळांशी राजकीय-आर्थिक हितसंबंध साधणे हे ब्राह्मणी चौकटीचे मुख्य उद्दिष्ट होते. या व्यवस्थेत स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व पूर्णपणे नाकारले गेले. मनुस्मृतीसारख्या स्मृतीग्रंथांमधून "पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने..." यासारखे नियम लादून स्त्रीला आयुष्यभर पुरुषाच्या आश्रयाखाली ठेवले गेले. लग्नापूर्वी बापानंतर भावाला तिचा 'रक्षक' बनवून भाऊ हा 'स्वामी' आणि बहीण ही 'संरक्षित-परावलंबी' अशी विषमतावादी कौटुंबिक उतरंड तयार केली गेली. पुढे रक्षाबंधन आणि भाऊबीजेसारख्या सणांच्या माध्यमातून या पुरुषसत्ताक नात्याला भावनिक व धार्मिक रूप दिले गेले, ज्यातून स्त्री ही 'अगतिक' आणि पुरुष हा 'शक्तिशाली रक्षक' हीच सामाजिक धारणा बळकट झाली.

मानवशास्त्राच्या मते, भाऊ-बहिणीतील लैंगिक बंदी ही केवळ जैविक दोष टाळण्यासाठी आणि दोन निरनिराळ्या समूहांमध्ये नातेसंबंध जोडण्यासाठी आलेली एक नैसर्गिक गरज होती. परंतु वैदिक-ब्राह्मणी परंपरेने या नात्याला वर्णजात-शुद्धता आणि पितृसत्ताक मूल्यांमध्ये बांधून टाकले. गोत्र-विवाहाचे कडक नियम आणि रक्षाबंधन-भाऊबीज सारख्या सणांच्या माध्यमातून भाऊ-बहिणीच्या नात्याला धार्मिक- जातीय पुरुषसत्ताक स्वरूप देण्यात आले, ज्यातून स्त्रीचे स्वयंभू अस्तित्व हिरावून तिला पुरुषाच्या दास्यात आणि आश्रयाखाली ठेवले गेले.

पवित्र नाते, शिव्या आणि ब्राह्मणी संदर्भ

सगोत्र किंवा रक्ताच्या नात्यांतील लैंगिक बंदी हा मानवी संस्कृतीचा पाया आहे. या निषिद्धतेमुळे माणसाने स्वतःच्या कुटुंबाबाहेर लग्ने (Exogamy) करण्यास सुरुवात केली, ज्यातून दोन वेगवेगळ्या समूहांमध्ये मैत्री व सहकार्याचे संबंध तयार झाले. कुटुंबात भाऊ-बहिणीच्या नात्यात लैंगिक आकर्षण नसलेले 'अलैंगिक वातावरण' निर्माण झाल्यामुळे तिथे निखळ प्रेम आणि सहकार्य टिकून राहिले. याला 'वेस्टरमार्क इफेक्ट' या जैविक सिद्धांताचा भक्कम आधार दिला जातो.सख्ख्या भाऊ-बहिणींमधील संबंध किंवा विवाहावर आलेल्या या 'अगम्यगमन निषिद्धतेमुळे' कौटुंबिक चौकटीत शांतता, आपुलकी आणि नात्यांची स्पष्टता निर्माण झाली. तसेच, कुटुंबाबाहेर पडून इतर समूहांशी सहकार्य साधणे शक्य झाले आणि जनुकीयदृष्ट्या सक्षम, निरोगी व प्रगत मानवी पिढ्या आकारास आल्या. असा 'वेस्टरमार्क इफेक्ट'चा निष्कर्ष आहे.

संस्कृतीने लादलेली अगम्यगमन निषिद्धता मोडण्याचे काल्पनिक भय दाखवणे, हाच शिव्यांच्या उगमामागील मुख्य सामाजिक आणि भाषाशास्त्रीय भाषाशास्त्रीय गाभा आहे. प्रतिस्पर्ध्याला मानसिकदृष्ट्या उघडे पाडण्यासाठी आणि त्याच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी या सामाजिक निषिद्धतेवर हल्ला चढवण्याची भाषा विकसित झाली. शिव्यांचा सामाजिक अभ्यास केल्यास असे स्पष्ट होते की, बहुतेक पितृसत्ताक संस्कृतींमध्ये शिव्यांच्या निर्मितीत आई आणि बहीण या स्त्री-नातेवाइकांनाच लक्ष्य केले गेले. जगात सर्वाधिक शिव्या पहिल्यांदा आईवरून आणि त्याखालोखाल बहिणीवरून दिल्या जातात; ज्या प्रामुख्याने मानखंडनाकारक, लिंगवाचक आणि आक्रमक पुरुषी संभोगविषयक (Coital/Copulative) स्वरूपाच्या असतात.

शिव्यांची रचना केवळ नातेसंबंधांवर आधारित नसून ती मुख्यत्वे लैंगिकतेभोवतीच फिरते; कारण पितृसत्ताक चौकटीत संभोगाला दोन व्यक्तींमधील परस्परसंबंध न मानता, ते एका पुरुषाने दुसऱ्यावर मिळवलेले 'वर्चस्व' किंवा 'ताबा' मानले गेले. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याचा पराभव दर्शवण्यासाठी आणि त्याच्या पुरुषी अहंकाराला ठेच पोचवण्यासाठी त्याच्या आई किंवा बहिणीसोबतच्या काल्पनिक संभोगाचा उल्लेख केला जातो. समाजमनात आई आणि बहीण ही नातेसंबंधातील सर्वाधिक आदराची आणि पवित्र स्थाने मानली गेल्याने, याच नात्यांना डागाळून समोरच्या व्यक्तीत तीव्र संताप निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. या संपूर्ण प्रक्रियेत आई आणि बहीण ही नातेसंबंधात अत्यंत पवित्र आणि आदराची मानली गेल्याने, त्याच नात्यांवरच हल्ला चढवून सर्वाधिक मानसिक वेदना दिली जाते. स्त्री ही पुरुषाची 'मालमत्ता' आहे या गृहितकावर ही भाषा टिकून आहे, जिथे अंतिम उद्देश त्या पुरुषाची अब्रू घालवणे हाच असतो. त्यामुळे, शिव्यांची भाषा ही स्त्री-शरीराचे वस्तूकरण (Objectification), मानवी संस्कृतीने निर्माण केलेली अगम्यगमन निषिद्धता आणि पुरुषी वर्चस्ववाद या तीन मुख्य घटकांचा एकत्रित परिणाम आहे.

