बदल हवाच पण दिशा कोणती?

‘द चेंज : विमेन, एजिंग अँड द मेनोपॉज’ हे जर्मेन ग्रिअर या लेखिकेचे पुस्तक पन्नाशीच्या उंबरठ्यावरील स्त्रियांना पुन्हा एकदा नव्याने आपल्या आयुष्याचा विचार करायला भाग पाडते. हे पुस्तक १९९१ मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे पण आज २०२० मध्येही त्याचा विषय आणि आशय महत्त्वाचा आहे. मेनोपॉज, रजोनिवृत्ती हा या पुस्तकाचा विषय असला तरी या विषयाच्या निमित्ताने जर्मेन एकूणच बाईचं जगणं, तिचं दिसणं, तिचं असणं आणि तिचं असून नसणं या सगळ्याचा एक विस्तृत धांडोळा घेतं. पुरूषप्रधान वर्चस्वाखालील वैद्यकीय क्षेत्र, साहित्य, धर्म या सगळ्याचा परामर्श घेत ती स्त्रीकेंद्री जगण्याचं एक तत्त्वज्ञान या पुस्तकात उभं करू पाहते. इथवर जर्मेनशी सहमती आहेच पण अखेरीस ती आध्यात्मिकतेची वाट दाखवते. इथे एक निसरडा रस्ता तयार होतो. स्त्रीवादी विचारविश्वातील हे एक महत्त्वाच पुस्तक असल्याने जर्मेनच्या मांडणीतील ज्या गोष्टी भावल्या त्यांची तसेच काही न पटलेल्या गोष्टींची नोंद घेत आहेत लेखक-अभ्यासक संध्या नरे-पवार.  

‘आपले उंच टाचांचे बूट जर तिने कधीच काढले नाहीत पायातून, तर कसं कळेल तिला की, ती किती वेगाने धावू शकते आणि किती दूरपर्यंत चालू शकते...’

‘पुरूषांच्या द्दष्टीपासून झालेली सुटका मला अजिबात उदास करत नाही, उलट माझ्यासाठी हे नवं स्वातंत्र्य आहे. काय घालायचं, कसं तयार व्हायचं याचा सतत विचार करायला न लागणं हे किती मुक्तीदायी आहे...’

‘स्त्रीने सतत आकर्षक दिसावं ही पुरुषप्रधान समाजाची अपेक्षा अनेक विसंगतींनी भरलेली आहे. स्त्रीच्या मनावर आघात करणारी आहे. स्त्री स्वतःला आकर्षक बनवू शकत नाही, ती केवळ आकर्षक वाटू शकते. जोपर्यंत कोणी तिच्याकडे आकर्षित झालेले आहे तोपर्यंत (त्या नजरेसाठी) ती आकर्षक राहते...’

‘इतरांना नकोसं असणं यामध्येही एक स्वातंत्र्य आहेच की...’

पुस्तकात पानोपानी विखुरलेल्या अशा अनेक विधानांमधून सौंदर्याच्या बाजारात, आकर्षकतेच्या सापळ्यात आणि मुख्य म्हणजे पुरूषप्रधान सामाजिकीकरणाच्या रचनेत अडकलेल्या स्त्रियांना जर्मेन जागं करत आहे. एखाद्या पुरूषाची जोडीदार म्हणून जगण्यातच आपल्या आयुष्याचं श्रेयस आणि प्रेयस शोधणाऱ्या स्त्रियांना जर्मेन त्यांच्या एकल अस्तित्वाची जाणीव करुन देत आहे. पाश्चात्य जगातील पुरूषप्रधान व्यवस्थेत स्त्री-पुरूषाच्या जोडीला सर्वाधिक महत्त्व आहे. जोडीच्या या जगात जोडीतल्या स्त्रीने कायम आकर्षक  असावं, तरुण असावं, आपल्या पुरूषाचं मन रिझवावं, अशी अपेक्षा असते. जोडीदारविहीन स्त्रीकडे कुचेष्टेने पाहिलं जातं. तिच्या बाह्य दिसण्याला हिणवलं जातं. स्त्रीही मग जोडीदार हवा, असलेला जोडीदार कायम राहायला हवा, जुना जोडीदार गेला तर नवा जोडीदार मिळवायला हवा, या अट्टाहासात इतर स्त्रियांपेक्षा अधिक आकर्षक दिसण्याच्या स्पर्धेत उतरते आणि कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या ब्यूटी इंडस्ट्रीच्या जाळ्यात गुरफटते. विविध प्रसाधनं, विविध उपचार...पण यातली कोणतीच गोष्ट तिला खऱ्या अर्थाने सुंदर बनवत नसते, तिच्या जोडीदाराला तिच्या प्रेमात बांधून ठेवत नसते. यात ती अनेकदा निराश होते, तिचा आत्मविश्वास उणावतो पण तरी हाती असलेल्या तारूण्याच्या बळावर ती स्पर्धेत कायम असते. आपण आजही पुरूषाची नजर खेचून घेऊ शकतो, ही बाब तिच्यासाठी सुखावणारी असते. तिच्यावर असणारी सुंदर दिसण्याची सक्ती या काळात तिला जाणवत नाही.

