ब्रिटिशकालीन भारतीय रेल्वे मार्ग आणि वडार मजूर

०९ ऑगस्ट २०२१

भारतात अतिशय कठिण शारीरिक श्रम करणारा समाज म्हणजे वडार अशी त्यांची ओळख आहे. दगड खाणी शोधणे व खणणे, दगड व खडी फोडणे, रस्ते तयार करणे, तलाव व विहिरी खोदणे, बंधारे बांधणे, दगडांची कोरीव कामे व इमारत बांधकामे अशी परंपरागत कामे वडार समाज पूर्वीपासून करत आहे. ब्रिटिशकालीन भारतातील सरकारी इमारती, पाटबंधारे, तलाव, धरणे, रस्ते, रेल्वेमार्ग व पूल निर्माण करण्यात वडार मजुरांचे मुख्य श्रेय आहे. ब्रिटिशकालीन सार्वजनिक बांधकाम, वन व रेल्वे विभागातील कागदपत्रे व अहवालात इमारती, रस्ते, रेल्वेमार्ग, पूल व बंधारे इत्यादी बांधकामाचे कंत्राट मुख्यत वडार मजुरांना दिले जात असल्याचे उल्लेख दिसतात. २७ नोव्हेंबर १८५२ रोजी वेल्लोर (तमिळनाडू) येथील ब्रिटिश सिव्हिल अभियंता जी. सी. कॉलियरने तत्कालीन रेल्वे कमिशनर टी. टी. पियर्सना पत्र पाठवले होते. त्या पत्रात वडार मजूर व त्यांचा उत्तम कामांच्या कौशल्यांचे वर्णन दिसते. कॉलियर पत्रात सांगतात, ‘वडार लोक दगडांची कामे करतात. ते पाटबंधारे, धरणे व तलाव बांधण्यासाठी खूप श्रम करतात. दगड व माती वाहण्यासाठी त्यांच्याकडे गाडी (Buffalo-cart) आहे. दगडवडार कंत्राट कामे घेतात व मातीवडार (Earth-worker) मजूरी करतात. वडार लहान-मोठी कंत्राट कामे घेऊन समूहात कामे करतात आणि त्यांचा एक प्रमुख असून तो समूहातील मजूरांना पैसे देण्याचे काम करतो. वृद्ध ते तरुण वयापर्यंतचे स्त्री-पुरुष, मुले-मुली हे जोडीने कामे करतात. दगड, विटा, मातीची भरीव व मजबूत बांधकामे, दगडखाणी खणण्याची कामे फक्त यांची कुटुंबे करतात आणि त्यातून मिळणारी मजुरी हीच त्यांची संपत्ती आहे. एखादे काम घेतले की ते काम पूर्ण कसे होईल यासाठी ते खूप संघर्ष करतात. ते अतिशय हुशार व चांगले मजूर आहेत. नॉर्थ अरकॉटमध्ये पुरुषांना २ आणे व स्त्रियांना १ आणे, तर चिंगलपत्तू येथे २ आणे इतकी मजुरी देण्यात येते. यान्नामकूल धरण बांधण्यासाठी पाच हजार लोक मजुरी करत होते. वडारांच्या कामाबद्दल कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही. एकदा मला एक ते पंधरा व्यक्ती अशा आढळल्या की मी त्यांना काम बंद असताना त्यांचे जेवण तयार करण्यासाठी परवानगी दिली कारण त्यांच्या स्त्रिया कामावर नव्हत्या. कामांवर काही मुले त्यांना पाणी आणून देत. अतिशय श्रम करण्याचा गंध त्यांच्यामध्ये असून ते रस्त्यांचे काम करणारे उत्कृष्ट लोक आहेत. ते नेहमीच अधिक संख्येत असतात यात शंका नाही, जेव्हा त्यांना योग्य वाटते तेव्हा ते नित्य श्रमाच्या ठिकाणी गर्दीत येतात' (Report 1950: 2-5).