ब्राह्मणी पितृसत्तेत शिव्यांचे स्वरूप केवळ अशिष्ट किंवा राग व्यक्त करणारे शब्द न राहता, ते वर्ण-जातीची उच्च-नीचता, स्त्रीचे दास्य आणि शुद्धाशुद्धतेच्या संकल्पनांना बळकट करणारे एक भाषिक हत्यार बनले. त्यात एक प्रकारची एक भाषिक हिंसा अध्याहृत आहे. जातीय शुद्धता टिकवण्याच्या हव्यासातून शिव्यांमध्ये स्त्री-शरीरासोबतच 'अनुलोम-प्रतिलोम' संबंधांचा वापर करून समोरच्या पुरुषाची जातीय-लैंगिक अवहेलना केली जाते. कनिष्ठ-अवर्ण जातीतील पुरुषाने सवर्ण स्त्रीचे केलेले काल्पनिक 'दूषण' दाखवून सवर्ण पुरुषाचा जातीय अभिमान/ अहंकार दुखावणे हा यामागील हेतू असतो. स्त्रीचे स्थान हे 'कुळाची पत' आणि 'पतिव्रता धर्मा'शी जोडले गेल्यामुळे, तिच्या चारित्र्यहननातून तिच्याबरोबरच तिच्या पुरुषाची मानखंडना व पराभूतता अधोरेखित केली जाते. शिव्यांच्या माध्यमातून तिच्या चारित्र्यावर थेट हल्ला हा कौटुंबिक रचनेत पुरुषाला 'रक्षक' आणि स्त्रीला 'आश्रित' मानल्याने, शिवी देणारा पुरुष स्वतःला 'वर्चस्ववादी' तर दुसऱ्या पुरुषाला 'अगतिक' सिद्ध करतो. स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारून तिला बापाची, भावाची किंवा नवऱ्याची 'मालमत्ता' मानल्याने तिच्या अशुद्धीकरणाचा/'अपवित्रीकरणाचा काल्पनिक उल्लेख हा पुरुषाचा अपमान म्हणजेच तिच्या संरक्षकाचा पराभव मानला गेला. शारीरिक स्राव आणि जननेंद्रियांना 'अशुद्ध' किंवा 'विटाळ' मानणाऱ्या ब्राह्मणी संकल्पनेतूनच त्या अशुद्धतेचा वापर करून समोरच्या व्यक्तीला हीन दाखवणे आणि त्याचा मानभंग करणे हा शिव्यांचा मुख्य उद्देश बनला आहे. कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातींमधील पुरुष आपल्या स्त्रियांचे रक्षण किंवा योनिशुचिता राखू शकत नाहीत, या लिंगभाव-जातीय धारणेतूनच त्यांची जात, ते स्वतः आणि त्यांच्या स्त्रीला अशुद्ध व हीन ठरवले जाते; याचाच थेट संबंध या भाषिक चौकटीशी येतो. ब्राह्मणी पितृसत्तेत शिव्यांची रचना ही जातीय उतरंड, स्त्री-शरीराची( कनिष्ठ जातीय पुरुषाचाही) अशुद्धता आणि पुरुषी वर्चस्ववाद यांना एकत्र बांधून दुसऱ्या पुरुषाचा सामाजिक-जातीय मानभंग करण्याचे एक प्रमुख भाषिक साधन ठरली आहे.

पॉर्नोग्राफी आणि शिव्यांचा गंभीर विरोधाभास

मानवी संस्कृतीतील एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि गंभीर विरोधाभास या संपूर्ण प्रक्रियेतून समोर येतो. जिथे एकीकडे सार्वजनिक व्यवहारात अगम्यगमन निषिद्धता मोडणे हा अत्यंत भीषण, गुन्हेगारी स्वरूपाचा आणि मानखंडनाकारक प्रकार मानला जातो, तिथेच दुसरीकडे खाजगी व डिजिटल अवकाशात—विशेषतः पॉर्नोग्राफीच्या जगात—याच निषिद्धतेला एका फँटसीमध्ये (Forbidden Fantasy) रूपांतरित केले जाते. फ्रेंच विचारवंत मिशेल फुको यांच्या सिद्धांतानुसार, समाज ज्या वर्तनावर किंवा विषयावर जेवढी कठोर सामाजिक-धार्मिक बंदी घालतो, मानवी मेंदूत त्या निषिद्ध विषयाबद्दल तेवढीच सुप्त उत्सुकता निर्माण होते. समाज ज्या नात्यांना 'पवित्र' किंवा 'निषिद्ध' म्हणून आखून देतो, त्यांनाच फँटसीच्या पातळीवर मोडून पाहण्याची किंवा मानसिकदृष्ट्या ओलांडण्याची एक विकृत वा बंडखोर प्रवृत्ती मानवी मानसशास्त्रात विकसित होत जाते.

या विरोधाभासाची पाळेमुळे समजून घेण्यासाठी शिव्या, पॉर्नोग्राफी आणि ब्राह्मणी-जातीय पितृसत्ता या तीन घटकांचा परस्परसंबंध अभ्यासणे अत्यंत आवश्यक ठरते. सार्वजनिक अवकाशात जेव्हा एखाद्या पुरुषाला त्याच्या आई किंवा बहिणीवरून शिवी दिली जाते, तेव्हा तो केवळ एक अशिष्ट शब्द नसतो; तर तो भाषेच्या माध्यमातून रचलेला एक सामाजिक आणि लैंगिक हल्ला असतो. पितृसत्ताक चौकटीत स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती न मानता पुरुषाची 'मालमत्ता' आणि 'कुळाच्या प्रतिष्ठेचे प्रतीक' मानले जाते. त्यामुळे समोरच्या पुरुषाचा पराभव दर्शवण्यासाठी, त्याला सामाजिकदृष्ट्या हतबल करण्यासाठी आणि त्याच्या पुरुषी अहंकाराला छेद देण्यासाठी त्याच्या घरातील स्त्रीसोबतच्या काल्पनिक अगम्यगमनाचा (Incestuous Sexual Act) उल्लेख केला जातो.

ब्राह्मणी पितृसत्तेच्या चौकटीत तर या शिव्यांचे स्वरूप अधिक आक्रमक आणि विषारी बनते. कारण इथे लैंगिकतेचा संबंध थेट 'जातीची शुद्धता' आणि 'शुद्धाशुद्धतेच्या संकल्पनांशी' (Purity and Pollution) जोडलेला असतो. सवर्ण स्त्रीचे तथाकथित 'कनिष्ठ' जातीतील पुरुषाकडून झालेले 'दूषण' ही संकल्पना शिव्यांमध्ये आणून पुरुषाच्या जातीय अभिमानावर थेट आघात केला जातो. तसेच स्त्रीचे शरीर, शारीरिक द्रव आणि जननेंद्रिये यांना 'अशुद्ध' किंवा 'विटाळ' मानणाऱ्या या मानसिकतेतूनच शिव्यांमध्ये स्त्री-शरीराचा मानखंडनाकारक उल्लेख केला जातो. थोडक्यात, सार्वजनिक आयुष्यात शिव्यांचा वापर हा जातीय उतरंड टिकवण्यासाठी, स्त्रीचे दास्य सिद्ध करण्यासाठी आणि पुरुषाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एक भाषिक हत्यार म्हणून केला जातो.

उलटपक्षी, आधुनिक पॉर्न उद्योगाने मानवी मानसिकतेच्या याच सुप्त, निषिद्ध आणि पितृसत्ताक कोपऱ्यांचा व्यावसायिक (Commercial) वापर सुरू केला आहे. सामाजिक बंधने, जातीय भीती आणि नैतिकतेचे नियम जिथे शिथिल होतात, अशा खाजगी डिजिटल अवकाशात या उद्योगाने 'Step-sibling' किंवा नातेसंबंधांची विविध लेबल्स वापरून या निषिद्धतेला थेट बाजारात विक्रीसाठी आणले. वास्तविक जीवनात 'वेस्टरमार्क इफेक्टनुसार' सोबत वाढलेल्या आईवडील-मुले व भाऊ-बहिणीमध्ये नैसर्गिकरीत्या जी लैंगिक उदासीनता वर्तनात विकसित झालेली असते, त्या इन्सेस्ट टॅबूप्रणीत नैसर्गिक अलिप्ततेवर आघात करून इन्सेस्ट पॉर्नसारखे प्रकार या कामुक- मानसिक उत्तेजनाच्या आधारे विकृत फँटसी निर्माण करतात.व विकृत ‘सवय’ लावू पाहतात. इन्सेस्ट पॉर्न हे मानवी नात्यांमधील या नैसर्गिक संरक्षणात्मक चौकटीवर आघात करते. काही अभ्यासांनुसार, अशा प्रकारच्या काही सामग्री व तत्सम व्हिडिओंमुळे प्रेक्षक प्रत्यक्ष कृतीपेक्षा मानसिक उत्तेजनेच्या आणि विकृत सवयींच्या आहारी जातात. अश्या जैविक वास्तवाला छेद देऊन, केवळ ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी आणि माणसाच्या निषिद्ध गोष्टी पाहण्याच्या कुतूहलाला (Voyeurism) खतपाणी घालण्यासाठी आधुनिक पॉर्नोग्राफी या फँटसीची योजना करत असते. शिव्यातील काल्पनिक मानभंग करणारी लैंगिक कृती आणि इन्सेस्ट पॉर्नमधील कल्पित पर-दृश्य कृती या दोन्ही घटकांमध्ये मानवी भावनांचा मानभंग करणारा एकच समान अंतर्विरोध स्पष्टपणे दिसून येतो.

