भगवान महावीरांशी मुक्तसंवाद

१२ फेब्रुवारी २०२६

आज आपण स्वार्थांध, धर्मांध झालो आहोत की काय? अशी शंका मनाला त्रास देते. अस्वस्थ बनवते. तो त्रास, ती अस्वस्थता थोडी इतरांनाही द्यावी, म्हणून हे लेखन! ती समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. लेखिकेला त्याची जाण आहे. त्यामुळं लेखिकेला त्रास होतोय, पण ती त्यावर शांत बसून चाललेलं सगळं बघत बसणारी नाहीये. हे लेखिका म्हणते त्याप्रमाणेच हा मुक्तसंवाद आहे. आज कोणत्याही माणसाबाबत हे आहे की मनात खदखदणारे, मनाला टोचणारे, मन विषन्न करणारे, मनाला न पटणारे सारे कुणाला सांगावे? कुणासमोर बोलावे? मन मोकळे करण्यासाठी जागा सापडत नव्हती. कारण आपली माणसं, आपला समाज, आपला मित्रपरिवार यापैकी कोण हे ऐकेल? कोण समजून घेईल? समजेनासे झाले तेव्हा लेखिकेला वाटले, हे सगळे महावीरांनाच सांगितले तर..? त्यांच्याशीच संवाद साधला तर..? हे जास्त योग्य वाटले... म्हणून हा, भगवान महावीरांशी केलेला मुक्त संवाद. त्यातील एक उदाहरण...

स्त्री-पुरुष समान असावेत, एकमेकांना पूरक असावेत श्रेष्ठ, कनिष्ठ असं नकोच, तर माणूस म्हणून सगळे एकाच पातळीवर असावेत, उच्च-नीच, स्त्री-पुरुष, जात-वर्ग काही न मानता, केवळ माणूस म्हणून राहण्यातच कल्याण आहे? आहे ना.

हा मुक्तसंवाद समाजातील प्रत्येक टोचणाऱ्या गोष्टीबद्दल आहे. ३२ मुक्त छंदातल्या या कविता म्हणजे भगवान महावीरांचा जीवनपटही उलगडून दाखवण्याबरोबरच आज जे प्रश्न आ वासून आपल्यासमोर उभे आहेत त्यांचा वेध घेणाऱ्या आहेत. अत्यंत साध्या, सोप्या, सरळ भाषेतील हा संवाद मनात रेंगाळत राहतो, विचार करायला भाग पाडतो. एक खंत वाटते ती ही की शुद्ध लेखनाच्या काही ठिकाणी चुका राहिल्या आहेत.

  • भगवान महावीरांशी मुक्तसंवाद नीलम माणगावे अरिहंत पब्लिकेशन, पुणे किंमत रु.३००/- पृष्ठसंख्या: २०८