मनःशांतीसाठी नवं पुरुष(?)भान

२५ ऑगस्ट २०२५

माध्यमांतर

आजच्या समाजात मानसिक आरोग्य, नैराश्य आणि मनःशांती याबाबतची चर्चा वाढत असली तरी ती प्रामुख्यानं स्त्रियांपुरती मर्यादित राहते; परिणामी पुरुषांमधील आत्महत्येचं वाढतं प्रमाण आणि भावनिक वेदनांची दखल घेतली जात नाही. स्त्रीवादानं विषारी पुरुषत्वाला प्रश्न विचारत नवं पुरुषभान निर्माण करण्याची वाट मोकळी केली आहे, पण हा बदल केवळ सामाजिक न राहता मानसशास्त्र, मनोविश्लेषण आणि लिंग-अभ्यासाच्या आंतरशाखीय दृष्टिकोनातून होणं आवश्यक आहे. संवेदनशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि LGBTIQA चळवळीत सक्रिय असलेले जमीर कांबळे यांचा हा लेख पुरुषांच्या मनोस्वास्थ्याचा शोध घेत समाजातील प्रस्थापित संकल्पनांना आव्हान देतो आणि मनःशांतीच्या चर्चेत पुरुषांचं स्थान नव्यानं अधोरेखित करतो. (पुरुष उवाच, दिवाळी 2024 मधून साभार.)

हल्ली ‘मन’, ‘मनोस्वास्थ्य’ आणि ‘मनःशांती’ हे विषय सतत चर्चेत येऊ लागले आहेत. आधी तर चळवळींमध्ये आणि विचारसरणींच्या सिद्धांतांमध्येही वैयक्तिक नैराश्याबद्दल बोलणे टाळले जात होते. कारण त्यामुळे विद्रोहाची धार कमी होईल की काय अशी भीती वाटत असणार. आंदोलनकर्त्यांच्या समुदायात मानसिक आरोग्य, नैराश्य, भीती या विषयांना थारा नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते बिचारे अजूनच जास्त नैराश्याच्या गर्तेत भरडले जातात. आज ह्या विषयांना सिद्धांतांमध्ये तरी एक महत्त्वाचे स्थान मिळाले आहे कारण आपल्या ‘राजकारण’, ‘शोषण’, ‘लिंगभाव’, ‘सत्ता’, ‘स्त्रीत्व’, ‘पौरुष्य’ इत्यादी विषयांचा मानसशास्त्रीय दृष्टीतून झालेला अभ्यास जास्त प्रगल्भ समज आणि शोषणाच्या निर्मूलनाच्या प्रवासाला एक नवी दिशाही देतो, हे आता लक्षात येऊ लागले आहे. म्हणून ‘स्त्री आणि पौरुष्य अभ्यासाला’ आणि चळवळींना मानसशास्त्र आणि मनोविश्लेषण ह्या ज्ञानशाखांशी हातमिळवणी करावीच लागेल, कारण ह्या दोन्ही ज्ञानशाखांना एकत्र येण्याचे संयोग जुळत राहणार आहेत. उदाहरणार्थ आज आपण स्त्रीवादी दृष्टिकोनातून पुरुषांचा विचार करत असताना हळूहळू पुरुषांच्या मनोस्वास्थ्याबद्दल, त्यांच्या नैराश्य आणि मनःशांतीबद्दलही बोलू लागलो आहोत.

विकिपीडियामधून मिळालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये भारतातील आत्महत्येच्या प्रमाणातील लिंग गुणोत्तर 70.9 (पुरुष): 29.1 (स्त्री) तर 2022 मध्ये 72.5 (पुरुष): 27.4 (स्त्री) असे होते. पुरुष आत्महत्येची संख्या एकूण 118,979 तर स्त्री आत्महत्येची संख्या 45,026 अशी होती. Lancet Psychiatry Study च्या रिपोर्टनुसार 1990 ते 2017 ह्या काळामध्ये स्त्रियांमध्ये नैराश्य, भीती आणि खाण्याशी संबंधित समस्या असे मानसिक विकार जास्त आढळले तर पुरुषांमध्ये थेट सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसॉर्डर, ADHD सारखे मोठे मानसिक विकार जास्त दिसून आले. ह्या मोठ्या मानसिक विकारांच्या मुळाशी शेवटी नैराश्य आणि भीतीच असते हे कोणीही सांगेल. परंतु तरीही आपल्याला पुरुषांच्या नैराश्याचे, भीतीचे आकडे मिळत नाहीत कारण पुरुष नैराश्य आणि भीती व्यक्त करत नाहीत. पुरुषांचे आकडे थेट मोठ्या मनोविकारांच्या पातळीवर मिळतात. पुरुषांच्या भीती आणि नैराश्येवर आधीच काम केले तर त्यांना आत्महत्या किंवा मोठ्या मनोविकारांपासून नक्कीच वाचवता येईल.