सार्वजनिक अवकाशात शिव्यांद्वारे होणारा आघात असो वा खाजगी अवकाशातील पॉर्नोग्राफीची फँटसी असो, या दोन्ही प्रक्रियेच्या केंद्रस्थानी स्त्री-शरीराचे वस्तुकरण (Objectification) आणि जातीय-पुरुषप्रधान वर्चस्ववाद हेच मुख्य चालक म्हणून काम करतात. सार्वजनिक आयुष्यात स्त्रीला 'कुटुंबाची व जातीची इज्जत' मानून तिच्या नावाने शिव्या देणे आणि खाजगीत त्याच निषिद्ध नात्यांचा उपभोग घेण्याची फँटसी बाळगणे—हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही अवकाशांत स्त्रीची स्वायत्तता संपूर्णपणे नाकारली जाऊन तिला केवळ पुरुषाच्या नैतिकतेचे, जातीय धारणांचे किंवा कामवासनेचे साधन बनवले जाते. अशा प्रकारे, सांस्कृतिक आणि जातीयदृष्ट्या ज्या गोष्टीवर तीव्र सामाजिक बंदी असते, तीच गोष्ट खाजगीत तीव्र मानसोपचारविषयक विकृती बनते; जी आजच्या मानवी संस्कृतीतील एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या म्हणून समोर आली आहे. भारतीय पॉर्नोग्राफीच्या जगात जातीय व्यवस्था, स्त्रीची लैंगिकता आणि पुरुषी उपभोगवाद यांचा अत्यंत शोषणकारी संबंध दिसून येतो. ऐतिहासिकदृष्ट्या ज्या 'जातीय शुद्धतेला' आणि 'कुळाच्या प्रतिष्ठेला' पवित्र मानले गेले, डिजिटल पॉर्न उद्योगाने त्याच गोष्टींचे बाजारीकरण करून त्यांना पुरुषाच्या चैनीचे साधन बनवले आहे. इथे स्त्रीच्या शरीराला आणि कौमार्याला केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून विकले जाते. हा उद्योग जातीय विषमता, पुरुषी अहंकार आणि स्त्री-दास्याचा वापर करून आपले नफेखोर गणित चालवतो. माणसाच्या निषिद्ध गोष्टी पाहण्याच्या सुप्त कुतूहलाला बाजारपेठ पुरवत, स्त्रीवरील हिंसा व शोषणाला 'मनोरंजन' म्हणून खपवले जाते. येथे स्त्रीची स्वायत्तता नाकारून तिला केवळ पुरुषाच्या कामवासनेचे साधन बनवले जाते. हे रूप केवळ लैंगिक नसून ते जातीय वर्चस्व आणि पुरुषप्रधान उपभोगवादाचे एक विषारी मिश्रण आहे.

ब्राह्मणी पितृतंत्र, योनिशुचिता आणि रक्षाबंधनाचा जमातवादी अर्थ

ब्राह्मणी धर्मव्यवस्थेमध्ये रक्षाबंधन या सणाचा आणि 'रक्षणाचा' जो अर्थ लावला गेला आहे, तो प्रामुख्याने 'धर्मरक्षण' आणि स्त्रियांच्या 'योनिशुचिता' (Sexual Purity/Chastity) या संकल्पनांभोवती केंद्रित राहिलेला आहे. या संरचनेमध्ये 'जातीची शुद्धता' टिकवून ठेवण्यासाठी स्त्रीच्या शरीरावर आणि तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर कडक नियंत्रण ठेवले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे की, जात ही केवळ कामाची विभागणी नसून ती 'अंतर्विवाहावर' (Endogamy) टिकून आहे. जातीव्यवस्था कायम ठेवण्यासाठी स्त्रियांनी केवळ आपल्याच जातीतील पुरुषाशी विवाह करणे सक्तीचे केले गेले. जर एखाद्या स्त्रीने ही जातीय चौकट ओलांडून दुसऱ्या जातीच्या किंवा धर्माच्या पुरुषाशी संबंध जोडले, तर त्यामुळे 'जातीची शुद्धता' नष्ट होते, अशी जाती पितृसत्ताक व्यवस्थेची धारणा आहे. भौतिक व मानसिक जातीपितृसत्तेत जातीचा दर्जा टिकवून ठेवण्याची एक सखोल व्यूह काम करतो. म्हणूनच, अशा मानसिकतेत भावाने बहिणीचे रक्षण करणे म्हणजे तिच्या शरीराचे, अर्थात तिच्या 'योनिशुचितेचे' रक्षण करणे ठरते; जेणेकरून जातीची शुद्धता बाधित होणार नाही. व जातीचा दर्जा टिकवला जाईल.

या विचारात 'आपल्या स्त्रीचे इतर धर्मीय किंवा परजातीय पुरुषांपासून रक्षण' करण्यालाच 'धर्मरक्षण' मानले गेले. यात स्त्रीला तिची स्वतंत्र ओळख (Agency) पूर्णपणे नाकारली जाते आणि तिला कुटुंबाची, जातीची व धर्माची 'इज्जत' (Honor) बनवले जाते. येथे होणारे रक्षण हे स्त्रीचे एक 'स्वतंत्र व्यक्ती' म्हणून होत नसून, ती जातीची आणि पुरुषांची एक 'मालमत्ता' असल्यामुळे केले जाते. ही मालमत्ता किंवा प्रतिष्ठा दुसऱ्या जातीत जाणे म्हणजे जातीचा पराभव मानला जातो. त्यामुळे रक्षाबंधनाचा हा जमातवादी आणि पारंपरिक अर्थ स्त्रीला खऱ्या अर्थाने सुरक्षित करत नाही, तर उलट तिच्यावर सातत्याने पाळत ठेवतो. तिने कोणाशी बोलावे, कसे वागावे, कोणावर प्रेम करावे, हे ठरवण्याचा अधिकार कुटुंबातील पुरुषांकडे (भावाकडे वा वडिलांकडे) जातो. जेव्हा एखादी स्त्री या चौकटीचा भंग करून स्वतःच्या पसंतीने परजातीय किंवा परधर्मीय पुरुषाची निवड करते, तेव्हा रक्षणाचे वचन देणारा भाऊच अनेकदा तिचा सर्वात मोठा शत्रू बनतो. 'ऑनर किलिंग' (जातीसाठी होणारे खून) हे याच जातीपितृसत्ताक योनिशुचितेच्या मानसिकतेचे अत्यंत भयानक रूप आहे.

आधुनिक काळात याच ब्राह्मणी पितृतंत्राचा वापर करून 'लव्ह जिहाद' सारख्या काल्पनिक संकल्पना उभ्या केल्या गेल्या. या राजकीय आणि तथाकथित हिंदुत्त्ववादी जमातवादी राजकारणाने रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता सीमित न ठेवता, तो इतर धर्मांविरुद्ध पुरुषांना आक्रमकपणे संघटित करण्याचे माध्यम बनवला. "तुमच्या बहिणी धोक्यात आहेत आणि त्यांचे रक्षण करणे हे तुमचे धार्मिक कर्तव्य आहे," असा नरेटिव्ह तयार करून स्त्रियांना कायम भयाखाली ठेवले जाते, जेणेकरून त्या घराबाहेर पडून स्वतंत्र निर्णय घेऊ शकणार नाहीत.ब्राह्मणी धर्मातील रक्षाबंधनाचा हा अर्थ स्त्रीला 'गुलामगिरीत' ठेवणारा आणि तिच्या नैसर्गिक मानवी हक्कांचा संकोच करणारा आहे.

