बापू, तुम्ही ग्रेटच !

१२ फेब्रुवारी २०२६

बापू, तुम्ही ग्रेटच ! हा, चरखा आणि गांधीजींचा मुक्त संवादात्मक दिर्घ कविता संग्रह नुकताच ६ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशित झाला. ज्येष्ठ साहित्यिका व संवेदनशील कवयित्री माननीय नीलमताई माणगावे यांनी वास्तवदर्शी व खऱ्या खुऱ्या घडामोडींवर आधारलेला हा काव्यसंवाद अतिशय कल्पकतेने आणि सखोल अभ्यासपूर्ण मांडला आहे. या संवादातून सद्य परिस्थितीत, राजकारण, धर्मकारण, समाजकारण, जातीय दंगली, धार्मिक द्वेष यामुळे निर्माण झालेल्या अव्यवस्थेचा, अराजकतेचा आढावा त्यांनी घेतला आहे. खरंतर नागरिकांना भानावर आणण्याचे काम हा काव्यसंग्रह करतो असे म्हणायला हरकत नाही. लेखिका अत्यंत हुशार, बुद्धिमान, प्रगल्भ, प्रतिभासंपन्न आणि शहाणीव असणाऱ्या विवेकशील व्यक्ती आहेत. हे त्यांच्या अनेक पुस्तकांच्या बरोबरीनेच या नव्या पुस्तकाच्या मांडणीतूनही प्रकर्षाने प्रत्ययास येते. एखादी अवघड गोष्ट सुलभ करुन सर्वाना समजेल अशी कशी सांगायची यांचे गमक त्यांना अवगत आहे.

गांधीजी नेमके कसे होते? अहिंसा म्हणजे काय? गांधीजींचे सत्याचे प्रयोग काय होते? कस्तुरबा विषयी त्यांच्या मनात काय भावना होत्या? सध्याच्या देशाच्या परिस्थितीवर त्यांना काय म्हणायचे आहे? हे समजून घेण्यासाठी मोहनदास करमचंद गांधी या स्वातंत्र्य लढ्यातील खूप मोठे योगदान दिलेल्या फाटक्या माणसावरील हे पुस्तक या काळात येणे अत्यंत गरजेचे होते. लहानापासून थोरापर्यंत सर्वांना सहज समजेल असा संवाद स्वरुपातील दिर्घ काव्य वास्तवाचे, सावध व सतर्कतेचे भान देते.

सद्य परिस्थितील अनेक संदर्भ घेऊन त्यांनी त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गांधीजींच्या व्यक्तिगत जीवनाविषयी अनेक अफवे जनमानसात पसरले आहेत. त्यांच्या कर्तुत्वाचा इतिहास पुसण्याची चढाओढ लागली आहे. अशा परिस्थितीत गांधीजींच्या गुढ सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न निलम ताईंनी केला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. गांधी नसते तर, स्वातंत्र्य मिळाले नसते असे म्हणता येणार नाही पण अहिंसा आणि सत्याग्रह हे स्वातंत्र्य लढ्यातील धारदार शस्त्रे बनू शकतात हे जगाला समजले नसते. म्हणून गांधी समजून घेणे या अर्थाने खूप गरजेचे आहे. इंग्रजांनी मिठावर कर लादल्यावर, मिठालाच चळवळीत आणून दांडियात्रेत मिठाच्या सत्याग्रहासाठी अनेक स्त्री पुरुष एकत्र येऊन, अन्यायाच्या विरोधात चिमूटभर मीठ उचलून मिठाच्या सत्याग्रहाचा इतिहास रचला गेला. हे आपण कसे खोडून काढू शकतो. असे अनेक प्रसंग चरखा, काठी, चष्मा त्यांच्या प्रश्नातून गांधींच्या मनातील सामाजिक, न्यायिक, लोकहिताच्या दृष्टीने खरी उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. उलट सुलट मागेपुढे चरखा कसाही गरागरा फिरायला लागला त्याचा केवढा तरी आवाज झाला तसे गांधी म्हणाले, “एवढं चिडायला काय झालं ? शांत राहून आपण आपलं काम करत राहावं..!”