स्त्रीवादाने पुरुषांचा अभ्यास करताना विषारी पुरुषत्वाची (toxic masculinity) संकल्पना मांडली तेव्हा आपसूकच पुरुषत्व चांगलं, प्रेमळ, करुणामय इत्यादीही होऊ शकतं अशी समज तयार झाली. ह्या दृष्टिकोनामागे एक छुपे राजकारण चालू आहे हे कदाचित आपल्या लक्षात येत नसेल. स्त्रीवादी अभ्यासकांना किंवा त्यांच्या ‘मनाला’ पुरुषांनी हिंसक न होता संवेदनशील, मैत्रीपूर्ण, प्रेमळ व्हावे असे वाटत राहिले आहे. किंबहुना स्त्रीवादाचा तो एक मुख्य हेतूही आहे की पितृसत्ता नष्ट करायची म्हणजे पुरुषांचे परिवर्तन केले पाहिजे. स्त्रीवादी चर्चांमध्ये जेव्हा सुरुवातीला स्त्री-पुरुष एकत्र बसू लागले तेव्हा पितृसत्तेचे परिणाम सांगताना स्त्रिया त्यांच्या शोषणाच्या कथा सांगत असत. पुढे हळूहळू ह्या चर्चांमध्ये आणि पर्यायाने चळवळीमध्येही पुरुषांचा सहभाग सक्रिय व्हावा यासाठी पुरुषांनीही बोलतं व्हावं असं सातत्यानं आव्हान केलं गेलं. ह्या आव्हानामागे मात्र पुरुषांनी पितृसत्तेत आपलेही कसे शोषण होते, आपलीही संवेदनशीलता कशी नष्ट केली जाते ह्यावर बोलावे अशी अपेक्षा होती. म्हणजे एकीकडे आपण पुरुषांनी स्त्रीवादी चर्चेत आणि चळवळीत ‘सक्रिय’ व्हावे ही अपेक्षा आणि दुसरीकडे मात्र त्यांनी स्वतःला अपराधी भावनेतून सादर करावं हीही अपेक्षा.

कदाचित म्हणूनच आपण एका ज्ञानशाखेला ‘स्त्री अभ्यास’ म्हणतो मात्र तिच्यासारख्याच दुसऱ्या ज्ञानशाखेला ‘पुरुष अभ्यास’ न म्हणता ‘पौरुष्य किंवा पुरुषत्व अभ्यास’ म्हणतो. आत्तापर्यंतचा दृष्टिकोन असा होता की, स्त्री ही नेहमीच शोषित असल्यामुळे ‘स्त्री’चा अभ्यास करायचा. त्या अभ्यासात स्त्री ही कर्ता (subject)असते, मात्र पुरुष नेहमी शोषक असल्यामुळे त्याच्या आत काहीतरी बिघाड आहे, त्याबद्दल बोलले पाहिजे, म्हणून ह्या अभ्यासात पुरुष कर्ता नाही तर वस्तू (object) असतो. ह्या दृष्टीतून ‘पुरुषत्व’, ‘पौरुष्य’ विषारी (toxic) असतं असे संकेत तयार झाले. त्यातून पुरुषांनी नवं (स्त्रीवादी) पुरुषभान आत्मसात करावं हा आपला हेतू तयार झाला. स्त्री अभ्यास करताना स्त्रीत्वसुद्धा विषारी असतं हे भान आलं तरी त्यावर कमी लक्ष केंद्रित केलं गेलं. नकळतपणे पुरुषांकडे आपण प्रबोधनाचे टार्गेट म्हणून पाहायला लागलो. पुरुषांनी चर्चेत सक्रिय व्हायचे मात्र स्वतःला नेहमी अपराधी भावनेतून पूर्वीचा शोषणकर्ता म्हणून किंवा पितृसत्तेचा निष्क्रिय बळी म्हणून पहायचे. तेव्हाच कुठे तो आपल्या चर्चेत सामील होऊ शकतो. ‘मला स्त्रियांचे शोषण करायला आवडते’ असे म्हणणाऱ्या पुरुषांना आपल्या चर्चांमध्ये आपण ‘वेडा’ ठरवू. किंबहुना ‘पौरुष्य अभ्यास’ आणि त्यातून निर्माण झालेल्या संस्था, पौरुष्य ह्या विषयाला समर्पित मासिके इत्यादी स्वतःला पितृसत्तेचे बळी म्हणून पाहणाऱ्या पुरुषांच्या सहभागाच्या आशेवरच उभ्या राहिल्या. पितृसत्ता पुरुषांच्या सहभागाशिवाय नष्ट होणार नाही ही समज त्यामागे होती. मात्र ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये पुरुष नकळतपणे स्त्रीवादी परिवर्तन प्रयोगाचे गिनिपिग होत गेले. जिथे पितृसत्तेत पुरुषांच्या संवेदनांना जागा नसते, त्यांना रडू दिले जात नाही, भावनिक होऊ दिले जात नाही त्याच्या अगदी उलट स्त्रीवादी चर्चेत त्यांनी स्वतःचे ‘मन’ मोकळे करावे, रडावे, संवेदना, भावना व्यक्त कराव्यात असे आवताण दिले जाते. मात्र स्वतःचे मन मोकळे करताना मीही पितृसत्तेचा बळीच आहे, जे काही शोषण मी केले तो भूतकाळ होता, आता मी तुमच्या परिवर्तन प्रयोगाचा गिनिपिग आहे अशीच पुरुषांची भूमिका असावी असे आपण स्त्रीवाद्यांना वाटत आले आहे. किंबहुना असेच ‘संवेदनशील’ पुरुष आता आपल्याला प्रेमी म्हणूनही आणि लैंगिक अर्थानेही जास्त आकर्षक वाटू लागले आहेत.