१८३७ मध्ये मद्रास येथील रेड हिल्स ते चिंताद्रीपेट दरम्यान व १८५२ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान पहिले रेल्वेमार्ग निर्माण करताना ब्रिटिशांना मिळालेले पहिले मजूर हे वडार लोक होते. वडार हे शारीरिकदृष्ट्या मजबूत व कठिण परिश्रम करत असल्याने त्यांना अनेक कामे देण्यात येत होती. उत्कृष्ट रस्ते व रेल्वे मार्ग तयार करण्याच्या त्यांचा पद्धतीची ओळख ब्रिटिश वसाहती व युरोपातदेखील होती. डब्लिनचे (आयर्लंड) तत्कालीन परदेशी आजीव सभासद टी. जी. गोइंग यांनी ८ जानेवारी १८६२ रोजी डब्लिन येथील प्रसिद्ध अभियंता एम. बी. मुलिन्सना पत्र पाठवले होते. त्यामध्ये मद्रास रेल्वेमार्ग व वडार मजुरांच्या संदर्भात उल्लेख येतो. त्या पत्रात गोइंग सांगतात, ‘इंग्लंडच्या नेहमीच्या रेल्वे मार्गापेक्षा भारतात वडार लोक हे वेगळ्या पद्धतीने रेल्वे मार्ग निर्माण करतात. तसेच ‘वडार लोकांचे पहार खूप जबरदस्त व जड असतात. त्यांच्याकडे पाचर घालून घट्ट बसवलेली काही लोखंडी हत्यारे, काही मातीची भांडी, एक कुत्रा व गाढव आणि थोड्या प्रमाणात तांदूळ असतात' (Transactions 1862: 22; सावंत २०२०: १५९). गोइंगचे हे वर्णन मद्रास रेल्वे मार्ग तयार करत असताना वडार मजुरांचा संदर्भात आहे. रस्ते व रेल्वे मार्गांचे कठिण परिश्रम करत असतानासुद्धा त्यांना पुरेसे अन्न मिळत नव्हते. तरीही या लोकांनी काम सोडले नाही. एखादे काम करत असताना ते काम पूर्ण करण्याची जिद्द व कौशल्य वडार मजुरांकडे होते. 

१८८५ च्या मुंबई प्रांत गॅझेटियरनुसार, ‘The Mativadars or earthmen carry on their asses the earth wanted for buildings, repair dams and take earthwork contracts on roads and railways. They are excellent workers; almost always working by the piece’ (Gazetteer 1885: 427). १९३१ च्या रॉयल कमिशन अहवालानुसार 'रेल्वे मार्ग निर्माण करण्यात वडार मजुरांचा मोठा सहभाग होता' (Report 1931: 138). ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग, रस्ते, इमारती व बंधारे इत्यादी बांधकामे व त्यांची दुरुस्ती मुख्यतः वडार मजूर करत असे दिसून येते. १८८७ च्या कोईमतूर जिल्हा मॅन्युअलनुसार खूप ठिकाणी दगड खणण्याची कामे, विहिरी खोदणे व पूल बांधण्याचे काम प्रामुख्याने वडार लोक करतात असा उल्लेख येतो. १८९० मध्ये विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे कृष्णा नदीवरील रेल्वे पूल बांधण्यात  वडार मजुरांचा सहभाग होता. 'पूल बांधकाम करताना स्त्री व पुरुष मजूरांच्या अंगावर पूर्ण कपडे दिसत नाहीत आणि ते खूप श्रम करताना दिसतात' (Keer 1995: 108; Sawant 2020: 154). कृष्णा, कावेरी, गोदावरी, भोगावती व पंचगंगा इत्यादी नद्यांवरील ब्रिटिशकालीन पूल निर्माण करण्यात वडार व इतर मजुरांचे श्रम दिसतात. मद्रास प्रांतात इ. स. १८६४-६५ या एका वर्षाच्या कालावधीत ३१ पूल बांधण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक वडार स्त्री, पुरुष व मुले यांचे श्रेय होते. ब्रिटिश भारतातील अनेक रस्ते, रेल्वेमार्ग, इमारती, धरणे व पाटबंधारे बांधण्यासाठी वडार मजूर हे प्रमुख स्त्रोत होते. १८५२ च्या बेल्लारी जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार मजुरांना इतर जिल्ह्यात श्रम करण्यासाठी पुरवण्यात येत होते. मुंबई व मद्रास प्रांताव्यतिरिक्त, संयुक्त, मध्य व बंगाल प्रांत आणि बर्मा (म्यानमार) इत्यादी ठिकाणीही रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी वडार मजुरांचा पुरवठा (Supply of Labour) करण्यात येत होता. रस्ते व पूल निर्माण करण्यासाठी अनेक वडार कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतरही होत असल्याचे तत्कालीन सरकारी अहवाल व पाश्चिमात्य अभ्यासकांचे वृत्तांत यावरुन लक्षात येते. विल्यम क्रुकच्या 'थिंग्ज इंडियन'नुसार ‘वडार हे रेल्वे मार्ग व कालव्यांचे काम करणारे मजुर आहेत' (William Crooke 1906: 179). इडगर थर्स्टन सांगतात‚ ‘वडार या देशातील मजूर आहेत’ (Thurston 1913: 200-201). मिलवर्डच्या मते, 'भारतात वडार लोक इमारत बांधकामासाठी दगड व वाळू बैलगाडीच्या साहाय्याने नेण्याचे व आणण्याचे काम करतात' (Milward 1948: 45). आर. ई. एंथोवेन म्हणतात, ‘The skill of vadar in earth work and masonry has led to a demand for their labour in all parts of India’ (Enthoven 1922: 139). (वडार मजुरांच्या उत्कृष्ट कामाच्या शैलीमुळे ब्रिटिश भारतात त्यांना खूप मागणी असल्याचे दिसून येते.) वडार हे शारीरिकदृष्ट्या मजबूत, प्रामाणिक, कमी मोबदल्यात खूप कठिण परिश्रम करत असल्याने  ब्रिटिश कंपनी व भांडवलदार वर्गाने त्यांच्या श्रमाचा वापर अनेक बांधकामात केला. आपण किती तास काम करतो व श्रमाचे मूल्य किती घ्यावे याबाबत वडार मजूर नेहमीच अज्ञानी राहिलेले दिसून येतात कारण त्यांच्यात शैक्षणिक ज्ञानाचा अभाव होता. कमी मूल्यात अतिशय कठिण परिश्रम करणारे वडार मजूर हे भांडवलदार व त्यांचे ठेकेदार यांच्या आर्थिक उत्पादनाचे मुख्य स्रोत राहिले. 