इथून सुरुवात होते आणि आपण पुढे वाचतच वाचत जातो. सलग वाचतो. पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. थोडेसे अल्लड, अवखळ, असमज असलेल्या मोहनदास पासून… स्वतःवर अनेक प्रयोग करत, रोज नव्याने स्वतःमध्ये बदल घडवत, त्यांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी पर्यंतचा प्रवास आपल्याला सहज या पुस्तकातून समजून घेता यावे म्हणून लेखिका एक एक प्रसंग अतिशय सुलभ पद्धतीने, वास्तवातील अनेक घटनांना सोबत घेऊन गुंफत जातात. गांधीजींचे वडील मुसलमान होते असे एक माथेफिरू म्हणतो असे चरखा गांधींना सांगतो. येथे माथेफिरू हा अत्यंत समर्पक शब्द वापरला गेला आहे. तो वाचकांच्या लक्षात येतो. हा संवाद त्यांनी अतिशय मिस्किल आणि विनोदी ढंगाने केला आहे वाचताना लेखिकेच्या कल्पक बुद्धिमत्तेची जाणीव होते.

 “अरे माझे वडील फक्त मुस्लिम नव्हते 
  ते मराठा होते ब्राह्मण होते 
 जैन लिंगायत दलीत ख्रिश्चनच काय 
  बौद्ध, शीख, पार्शी सुद्धा होते 
 सगळ्याच धर्माचे सत्व आणि तत्व होते..”
   “बापू चेष्टा नका करू 
 “चेष्टा नाही रे खरच सांगतोय.” गांधी म्हणाले, 
 “प्रत्येक धर्मात जे जे चांगलं 
 ते घेण्याची दृष्टी मला माझ्या वडिलांनी दिली 
 आता मला सांग 
 ते सगळ्या धर्माचे होते की नाही ?
 मग त्यांना फक्त मुस्लिम म्हणणं 
  त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं नाही का ?

मणिपूरच्या ज्वलंत प्रश्नावर बोलताना गांधी म्हणतात, आजही स्वतंत्र भारतात जाती धर्माचं राजकारण खेळलं जातंय मणिपूर मध्ये तेच तर चाललंय दंगल जाळपोळ मारामारी स्त्रियांची नग्न धिंड

शाळेत स्वातंत्र्य समता बंधुता शिकवायला हवी. हे सांगताना, मुस्लिम मुलाला इतर जातीच्या मुलाकडून मारायला लावलं जातं. ही हल्ली घडलेली घटना लेखिकेने अतिशय चाणाक्षपणे नमुद केली आहे.

   मुस्लिम मुलाला इतर जातीच्या मुलाकडून 
   मारायला लावलं जातं..
    नाही…रे ss नाही सहन होत 
    मला जायला हवं 
    हे सगळ थांबवायला हवं   

मणिपूरची घटना थांबवायला हवी तिथल्या जनतेच्या/ स्त्रियांच्या पाठीशी राहून त्यांना निर्भय बनवायला हवं असं चरखा आणि गांधींच्या मध्ये संवाद होतो. बापू मणिपूर शांतता प्रस्थापित करण्यासाठी जाऊ इच्छितात. पण ते तर जिवंत नाहीत. तेव्हा चरखा विचारतो.

  पण बापू…चरका म्हणाला,
  “ तुम्ही तर हयात नाही आहात 
    कसं काय करणार हे !
“अरे मी हयात नसताना सुद्धा 
 पुन्हा पुन्हा माझा खून केला जातो
  तर मी लढू का शकणार नाही ?
माझी अहिंसा…माझी समानता सोबत घेऊन 
संविधानाचे बोट धरून 
   माझे लोक आहेत ना ?
   त्यांच्या पाठीशी राहून त्यांना 
     प्रोत्साहन देईन 
  शिवाय दंगल खोरांच्या मनात ही विचार भरेन, 
   की बाबांनो, 
   प्रश्न हिंसेने नाही. अहिंसेने सुटतात.
  शांततेच्या…चर्चेच्या मार्गाने उत्तर शोधता येतात. 
    स्वतःला बदला 
   सारी तुमची भावंड आहेत….

मणिपूरला जाऊन आला का असे चरखा गांधीना विचारतो. तेव्हा ते हतबलतेने म्हणतात…

    एकमेकांचे रक्त शोषताहेत 
    कोण कोणाचे ऐकतच नाही 
    आणि देशाचा कारभारी 
    काही बोलायलाच तयार नाही.

लेखिकेने देशाचा कारभारी हा शब्द अतिशय समर्पक पद्धतीने वापरला आहे.