पुरुषाने विषारी पुरुषत्व सोडावं, त्याला नवं पुरुषभान यावं या इच्छेमागे एक ‘मन’सुबा कार्यरत आहे. पुरुषांनी त्यांच्यातला पुरुष हा पूर्णपणे नष्ट करू नये असेच आपल्याला अजूनही कुठेतरी वाटते. कारण शेवटी आम्हाला पुरुष हवे आहेत. त्यांनी संवेदनशील व्हावं, पण ‘पुरुष’ नावाचा जो सामाजिक, सांस्कृतिक साचा आहे, त्यातून त्याने बाहेर येऊ नये. माझ्या नवऱ्याने समजूतदार, प्रेमळ आणि स्त्रीवादी व्हावं, मात्र त्याने उद्या साडी आणि दागदागिने घालायला सुरुवात केली अर्थात त्याने जर सांस्कृतिक अर्थाने सुद्धा पुरुष होणं थांबवलं; त्यांचं चालणं, बोलणं, वागणं, त्याचा पोशाख, त्याची केशरचना, त्याचा मेकअप हे सगळंच बायकांसारखं झालं तर, तर ते मला चालणार नाही. थोडक्यात पुरुष एका मर्यादेपर्यंतच परिवर्तित झाला पाहिजे, थोडा पुरुष तो अजूनही उरला पाहिजे नाहीतर मला तो लैंगिक अर्थाने आकर्षक वाटणार नाही. ज्याअर्थी स्त्रियांना पुरुषांनी अजूनही थोडा पुरुष राखला पाहिजे असं वाटतं त्याअर्थी त्याही त्यांचं स्त्रीत्व पूर्णपणे सोडायला तयार नाहीत हे उघड होतं. स्त्रीवादाचंही स्वतःचं एक मन आहे, त्या मनाचीही लैंगिकता आहे आणि तिचं राजकारण आपल्याला बाहेरूनच म्हणजे मनोविश्लेषण (psychoanalysis) ह्या ज्ञानशाखेच्या दृष्टीतूनच दिसू शकेल. असा आंतरशाखीय अभ्यास मनःशांती नाही तर एकूणच शांतीसाठी महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

मानसशास्त्र आणि स्त्रीवाद ह्यांच्यात एक महत्त्वाचा समान धागा आपल्याला स्त्रीवादी अभ्यासक ज्युडीथ बटलर आणि मनोविश्लेषक जाक लाकान ह्यांनी लिंगभावावर केलेल्या मांडणीत सापडतो. ज्युडीथ बटलर म्हणते - लिंगभाव हे नैसर्गिक नाही तर एक सामाजिक रचित (social construct) आहे. माणसाच्या जन्माच्या वेळी त्याचे लिंग ठरवले जाते कारण माणूस लिंगभावाची चौकट पाळणाऱ्या समाजात जन्म घेतो. लिंग आणि लिंगभाव दोन्ही सामाजिक, सांस्कृतिक साचे आहेत जे आपण समाजात जगण्यासाठी आत्मसात करतो. आपले लिंग आणि लिंगभाव ‘पुरुष’ ठरवले गेले असेल तर त्या साच्यात बसणारी भूमिका आपण शिकतो, तिला आखून दिलेले नियम (पोशाख, देहबोली, सत्ता इत्यादी) पाळत वठवू लागतो. म्हणून बटलर पुढे म्हणते की लिंगभाव हा performance म्हणजे नाटक असतो. ह्याचा एक महत्त्वाचा अन्वयार्थ आपण असा लावू शकतो की लिंगभाव नाटक असतो म्हणजेच तो सत्य नसतो. मनोविश्लेषक लाकानही लिंगभावाची हीच समज एका प्रक्षोभक विधानातून अधोरेखित करतो. तो म्हणतो - स्त्री अस्तित्वात नसते, woman does not exist.