पण अपरिहार्यपणे आयुष्यात पन्नाशीचा टप्पा येतो. शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होऊ लागतात. वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षांपासून नियमितपणे येणारी मासिक पाळी अनियमित होत अखेरीस थांबते. त्वचेचा पोत बदलतो. ती रूक्ष होऊ लागते. शरीराची बांधीव गोलाई सैल होऊ लागते. अशातच पत्नी म्हणून, आई म्हणून, गृहिणी म्हणून वर्षानुवर्ष केलेली उस्तवार बाईच्या चेहऱ्यावर दिसू लागते, केसांमधून बोलू लागते. बाईचा चेहरा ती बाई कोणत्या प्रकारचे आयुष्य जगली आहे, हे सांगत असतो. वेगवेगळ्या व्याधी मागे लागतात, वजनवाढ होते. याच काळात मुलं मोठी होऊन आपापल्या आयुष्याच्या शोधात बाहेर पडलेली असतात किंवा घरातच असली तरी त्यांना पूर्वीसारखी आईची गरज राहिलेली नसते. नवऱ्याला पन्नाशीची बायको आकर्षक वाटत नाही, तिच्याशी पूर्वीसारखे शरीरसंबंध ठेवण्याची निकड त्याला वाटत नाही. तो एक तर त्याच्या फँटसीमध्ये रमलेला असतो किंवा बाहेर त्याचं प्रत्यक्षातलं किंवा व्हर्च्युअल किंवा दोन्हीचे मिश्रण असलेलं असं अफेअर सुरू असतं. याने तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते. ती स्वतः नोकरी करणारी असली तरी तिथेही तिच्यापेक्षा तरूण असलेल्या स्त्रियांना लवकर बढती मिळताना, त्यांना झुकतं माप मिळताना तिला पाहावं लागतं. स्त्रीच्या शरीरात होणारे बदल आणि तिच्या आयुष्यात होणारे बदल या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू असतात.

पन्नाशीच्या टप्प्यावर स्त्रीच्या शरीर-मनावर एकाचवेळी अनेक आघात होत असतात. यात ती अधिकच उदास आणि भकास होत जाते. कधी ती चिडचिडी होते, एखाद्या क्षुल्लक कारणावरुनही तिच्या रागाचा स्फोट होतो. आपल्याला नेमकं काय होतंय हे अनेकदा तिचं तिलाही कळत नाही. मात्र आयुष्याने आपली वंचना केली, ही भावना बळावते आणि मग त्या स्त्रीचं रूपांतर एखाद्या सतत कटकट करणाऱ्या त्रासिक व्यक्तीमध्ये होते. स्त्रीच्या या अवस्थेमागची मूळ कारणं लक्षात न घेता तिलाच यासाठी दोषी ठरवलं जातं. ही सारी तिचीच चूक आहे, तिलाच परिस्थितीशी जुळवून घेता येत नाही, असा आरोप केला जातो.

या अशा स्थितीत आधी ब्यूटी इंडस्ट्रीच्या जाळ्यात सापडलेली ती आता वैद्यकीय क्षेत्राच्या तावडीत सापडते. शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवर एकाकी असणारी, आपल्याला काय त्रास होतोय, हे नेमक्या शब्दांत सांगू न शकणारी स्त्री वैद्यकीय क्षेत्रासमोर उभी असते. रजोनिवृत्तीमुळे आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे शरीराची गोलाई सैलावतेय, आपला जोडीदार आता आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, आपला लैंगिक कोंडमारा होतोय, ही बाब ती डॉक्टरांना सांगू शकत नाही. आयुष्यभर आपण जे घरकाम केलं ते करायचा आता आपल्याला अतीव कंटाळा आलेला आहे, हेही ती सांगू शकत नाही. मला प्रेम हवं आहे, हे शब्द ती उच्चारू शकत नाही. पण या सगळ्या ताणामुळे तिची झोप उडालेली असते किंवा डोकेदुखी त्रास देत असते. त्यामुळे न येणारी झोप किंवा सततची डोकेदुखी हा त्रास डॉक्टरांसमोर जातो. डॉक्टर त्यावर सायकोसोमॅटिक असा शिक्का मारतात. एकूण समाजव्यवस्थेत दुय्यम स्थान असलेली, जिच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही, अशी स्त्री आपली रजोनिवृत्ती घेऊन  वैद्यकीय क्षेत्रासमोर उभी असते. मुलीची मासिक पाळी, स्त्रीचं गर्भारपण, बाळंतपण या सगळ्याला मानवी प्रजोत्पादनात महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे सामाजिकद्दष्ट्याही या विशेष बाबी आहेत. रजोनिवृत्ती म्हणजे या सगळ्याला मिळालेला पूर्णविराम. त्यामुळे सामाजिक द्दष्ट्याही रजोनिवृत्तीला महत्त्व नाही. किंबहुना स्त्रीच्या स्त्रीत्वाचा शेवट याद्दष्टीनेच रजोनिवृत्तीकडे पाहिलं जातं. या रजोनिवृत्तीला स्त्रीच्या इतर शारीरिक, भावनिक समस्याही जोडल्या जातात. या अशा स्थितीत वैद्यकीय क्षेत्राने सुरूवातीपासून रजोनिवृत्तीकडे एक आजार म्हणूनच पाहिलं आहे आणि उपचाराच्या नावाने स्त्रीच्या शरीरावर वेगवेगळे प्रयोग केले आहेत.

