अस्तित्व

२१ जून २०२२

मी तेव्हा पुण्यात राहात कर्वेनगरात होतो. ऑफिस वारजे येथील रुणवाल सोसायटीत होते. तिथून वारजे पुलाजवळ उतरून, मी बहुतेकदा पायीच चालत कर्वेनगरमधील स्पेन्सर्स चौकात जायचो. २०१५ चा ऑक्टोबर महिना असावा, नेहमी प्रमाणे काम आटोपून मी ऑफिसातून निघालो. भूक लागली होती म्हणून काहीतरी खाण्याच्या शोधात मी थोडा पुढील बाजूस गेलो, तिथे कच्छी दाबेलीची गाडी लागलेली असायचीच. मी एक दाबेली ऑर्डर करून उगाच इकडेतिकडे न्याहाळत होतो. नोकरदारांची ये-जा सुरू होती. भाजी, फळे विक्रेत्यांचा गोंगाट ऐकू येत होता, रस्त्यापलीकडे विद्यार्थ्यांचा एक गट सिगरेटचे झुरके मारून अभ्यासाचा शीण घालवत होते, असं इकडचं तिकडचं काय काय बघता बघता माझी नजर जवळच असलेल्या एका व्यक्तीवर जडली. हताश, शून्यात मग्न, भिंतीला टेकून बसलेली ती व्यक्ती, जणू वर्तमान जगाच्या पसाऱ्यातून अदृष्य होती, कदाचित तिचं अस्तित्व कळण्याइतकं सखोल आपण नसूच.

मळकट साडी, त्यातून अर्धा परकर बाहेर, राकट हातांतल्या बांगड्यांनी उगाच त्यांना नाजुकपणाची जाणीव दिली होती. गळ्यात गंठन, कपाळावर मोठं ठासर कुंकू; पण त्यात सौभाग्याचा लवलेशही दिसत नव्हता. वयोमनानुसार रुंदावलेलं कपाळ, चिमटीत बसतील एवढ्या केसांचा बांधलेला अंबाडा, सुरकुतलेला रापलेला चेहरा आणि त्यावर पावडरचा भपका- तो की ती- या संबोधनांना बुचकळ्यात टाकणाऱ्या त्या व्यक्तित्वाने माझं कुतूहल जागं केलं होतं. मी दाबेलीवाल्याला हातानेच खुणावून दोन दाबेल्यांची ऑर्डर दिली आणि तयार दाबेल्या घेऊन मी त्या व्यक्तीकडे वळलो.

“मावशी खाता का..?” बाह्य रुपानुसार संबोधन वापरून मी संभषणाची सुरुवात केली. तिने माझ्याकडे पाहिलं, सुरकुतलेल्या पापण्यांवर विस्कटलेल्या काजळाच्या ओळीमागे माझ्याकडे स्थिरावलेल्या डोळ्यांची लाली होती. जणू तिनं भोगलेल्या यातनांचा लाल रंग होता. “मी..?”, आश्चर्याने बघत खात्री करण्यासाठी ती उद्गारली. मी हात पुढे करत घ्या म्हटलं. दाबेली हातात घेऊन तिच्या खास शैलीत आशीर्वाद देत ती म्हणाली, “ आज पतुर कुनी मागितल्या बिगर काय दिलं नाय, मोट्टा हुशील बाबा..!” मी थोडा मागे सरून बोललो, “ एक विचारू..?” तोंडातला घास खाली ढकलत ती बोलली, “ मला रं काय इचारनार, आनि इचारलस तरी मी काय सांगणार...?” मी धीर एकवटत बोललो, “इथं रस्त्यावर का बसलात..?”. “आता कुठला ठिकाना सांगू तुला, तोंडावर सुरकुत्या आल्या की खायाला कोंडा आनि निजंला धोंडा, त्योच ठिकाना”, डोळ्यातली टिपं टिपत ती बोलली. मी जावं की थांबावं या विवंचनेत असतानाच ती पुन्हा बोलू लागली, “ तशी लहानपनापस्नच बाईगत हुते, बोलनं, चालनं तसंच. घरापास्न येशीपतुर समदी चिडवायची. नावच जनू बायल्या ठिवलं हुत.” ती बोलता बोलता थांबली, आवंढा गिळला, पुन्हा बोलू लागली. “ बारा-तेरा वर्साची हुते, पोरीच्यातच खेळायचे, त्यांच्यातच असायचे, मित्र असा कुनी नव्हताच. त्यो हुता, पण त्याला मित्र का म्हनावं, दोनेक वर्सानं मला मोट्टा, लहानपनापस्नच चिडवायचा, छळायचा, एक दिस अचानकच गोड गोड बोलाया लागला, अंगचटी याला लागला. मला बी त्याचं तस वागनं आवडायचं, जनू मी भाळलेच तेच्यावर. एक दिस सायकलवर बसवून लांब शेतावर घेउन गेला, तिन्हीसांजचं. मानसं गावात परतली हुती, आजूबाजूला कुनी नव्हतं, बांधाशी सायकल लावून त्यो शेतात गेला, मला खुनवून आत बोलवलं, खस्सकन वडून जवळ घेतलं, बिलगला. त्याच्या मिठीत माझं पानी-पानी झालं, मी त्याच्या हवाली झालो.” तिची स्वत: बद्दलची संबोधनं आता पुरुषी होऊ लागली. घरी परतताना त्यो गुमान हुता, एक अक्षरबिगर बोलला न्हाई, घरापास्न जरा लांबूनच मला चालत जा म्हटला, मी बी गेलो. सारी रात गालावरची खळी हालली नाय माझ्या, अंगावर शहारं घेउनच झोपलो. पुढं बरंच दिवस त्यो दिसला न्हाई, मी वाट बघत बसायचो.”