हा समान धागा असला तरी त्याचा स्त्रीवादी चर्चेत आणि लाकानच्या मांडणीत निराळा प्रवास करतो. बटलरच्या मांडणीत दोन गोष्टी पुढे येतात, एक म्हणजे माणूस हा लिंगभाव राजकारणातच जन्माला येतो. इथे लिंगभावाला पर्याय नसतो. लिंगभाव ही एक संहिता आहे आणि त्या संहितेतच आपला जन्म होतो. दुसरे म्हणजे लिंगभाव संहितेला पर्याय नसला तरी माणूस लिंगभावाची भूमिका वठवताना एक सक्रिय कर्ता म्हणून त्या भूमिकेला improvise करतो, तिच्यात थोडेफार बदल आणि फेरफार करत वठवतो. माणसाच्या ह्या सक्रिय सहभागात, त्याच्या बुद्धीत बटलरला सकारात्मक राजकारणाची शक्यता दिसते. आपण इथे पारलिंगी व्यक्तीचे उदाहरण घेऊ. पारलिंगी व्यक्तीची व्याख्या करताना आपण म्हणतो ‘जी व्यक्ती जन्माने पुरुष आहे पण जिला समाजाने तिच्यासाठी आखून दिलेला लिंगभाव मान्य नसतो आणि म्हणून जी तिचा लिंगभाव बदलते ती व्यक्ती म्हणजे पारलिंगी.’ इथे एक तर ‘जन्माने’ असे म्हणणे सोडून दिले पाहिजे, कारण लिंग आणि लिंगभाव दोन्ही सामाजिक रचिते असतील तर कोणी जन्माने स्त्री किंवा पुरुष कसा असेल? सामाजिक संहितेत ज्याला पुरुष ठरवले गेले त्याने जर त्याला देऊ केलेल्या साच्याचे नियम बदलले, त्यामध्ये दुसऱ्या साच्याच्या गोष्टी मिसळल्या तर तो पारलिंगी स्त्री (transwoman)! तसेच सामाजिक संहितेत जिला स्त्री ठरवले गेले तिने जर दोन साच्यांची सरमिसळ केली तर ती पारलिंगी पुरुष (transman). आता बटलरच्या मते जेव्हा ‘समाजमान्य पुरुष’ त्याच्या साच्यातले नियम झुगारतो आणि स्त्रियांसारखा वागू लागतो (पोशाख, केशरचना, मेकअप, देहबोली, भाषा इत्यादी) तेव्हा ही पारलिंगी ओळख समाजातील लिंगभाव राजकारणाला एक छेद देते आणि मुक्तिदायी राजकारणाची वाट सुरु करते.

बटलरच्या सिद्धांताला एक मर्यादा आहे, ती म्हणजे माणूस जेव्हा साच्यांची अदलाबदल किंवा सरमिसळ करतो तेव्हा मूळ साचे तसेच राहतात. पुरुष जेव्हा पारलिंगी स्त्री होतो किंवा स्त्री जेव्हा पारलिंगी पुरुष होते तेव्हा मूळ ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ हे साचे तसेच राहतात. स्त्री-पुरुष साचे तसेच राहिले तर लिंगभाव राजकारणही राहतं, संहितेत थोडे फेरफार केले तरी संहिताही राहतेच. बटलरच्या मांडणीतील पारलिंगी व्यक्ती मूळ साच्याच्या, संहितेच्या ‘पार’ जात नाही. बटलरला वाटतो तो सक्रिय, बुद्धिवान कर्ता खरं तर मूळ साच्यांचा अजूनही गुलामच असतो.

स्त्रीवादामध्ये सिमॉन दे बुवाचे एक वाक्य प्रचलित आहे - One is not born a woman, one becomes a woman. हे वाक्य मुद्दाम इंग्रजीत देत आहे कारण अनेकवेळा आपण ह्याचे चुकीचे भाषांतर केले आहे, आपण घाईघाईत असे म्हणत आलो आहोत की, ‘कोणी जन्माने स्त्री नसते तर तिला स्त्री बनवले जाते’. बुवाच्या वाक्यातील ’becomes’ हे क्रियापद अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण समाज मला स्त्री बनवत असला तरी ‘मी’ही स्त्री होते. बटलरला इथे एक सकारात्मक राजकारणासाठी हवा असलेला सक्रिय कार्यकर्ता अजून दिसत नाही कारण इथे समाज म्हणतो तशी मी स्त्री होत आहे. पण बटलर ज्या पारलिंगी व्यक्तीचे कौतुक करते तिच्याबाबतीतही हे म्हटले पाहिजे की कोणी व्यक्ती जन्माने स्त्री नसते, ती स्त्री होते. तसेच कोणी व्यक्ती जन्माने पुरुष नसते, ती पुरुष होते. तसेच कोणी जन्माने पारलिंगी नसते, ती पारलिंगी होते. ही वाक्ये एकत्र आल्यावर लक्षात येते की केवळ पारलिंगी होण्याने मी मुक्तिदायी राजकारणाचा सक्रिय कर्ता होत नाही, किंबहुना मी अजूनही लिंग आणि लिंगभाव संहितेचा गुलामच आहे कारण भूमिका थोडी वेगळी दिसत असली तरी माझं नाटक अजूनही चालूच आहे.