स्त्रीच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेचं कसं वैद्यकीकरण झालं आहे, उपचारांच्या नावाखाली स्त्रीचं शरीर कसं वेठीला धरलं जात आहे, ज्यांनी कधीही रजोनिवृत्तीचा अनुभव घेतला नाही अशा पुरूष डॉक्टरांनी रजोनिवृत्तीवर आपलं करिअर कसं उभारलं याचा विस्तृत आढावा जर्मेनने घेतला आहे. मेडिकल इग्नोरन्स, द ट्रीटमेंटस् - अ‍ॅलोपॅथिक, द ट्रीटमेंट्स - ट्रेडिशनल, द ट्रीटमेंट्स - अल्टरनेटिव्ह या प्रकरणांमधून स्त्रीच्या रजोनिवृत्तीभोवती उभी राहिलेली विविध उपचारांची दुनिया त्या स्पष्ट करतात. मेनोपॉज क्लिनिक, मॅच्युअर विमेन क्लिनिक, मेनोपॉज मॅनेजमेंट, इस्ट्रोजन रिप्लेसमेंट क्लिनिक, हार्मोनल रिप्लेसमेंट ट्रीटमेंट अशी वेगवेगळ्या नावांची क्लिनिक्स विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून पाश्चात्य जगात सुरू झाली. जर्मेन सांगते, या सगळ्या कंपन्या पुरूषांनी चालवलेल्या होत्या. यात स्त्रीच्या शरीरावर वेगवेगळे प्रयोग केले गेले. १९०५ मध्ये झालेल्या एका प्रयोगात क्ष किरणांच्या माऱ्याने मादी सशाच्या ओव्हरीज् आकुंचन पावतात, असं दिसून आलं. लगेचच मेनोपॉजसाठी क्लिनिक उघडून बसलेल्या डॉक्टर मंडळींनी रजोनिवृत्तीच्या काळात अनियमित झालेली स्त्रीची मासिक पाळी लवकर पूर्णपणे थांबावी यासाठी स्त्रीच्या बीजांडांवर क्ष किरणांचा मारा करायला सुरूवात केली. हा उपचार महागडा होता, पण अनेक त्रस्त महिलांनी तो करून घेतला. काही डॉक्टरांनी स्त्रीच्या योनीमार्गात रेडियम रॉड घालून कॅस्ट्रॅशनचा, खच्चीकरणाचा मार्ग स्वीकारला. याचे अनेक दुष्परिणाम झाले असणार, इतर अवयवांनाही इजा पोहोचली असणार. काहीजणींचा यात कालांतराने मृत्यूही झाला असेल. जर्मेनच्याच शब्दात सांगायचं तर किती आणि काय उद्ध्वस्त झालं हे आपल्याला कधीच कळणार नाही. तरीही वेगवेगळे प्रयोग होत मेनोपॉज इंडस्ट्री सुरूच राहिली.