‘धर्मरक्षणा'चा हिंसक आणि विकृत अर्थ

पारंपरिक धर्मरक्षणाची संकल्पना ही दुहेरी पातळीवर कार्य करत होती. एका बाजूला स्त्रीचे नियंत्रण आणि तिचे जातीय-पितृसत्ताक चौकटीत शिस्तीकरण करणे हे तिचे उद्दिष्ट होते, तर दुसऱ्या बाजूला या व्यवस्थेतील मूल्यांना आव्हान देणाऱ्या किंवा विरोध करणाऱ्या व्यक्ती व विचारांचे हिंसक दमन करणे हाही त्याचाच एक भाग मानला गेला. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली; तो दिवस नेमका रक्षाबंधनाचाच होता. एका समर्पित समाजसुधारकाच्या निर्घृण हत्येनंतर सोशल मीडियावर काही विकृत मानसिकतेच्या घटकांकडून या घटनेचे "धर्मरक्षण" म्हणून केलेले उदात्तीकरण हे 'रक्षण' या संकल्पनेचा काही हिंदुत्त्ववादी शक्तींनी किती हिंसक आणि अत्यंत विकृत अर्थ लावला आहे, याचे थेट आणि जिवंत उदाहरण त्यावेळी माझ्या नजरेत आल्याने मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, जादूटोणा आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाविरोधात अविरत लढा दिला. त्यांच्यावर केवळ हिंदू धर्मातील प्रथांवरच बोट ठेवले जात असल्याचा एकांगी आरोप वारंवार केला गेला. परंतु, त्यांनी सर्वच धर्मांमधील मानवी हक्कांचे हनन करणाऱ्या अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धांवर तितक्याच ठामपणे प्रहार केले होते. भारताच्या एकूण सामाजिक रचनेत बहुसंख्याक समाज हिंदू असल्याने, त्यांच्या प्रबोधनात्मक कार्याचा रोख अधिक प्रमाणात तेथे असणे स्वाभाविक आणि नैसर्गिक होते. मात्र, ब्राह्मणी आणि हिंदू जमातवादी व्यवस्थेला हा विवेकवाद (Rationalism) नेहमीच त्यांच्या स्थापित धार्मिक सत्तेला आणि मक्तेदारीला असलेला 'मोठा धोका' वाटत आला. गीतेतील "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् | धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ||" (सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी मी युगायुगात अवतार घेतो) या श्लोकाचा किंवा संकल्पनेचा विकृत आणि एकांगी वापर करून, धार्मिक मक्तेदारीला प्रश्न विचारणाऱ्या विवेकवादी व्यक्तींना 'धर्मद्रोही' किंवा 'दुष्कृत' ठरवले जाते. यातूनच, एका निरपराध विचाराची आणि व्यक्तीची हत्या करणे हेच "धर्माचे रक्षण" (धर्मसंस्थापना) आहे, असा हिंसक आणि अत्यंत भयानक घातक अर्थ लावला जातो. त्या दिवशी सोशल मीडियावर पसरवलेल्या पोस्ट्स याच आक्रमक आणि विकृत मानसिकतेचे उघड प्रदर्शन करत होत्या.

पारंपरिक आणि सामाजिक पातळीवर रक्षाबंधन हा सण प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि अभय देणारे प्रतीक मानला जातो. परंतु, डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या दिवशी समोर आलेल्या या मानसिकतेने स्पष्ट करून दिले की, या सणाचा वापर आता 'हिंसक धार्मिक अस्मिता' टोकदार करण्यासाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी कसा वळवला जात आहे. एका बाजूला बहिणीच्या रक्षणाचे गोडवे गायचे आणि दुसऱ्या बाजूला समाजातील अन्यायाविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध लढणाऱ्या एका निरपराध आणि विवेकवादी व्यक्तीच्या रक्ताने हात माखून त्याला 'धर्मरक्षण' म्हणायचे, हा या व्यवस्थेतील सर्वात मोठा आणि क्रूर विरोधाभास आहे.

वास्तविकदृष्ट्या, डॉ. दाभोलकरांचे समग्र कार्य हे ब्राह्मणी पितृतंत्र, कर्मकांड आणि धार्मिक शोषणाच्या संरचनेला थेट सुरुंग लावणारे होते. याच कारणास्तव, त्यांची हत्या करून प्रस्थापित धर्मांध, जातीवादी आणि पितृसत्ताक शक्तींनी स्वतःच्या शोषक व्यवस्थेचे 'रक्षण' केले आणि रक्षाबंधनासारख्या सणाचा वापर करून या हिंसाचाराचे विकृत उदात्तीकरण केले. या भीषण घटनेतून एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे की, जोपर्यंत आपण सण-उत्सवांना या हिंसक व जमातवादी चौकटीतून बाहेर काढत नाही आणि त्यांना विचारस्वातंत्र्य, विवेकवाद व मानवी समतेची जोड देत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तोपर्यंत खऱ्या अर्थाने समतावादी सांस्कृतिक परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त होणार नाही.

धार्मिक सलोखा, सामाजिक न्याय आणि ऐतिहासिक बंधुभाव

रक्षाबंधनासारख्या सणाचे सामाजिक स्थान अधोरेखित करण्यासाठी धार्मिक सहिष्णुता, सामाजिक न्याय आणि ऐतिहासिक ऐक्य हे तीन निकष अत्यंत महत्त्वाचे ठरतात. भारतीय संस्कृतीत या सणाला केवळ कौटुंबिक परंपरेचे रूप न देता, धार्मिक सीमा ओलांडून हिंदू-मुस्लिम सौहार्द आणि व्यापक सामाजिक एकात्मता साधणारे एक ऐतिहासिक माध्यम म्हणून मान्यता मिळाली आहे.

ऐतिहासिक संदर्भ: इतिहासामध्ये चित्तोडची राणी कर्णावती हिने गुजरातच्या सुलतान बहादूर शाहच्या आक्रमणापासून आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी मुघल सम्राट हुमायूँला राखी पाठवली होती. हुमायूँने या नात्याचा व परंपरेचा सन्मान करत धार्मिक भेद ओलांडून राणी कर्णावतीच्या मदतीसाठी सैन्य पाठवले होते; ही घटना राजकीय सीमांच्या पलीकडे जाऊन निर्माण झालेल्या ऐक्याचे एक ऐतिहासिक प्रतीक मानली जाते. याच परंपरेचा प्रत्यय आजच्या लोकसंस्कृतीतही येतो; जिथे विशेषतः ग्रामीण व मिश्र संस्कृतीच्या प्रदेशांत मुस्लिम बांधव हिंदू बहिणींकडून राखी बांधून घेतात, तर हिंदू बांधव मुस्लिम बहिणींच्या संरक्षणाची व सन्मानाची जबाबदारी स्वीकारतात.यातून उदार धार्मिक सलोख्याची सांस्कृतिक प्रक्रिया घडत जाते.

शिवरायांचे स्वराज्य आणि स्त्रीदाक्षिण्य: मध्ययुगीन कालखंडातील जाती-पितृसत्तेच्या उतरंडीत, उच्च जातीपासून ते कनिष्ठ स्तरापर्यंत जरी स्त्रीदास्य आणि स्त्रीशोषण वेगवेगळ्या रूपांत अस्तित्वात असले, तरी त्यावरील उच्चजातीय पुरुषी वर्चस्वाचे सातत्य अबाधित होते. संपूर्ण मध्ययुगात जिथे स्त्रियांना केवळ भोगवस्तू किंवा युद्धातील लुटीची मालमत्ता मानले गेले, त्याला छेद देत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात 'स्त्रीदाक्षिण्य' आणि 'स्त्री-हक्क' या संकल्पनांना राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी आणले. महाराजांच्या चरित्रातील कर्नाटकातील बेलवडीच्या गढीची घटना हे याचे एक अद्वितीय उदाहरण आहे. दक्षिण दिग्विजयाहून परतताना बेलवडीची गढी जिंकण्यासाठी मराठ्यांच्या सैन्याला महिनाभर संघर्ष करावा लागला, कारण मल्लाबाई (सावित्री) देसाई ही अत्यंत चिवटपणे आपल्या स्वराज्यासाठी लढा देत होती. गढी जिंकल्यानंतर सावित्रीबाईंला कैद करून महाराजांसमोर आणले गेले, तेव्हा आपल्या लहान बाळाच्या प्राणांची भीक मागत त्या तिने “मला मारा, पण माझ्या बाळाला सोडा,” अशी आर्त हाक मारली.