नाटक आणि सत्य ह्या दोन निराळ्या गोष्टी आहेत. मुक्तिदायी राजकारणासाठी स्त्रीवादाला लिंगभाव नावाच्या नाटकाच्या पलीकडे जाऊन सत्य शोधावे लागेल. त्यासाठी बुवाच्या मांडणीतून उद्भवणाऱ्या काही मूलभूत प्रश्नांचे चिंतन केले पाहिजे. ते प्रश्न असे की स्त्री किंवा पुरुष होण्याचा निर्णय घेणारा ‘मी’ कोण आहे? ‘मी’ स्त्री, पुरुष किंवा पारलिंगी होण्याचा निर्णय का घेतो? हा निर्णय एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, माझ्या बुद्धीचा की माझ्या चलाखीचा परिणाम आहे? ही माझी चलाखी असेल तर असा खोटेपणा करायची ‘मी’ला का गरज भासते? सगळ्यात शेवटी हे ‘स्त्री’, पुरुष किंवा पारलिंगी होणे जर खोटेपणा आहे तर सत्य काय आहे? ह्या सत्याचा शोध घ्यायचा असेल तर मनातल्या ह्या निर्णयप्रक्रियांचा अभ्यास केला पाहिजे. आपण जेव्हा खोटे बोलतो तेव्हा सत्य लपवत असतो? हे सत्य आपण मनात लपवतो, मनात ठेवतो. मग मनाचा खोटेपणा उघड केला तर मनाचे विकार दूर व्हायलाही मदत होईल, नाही का?

अशा सत्यशोधासाठी जाक लाकानची एका मनोविकारावरील विशिष्ट मांडणी आपल्याला उपयोगी पडू शकेल असे वाटते. त्याआधी ह्या एका मनोविकाराची कल्पना यावी म्हणून एका लेखात सांगितलेली एका मनोरुग्णाची खरी गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे जेम्स नावाच्या 24 वर्षांच्या एका तरुणाची. जेम्स हा त्याच्या मानसोपचारतज्ज्ञाकडे मनःशांतीसाठी आला होता. त्याचं मन अशांत, खूप गोंधळलेलं आणि अस्वस्थ होतं. त्याच्या मानसिक अस्वस्थतेला कारण होते त्याला नुकतीच स्वतःबद्दल कळलेली माहिती! त्याच्या बायकोला एक दिवस घरातल्या अडगळीत त्याची क्रेडिट कार्डची बिलं सापडली. त्यात तिला जेम्सने एका अनोळख्या बाईसाठी महागड्या वस्तूंवर केलेला अवाढव्य खर्च लक्षात आला. जेम्सला ही माहिती कळली तेव्हा तो गोंधळला, कारण त्याला ना त्या खर्चाची आठवण होती ना त्या अनोळख्या बाईची! आधी जेम्सच्या बायकोला तो धादांत खोटं बोलतोय असे वाटले. पण त्याच्याच सांगण्यावरून त्या दोघांनी त्या बाईचा पत्ता शोधून काढला. त्या बाईने सांगितले की जेम्स आणि तिच्यात दोन वर्षांपासून प्रेमाचा संबंध चालू आहे. ते दोघे आठवड्यातून अनेकवेळा भेटतात, फिरायला जातात, जेम्स तिच्यासाठी भेटवस्तूही विकत आणतो वगैरे वगैरे. जेम्सला यातलं काहीही आठवत नव्हतं. त्या बाईने असेही सांगितले की जेम्स रोज रात्री 3 च्या दरम्यान तिच्यासोबत ऑनलाईन गप्पा मारतो. जेम्सला हे खोटे वाटत होते. त्यानेच सुचवल्यावर त्याने आणि त्याच्या बायकोने त्याचा कम्प्यूटर उघडला. कम्प्यूटरमध्ये जेम्सने त्या बाईसोबत मारलेल्या गप्पांचा सगळा इतिहास होता. त्या गप्पांमध्ये जेम्सचे वर्तन, त्याची भाषा इतकी अश्लील होती, की त्याचा विश्वास तर बसत नव्हताच परंतु त्याला त्या भाषेची किळसही वाटत होती. मात्र हे सगळे पुरावे पाहून जेम्सला ह्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. ह्याचा त्याच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला. त्याला स्वतःचा राग येऊ लागला, तो स्वतःचा द्वेष करू लागला, त्याचा स्वतःवरचा विश्वासच उडाला. त्याला एवढं कळत होतं की जे काही घडलं ते त्याच्या नकळत घडलं. त्या घटनांमध्ये तो होता पण जेम्स नव्हता. कारण जेम्स तर चांगला माणूस आहे, सभ्य आहे, बायकोवर त्याचं खूप प्रेम आहे, नेहमी खरं बोलणारा आहे. त्या घटनांमध्ये तो असूनही तिथे जेम्स नक्की नव्हता अशी खात्री पटल्यामुळे त्याला स्वतःचीच भीती वाटू लागली. आपल्या नकळत आपल्या हातून कधी काय घडेल हे सांगता येत नाही म्हणून त्याची भीती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. घराच्या दाराची बेल वाजली की त्याला वाटे कोणीतरी त्याच्या कुठल्यातरी दुष्कृत्याची तक्रार करायला आलं असेल. त्याच्या ह्या मानसिक अस्वस्थेतेचा परिणाम त्याच्या शरीरावरही होऊ लागला होता. त्याचे सतत डोके दुखत असे, त्याचा श्वास गुदमरल्यासारखा होत असे आणि अस्वस्थता शिगेला पोचली की त्याला आत्महत्या करावीशी वाटे.