१९७४ मध्ये इंटरनॅशनल मेनोपॉज सोसायटीची स्थापना झाली. नंतरच्या काळात ‘हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी’ अधिक लोकप्रिय झाली. या काळात स्त्रिया नेमक्या  कोणत्या तक्रारी घेऊन क्लिनिक्समध्ये जातात, याचंही वर्गीकरण जर्मेनने केलं आहे. हॉट फ्लशेस – अचानक अंगातून गरम वाफा येणं, डोकेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी, स्तनांमध्ये वेदना, वजनवाढ, पोटफुगी, छातीत धडधडणं, संवेदनशील त्वचा, विलक्षण थकवा, लघवीला अधिक होणं, रक्तस्त्राव अधिक होणं, अचानक रडू येणं अशा अनेक त्रासांनी स्त्रिया या काळात त्रस्त असतात. यातील काही लक्षणं शारीरिक असतात, काही शारीरिक-मानसिक असतात तर काही भावनिक असतात. या सगळ्या त्रासांना तोंड देण्याची प्रत्येक स्त्रीची क्षमता वेगवेगळी असते. जर्मेन इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडते. तो असा की, एखादी पन्नाशीची स्त्री चाळिशीच्या स्त्रीपेक्षा, जिचं आरोग्य चांगलं आहे, एखाद्या आधीच आजारी असलेल्या स्त्रीपेक्षा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याबाबत समाधानी, आनंदी असलेली स्त्री आपल्या आयुष्याबाबत असमाधानी, दुःखी असणाऱ्या स्त्रीपेक्षा या त्रासांना अधिक चांगलं तोंड देऊ शकते. म्हणजे शरीरांतर्गत होणाऱ्या बदलांमुळे काही त्रास होत असतात पण याच काळात स्त्रियांवर वेगवेगळ्या नात्यांमधून इतरही अनेक आघात होत असतात, फसवणुकीचं, वंचनेचं दुःख अअसतं. शिवाय रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रीच्या स्त्रीत्वाची समाप्ती हा सामाजिक द्दष्टीकोन स्त्रीची अस्वस्थता अधिकच वाढवतो. मनाच्या या अशा विषण्ण अवस्थेत रजोनिवृत्तीचे शारीरिक-मानसिक त्रास स्त्रीसाठी अधिकच त्रासदायक ठरतात. याच काळात स्त्रीचा जोडीदार किंवा तिच्याच वयाचा पुरूष त्याच्यापेक्षा अधिक तरूण मुलींशी फ्लर्ट करत असतो, नातेसंबंध जोडत असतो. पन्नाशीच्या स्त्रीसाठी नवीन नातेसंबंधाच्या शक्यता अधिकाधिक कमी होत जातात. म्हणजे याच काळात असलेला जोडीदार टिकण्याच्या आणि नवीन जोडीदार मिळण्याच्या - दोन्ही शक्यता धुसर होत जातात आणि आपल्या रजोनिवृत्तीसमोर स्त्री एकाकीपणे उभी असते. मिझरी आणि ग्रीफ या प्रकरणांमधून जर्मेन पन्नाशीच्या स्त्रीचं हे एकाकीपण मांडते. त्यासाठी साहित्यातील विविध कलाकृतींचा, इतिहासाचा धांडोळा घेते.

इथून पुढे जर्मेन आपल्या मुख्य विषयाकडे वळते. रजोनिवृत्ती हा आजार नाही तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे सांगत असतानाच हा काळ स्त्रियांसाठी ‘स्टॉक टेकिंग’चा म्हणजे आजवरच्या आयुष्यातील भल्याबुऱ्या बाबींचा मागोवा घेण्याचा आणि त्यानुसार आपल्या जगण्यात मुळापासून बदल करण्याचा आहे, सामाजिक मान्यतांनुसार जगलेल्या आजवरच्या आयुष्याला नकार देत स्वतःच्या ‘स्व’ला नवा आकार देण्याचा आहे, हे जर्मेन वेगवेगळ्या उदाहरणांतून अधोरेखित करत जाते. एम्मा ड्रेकला उद्धृत करत ती सांगते, या काळात स्त्रियांनी आपल्या घरापासून अधिकाधिक वेळा दूर जावं, आपल्या आजवरच्या आयुष्याबाबत चिंतन करावं, दाबून ठेवलेल्या दुःखांचा शोक करावा आणि त्यांना हळुवारपणे जाऊ द्यावं. इथे ती एक महत्त्वाचा सल्ला देते. डॉक्टरांचे कुठलंही प्रिस्क्रिप्शन रिकाम्या, पोकळ बनलेल्या आयुष्याला जगण्यायोग्य बनवू शकत नाही. त्यासाठी स्त्रीला स्वतःलाच प्रयत्न करायला हवेत. आणि असे प्रयत्न करताना आधी पुरूषप्रधान समाजरचनेने स्त्रीच्या आयुष्याचं नेमकं काय करुन ठेवलं आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

जर्मेन सांगते, पुरूषप्रधान, पितृवंशक समाजरचनेने वयोवृद्ध स्त्रीचं शहाणपण नाकारलं. तिच्या ज्ञानाचा अनादर करत तिला एका थेरडीच्या, त्रासदायक म्हातारीच्या रूपात समाजासमोर उभं केलं. आधुनिक पुरूषप्रधानतेने यात भरच घातली. मुलीचं गरोदरपण, बाळंतपण, नवजात बालकाचं संगोपन यातला वयोवृद्ध स्त्रियांचा सहभाग नाकारत या सगळ्यावर वैद्यकीय विश्वाने कब्जा केला. नातवंडांना गोष्टी सांगणारी आजी, लोकगीतं-लोककथा रचणारी स्त्री या सगळ्या आधुनिक काळात हरवून गेल्या. मातेची सत्ता नष्ट करण्यासाठी पाश्चात्य जगाने काही शतकं जी दीर्घ मोहीम चालवली त्याचा परिणाम म्हणजे आजच्या प्रौढ स्त्रीची दयनीय, एकाकी अवस्था.