“बऱ्याच दिसांनी त्यो आला, लांबनच खुनावलं, मी यड्यावानी धावत त्याच्या मागं गेलो. ह्या वेळला त्यानं सायकलवर घेतलं न्हाई. त्यो शेतात शिरला, मी त्यानं बोलवायची वाट बी नाय बघितली, तडक त्याच्या मागनं आत शिरून मागनं त्याला मिठी मारली. त्यानं मला वडून आत ढकललं, जमिनीवर आडवं केलं, या वेळी तो सैतान झाला हुता, अंगातली आग विझवून त्याला निघायचं हुत. त्यो अंगावरनं बाजूला झाला आनं माझ्या पायाखालची जमीन सरकली, त्याच्यामागं त्याचा दोस्त उभा हुता. मी डोळं मिटलं, हुतय ते हु दिलं. या वेळी मला सावरायला, घरी न्याला कुनी नव्हतं, माझं मीच घरी गेलो.” अंगनात आय उभी हुती, “काय रं, सांगूनबिंगून जाशील का नाय..?”, ती बोल्ली. मी ऐकलं न ऐकलं करून सरळ बिछान्यावर गेलो. आय जेवायला उठवायला आली, पन मी उगाच झोपेच सोंग घेउन रात सरू दिली. माझं बोलनं, खेलनं कमी झालं, ज्याची वाट बघायचो त्याची भीती वाटाय लागली. लय दिस काय त्यो दिसला नाय, पन एकदा त्यानं मारुतीच्या मंदिराजवळ मला गाठलं, दमदाटी करून सायकलवर बसवलं. म्हसोबाच्या रानात न्हेऊन पुन्हा तेच..! “ जवा बोलवीन तव्वा याचं ” असा दम बी भरला. मी कापडं आवरून घराकडं पळालो.

आता त्यो घराजवळ आला की सायकलची घंटी वाजवायचा, मी घाबरून त्याच्या मागं जायचो, कधी या शेतात, कधी त्या; वडं-वगळी-नालं जिथं जमंल तिथं घेऊन गेला, दर वेळेला नवा मैतर, सात का आठ किती झालं कुनला ठावं, जो आला त्यानं आडवं केलं, पण जातना मोकळा गेला न्हाई. गावभर केलं, आमक्याचं पोरगा हांडगा, हिजडा म्हणून, रस्त्यानं जो तो बघून हसू लागला. एकदा असाच पाटलाच्या उसात त्यो घेऊन गेला, सोबत मैतर हुतच, पाटील पाचटीच्या आवाजानं धावत आला, त्यानं रंगे हात पकडलं. बाकी पोरं पळाली. पाटलानं उसानं बडवत, मला बासमोर आनलं. बा गावात नावाजलेला, त्याला सहन न्हाई झालं, त्यानं हातातल्या काठीनं बडवायला लागला, तुडवायला लागला, आय आडवी आली, म्हनाली, जा बाबा जसा देवानं घडवलाय तसा रहा, पर जित्ता रहा. मी घर सोडलं आनि पुन्याला आलो. हितली कथा अजून वेगळी, जे गावात जबरदस्तीनं झालं, ते हितं मर्जीन केलं, टिचभर पोटासाठी जिंदगीचा उकिरडा केला रं बाबा.” ती बोलायची थांबली, पदरात आसू टिपून, भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली, मला कुठचाच प्रतिसाद न देता चालती झाली, हातात अर्धा दाबेलीचा तुकडा तसाच होता.

मी मात्र, अंतर्मुख झालो होतो. नकळत डोळे पाणावले होते. मन अस्वस्थ झालं होतं. गुन्हेगार कोण आणि शिक्षा कोणला याचं गणित मला न रुचणारं होतं, आणि त्याच अस्वस्थतेतून मी एक कविता लिहिली. ज्यांनी त्याला हिजडा बनवलं, त्यांनी पुसून टाकलेल्या त्याच्या ‘अस्तित्वा’ची.

जन्मलो नाही जरी मी तुझ्याचसारखा,
अगदी हुबेहुब, तरी माझ्यात प्राण होते
तुझ्याच सवे तुझ्याचसारखा वाढलो,
अस्तित्व मात्र खुणावत होते..!

बदललास तू काळानुरूप,
आणि मी ही बदललो
तुझे बदल होते समजाभिमुख, त्याला रुचणारे,
माझे मात्र विरुद्ध त्याला न पचणारे..!

बदलाला या कारणीभूत स्पर्श मात्र तुझाच होता,
प्रत्येक स्पर्शागणिक अंतरंग माझा चित्कारत होतं
नसतील पडले चित्कार तुझ्या कानी कदाचित,
माझ्या कानात मात्र टाहो फोडीत होता..!

गरजेपोटी भुकेला तुझ्या, भोज होतो भोग्य मी,
हात पदरी पुसताना मळवलेस चारित्र्यही
बदललास तू, आणि बदललो मीही,
शिंतोड्यांनी बदलाच्या तुझ्या, ना उरलो ‘पुंसक’ मी..!

(चित्र : इंटरनेटवरून. thespiritual.wordpress.com यांचे आभार.)

राम मधुघन
cramsalvi@gmail.com
(लेखक डीबीजे महाविद्यालय, चिपळूण येथे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)