जेम्सच्या मानसोपचारतज्ज्ञाने मानसशास्त्रातील अभ्यासाचा आधार घेत जेम्सला ‘बहुव्यक्तित्व’ म्हणजे आधी ज्याला multiple personality disorder आणि आता dissociative identity disorder म्हणतात तो मनोविकार झाला आहे असे निदान केले. असा मनोविकार झालेल्या व्यक्तींच्या मनामध्ये कधी कधी एक किंवा अनेक व्यक्तिमत्वं घर करतात. काही मनोरुग्ण त्यांच्या मनातील व्यक्तींशी नुसतेच संभाषण करतात तर काही मनोरुग्ण हळूहळू निरनिराळ्या वेळी त्यांच्या मनातील वेगवेगळ्या व्यक्ती होतात, त्यांच्यासारख्या बोलू लागतात, वागू लागतात.

आता, एखादी व्यक्ती मनोरुग्ण आहे हे कसे ठरवले जाते? आपल्या दैनंदिन भाषेतून ह्याचा विचार करूया. मनोरुग्णांना सामान्य माणसं ‘वेडा’ म्हणतात. वेड्याची आपल्या मनातील व्याख्या ही आहे की वेडा तो आहे जो शहाण्यासारखा वागत नाही. इंग्रजीत आपण मनोरुग्णांना 'abnormal' असा शब्दही वापरायचो. ह्या शब्दामुळे आपल्याला शहाणपणाची व्याख्या काय असेल ते कळते. शहाण्यासारखे वागणे म्हणजे नॉर्मल वागणे. नॉर्मल हा शब्द norm ह्या शब्दापासून आला आहे. Norm म्हणजे नियम. नियमानुसार वागणं म्हणजे शहाणपण. परंतु कोणते नियम? तर मला माझी ओळख तयार केली पाहिजे, मी कोण आहे, माझी लिंग ओळख, लिंगभाव ओळख, माझे नाव, माझे आडनाव, नावात दिसणारी माझी जात, माझा धर्म, माझी शैक्षणिक ओळख, माझी कार्यक्षेत्रातील ओळख ह्या सगळ्या ओळखींच्या साच्यांमध्ये मी मला बसवलं पाहिजे, त्या साच्यांचे नियम पाळले पाहिजेत, नियम पाळले म्हणजे ओळखीचे सातत्य राखले जाते आणि त्यामुळे ‘मी’चे सातत्य जपले जाते. लिंगभाव ओळखीच्या बाबतीतच बोलायचे झाले तर मी आज पुरुष, उद्या बाई, परवा पारलिंगी, तेरवा अजून काही अशा सतत ओळखी बदलत राहिलो आणि निरनिराळ्या ओळखीनुसार माझी भाषा, माझी देहबोली, माझा पोशाख, माझं चरित्र इत्यादी बदलू लागलो तर मला वेड लागले आहे असे लोक नक्कीच म्हणू लागतील. हल्ली मानसशास्त्रात 'abnormal' हा शब्द वापरला जात नाही. मनोविकारांना mental disorder किंवा mental disability असे म्हटले जाते. परंतु तुम्ही कितीही गोड शब्द वापरले तरीही disorder किंवा disability ठरवताना आपली order आणि ability ची व्याख्या काय आहे हा प्रश्न पडतोच.

मनोरुग्णांच्या बाबतीत अजून एक विधान केलं जातं ते म्हणजे त्यांना वास्तवाचं ‘भान’ नसतं. ह्या विधानामध्ये वास्तवाची व्याख्या काय असते? नॉर्मल मधला नॉर्म, disorder मधली order, disability मधली ability, वास्तवाचं भान यातील वास्तव ह्यांच्या व्याख्या ह्या नैसर्गिक नसून सामाजिक आहेत, सांस्कृतिक आहेत. इथे एक मजेशीर गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे मानसशास्त्रात आधी पारलिंगी किंवा समलिंगी इत्यादी लोकांकडेही मनोरुग्ण म्हणून पाहिले जात होते. हे नमूद करण्याचं कारण इतकंच की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शहाणपणाच्या सीमारेषा, त्याचे नियम हे सामाजिक आहेत आणि ते नियम कालांतराने बदलण्याची शक्यताही आहे. म्हणजे आज ज्याला आपण मनोविकार म्हणतोय त्याला आपण भविष्यात निराळ्या दृष्टीने पाहू यात शंका नाही.