पुरूषप्रधानतेने मुलींच्या अवखळ, नखरेल वागण्यालाच स्त्रीत्व मानलं आणि आपण साऱ्याजणीही बाईपण म्हणजे काय, हेच विसरून गेलो, असं जेव्हा जर्मेन सांगते तेव्हा ती बायांना हलवून जागं करत असते. खरं बाईपण विसरलेल्या स्त्रियांसाठी ती 'फेमिनाईन व्हिक्टिम' (स्त्रीत्वाच्या बळी) हा शब्द वापरते. फेमिनाईन व्हिक्टिम ते फीमेल हीरो हा प्रवास जर स्त्रीला करायचा असेल तर तिला आपलं स्वभान जागं करायला हवं. आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी स्वतःला आणायला हवं. आपल्या लैंगिक आणि घरगुती सेवांमधून स्वतःची सुटका करून घ्यायला हवी, आयुष्याची गती थोडी कमी करायला हवी. आपल्या भूतकाळापेक्षा, त्यातील व्यथा-वेदनांपेक्षा आपल्या वर्तमानावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवं. पुरूषप्रधानतेने वेगवेगळ्या नात्यातल्या, वयोगटातल्या स्त्रियांना प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकींसमोर उभं केलं आहे. हे लक्षात घेऊन स्त्रियांनी स्त्रियांशी अधिकाधिक मैत्री करायला हवी. मैत्रिणींसोबत अधिक वेळ घालवायला हवा. हे सांगताना जर्मेन म्हणते, पन्नाशीच्या स्त्रियांसाठी स्वातंत्र्याबरोबरच मैत्री ही बाबही अतिशय महत्त्वाची आहे. खोलवरचा भगिनीभाव, त्यातील जिव्हाळा हा दीर्घ काळ टिकणारा असतो.

थोडक्यात, पुरूषप्रधानतेने लादलेले मादीपण नाकारून स्त्रियांनी माणूसपणाच्या वाटेकडे जावं, आपल्या स्त्रीत्वाला नवा अर्थ द्यावा, असं जर्मेन सांगते. स्त्रीत्वाचा नवा अर्थ शोधताना ती स्त्रियांचा, मातृसत्तेचा इतिहास धुंडाळते आणि 'विच'चा, चेटकिणींचा वारसा स्त्रियांनी आता अभिमानाने मिरवायला हवा, असं सांगते. ‘द ओल्ड विच’ हे स्वतंत्र प्रकरणच ती लिहिते. एके काळी, लेखनाचाही शोध लागण्याच्या आधी टोळीचं धुरिणत्व टोळीतल्या वयोवृद्ध स्त्रीकडे असे, टोळीतले महत्त्वाचे निर्णय ती घेत असे. ती देवतेची पुजारिण होती, 'विच' होती, तिच्याकडे वनौषधींचं ज्ञान होतं. त्याआधारे ती विविध जादू करत होती. पण या 'विच'ला पुरूषप्रधान व्यवस्थेने हिंसक ठरवलं, तिच्या स्त्रीसत्तेचं गुन्हेगारीकरण केलं. विच हंटिंग आणि विच बर्निंगचा एक इतिहासच मध्ययुगीन काळाने पाहिला. या विच हंटिंगला नकार देत स्त्रियांनी पुन्हा एकदा आपण 'विच' आहोत हे सांगावं, हे जर्मेन म्हणते तेव्हा ती स्त्रियांनी आपल्या आयुष्याचं, जगण्याचं धुरिणत्व स्वतःकडे घ्यावं असं सांगत असते. प्राचीन काळातल्या विचप्रमाणेच ती स्त्री संतांचाही दाखला देते. विच आणि स्त्री संत या दोघींनाही मातृस्थानी असणारी 'सिबिल' ही देवता म्हणजे वयोवृद्ध स्त्रीची सकारात्मक प्रतिमा आहे. सुंदर आणि शहाण्या प्रौढ स्त्रीची ही प्रतिमा आपण स्वीकारली पाहिजे, असं जर्मेन सांगते.

