‘अविनाशपासष्टी’

१५ मार्च २०२२

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे आद्य मराठी गझलसंशोधक म्हणून सर्वदूर सुपरिचित आहेत. त्यांचा ‘अविनाशपासष्टी’ हा ६५ निवडक गझलांचा संग्रह त्यांच्या पासष्टीतील पदार्पणाचे औचित्य साधून मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने १५ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित केला आहे. इ.स.१९७९पासून म्हणजे गेल्या चाळीस वर्षांपासून प्राचार्य डॉ. सांगोलेकर हे गझललेखन करीत आलेले आहेत. ते आपल्या गझललेखनाविषयी मनोगतात म्हणतात, “माझ्या गझला ह्या आत्मचिंतनपर आहेत. त्याहून अधिक त्या समाजचिंतनपर आहेत. निसर्गप्रेम, प्रेयसीप्रेम/पत्नीप्रेम त्या अपवादानेच व्यक्त करतात. समाजप्रेम, मानवप्रेम मात्र त्या विपुल प्रमाणात व्यक्त करतात. माझ्या व्यक्तिगत जीवनातून त्या जशा उगवलेल्या आहेत, तशाच त्या माझ्या आजूबाजूच्या समाजजीवनातूनही उगवलेल्या आहेत. त्या क्वचित तंत्रशरण आहेत. मात्र, तंत्रशुद्ध अधिक आहेत. माझ्या गझला अधिक प्रमाणात अक्षरगणवृत्तात आहेत. माझ्या सर्वच गझलांचा शेवट मी मक्त्याच्या शेरानं (द्विपदीनं) करत आलेलो आहे. ह्या शेरामध्ये (द्विपदीमध्ये) मी ‘अविनाश’ हा तख्खलुस (टोपणनाव) वापरत आलेलो आहे. माझ्या गझला गंभीर प्रकृतीच्या असल्या, तरी विनोदी प्रकृतीचा ‘हझल’ हा गझलेचा उपप्रकारही मी थोड्या प्रमाणात हाताळलेला आहे. माझ्या हातून अधिकाधिक चांगल्या, दर्जेदार गझला लिहिल्या जाव्यात, ह्यासाठी मी प्रयत्नशील राहत आलेलो आहे.” सांगोलेकरांच्या गझलेने गेल्या चाळीस वर्षांमधील विविध स्पंदने टिपलेली आहेत. त्यामुळे बदलत्या काळाची स्पंदने टिपणारी गझल असा तिचा उल्लेख करावा लागेल. १९७९ म्हणजे नुकताच जागतिकीकरणाच्या संकल्पनेचा उदय झालेला होता आणि आजचा काळ म्हणजे जागतिकीकरणाच्या पडझडीचा काळ. त्यामुळे या दोन अक्षांमध्ये जे घडत आले आहे, ते सार्वत्रिक स्वरूपाच्या स्पंदनातून गझलेच्या माध्यमातून त्यांनी टिपलेले आहे.

’ऊन इथले खंगताना, भंगतो मी अंतरी’ ही गझल त्यांनी १९८०मध्ये लिहिली. तीत आपली कैफियत ’खंगलेले ऊन’ या उपहासपूर्ण प्रतिमेमधून त्यांनी चित्रित केली आहे. मतल्यातील ही प्रतिमा अर्थवाही होऊन आपल्या अंगावर येते आहे. गझलकाराने ‘मुके दु:ख’ ही प्रतिमा खुबीने योजलेली आहे. यातील ‘मी’ हा भंगल्यानंतरही त्याच्या दु:खाला ‘शेंदरी रंग’ आला आहे. हा शेंदरी रंग मांगल्य, भक्ती, त्याग, समर्पण यांचा सूचक आहे. त्यामुळे, गझलेच्या आशयातील विरोधात्म भाव हा प्रखरपणे आपल्यासमोर येतो. अर्थाची ही दोन टोके आपल्या मनावर ठसठशीत बिंबतात आणि आपल्या मनातून उत्स्फूर्त उद्गार निघतात, “वाह, क्या बात है !”

प्रतिमांचे असे नावीन्य या गझलेत आलेले आहे. विरोधाभासात्मक आशय व्यक्त करणे, हा डॉ. सांगोलेकर यांच्या गझलेचा एक गुणधर्म आहे, हे येथे लक्षात येते.

‘ठेवून दूर वाती’ ही गझल आनंद या वृत्तातील असून, ती त्यांनी २००४मध्ये लिहिलेली आहे. या काळात गझलकाराचे लोकशाहीविषयक संवेदन कसे टोकदारपणे व्यक्त झाले आहे पाहा :

“हे भ्रष्ट लोक सारे,
नोटाच फक्त खाती” (पृ. ५१)