सावित्रीबाईंची ती कारुणिक अवस्था पाहून शिवरायांचे हृदय गहिवरले. त्यांनी त्यांना तात्काळ बंधमुक्त करत “ताई” अशी सन्मानाची साद घातली आणि उद्गारले, “मी तुम्हाला ताई मानल्यामुळे हे बाळ माझा भाचा झाले आहे; त्यामुळे मी भाच्याला रिकाम्या हाताने भेटणार नाही.” राजांनी जिंकलेली ती गढी त्या बाळाच्या दुधभातासाठी आणि आसपासचा प्रदेश सावित्रीबाईंच्या चोळी-बांगडीसाठी देऊन टाकला. पराभूत शत्रूच्या स्त्रीलाही 'ताई' मानून तिला तिचे राज्य, स्वाभिमान आणि हक्क परत देण्याची ही घटना मध्ययुगातील स्त्री-हक्कांची एक अभूतपूर्व नांदी होती. शत्रूच्या स्त्रीमध्येही सख्ख्या बहिणीचे रूप पाहणाऱ्या शिवरायांच्या दृष्टीने रक्षाबंधनाचा खरा अर्थ 'शोषणापासून रक्षण करणे', 'स्त्रीचा स्वाभिमान जपणे' आणि 'तिला तिचे मूलभूत हक्क बहाल करणे' असा लावला जात आहे.

रवींद्रनाथ टागोर आणि बंगालची फाळणी (१९०५): आधुनिक भारताच्या इतिहासात पुढे १९०५ मध्ये ब्रिटिशांनी जेव्हा धर्माच्या जमातवादी आधारावर बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या राजकीय कटकारस्थानाविरुद्ध समाज जोडण्यासाठी कविवर्य रवींद्रनाथ टागोरांनी रक्षाबंधनाचा अभूतपूर्व सामाजिक वापर केला. त्यांनी कोलकात्यात हिंदू आणि मुस्लिम बांधवांना एकमेकांच्या मनगटावर 'राखी' बांधण्याचे आवाहन केले. "आम्ही धर्माने वेगवेगळे असलो तरी एकाच मातीची लेकरे आहोत आणि आमचा बंधुभाव अभेद्य आहे," हा संदेश देत टागोरांनी या सणाला राष्ट्रीय ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे एक प्रभावी माध्यम बनवले.

सामाजिक सुधारणांचे प्रयोग: महाराष्ट्रासह भारतातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि साने गुरुजी यांसारख्या अनेक समाजसुधारकांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत अशा सणांचा एक प्रभावी माध्यम म्हणून वापर केला. त्या काळात उच्चजातीय आणि दलित बांधवांनी एकमेकांना राखी बांधून व एकत्रित सहभोजन (आंतरजातीय भोजन) करून जातीभेदाच्या भिंती पाडण्याचे प्रत्यक्ष प्रयोग केले. विशेषतः साने गुरुजींनी 'आंतरभारती' आणि 'राष्ट्र सेवा दल' यांच्या माध्यमातून विविध जाती, धर्म आणि भाषांच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी रक्षाबंधनाचा आधार घेतला; जिथे सेवा दलाच्या सैनिकांनी गावकुसाबाहेरील दलितांच्या वस्त्यांमध्ये जाऊन एकमेकांना राखी बांधत "सर्व भारतीय माझे बांधव आहेत" या भावनेतून जातीभेद मोडीत काढण्याचा स्पष्ट संदेश दिला.

वास्तविक पाहता सण-उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून ते माणसांना जोडणारे सांस्कृतिक माध्यम असतात. रक्षाबंधन हा सण रक्ताच्या नात्यांच्या आणि धर्माच्या चौकटींच्या पलीकडे जाऊन मानवता, परस्पर आदर आणि सामाजिक बांधिलकी साजरी करण्याचा मार्ग दाखवतो. म्हणूनच, समाज धार्मिक आधारावर ध्रुवीकृत होण्याचा धोका असतो अशा आजच्या आधुनिक काळात, रक्षाबंधनासारख्या सणांमधून हिंदू-मुस्लिम समुदायातील नागरिक एकमेकांना राखी बांधून कोमी एकता आणि परस्पर विश्वासाचा एक संदेश पुन्हा आपल्याला धार्मिक सलोख्याच्या मुद्द्याकडे घेवून जाते. त्याचबरोबर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक सुधारणांच्या आवश्यकतेला अनुकुलता प्रदान करतो.

डिजिटल पब्लिक स्फेअर आणि महापुरुषांचे दाखले: एक सम्यक विश्लेषण

इतिहासातील समाजपरिवर्तक महापुरुष व त्यांच्या तत्कालीन प्रसंगातील उदाहरणांचा विचार सोशल मीडियाच्या दैनंदिन विचार व्यवहारांच्या अंगाने करून मांडला जात असतो. वरील संदर्भ त्यार्थाने इथे घेतला आहे. सोशल मीडिया हा आजच्या काळातील अत्यंत प्रभावी आणि 'लोकप्रिय सार्वजनिक चव्हाटा' (Popular Public Sphere) बनला आहे. डिजिटल 'पब्लिक स्फेअर' हा आधुनिक लोकशाहीचा आणि सामाजिक संवादाचा मुख्य आधार आहे. हा चव्हाटा जरी अनियोजित असला, तरी तो सकारात्मक विचारांच्या देवाणघेवाणीचे एक शक्तिशाली माध्यम ठरत आहे. या डिजिटल अवकाशात दैनंदिन विचार-व्यवहार, मतप्रदर्शन आणि सामाजिक चर्चा सातत्याने घडत असतात. विशेष म्हणजे, ही डिजिटल प्रबोधनाची चळवळ कोणत्याही एका केंद्रातून संचलित होणारी नसून, ती अत्यंत असंघटित आणि उत्स्फूर्त (Unorganized and Spontaneous) पद्धतीने पुढे जात आहे.

याच मोकळ्या अवकाशात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक दाखल्यांचा वापर करून रक्षाबंधनाबाबतच्या अनेक पोस्ट्स मोठ्या प्रमाणात 'व्हायरल' होताना दिसतात. हा संपूर्ण व्यवहार पाहता, सार्वजनिक चव्हाट्यावरील चर्चेला एक योग्य, तार्किक आणि समतावादी दिशा मिळत असल्याचे स्पष्ट होते; आणि याच प्रक्रियेचे सुटसुटीत वैचारिक स्पष्टीकरण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

सोशल मीडियाचा स्वभाव असा आहे की, तिथे एखादा विषय किंवा ऐतिहासिक प्रसंग अत्यंत वेगाने सर्वदूर पसरतो. मात्र, ही चळवळ अनियोजित असल्यामुळे अनेकदा ऐतिहासिक प्रसंगांचे चुकीचे, अति-सुलभीकरण केलेले किंवा कर्मकांडी अर्थ पसरण्याचा धोका नेहमीच संभवतो. या महापुरुषांना केवळ धार्मिक किंवा पुरुषसत्ताक 'रक्षक' म्हणून दाखवून त्यांच्या मूळ समतावादी विचाराला बाजूला सारले जाण्याची शक्यता असते. पण जेव्हा सोशल मीडियावरील ही उत्स्फूर्त चळवळ महापुरुषांच्या दाखल्यांचा वापर करते, तेव्हा ती केवळ एक सण साजरा करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती त्या सणाच्या निमित्ताने आपली विचारधारा प्रसार करण्याची म्हणजेच सामाजिक प्रबोधनाचे एक डिजिटल अभियान म्हणून कार्यरत राहते.