‘द ओल्ड विच’ या प्रकरणाला जोडूनच जर्मेन शेवटचं ‘सीरीनिटी अ‍ॅंड पॉवर’ हे प्रकरण लिहिते. तिच्या एकूण मांडणीचा गाभा या प्रकरणात आला आहे. प्रगाढ शांतता आणि सामर्थ्य यांच्यासोबतीनेच पन्नाशीच्या स्त्रीने पुढची वाटचाल करायची हे ती या प्रकरणात अधोरेखित करते. आयुष्याचे सगळे चढउतार येऊन गेल्यावर एका नितळ शांततेची स्त्रियांना गरज आहे. त्यासाठी प्रयत्नपूर्वक स्वतःतल्या सगळ्या उद्रेकांचं शमन करणं आवश्यक आहे, गर्दी-घोळक्यापेक्षा एकांतामध्ये रमायला शिकणं गरजेचं आहे. वेदनेचाही शांतपणे स्वीकार करता यायला हवा. इथे जर्मेन ‘आर्ट ऑफ लूझिंग’विषयी, गमावण्याच्या-हरवण्याच्या कलेविषयी बोलते. आपल्याला सतत काही ना काही गमावण्याची, हरवण्याची भीती असते. पण कदाचित जे काही गमवायचं आहे ते आपण आधीच गमावलेलं आहे आणि तरीही आपण अजून तगून आहोत. त्यामुळेच आयुष्याच्या या टप्प्यावर आता आपण निवांत व्हावं आणि ज्या गोष्टी बोटांमधून निसटून जाणार आहेत त्यांना जाऊ द्यावं, असं ती सांगते. घरातील दैनंदिन कामाचा रगाडा स्त्रीला आतल्या आत मृतवत करत असतो. म्हणूनच स्त्रीने अधूनमधून अद्दश्य व्हावं, एकांतात जावं, असा सल्लाही ती देते. या प्रकरणात जर्मेनने अतिशय महत्त्वाची मांडणी केली आहे. ती इथे केवळ स्त्रीत्वाविषयी नाही तर स्त्रीच्या सत्त्वाविषयी सांगू पाहातेय. आपल्या या सत्त्वाची ओळख हेच स्त्रीचे खरे सामर्थ्य आहे.

स्त्रीच्या सत्त्वाचे तत्त्वज्ञान मांडत असतानाच जर्मेन स्पिरिच्युअ‍ॅलिटीविषयी - अध्यात्माविषयी सांगू लागते. स्त्रीने आपल्या स्वची जोपासना करायला हवी, हे सांगताना जर्मेन धर्माकडे वळते. आपल्या आंतरिक आयुष्याचा दरवाजा उघडण्यासाठी स्त्रिया धर्माचा मार्ग अवलंबू शकतात, आपापल्या धर्माच्या तत्त्वज्ञानात आस्तिक स्त्रियांनी रस घ्यावा आणि आपल्या अंतर्मनाचा शोध घ्यावा, असं ती सांगते. जर्मेनची शेवटाकडची ही मांडणी काहीशी खटकणारी आहे. त्यात विसंगतीही आहे. म्हणजे आधीच्या प्रकरणात जर्मेन स्त्रीप्रधान धर्माची धुरिण असलेल्या 'विच'विषयी बोलते, स्त्रियांनी 'विच' व्हायला हवं, असं सांगते आणि नंतर पुढच्याच प्रकणात स्त्रियांना प्रचलित धर्माची वाट धरायला सांगते. ही वाट खूप निसरडी आहे. मुळात सगळे प्रचलित धर्म हे पुरूषप्रधान आहेत. त्यातील तत्त्वज्ञानाचा गाभा जरी काही प्रमाणात लिंगनिरपेक्ष असला तरी त्याचे अन्वयार्थ, त्याला चिकटलेल्या प्रथा-परंपरा या स्त्रीला दुय्यमत्व देणाऱ्या आहेत. धर्म आणि अध्यात्म या दोन गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी वास्तवात त्या एकमेकींना धरूनच असतात. भारतीय संदर्भात तर अध्यात्माची व्याप्ती सध्या खूपच मोठी आहे. म्हणजे संत स्त्रिया, वारकरी स्त्रिया आणि विविध बुवामहाराजांच्या-मातांच्या सत्संगाच्या बैठकींना जाणाऱ्या स्त्रिया असा हा मोठा कॅन्व्हास आहे. यात श्रद्धा आहे तशी अंधश्रद्धाही आहे. मुक्ती आहे तसे शोषणही आहे. 'स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास', हे संत स्त्रियांचे आत्मभान किंवा बौद्ध धम्मातल्या थेरींनी मांडलेली मुक्तीची कल्पना किंवा वारकरी स्त्रियांची भक्तीभावातील लीनता आणि सत्संगाच्या बैठकींना जाणाऱ्या स्त्रियांची प्रापंचिक व्यापातून विसावा मिळवण्याची असोशी या गोष्टी गुणात्मकरित्या भिन्न आहेत. पण या सगळ्याकडे अध्यात्म या एकाच दृष्टीने पाहिलं जातं.