जेम्सच्या केसमध्ये त्याच्या मानसोपचारतज्ज्ञाने फ्रॉईडच्या सिद्धांतांचा आधार घेऊन त्याच्या मनाच्या खोलात काय दडून ठेवले आहे त्याची शोधाशोध सुरू केली. अनेक समुपदेशनाचे सेशन केल्यावर जेम्सच्या अवचेतन (subconscious) मनातील भूतकाळातील, मुख्यतः बालपणीचे आघात (trauma) उघड झाले. जेम्सचे वडील त्याच्या आईचा खूप शारीरिक छळ करीत असे. हा त्याच्या आईला वाचवायला गेला तर त्याचे वडील त्यालाही घाण घाण शिव्या देत आणि मारत असे. पुढे कधीतरी त्याला त्याच्या वडलांच्या एका वेश्येसोबत चालू असलेल्या संबंधांची माहिती मिळाली. वडील तिच्यावर खूप पैसे उधळत असे वगैरे वगैरे. त्याला त्याच्या वडलांचा, त्यांच्या हिंसेचा, शिव्यांचा, चरित्राचा इतका राग येऊ लागला होता की द्वेषाचे रुपांतर खुनात होईल की काय याची त्याला भीती वाटत असे. एक दिवस त्याचे वडील खूप आजारी पडले आणि शेवटी त्या आजाराने त्यांचा मृत्यूही झाला. तेव्हाही जेम्सच्या मनात ‘आपण वडलांबद्दल असं बरं-वाईट मनात आणायला नको होते’ अशी अपराधी भावना बोचत राहिली होती. जेम्सच्या केसवरील फ्रॉईडचे मनोविश्लेषण हे म्हणते की जेम्सच्या मनावर झालेला वडलांच्या घटनांचा आघात त्याच्या मनावर मोठा परिणाम करून गेला. इतका की जेम्सने स्वतःची व्याख्या वडलांशी तुलना करत तयार केली. जेम्सला त्याच्या वडिलांसारखे मुळीच व्हायचे नव्हते असे त्याने स्वतःला सतत बजावले होते कारण त्याच्या वडिलांबद्दल त्याच्या मनातली भीती त्यांच्या मृत्युनंतरही नाहीशी झाली नव्हती. थोडक्यात जेम्सने समाजाला जसा एक चांगला पुरुष अभिप्रेत असतो तशी स्वतःची व्याख्या केली. ह्या व्याख्येत त्याचे वडील अर्थातच बसत नव्हते. शिवीगाळ करणे, हिंसा करणे, खोटे बोलणे, बायकोचा छळ करणे, विवाहबाह्य संबंध करणे इत्यादी गोष्टी त्याच्या मनातील चांगल्या व्यक्तीच्या नियमाचे उल्लंघन वाटत होते. ‘जेम्स’ होऊन जगणे म्हणजे शहाणपण आहे, त्याला सामाजिक मान्यता आणि आदरही आहे. त्याचे वडील त्याच्या लेखी वेडे होते म्हणून समाजातही त्यांना आदर नव्हता.

आता प्रश्न हा पडतो की जे जेम्सच्या मनाला मुळीच पटत नव्हते नेमके तसेच त्याचे मन का वागले? जेम्सच्या मनावर ह्या चांगल्या जेम्सच्या साच्याच्या नियमांचा इतका प्रभाव होता की त्याचे त्याला दडपणही येऊ लागले, तो स्वतःच स्वतःच्या चांगल्या वागण्याची परीक्षा घेत होता, कधी एखादी छोटी चूक झाली तरी तो स्वतःला माफ करत नव्हता, स्वतःला रागवत होता आणि नकळतपणे त्याचे वडील त्याला ज्या शिव्या द्यायचे त्याच शिव्या तो स्वतःला द्यायचा. कधी कधी त्याला याचे हसूही यायचे, की ‘अरे! शी! आपण आपल्या वडिलांसारखेच वागलो स्वतःशी!’ हळूहळू त्याला ह्याची मजा वाटू लागली. हळूहळू त्याच्या मनाला वडिलांच्या वागण्याचे आकर्षण वाटू लागले, एक ‘सुप्त’ आकर्षण! सामाजिक वास्तवात जेव्हा जेव्हा त्याला हतबल वाटायचे तेव्हा तेव्हा त्याला वडिलांच्या हिंसेत, शिव्यांमध्ये, बिनधास्त वर्तनात एक आकर्षक विद्रोह दिसायचा. कालांतराने त्याच्या मनाने नैराश्येच्या टोकाच्या क्षणांमध्ये वडिलांचे व्यक्तिमत्व तयार केले. जेम्स ह्या क्षणांमध्ये त्याचे वडील करायचे त्या सगळ्या गोष्टी करत होता मात्र नंतर त्याला ह्या गोष्टी आठवत नव्हत्या. बेहोशी किंवा निद्रावस्थेत केलेल्या गोष्टी होत्या त्या. भानावर आल्यावर ह्या गोष्टी तो विसरायचा कारण वास्तवाचं भान हे होतं की आपण जेम्स आहोत, आपण एक चांगला माणूस आहोत.

अनेक समुपदेशन सेशन्स झाल्यावर जेम्सला त्याचं निराळं व्यक्तिमत्व होणं आठवूही लागलं. जेम्सवर उपचार करताना त्याचा मानसोपचारतज्ज्ञ सातत्याने त्याला ह्याची आठवण करत राहिला की आपल्या मनाला खात्रीशीर पटलं आहे की आपण जेम्स आहोत, आपल्याला आपल्या वडिलांसारखे व्हायचे नाहीये, आपण स्वतः हा निर्णय घेतला आहे तेव्हा वडिलांसारखे वागणे म्हणजे आजार आहे, जेम्स हे वास्तव आहे आणि ह्या वास्तवात आपण जगलो तरच आपलं मन निरोगी राहील. गोळ्यांच्या आणि समुपदेशनाच्या मदतीने जेम्स हळूहळू बरा झाला. बरा झाला म्हणजे त्याला बरं वाटू लागलं. त्याची भीती कमी झाली, त्याच्या मनातले त्याचे भास कमी झाले. हळूहळू तो शहाण्यासारखा वागू लागला म्हणजे जेम्ससारखा! जेम्सच्या गोष्टीला एक नवी कलाटणी अशी मिळाली की एवढं सगळं करूनही जेम्सचा मनोविकार पुन्हा पुन्हा परत येऊ लागला.