सोशल मीडियावर शिवरायांच्या काळातील घटना—जसे की बेलवडीच्या गढीच्या मल्लाबाई देसाई यांचा प्रसंग किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा विषय—अनेकदा रक्षाबंधनाशी जोडून मांडले जातात. परंतु, शिवराय हे केवळ स्त्रीचे 'रक्षक' होते आणि स्त्री ही केवळ पुरुषाच्या आश्रयावर जगणारी 'संरक्षित' किंवा अगतिक घटक होती, असा एकांगी अर्थ काढणे चुकीचे ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे 'रक्षण' हे पुरुषसत्ताक किंवा मालकी हक्काचे नव्हते; तर ते 'स्त्री-दाक्षिण्य', 'स्त्री-स्वाभिमान' आणि 'हक्कांचे पुनरुत्थान' होते. शत्रूच्या स्त्रीमध्येही बहिणीचे रूप पाहून तिला तिचे राज्य, जमीन आणि अधिकार सन्मानाने परत देणे म्हणजे केवळ एकतर्फी रक्षणाचे वचन नसून, स्त्रीचा एक स्वतंत्र नागरिक म्हणून केलेला गौरव होता. त्यामुळे आजच्या काळात या घटनेचा सम्यक अर्थ "स्त्रीच्या आत्मसन्मानाची, अधिकारांची आणि स्वातंत्र्याची जपणूक करणे" असाच लावला पाहिजे.

महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सण-उत्सवांमधील विषमतावादी व कर्मकांडी भाग नाकारून सार्वजनिक आणि समतावादी नवे पर्याय दिले आहेत. या पर्यायांकडे जाण्यासाठी या सण-उत्सवांना अधिक उदार व न्याय्य स्वरूप देण्यावर पोस्टकर्त्यांचा भर असतो.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान: महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या इतिहासाचा अर्थ या सणाशी जोडून आपल्याला त्याचे नवसर्जीत मूल्य शिकवले जाते की, स्त्रीला परावलंबी ठेवण्याऐवजी शिक्षण देऊन स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम म्हणजेच सबला बनवणे हेच तिचे खरे रक्षण आहे. फुले दांपत्याने स्त्रियांच्या हातात शिक्षणाच्या रूपाने संरक्षणाचे सर्वात मोठे शस्त्र दिले. त्या काळात पतीच्या निधनानंतर स्त्रियांचे केशवपन केले जाई आणि त्यांना अतिशय क्रूर जीवन जगावे लागे. ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी फुल्यांनी पुण्यात नाभिकांचा ऐतिहासिक संप घडवून आणला, जेणेकरून कोणत्याही विधवेचे सक्तीने केशवपन केले जाऊ नये. रक्षाबंधनाचा या ऐतिहासिक घटनेशी अर्थ जोडला तर त्याला नव्या सांस्कृतिक मूल्यांशी जोडून वारसा सांगितला जातो. जर बहिणीला दुःखातून आणि अन्यायातून वाचवणे असा याचा अर्थ असेल, तर फुल्यांनी घेतलेला हा पुढाकार संपूर्ण महाराष्ट्रातील विधवा बहिणींचे रक्षण करणारा एक क्रांतिकारक टप्पा ठरतो.त्याचप्रमाणे, ब्राह्मणी पितृसत्तेमुळे छळल्या गेलेल्या गरोदर विधवा महिलांना आत्महत्येपासून वाचवण्यासाठी फुले दांपत्याने १८६३ मध्ये स्वतःच्या घरात 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केले. येथे आश्रयाला आलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या मुलाला (यशवंत) त्यांनी दत्तक घेतले आणि त्याला स्वतःचा वारसदार बनवले. कोणत्याही भावाने आपल्या बहिणीला आणि तिच्या लेकराला द्यावे, त्याहून मोठे अभय आणि जीवदान महात्मा फुल्यांनी या कार्यातून दिले.असे याचे वर्ण केले जाते. यासोबतच, त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून हुंडाविरोधी आणि पुरोहितांशिवाय होणाऱ्या सत्यशोधक विवाह पद्धतीची सुरुवात केली. या विवाहांच्या मंगलाष्टकांमध्ये त्यांनी स्त्री आणि पुरुषाला समान हक्क देण्याची शपथ अंतर्भूत केली. रक्षाबंधनात जसे एक प्रकारचा आदराचे व संरक्षणाचे सूत्र असते, त्याच सन्मान आणि हक्क यांच्या सूत्राचा विस्तार करत तो स्त्रीला कुटुंबात आणि समाजात मिळावा, यासाठी त्यांनी लग्नव्यवस्थेत ही ऐतिहासिक सुधारणा घडवून आणली.

या संपूर्ण इतिहासाचे आकलन करताना आपल्या लक्षात येते की, महात्मा फुले यांनी केवळ एका बहिणीपुरते मर्यादित न राहता, तत्कालीन समाजातील प्रत्येक शोषित आणि पीडित स्त्रीला आपली बहीण मानले. त्यांनी राखीच्या एका कच्च्या धाग्याला शिक्षणाच्या, मूलभूत अधिकारांच्या आणि सामाजिक सन्मानाच्या मजबूत व पक्क्या बंधनात रूपांतरित केले, असे कथन लोकप्रचलित प्रवाहात केले जाते.

दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सण-उत्सवांमधील कर्मकांड, विषमता आणि पुरुषसत्ताक चौकटीला नकार देऊन 'सामाजिक बंधुता' (Fraternity) हा संविधानात्मक व वैचारिक गाभा मांडला. पारंपरिक रक्षाबंधनात 'स्त्री ही अबला असून पुरुषाने तिचे रक्षण करावे' ही धारणा दडलेली होती. बाबासाहेबांनी स्त्रीला 'संरक्षित किंवा दुय्यम' न मानता, तिला शिक्षण, मालमत्तेचा अधिकार आणि कायदेशीर हक्क देऊन स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम बनवले. त्यांनी कायद्याच्या बळावर महिलांच्या हक्कांचे व संरक्षणाचे कायमस्वरूपी छत्र निर्माण केले. हिंदू कोड बिलात मृत व्यक्तीच्या संपत्तीत विधवा, मुलगी आणि मुलगा यांना समान हिस्सा मिळण्याचा क्रांतिकारक प्रस्ताव होता. याशिवाय पती-पत्नीला अन्याय किंवा इतर कारणावरून कायदेशीर रीतीने घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळाला, पुरुषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्यास प्रतिबंध करण्यात आला आणि हुंड्यासारख्या प्रथेवर नियंत्रण ठेवण्याची तरतूद करण्यात आली. विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासोबतच कोणत्याही जातीतील मूल दत्तक घेण्याचा अधिकार महिलांना बहाल करण्यात आला. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या पदरात हिंदू कोड बिलाची ओवाळणी टाकून त्यांना समाजात खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीचा समान दर्जा मिळवून दिला.अश्या आशयाचे स्मरण या सणाशी जोडून या चर्चेत स्त्रीच्या दास्यमुक्तीचा आंबेडकरी विचार मध्यवर्ती केला जातो.

बाबासाहेबांच्या उदाहरणावरून इतिहास आपल्याला हे शिकवतो की, रक्षण हे केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवर मर्यादित न राहता ते संस्थात्मक आणि कायदेशीर असावे लागते. केवळ तोंडी वचनांपेक्षा 'कायदा' करून व्यवस्थेतच मूलगामी बदल करणे हे खरे रक्षण आहे, हा इतिहास अर्थ पुढे आणण्ला जातो. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाद्वारे संरक्षणाची व्याख्याच बदलली. त्यांनी स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य (संपत्तीचा अधिकार), सामाजिक स्वातंत्र्य (विवाह व घटस्फोटाचा अधिकार) आणि कौटुंबिक सन्मान दिला. स्त्री जर कायद्याने आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर ती स्वतःचे रक्षण स्वतः करण्यास समर्थ बनते, हाच बोध इतिहासाचे समकालीन अर्थ लावून पोस्टकर्ते देत असतात. आंबेडकरी विचारांनुसार खरा 'बंधुभाव' तोच आहे, जो जातीच्या आणि धर्माच्या भिंती पाडतो. म्हणूनच फ्रेंच राज्यक्रांतीतील आणि बुद्धांच्या धम्मातील 'बंधुता' ही संकल्पना त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत स्थान देऊन सर्व भारतीयांना एकमेकांचे बंधू-भगिनी मानण्याचा नैतिक पाया रचला, हेही आवर्जून सांगण्यास विसरत नाही. संविधानातील 'बंधुता' (Fraternity) ही संकल्पना केवळ एका रक्ताच्या किंवा कौटुंबिक नात्यापुरती मर्यादित नसून, ती जात, धर्म आणि लिंगभावाच्या भेदांना छेदणारी भावनिक सांस्कृतिक शक्ती आहे आणि ती प्रत्येक नागरिकाला समान मानणाऱ्या व्यापक मूल्यप्रणालीवरच अधिष्टीत राहू शकते, याचा निर्वाळा यातून संबोधित केला जातो.