अठराव्या शतकात भारतात आलेला स्कॉटिश भूगोलवेत्ता फ्रांसिस बुकानन हॅमिल्टन (१७६२-१८२९) याने  भारतीय समाज व संस्कृतीचा अभ्यास केला आहे. मद्रास, म्हैसूर व मलाबार येथील वडार मजूर विविध कामे करत असल्याचे उल्लेख फ्रांसिसने 'A Journey from Madras through the Countries of Mysore, Canara and Malabar' या प्रवासवर्णनात केलेले आहेत. फ्रांसिस आपल्या प्रवासवर्णनात सांगतो, ‘The Woddas or Woddaru, they dig canals, wells and tanks, build dams and reservoirs, make road’ (Francis 1807: 310). फ्रांसिस बुकानन पुढे असेही सांगतात की, ‘वडारांच्या झोपड्या हे गावाबाहेर असत. मजुरी करण्यासाठी व कामाच्या शोधात ते सतत फिरत असतात’. एकंदरीत बिटिशपूर्व व ब्रिटिशकाळात वडार लोक गावाबाहेरच राहत असल्याचे दिसून येते. खेड्यात अथवा गावांमध्ये वडारांना प्रवेश नव्हता. गावातील प्रस्थापित, उच्च वर्गातील लोकांनी त्यांना गावगाड्यापासून नेहमीच वंचित ठेवलेले आहे; पण पारंपरिक व्यवसायामुळे वडारांचा गावाशी अंशतः संबंध येत राहिला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरदेखील अनेक वर्षे वडार समाज हा गावगाड्याबाहेरच राहत होते. ब्रिटिश भारतात एकीकडे वडारांची बहुसंख्य कुटुंबे बांधकाम व इतर मजुरी करत, शहरी जीवनात हळूहळू स्थिर होत शहरांच्या विकासात योगदान देत राहिली आणि अनेक कुटुंबे एका गावाहून दुसऱ्या गावात पारंपरिक व्यवसाय व उदरनिर्वाहासाठी सतत स्थलांतर करत गावाबाहेर वस्त्या करून आपले जीवन व्यतीत करत राहिली. दुसरीकडे १८७१ च्या गुन्हेगार जमाती कायद्याने बहुसंख्य वडार कुटुंबे ब्रिटिश वसाहतीमध्ये बंदिस्त झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही १९५२ व १९६० पर्यंत ती बंदिस्तच होती. महाराष्ट्रात १९६० नंतर भटक्या जाती व जमातींना ब्रिटिश वसाहतीमधून मुक्त केले गेले म्हणून सत्ताधीशांनी त्यांना 'विमुक्त जाती' अशी संज्ञा लावली. 

