अथिया

लहान मुलांच्या भावविश्वाला समजून घेणारं, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारं आणि सहज, सोप्या भाषेत आनंद देणारं बालसाहित्य लिहिणं हे नेहमीच आव्हानात्मक मानलं जातं. डॉ. मीरा सुंदरराज यांच्या ‘अथिया’ या बालकविता संग्रहाबद्दलच्या या लेखात बालमनातील निरागसता, निसर्गाशी असलेली मैत्री आणि मुलांच्या भावविश्वाचं सुंदर चित्रण यांचा वेध घेण्यात आला आहे. ‘छकुली’, ‘मनाची बाग’, ‘मळा’, ‘काळजी’ यांसारख्या कवितांमधून बालसुलभ भावना, खेळकरपणा आणि संवेदनशीलता सहजपणे उलगडत जाते; तर आकर्षक चित्रांमुळे संग्रहाचा आनंद अधिक खुलतो. बालकवितेतील साधेपणा, आशयाची निरागसता आणि मुलांना आपलंसं वाटणारं शब्दविश्व यांची ओळख करून देणारा हा लेख ‘अथिया’ या संग्रहाकडे वाचकांना आपुलकीने पाहायला लावतो.

बालकविता आणि बालसाहित्य हा नेहमीच लेखनाचा कस लागणारा साहित्यप्रकार मानला जातो. लहान मुलांच्या मनाला भिडणारे शब्द, सहज आशय, निरागस भावविश्व आणि खेळकर मांडणी हे त्यातील महत्त्वाचे घटक असतात. नुकताच वाचनात आलेला डॉ. मीरा सुंदरराज यांचा ‘अथिया’ हा बालकवितासंग्रह या सगळ्या गुणांनी समृद्ध आहे. ‘अथिया’ या शब्दाचा अर्थ ‘गणपतीने दिलेला प्रसाद किंवा उपहार’ असा सुंदर असून, संग्रहाचं शीर्षकही तितकंच आकर्षक आणि अर्थपूर्ण वाटतं.

या संग्रहात एकूण पन्नास बालकवितांचा सुंदर वाचनानंद मिळतो. सर्व कवितांमध्ये बालमनाला भिडणारी, सोपी आणि सहज भाषा आहे. बालकवितेमध्ये शब्दरचनेइतकीच महत्त्वाची असतात ती त्या कवितेला साजेशी आकर्षक चित्रं. ‘अथिया’ संग्रहातली चित्रंही वाचकांचं लगेच लक्ष वेधून घेतात. मोजकी पण समर्पक चित्रं कवितांची शोभा आणखी वाढवतात.

एकूणच कविता छोट्या, सोप्या आणि मुलांना सहज समजतील अशा भाषेत लिहिल्या आहेत. ‘छकुली’, ‘माझी नदी’, ‘पावसात मज्जा’, ‘मनाची बाग’ अशी शीर्षकंसुद्धा लक्ष वेधून घेणारी आहेत. ‘मनाची बाग’ या कवितेत कवयित्री लिहितात —

“खारुताई झाडावर चढते सरसर, स्पर्धेत हरते माझी भिरभिरी नजर...”

या ओळी वाचताना नकळत “वाह!” असा उद्गार निघून जातो.

त्यानंतर ‘मळा’ या कवितेतील ओळी पहा —

“आमच्या मळ्यात विहीर आहे, विहिरीचं पाणी मधूर आहे, आम्ही मुलं मनसोक्त हुंदडतो, पाखरा-पक्ष्यांशी खेळत राहतो...”

या ओळी वाचताना संपूर्ण दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं आणि कविता आपल्याला थेट त्या मळ्यात घेऊन जाते.

‘भुताच्या गोष्टी’, ‘माझे बाबा’, ‘काळजी’ अशा अनेक कविता मनाला स्पर्शून जातात. ‘काळजी’ या कवितेत शाळेबद्दलची एक निरागस भावना व्यक्त झाली आहे. शाळा सुटल्यानंतर अंधारात शाळा एकटी राहते, याची काळजी वाटणाऱ्या बालमनाचं चित्रण या कवितेत अतिशय सुंदरपणे आलं आहे आणि तो निरागस भाव आपल्यालाही मनापासून आवडून जातो.

‘अथिया’ संग्रहाला स्वतः उत्कृष्ट कथालेखिका असलेल्या डॉ. कीर्ती मुळीक यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. संग्रहाचं मुखपृष्ठ आणि आतील चित्रं प्रख्यात चित्रकार पुंडलिक वझे यांच्या कुंचल्यातून साकार झाली आहेत.

आजच्या छोट्या दोस्तांसाठी ‘अथिया’ हा संग्रह एक सुंदर मनोरंजनात्मक ठेवा आहे. ‘संवेदना’ प्रकाशनाची निर्मिती असलेला हा संग्रह प्रत्येकाच्या संग्रही असावा असाच आहे. कवयित्री डॉ. मीरा सुंदरराज यांच्या अनुभवविश्वातून शब्दबद्ध झालेल्या या बालकविता लहानांसह मोठ्यांनाही सुखावून जातात.