कस्तुरबा गांधी बद्दल बोलताना ते इमोशनल/ भावनिक होतात. लग्नाविषयी त्यांच्या कल्पना किती वेगळ्या होत्या हे सांगून कस्तुरबा वर कळत नकळत खूप अन्याय केल्याचे मान्य करतात. मोहनदासांचा महात्मा बनणं ही सोपी गोष्ट नव्हती. कष्ट, त्याग, चिकाटी, संयमाची साथ संगत बापूंनी कधी सोडली नव्हती. गांधी जयंतीला हातात झाडू घेऊन फोटोशूट करून घेऊन मीडियामध्ये प्रसिद्ध करणाऱ्यांना ते कसे समजणार हे भयानक सत्य लेखिका या पुस्तकातून सांगू पाहाते. बापूंचं ओझं कोणालाही पेलवत नाही. बापूंना सोबत घेतलं तरी अडचण आणि बापूंना सोडून दिलं तरी अडचण, अशी परिस्थिती नेहमीच असते. म्हणजेच बापूंच्या विचाराने चालावं म्हटलं तरी प्रॉब्लेम निर्माण होतात आणि बापूंचा विचार सोडून देऊन चालायचं म्हटलं तरीही प्रॉब्लेम येतात. बापू बंडखोर होते. निर्भय आणि धाडसी होते. सर्व धर्माची माणसं एकत्र यावीत यासाठी आपल्या आश्रमात प्रत्येक धर्माची प्रार्थना घेतली जात होती. त्यांचे वर्णन करताना माणगावे मॅडम लिहितात,

  सगळ्यांना प्रश्न पडतो 
 बकरीचा दूध पिणाऱ्या 

त्या हडकुळ्या माणसा जवळ एवढी ताकद आली कुठून जी आज ही मानगुटीवर बसली आहे विरोधकांच्या नाकावर टिच्चून ! हडकुळ्या म्हाताऱ्याचं ओझं पेलवत नाही आणि उतरवताही येत नाही किती वेळा मारलं तरी म्हातारा मरत ही नाही याला मारायचं कसं ? आणि जगवायचं तरी किती काळ? अवघ्या जीन्समध्येच रुतून बसलाय फाळ

आफ्रिकेतला प्रसंग, तुरुंगवास, शिक्षा, उपोषण, राग आला की मौन धरण, अपराधीपणा, पश्चाताप आत्मपरिक्षा… परिवर्तनशीलता.. त्यांच्या वाट्याला आलेले मोहाचे क्षण, स्त्रियांबद्दलचे विचार, जालियनवाला बाग हत्याकांड, त्यांनी स्वतःवर केलेले अनेक प्रयोग. त्यांच्यावर झालेल्या अनेक टीका, देशाची फाळणी, ते 55 कोटी रुपये. अशा अनेक गोष्टींवरील चर्चा संवाद स्वरूपात या पुस्तकात वाचायला मिळतील.

देशाच्या पी एम विषयी सांगताना गांधी म्हणतात, हिंसेच्या गाळात गरिबांचा पाय रुतत चाललाय आणि कारभारी नुसते भाषणे देत सुटलाय अशांनी जनतेचा काय भलं होणार ? हे सहन होत नाही.

जातीअंत, खेडी सुधारणा, शहरांना बकाल होण्यापासून वाचवणे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ह्या त्यांच्या इच्छा होत्या. देशाला त्याची गरज होती. जे हवे ते सगळे करू शकले नाहीत. आणि आता काही करता येत नाही. ही खंत चरक्या जवळ बसून गांधी बोलून दाखवतात. पीएमना गांधी नको पण चरक्या सोबत फोटो काढायचा होता हे योग्य पद्धतीने नमूद केले आहे. गांधींना खूप वेळा मारण्याचा प्रयत्न झाला. हे सांगताना चरखा म्हणतो,

  देशाला अजून स्वातंत्र्य मिळाले नव्हते 
 55 कोटी देण्याचा तर प्रश्नच नव्हता 
  तेव्हापासून तुम्हाला संपवण्याचा 
  चार वेळा प्रयत्न केला होता 
  याचा अर्थ काय..?

शेवटी स्वातंत्र्य मिळाले. अनेक तडजोडीसह जीनाला पाकिस्तान स्वतंत्र हवे होते म्हणून फाळणी झाली. एकीकडे स्वतंत्र भारताचे ध्वजारोहण होत होते. तर दुसरीकडे हा हाडकूळा अशक्त वाटणारा माणूस हिंदू मुस्लिम दंगली शांत करण्याचे अनेक प्रयत्न करत होता. जीवाच्या आकांताने हा माणूस धावत होता. गांधीजींचा यात काय स्वार्थ होता? एवढं करुनही, “माझं महात्मा पण बिन कामाचं झालंय रे.. काय करु? असं म्हणणारा अफलातून माणूस आपल्याला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहत नाही.