आपापल्या धर्माच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं, त्याचे अन्वयार्थ शोधणं या गोष्टीत एखादीला रस असू शकतो. पण ही बाब प्रत्येकीला जमेलच असे नाही. मात्र आपलं दैनंदिन आयुष्य जगताना आपल्या अस्तित्त्वाचा पुरुषनिरपेक्ष विचार करणं ही बाब प्रत्येकीलाच जमायला हवी. आत्मनिर्भर होणं, स्वअस्तित्त्वाचं पुरुषनिरपेक्ष भान येणं ही गोष्ट स्पिरिच्युअ‍ॅलिटीपेक्षा वेगळी आहे. भौतिक सुबत्तेत अडकलेल्या पाश्चात्य मनाला वाटणारी आध्यात्मिकतेची ओढ जर्मेनला वाटत असावी. भारतीय संदर्भात मात्र या आध्यात्मिकतेचे अर्थ अनेक अर्थाने धुसर आहेत. त्यामुळे जर्मेन जेव्हा आध्यात्मिकतेविषयी बोलायला लागते तेव्हा सावध व्हायला होतं. अमूर्त तत्त्वज्ञानाच्या पातळीवरचं अध्यात्म ही सर्वथा वेगळी बाब आहे. मात्र सध्या अध्यात्माच्या क्षेत्रातही वेगवेगळे गुरुमहाराज आणि त्यांच्या संस्था यांचं एक व्यवस्थात्मक जाळं तयार झालं आहे. त्यामुळे तिथे केवळ अंधश्रद्धाच असेल असं नाही तर प्रत्यक्ष व्यवहारात आर्थिक फसवणूक आहे आणि लैंगिक शोषणही आहे. मुख्य म्हणजे यातील काही गट वेगवेगळ्या कट्टरतावादी विचारधारेशी जोडलेले आहेत. त्यांच्यासाठी स्त्रिया या सहज उपलब्ध होणाऱ्या 'फूट सोल्जर' आहेत. शिवाय इथले आध्यात्मिकतेचे क्षेत्रही पुरुषप्रधान आहे. अशा अनेक गटांमध्ये मिळणारी शिकवणूक ही समतावादी विचारसरणीपासून कोसो दूर असते, पण तरी यातले सगळेच गट आध्यात्मिक संस्था या एकाच नामाभिधानाने ओळखले जातात. या सध्या प्रचलित असलेल्या आध्यात्मिकतेच्या वाटेवरचा आत्मशोध हा स्त्रीवादी जाणिवांना अभिप्रेत असलेल्या आध्यात्मिकतेपेक्षा वेगळा आहे. 'देहीचा विटाळ देहीच जन्मला' हे सांगणाऱ्या संत सोयराबाईच्या अध्यात्मात जी स्त्रीवादी जाणीव आहे तिचा या सध्याच्या संस्थात्मक अध्यात्माच्या क्षेत्रात अभाव आहे. हे संस्थात्मक अध्यात्माचं क्षेत्र आपापल्या धर्मांशी जोडलेलं आहे. यात काही अपवाद असले तरी सर्वसाधारण चित्र हे असं आहे. काही आध्यात्मिक गुरुंना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली शिक्षाही झालेली आहे. या अशा स्थितीत भारतीय संदर्भात तरी आत्मशोधासाठी स्त्रियांनी धर्माच्या, अध्यात्माच्या वाटेवर जाणे म्हणजे धुक्यात हरवण्यासारखं आहे. कोणाला मार्ग सापडेल, कोणाला नाही, याची काहीच शाश्वती नाही.

धर्म-अध्यात्म या गोष्टी अज्ञाताविषयी अधिक बोलतात. आपलं आत्मभान शोधू पाहणाऱ्या स्त्रीने अज्ञातापेक्षा ज्ञाताचाच अधिक शोध घेतला पाहिजे. पुरुषप्रधान व्यवस्थेने स्त्रीवर एक मर्यादित विश्व लादलं आहे. घर-मुलं-नोकरी या चाकोरीने स्त्रीच्या सार्वजनिक वावराचा, सामाजिक अस्तित्वाचा संकोच केला आहे. या स्थितीत ज्ञात जगाचे अनेक आयाम स्त्रीपासून दूरच राहातात. त्यामुळे स्त्रीने ज्ञाताचाच अधिकाधिक शोध घेत आपला स्वविकास केला पाहिजे. आपल्या ज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक वाढवत आपली बौद्धिक क्षमता स्त्रीने वाढवायला हवी. जुन्या आयुष्यातील दुय्यमता नाकारुन स्वतःला मनःशांती देणारा, स्वतःची स्वतःला नव्याने ओळख घडवून देणारा असा अनुभव नव्या ज्ञानाच्या प्राप्तीने, नव्या कौशल्याच्या विकासानेच मिळू शकतो. सर्व प्रकारची आत्मनिर्भरता स्वविकासातूनच येत असते. स्वविकास ज्ञानाच्या, कौशल्यांच्या प्राप्तीने होतो. अनेकदा स्त्रिया एखाद्या महत्त्वाच्या ज्ञानप्रक्रियेचा भाग असतात पण त्यांना त्याची जाणीव नसते. त्या आपले चाकोरीतलंच काम करत राहातात. उदा. शेतकरी स्त्री. तिला बियाणांची माहिती आहे, झाडाझुडपांच्या फुलण्या-फळण्याची माहिती आहे, तिला गुरावासरांच्या आजारांची, त्यावरच्या उपचारांची माहिती आहे. हे तिचं परंपरागत ज्ञान आहे. हे तिचं ज्ञान तिने एका वहीवर उतरवून काढायला जरी सुरूवात केली तरी डॉक्युमेंटेशनचं मोठं काम होईल आणि ज्ञानाच्या क्षेत्रातला त्या स्त्रीचा तो हस्तक्षेप ठरेल. आपलं पारंपारिक ज्ञान त्याच क्षेत्रातल्या आधुनिक ज्ञानाशी जर तिने जोडलं तर तिच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील आणि तिला एक आगळा आनंद मिळेल. जर्मेनने सुचविलेल्या आध्यात्मिकतेच्या, धर्माच्या वाटेला हा एक वास्तवातला पर्याय आहे.