परंपरेने रुजलेल्या 'बंधुता' (Fraternity -Brotherhood) या पुरुषसत्ताक शब्दाला पर्याय म्हणून आणि स्त्रियांच्या परस्पर ऐक्याला अधोरेखित करण्यासाठी स्त्रीवादी विचारसरणीत 'भगिनीभाव' (Sisterhood) ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली गेली. मात्र, 'बंधुता' ही केवळ पुरुषांपुरती आणि 'भगिनीभाव' ही केवळ स्त्रियांपुरती मर्यादित राहत असल्याने, हे दोन्ही शब्द संपूर्ण समाजाला एकत्र सामावून घेण्यात अपुरे पडतात. याउलट, 'भावंडभाव' (Siblinghood) हा पर्याय स्त्री आणि पुरुषांसोबतच परलिंगी (Transgender/Non-binary) व्यक्तींनाही सामावून घेतो. त्यामुळे कोणत्याही लिंगाला दुय्यम न ठेवता सर्वांचा समावेश करणारा 'भावंडभाव' हाच शब्द खऱ्या अर्थाने व्यापक, लिंगनिरपेक्ष आणि सर्वाधिक समर्पक ठरतो. 'बंधू' या शब्दातील पुरुषी केंद्र साचलेपण दूर करून भाऊ, बहीण आणि लिंगापलीकडच्या सर्व मानवी नात्यांना सामावून घेण्याची क्षमता 'भावंडभाव' या संज्ञेत आहे. भारतीय संविधानातील 'Fraternity' या मूल्यामागील मुख्य उद्देश समाजातील सर्व घटकांमध्ये एकात्मता साधणे हाच असल्याने, 'भावंडभाव' ही संकल्पना या लोकशाही ध्येयाशी अधिक सुसंगत आहे. पारंपरिक भाषिक पुरुषसत्ताकतेला छेद देण्यासाठी (उदा. 'मॅनकाइंड' ऐवजी 'ह्युमनकाइंड' वापरण्याप्रमाणे) 'भावंडभाव' किंवा 'सहभाव' यांसारख्या शब्दांचा स्वीकार करणे हे आधुनिक, प्रगल्भ आणि सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे भाषिक पाऊल आहे.

या सर्व सोशल मीडिया पोस्ट्स आणि वैचारिक मंथनातून पुरुषसत्ताकतेकडून समतेच्या मूल्यांकडे होणारे परिवर्तन स्पष्टपणे दिसून येते. 'संरक्षक-संरक्षित' या पारंपरिक विषम चौकटीला छेद देऊन परस्पर आदर व समानतेवर आधारित नातेसंबंध प्रस्थापित करणे, हा या चर्चेचा मुख्य गाभा आहे. रक्षाबंधनाकडे धार्मिक कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन घटनात्मक समता, स्वातंत्र्य आणि बंधुता -'भावंडभाव' या मूल्यांच्या चौकटीतून पाहण्याची आवश्यकता या प्रागतिक विचार-चर्चेतून व्यक्त होत असते. अशा प्रकारे महापुरुषांच्या इतिहासाचा सम्यक आणि तार्किक अर्थ लावून, या सणाचा उपयोग जातीय शुद्धता वा योनिशुचितेच्या संरक्षणासाठी न करता, जातीभेद निर्मूलन आणि सामाजिक सलोख्यासाठी करणे हा विवेकवादी मार्ग यातून दाखवला जातो.

सांस्कृतिक पर्यायाचा विचार

पारंपरिक सण-उत्सव आणि धार्मिक प्रतीकांमधील विषम आशयाला प्रतिवाद करत, त्याला समतावादी पर्यायी सांस्कृतिक अवकाश निर्माण करून देणे हा या सांस्कृतिक समीक्षेचा मुख्य उद्देश आहे. समतावादी मूल्यांवर आधारित पर्यायी सांस्कृतिक कृती आणि सण-उत्सव पुरस्कृत करत असताना अशा प्रबोधनात्मक व संघटनात्मक उपक्रमांसाठी संवादाचे एक व्यापक आणि उदार अवकाश स्वीकारणे आवश्यक ठरते. याच पार्श्वभूमीवर, गावांपासून शहरांपर्यंत आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दलित, बहुजन, आदिवासी व उच्चजातीय अशा सर्व धर्मीय व जातीय बांधवांनी एकत्र येऊन 'समता रक्षाबंधन' हे सार्वजनिक अभियान म्हणून राबवण्याचा प्रस्ताव सुचवला गेला आहे. या अभियानाअंतर्गत केवळ विधीवत राखी न बांधता, जातीभेद निर्मूलन, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन आणि सामाजिक समतेचे पालन करण्याची सामूहिक शपथ घेतली जाते. ज्या भागांत अजूनही जातीय भेदभाव आढळतो, तिथे युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष वस्ती-पातळीवर उपक्रम राबवून सामाजिक ऐक्य आणि सलोखा प्रस्थापित करण्याचे निश्चित केले आहे.

नफा-केंद्रित भांडवलशाहीने रक्षाबंधन आणि भाऊबीज यांसारख्या सणांमधील भाऊ-बहिणीच्या नात्याचे एका 'व्यापारी बाजारपेठेत' रूपांतर केले आहे. हे सण आता केवळ साध्या सुताचा धागा किंवा औक्षणापुरते मर्यादित न राहता, महागड्या भेटवस्तू, कपडे आणि गॅजेट्स विकण्याचे कॉर्पोरेट साधन बनले आहेत. जाहिरातींच्या माध्यमातून "जितके महागडे गिफ्ट, तितके जास्त प्रेम" असा आभास निर्माण केला गेल्याने भावाचे प्रेम ओवाळणी व भेटवस्तूंच्या आर्थिक मूल्यावरून ठरवले जाऊ लागले आहे. यामुळे कनिष्ठ-मध्यमवर्गीय भावाच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन नात्यांतील आपुलकीची जागा पैशाने घेतली आहे. जाहिरातींमधून पुरुषाच्या 'खर्च करण्याच्या क्षमतेचे' उदात्तीकरण केले जाते, तर स्त्रीला केवळ 'भेटवस्तू स्वीकारणारी उपभोक्ता' म्हणून दाखवले जाते. कंपन्यांच्या 'स्त्री सक्षमीकरणाच्या' दाव्यांमागेही निव्वळ वस्तू विकण्याचाच हेतू असतो. या सांस्कृतिक प्रभुत्वामागे संपत्तीचे आणि विषमतेचे मुख्य आर्थिक वास्तव झाकले जाते. भांडवलशाही आणि जातीय पितृसत्तेच्या संरचनेत मालमत्ता उच्चजातीय पुरुषांच्याच हातात केंद्रित राहते. यात उच्चवर्गीय स्त्रियांना भौतिक सोयी-सुविधा मिळत असल्या तरी मुख्य मालमत्तेच्या हक्कापासून त्यांना दूर ठेवले जाते; तर कनिष्ठ वर्ग व जातींमधील स्त्रिया अधिक तीव्र आर्थिक-सामाजिक शोषणाला बळी पडतात. रक्षाबंधन आणि भाऊबीज या सणांमधील भावनिकतेचा वापर करून हा मूळ अंतर्विरोध दडपला जातो. म्हणून, सणांचे हे ग्राहकवादी वस्तूकरण नाकारून नात्यांची पुनर्रचना समता, परस्पर आदर आणि आर्थिक न्यायाच्या तत्त्वावर करण्यासाठी प्रबोधनपर व्यापक चिंतन विस्तारणे ही निकडीची बाब आहे.