कोणत्याही आधुनिक तंत्राविना, अशिक्षित अशा वडार मजूर व कारागिरांनी पहार, सुतकी, घण, टिकाव, कुदळ, हातोडा, छिन्नी, पिचर, चिरणी, गुण्या (काटकोन), वळंबा व दोरी इत्यादी साधनांच्या साहाय्याने व आपल्या हस्तकौशल्याने आणि अनुभवाने तलाव, धरणे, बंधारे, रस्ते, रेल्वे मार्ग, पूल व इमारती निर्माण केली आहेत. वडार लोक अशिक्षित असतानाही त्यांनी केलेली विविध बांधकामे आणि त्यातील कौशल्यावरुन त्यांचे ज्ञान, कला व तंत्र किती प्रगल्भ होते हे दिसून येते. वडार कारागीर व मजूर यांच्यामध्ये असणारी कला ही केवळ पारंपरिक नसून ती त्यांच्यामध्ये असणारी आवड, निपुणता व कसब आहे. परकीय प्रवासी व अभ्यासक यांनी भारतात येऊन येथील समाज, संस्कृती, स्थापत्य व कारागीरांच्या उत्कृष्ट हस्तकौशल्याचे वर्णन केले आहे; पण भारतीय इतिहासकार व अभ्यासकांनी वडार मजूर आणि त्यांचे उत्कृष्ट हस्तकौशल्य व ज्ञानाकडे नित्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आजपर्यंत कारागीर व मजुरांचा परिपूर्ण असा इतिहास लिहिला गेला नाही ही वस्तुस्थिती आहे. भारतात मजूर व कारागीर करत असलेल्या उत्कृष्ट कामालाही कमी लेखण्यात येते याचे कारण म्हणजे आपल्या देशात मुलांना कधीही श्रमाकडे सन्मानाने पाहण्यास शिकवले जात नाही. भारतीय समाजात श्रमाच्याबाबत सन्मानाच्या भावनेचा अभाव आहे कारण जातीव्यवस्थेच्या ढाच्यामध्ये श्रमावर आधारित कोणत्याही गतिविधीला तुच्छ मानले जाते ही वस्तुस्थिती आहे.

डॉ. जगन्नाथ सावंत
human5580@gmail.com

(लेखक इस्लामपूर, जि. सांगली स्थित इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

संदर्भ -

  1. Buchanan, Francis. 1807. A Journey from Madras through the Countries of Mysore Canara and Malabar. Vol.1. London: the Asiatic Society.
  2. Enthoven, R. E. 1922. Tribes and Castes of Bombay, Vol. III. Bombay: Government Central Press.
  3. Gazetteer of the Bombay Presidency, 1885. Vol. XVIII, Part I. Poona: Government Central Press.
  4. Keer, Ian J. 1995. Building the Railways of the Raj 1850-1900. Delhi: Oxford University Press.
  5. Milward, M. 1948. Artist in Unknown India. London: T. Werner Lauric Ltd.
  6. Report of the Railway Committee. 1950. Madras: American Mission Press.
  7. Report of the Royal Commission on Labour in India. 1931. Calcutta: GOI.
  8. Thurston, Edgar. 1913. The Madras Presidency with Mysore Coorg and the Associated States. London: Cambridge University Press.
  9. Transactions of the Institution of Civil Engineers of Ireland. 1862. Vol. VII, Part I. Dublin: Majesty’s Stationery Office.
  10. William, Crook. 1906. Things India. London: Albemarle.
  11. सावंत, जगन्नाथ. २०२०. महाराष्ट्रातील वडार समाज: एक ऐतिहासिक अभ्यास. अप्रकाशित पीएचडी प्रबंध. पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.