आपलं स्वतःचं असं काम शोधणं, त्यात रमणं यातूनच स्वविकास साधला जाईल आणि स्वभानही जपलं जाईल. खरं तर जर्मेनने 'विच'चा उल्लेख केला आहे तिथेच हा मुद्दा स्पष्ट होतो. परंपरागत 'विच'ला, चेटकिणींना अनेक गोष्टींचं ज्ञान होतं. त्या वैद्य होत्या, शेतकरी होत्या, विणकर होत्या, त्यांना पर्यावरण आणि मानवी जगणं यातील नातं उमगत होतं. त्यामुळे जर्मेन सांगते त्याप्रमाणे आजच्या आपल्या जगण्यात 'विच' होणं म्हणजे विविध विषयांचं ज्ञान मिळवणं, असाच अर्थ होतो. स्त्रीवादी विचारवंत सिमोन द बोव्हाच्या संदर्भात टिप्पणी करतानाही जर्मेनने या आशयाची मांडणी केली आहे. सार्त्रबरोबरचं नातं हे आपल्या आयुष्याचं मोठं यश आहे, असं म्हणणाऱ्या सिमोनला, वृद्धत्वाचं भय बाळगत आयुष्यात पुरुष असण्याला, लैंगिक सुख असण्याला आत्यंतिक महत्त्व देणाऱ्या सिमोनला खोडून काढताना जर्मेन म्हणते, आपल्या बौद्धिक कामात, लेखनात सिमोनला ती उत्तेजना का मिळत नाही, तिची वैचारिक प्रक्रिया तिला प्रगाढ शांतता का देत नाही, आयुष्यात पुरुष नसेल तर आपण अर्धवट जिवंत आहोत, असं इतर स्त्रियांप्रमाणे तिला का वाटतं?  थोडक्यात, स्त्री करत असलेलं काम, त्यातील तिची गुंतवणूक, त्यातून तिच्या बुद्धीला मिळणारी चालना या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत, त्यातून मिळणारा आनंद हा लैंगिक सुखापेक्षाही अधिक खोलवरचा असा आहे, हेच जर्मेन सांगत आहे. मात्र मध्येच प्रचलित धर्माच्या मार्गाचाही ती उहापोह करते ही बाब खटकते. निखळ धार्मिक तत्त्वज्ञानाच्या मार्गावरचा आत्मानंद हा एक मार्ग काही स्त्रियांच्या बाबतीत असू शकतो पण त्याचं सरसकटीकरण प्रसंगी स्त्रियांना वेगळ्याच भोवऱ्यात अडकवतं, याचंही भान असायला हवं. जर्मेन 'सीरीनीटी' आणि 'पॉवर' हे दोन शब्द एकत्र वापरते, हे महत्त्वाचं आहे. प्रगाढ शांतता सामर्थ्यातूनच मिळते आणि हे सामर्थ्य केवळ आत्मभानातून नाही तर आत्मविकासातून मिळतं आणि आत्मविकासाला प्रत्यक्ष कृतीची गरज असते. अज्ञातापेक्षा ज्ञाताच्या, ऐहिकाच्या शोधातूनच कृतीची वाट सापडते.

पन्नाशीच्या टप्प्यावर स्त्रियांनी बदलाचं नवं वळण घ्यायला हवं, हे सांगणारं हे पुस्तक खरं तर सर्वच वयोगटातल्या स्त्रियांसाठी महत्त्वाचं आहे. फक्त हे वळण आत्मभान देणारं हवं, आत्मगुंग करणारं नको, एवढी एक बारीकशी नोंद शेवटाकडे करणं आवश्यक वाटतं. बाकी स्त्रीवादी स्त्रीत्वाचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक हा एक महत्त्वाचा ऐवज आहे.

संध्या नरे-पवार 

sandhyanarepawar@gmail.com