भाऊ-बहिणीचे नाते हे केवळ रक्ताच्या नात्यापुरते वा निखळ आपुलकीपुरते सीमित नसून, त्यावर जात, लिंगभाव (स्त्री-पुरुष विषमता) आणि भांडवलशाही या सामाजिक-आर्थिक व्यवस्थांचा सखोल परिणाम झालेला असतो. रक्षाबंधन आणि भाऊबीजेसारख्या पारंपरिक उत्सवांची जपणूक करणाऱ्या आपल्या समाजात एक भीषण सामाजिक अंतर्विरोध दडलेला आहे. निर्भया' प्रकरणाच्या वेळी प्रकट होणारी सार्वत्रिक सहानुभूती खैरलांजीतील सुरेखा किंवा प्रियंका भोतमांगे यांच्या वाट्याला येत नाही. यातून बंधुभावाची व्याप्ती ही जात-निरपेक्ष नसून जातीय चौकटींनी मर्यादित झालेली दिसते.नात्यांमधील आणि संरक्षणातील हा दुटप्पीपणा आपल्या सामाजिक संवेदनशीलतेतील विषमता उघडी पाडतो. पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रीला जातीची प्रतिष्ठा मानले गेल्याने 'रक्षणाची' संकल्पना ही स्त्रीच्या अधिकारांचे जतन करण्याऐवजी तिचे लैंगिक व सामाजिक नियंत्रण आणि जातीय शुद्धता अबाधित राखण्याचे साधन बनली. गेल्या काही दशकांत जमातवादी राजकारणाने या सणांचा वापर परधर्मीयांची भीती घालण्यासाठी आणि स्व-समूहाचे ध्रुवीकरण करण्यासाठी एक राजकीय हत्यार म्हणून केला आहे. 'आपली स्त्री' विरुद्ध 'परधर्मीय पुरुष' असे आभासी शत्रुत्त्व निर्माण करत स्वतःच्या समूहाची तटबंदी मजबूत केल्या जात आहेत.

आजच्या आधुनिक, शहरी आणि शिक्षित समाजघटकांमध्ये रक्षाबंधनासारख्या पारंपरिक सणाच्या सांस्कृतिक रूपात काही प्रमाणात धर्मनिरपेक्ष व समभाव प्रतीत करणाऱ्या मूल्यप्रणालीत रूपांतर होताना स्पष्टत: दिसून येत आहे. तरुण पिढी या सणाला धर्म, जात किंवा रक्ताच्या नात्यापुरते मर्यादित न ठेवता सर्वसमावेशक मैत्री व स्नेहाचे प्रतीक मानत आहे. यामुळे 'फ्रेंडशिप डे' आणि 'रक्षाबंधन' यांच्यातील दरी पुसली जात आहे.यासोबतच, पारंपरिक 'संरक्षक पुरुष आणि आश्रित स्त्री' या सत्तासमीकरणाला छेद दिला जात आहे. बहिणींद्वारे भावाला, दोन बहिणींनी एकमेकींना किंवा मित्र-मैत्रिणींनी परस्परांना राखी बांधण्याची नवी पद्धत ही मालकी हक्क किंवा संरक्षणाचा आव आणण्याऐवजी परस्पर स्वायत्तता, आदर आणि मैत्रीचे नाते दृढ करणारी ठरत आहे.

संस्कृती आणि आधुनिक सामाजिक मूल्यांच्या प्रवाहात सणांचे अर्थ आणि रूप सातत्याने बदलत असते. 'रक्षाबंधन' आणि 'फ्रेंडशिप डे' (मित्रता दिवस) यांची तुलना केल्यास, स्त्री-पुरुष संबंधांवरील सामाजिक प्रभावाची दिशा कौटुंबिक चौकटीची सक्ती आणि स्त्री-पुरुष मुक्त मैत्री यातील फरकात तपासता येते. पारंपरिक रक्षाबंधन हे 'रक्ताचे नाते' आणि कौटुंबिक चौकटीवर आधारित असून, त्यात स्त्रीने पुरुषाला 'भाऊ' मानणे आणि पुरुषाने तिचे 'रक्षण' करणे ही भूमिका पूर्वलिखित असते. या चौकटीमुळे स्त्री-पुरुषांमधील निखळ मैत्रीचा पर्याय अनेकदा नाकारला जातो. याउलट, 'फ्रेंडशिप बँड' हा स्वेच्छेने निवडलेल्या आणि संमतीवर आधारित (Consent and Choice) नात्याचे प्रतीक आहे, जिथे कोणत्याही भूमिकेच्या सक्तीविना स्त्री-पुरुष समान पातळीवर मित्र म्हणून जोडले जातात. फ्रेंडशिप बँड हा कोणत्याही लिंगभाव आधारित सक्तीशिवाय, परस्पर संमती व स्वायत्ततेवर आधारित मुक्त मैत्रीचे प्रतीक मानला जातो. मुहूर्त आणि धार्मिक कर्मकांडांत जगणाऱ्या आपल्या समाजात स्त्री-पुरुष संबंधांमध्ये खरा मोकळेपणा कधी येणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भाऊ-बहिणीचे नाते विषम सत्तासमीकरणांना छेद देत सुंदर मैत्रीचे रूप घेण्यास अजून बराच काळ जावा लागेल असे दिसते. यासाठी पुरुषांनी केवळ स्वतःच्या बहिणीकडेच नव्हे, तर प्रत्येक स्त्रीकडे 'एक माणूस' म्हणून पाहण्याची मानसिकता अंगी बाणवणे गरजेचे आहे. आपल्या समाजात स्त्री-पुरुष संबंधांवर असलेल्या बंधनांमुळे मोकळ्या संवादाचा अभाव राहिला आहे; परिणामी, अस्वीकृत किंवा दडपलेल्या नात्यांना झाकण्यासाठी 'मानलेल्या भाऊ-बहिणीच्या' नात्याचा वापर एका सुरक्षित सामाजिक मुखवट्यासारखा केला गेल्याचे आढळते. 'ताई''भाऊ' यांसारख्या सार्वजनिक संबोधनांचा आडोसा घेऊन अनेकदा दडपलेल्या भावनांना वाट करून दिली जाते, ही आपल्या सामाजिक नैतिकतेतील एक गुंतागुंतीची वास्तवता आहे.

स्त्री-पुरुषांकडे केवळ 'भाऊ-बहीण' किंवा 'पती-पत्नी/प्रेमी' या दोनच पारंपरिक चष्म्यातून पाहण्याची सवय बदलणे, ही नव्या पर्यायी प्रगल्भ समाजघडणीसाठीची भौतिक व मानसिक बदलाची अट आहे. व्यक्तीला लिंगभावाच्या पलीकडे जाऊन समान नागरिक आणि उत्तम मित्र म्हणून स्वीकारणे हे प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे. रक्षाबंधनाला 'रक्षक पुरुष आणि आश्रित स्त्री' या पितृसत्ताक नात्यांची सक्तीतून मुक्त करून, त्यात परस्पर आदर, मैत्री आणि स्वायत्ततेची भावना रुजवणे ही वर्तनप्रक्रिया घडवण्याचा मुद्दा अहम आहे. फ्रेंडशिप बँडमधील हीच मुक्त मैत्रीची आणि समानतेची भावना रक्षाबंधनात स्वीकारली जाऊ शकते. सणांचे रूप आणि अर्थ कालसापेक्ष बदलत असतात. जर सणांचा वापर विषमतेचे किंवा द्वेषाचे उदात्तीकरण करण्यासाठी होत असेल, तर लोकशाही समाजात त्यांना समता, स्वातंत्र्य व बंधुतेच्या संवैधानिक मूल्यांनी समृद्ध करून सार्वत्रिक व मानवतावादी बनवणे शक्य आहे.


प्रा. सचिन गरुड, A-11, ‘अर्हण’, प्राध्यापक कॉलनी, महादेव नगर, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली, पिन-415409. Mob. No. 9890912734 Email- garudsachin.38@gmail.com