अचानक पहाटे झालेला महाराष्ट्रातला शपथविधी, देशाची चाललेली आधोगती अधोरेखित करणारा आहे. हा उल्लेख अतिशय सुज्ञपणे केला आहे आणि देश/ पुरोगामी महाराष्ट्र लोभी, तत्वहीन राज्यकर्त्यांमुळे कसा रसातळाला जात आहे याचे उदाहरण दिले आहे.

तसे पाहायला गेले तर गांधीजींचे सगळेच सत्याचे प्रयोग आपल्याला पचण्यासारखे नाहीत. त्यासाठी निर्भिड, निस्पृह, नितळ, चौकटी बाहेर जाऊन मर्यादा ओलांडून विचार करावा लागेल. त्याबद्दल ही लेखिकेने अतिशय स्पष्टतेने लेखन केले आहे. त्यामुळे जेवढे पचतील तेवढे तरी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करु.

  देशाची अवस्था सांगताना चरखा म्हणतो..
   “बापू तुमच्याविना 
    पिठाचं पोत फाटल्यासारखी 
  देशाची अवस्था होईल 
  धूर्त लांडग्यांचे कळपच्या कळप
    पोत्यावर तुटून पडतील 
   पोते आपलेच आहे… या हक्कासाठी
    आपापसात भांडत राहतील
    आणि
    पोत्याचे तुकडे तुकडे होतील 
    ते परवडणारे नाही
     देशाला पुन्हा गुलामगिरीत ढकलायचे नाही 
     देशच नव्हे, तर बापू 
    जग.. जग वाचण्यासाठी 
    तुम्ही हवे आहात
     सत्य अहिंसा संयम शांतीसारखी 
      तुमची तत्त्वं हवी आहेत 
      ऐकताय ना..?

बापू बद्दल कवयित्री म्हणतात, बापू म्हणजे डोळे उघडे ठेवून जाणीवपूर्वक आचरण करणारा विचारी महात्मा..

देशातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा संदर्भ घेऊन अतिशय चाणाक्ष पद्धतीने मांडणी करुन महात्मा गांधींच्या जीवन कार्याचे महात्म्य देशासाठी आणि व्यक्तिगत जीवन जगण्यासाठी कसे उपयोगी आहे हे सांगण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न या पुस्तकात केला आहे.. म्हणूनच बापूंना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पुस्तक अतिशय वाचनिय आहे. जरूर वाचा समजून घ्या. अनेक मोठ्या माणसातले चांगले गुण घेऊन आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकतो. त्यामुळे इतिहासातल्या आणि स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांची पुस्तक वाचून आणि त्यांनी अनावधानाने केलेल्या चुकांमधून आपण सुधारणा करुन देशाची व देशातील प्रत्येक माणसाची प्रगती साधणं ही काळाची गरज आहे.

शेवटी गांधीजी चरख्याला उद्देशून म्हणतात तेवढं लक्षात घेऊया..

 ‘अरे भोळ्या सांबा..” गांधी म्हणाले,
 “ते मुद्दाम तुला उलट्या दिशेने फिरवत होते 
 कारण त्यांना चक्र उलटेच फिरवायचे आहे 
 देश उलट्या दिशेला वळवायचा आहे..”

लोकहो, बाकी सारं तुम्ही जाणताच.. अधिक जाणून घेण्यासाठी हे काव्यात्मक पुस्तक जरूर वाचा. तुम्ही सुजाण नागरिक आहात. गांधीजींच्यावर आजपर्यंत एक लाखाहून अधिक पुस्तकं लिहिली गेली आहेत. पण तरीही या येऊ घातलेल्या काळात गांधीजींच्या संदर्भातील, या दिर्घ संवादी काव्यसंग्रहाचं मोल मोठं आहे. मा.महावीर जोंधळे सरांनी या दीर्घकाव्याला अतिशय समर्पक, सविस्तर प्रस्तावना दिली आहे. ‘बापू, तुम्ही ग्रेटच !’ तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. जरुर वाचा.

पुस्तकाचे नाव- बापू तुम्ही ग्रेटच ! (चरखा आणि गांधीजींचा मुक्त संवाद) लेखिका/ कवयित्री - निलम माणगावे प्रकाशन- शब्द शिवार मूल्य- १५० रु.