लोकशाहीचे अध:पतन या काळापासून सुरू झाले. त्यामुळे मतल्यात ‘वाती’ ऐवजी ‘मशाल’ हाती घेण्याची सूचना गझलकार करतो आहे. डॉ. सांगोलेकर यांच्या गझलांमधील शेर थेटपणे आपल्याला भिडतो. ते भावनिक नसून वैचारिक आहेत. प्रेमाची भावनिक तरलता व्यक्त करणे, हळुवार संवेदना व्यक्त करणे, यापेक्षा मानवी जीवनविषयक, तसेच समाजविषयक आशय निर्भीडपणे व्यक्त करणे, यात ती रमते-रंगते. त्यामुळे तिच्यात कल्पनाप्रधानता, चमत्कृती या गोष्टींना फारसे महत्त्व नाही. तिला परिवर्तनाची आस असून प्रबोधनाची कास ती धरणारी आहे आणि हाच तिचा श्वासही आहे. नव्या नव्या बदलांचा तिला ध्यास आहे. हेच तिचे वेगळेपण आहे. ’कुणी कुणा नजरेने खुणावले होते’, ही गझल जशी त्यांनी लिहिली आहे; तसेच ‘हझल’ हा विनोदी गझलेचा प्रकारसुद्धा हाताळला आहे. ‘का हो माझी होते घाई ती आल्यावर’ या हझलेत ‘ती’ आल्यावर काय काय झाले, ते त्यांनी पाच शेरांमध्ये विनोदी पद्धतीने टिपले आहे. अनेक गझलांमध्ये इंग्रजी काफिये वापरून प्राचार्य डॉ. सांगोलेकरांनी नावीन्य आणले आहे. छोटी आणि मोठी वृत्ते त्यांनी सारख्याच ताकदीने लीलया हाताळली आहेत. ते सतत माणसाचा, माणूसपणाचा शोध घेत आलेले आहेत. त्यांची गझलही याला अपवाद नाही. उदाहरणादाखल, ’शब्दास जागणारा माणूस शोधतो मी’ ही गझल पाहण्याजोगी आहे. या गझलेत ते म्हणतात,

“हव्यास जास्ततेचा हा रोग आज झाला,
थोड्यात भागणारा माणूस शोधतो मी” ( पृ. ४१)

या गझसंग्रहात नावीन्यपूर्ण प्रतिमा, प्रतीके, रूपके पाहायला मिळतात. शब्दकळा सहज स्वाभाविक अशी आहे. ‘शुभ्र दूध आणि साय’ , ‘बाप्या आणि बाय’, ‘शुद्धच जाई’, ‘भाता माणसे’, ‘नंगे सवस्त्र’, ‘बहिरा समाज’, ‘छबिदार माणसे’, ‘अंधार नेक’, ‘दुनिया जनावरांची’, ‘अंधार-गल्बला’, ‘आरंभशूर’, ‘प्राक्तनी काटे’, ‘दु:खबेड्या’, ‘डोके पडिक’, ‘चैतन्यवंत’, ‘आत्मा असे रक्ताळला’, ‘आंबटढोण’, ‘काळाची सळसळ’, ‘वाचाळवीर’,‘जात्यंध्य धूर्त’ ह्या प्रतिमा वेगळ्या आहेत.
मानवी जीवनविषयक अनेक दृष्टिकोनांचे दर्शन त्यांची गझल घडविते.

“झटकू आता सारी मरगळ,
चला उभारू नवीन चळवळ”

हा तिचा भाव आहे. ती प्रेरणादायी आहे. प्रत्येक काळातील प्रश्नावर तिने रामबाण उपाय शोधलेला आहे. तिच्या प्रबोधनामागे तिची श्रद्धास्थाने आहेत. यात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, ‘सहजयोगा’च्या संस्थापिका प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवी यांचा अंतर्भाव आहे.हेवेदावे, अनाचार, रागलोभ, वासना, असंतुलन, गुंडगिरी, भित्री वृत्ती याविषयी त्यांची गझल सडेतोड बोलते. ती राजकारणावरही भाष्य करते. पाहा : “महिना निवडणुकीचा, आहे सुरेख मोका हे पक्ष काय करती? देतात फक्त झोका” (पृ. ३४) येथे त्यांची गझल उपहास-उपरोधाच्या अंगाने सूचकपणे व्यक्त होते. सामान्यांच्या बाजूने ती उभी राहते. या गझलेचे प्रयोजन समाजाचा रोग घालवणे, हे आहे.म्हणूनच ते म्हणतात , “झाला कसा कळेना, सारा समाज रोगी? जो तो खुशाल सांगे, मी वैद्यराज नाही” (पृ. ३४) प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांची गझल ही काळाच्या प्रश्नावरची गझल आहे. ती मानवी जीवनाचे मांगल्य शोधण्याच्या वृत्तीतून आकारास आलेली आहे. या गझलेचा थेटपणा आणि धीटपणा आपणास विचारप्रवृत्त करतो. तो चिंतन-मनन करायलाही लावतो. शिवाय, रसिकाला अंतर्मुखही करतो. अशा या आद्य गझलसंशोधकाच्या गझलसंग्रहाचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन!

गझलसंग्रह : अविनाशपासष्टी
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई. (प्रथम आवृत्ती- १५ जानेवारी २०२२)
किंमत : रु. १५०/-

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे
गुहागर (जि. रत्नागिरी)
balasaheb.ml@gmail.com

(लेखक हे सुप्रसिद्ध समीक्षक-कवी-कादंबरीकार आहेत.)