म्हणून जेम्सच्या गोष्टीकडे लाकानच्या नजरेतून पाहणे गरजेचे आहे. लाकानच्या मते ‘बहुव्यक्तित्व’ ही अवस्था मनाने केलाला समाजमान्य ओळखीचा भंग (rupture) असतो. लाकान आपल्याला पुन्हा आठवण करून देतो की माझ्या मनातले व्यक्तिमत्व मी दूर केले तरी माझी समाजमान्य वास्तवातील ओळख ही सुद्धा एक कल्पित व्यक्तिमत्वच आहे. इथे personality ह्या शब्दातील persona ह्या शब्दाचा अर्थ महत्त्वाचा आहे, persona म्हणजे मुखवटा. म्हणजे समाज आपल्या ज्या ओळखीला, ज्या वर्तनाला, ज्या सातत्याला शहाणपण म्हणतो तोही एक मुखवटाच आहे. फरक एवढाच आहे की तो समाजमान्य आहे. स्त्रीवादामध्ये आपल्याला जसे ‘लिंगभाव एक समाजमान्य मुखवटा आहे’ असे समजले तसेच आपल्या सगळ्याच समाजमान्य ओळखीसुद्धा मुखवटाच आहेत हे समजले पाहिजे. माणूस ह्या समाजमान्य ओळखींच्या भूमिका वठवताना जेव्हा अयशस्वी होतो किंवा त्याला त्या भूमिका नकोशा होतात तेव्हा तो नैराश्येचे, हतबलतेचे असे टोकही गाठू शकतो जेव्हा तो स्वतःच त्याच्या मनामध्ये त्याला हवे तसे मुखवटे तयार करेल. म्हणून आपल्याला मन आणि समाज ह्यांचे द्वंद्व समजून घेतले पाहिजे. ओशो म्हणतात ‘मन म्हणजेच संसार!’. त्याच अर्थाने आपण म्हणू शकतो की मन अर्थात निरोगी मन म्हणजेच समाज. परंतु हे निरोगी मन आपलं सत्य नाही, हे निरोगी मन आपण ‘झालो’ आहोत. ह्या होण्याच्या (becoming) प्रक्रियेत समाजाची मान्यता आपल्याला हवी असते म्हणून आपण समाजमान्य ओळखी होतो हे राजकारण अधोरेखित केले पाहिजे.

एखादी ओळख (मग ती समाजमान्य असो किंवा वेडेपणाचे लक्षण म्हणून असो) होण्याचा निर्णय घेणारा ‘मी’ समाजात वावरणाऱ्या मीच्या मुळाशी आहे. ह्या ‘मी’ला आपण भान म्हणतो. आपण जेव्हा सायकल चालवायला शिकतो तेव्हा आपल्याला सायकल नीट चालवण्याच्या सगळ्या नियमांचे भान असते. कालांतराने सायकल चालवण्याचे तंत्र अवगत झाल्यावर हे तंत्र आपल्या अवचेतनेचे भाग होते तेव्हा आपण सहज सायकल चालवू लागतो. सायकल चालवण्याची सवय झालेली असल्यामुळे आता त्याचे भान राखायची गरज नसते. एखाद्या नियमाचे भान अशा तऱ्हेने सुटू शकते आणि अपघात होऊ शकतो. जेम्सच्या वडिलांची ओळख ही जेम्सच्या अवचेतनेचा भाग झाली असल्यामुळे ती ओळख एक सवय झाली आहे. ती कधीही अजाणत्या क्षणांमध्ये उफाळून वर येऊ शकते. सवयीप्रमाणे सायकल चालवताना अपघात होऊ शकतो, अपघात झाल्यावर लक्षात येतं की सायकल चालवताना माझं भान नव्हतं. अपघात नको असतील तर भान हवे, हेच उत्तर आहे. मला जर सायकल अपघात न करता चालवली पाहिजे हे पटले असेल तर मी ठरवून भान ठेवूनच सायकल चालवीन. लाकानच्या मांडणीत तो मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोरुग्ण दोघांना विश्लेषक म्हणून पाहतो. तथाकथित मनोरुग्णाच्या भानाला साद घालत त्याच्या गोष्टीचे विश्लेषण करायला जमले तर तो त्याच्या मानसिक अपघाताकडे तटस्थपणे पाहायला शिकेल आणि स्वतःच समाजातील त्याच्या जगण्यात एक सम्यकता, एक तारतम्य, एक नियंत्रण आणू शकेल.

लाकान मनाची व्याख्या करताना म्हणतो की माणसाला जेव्हा लहानपणी पहिल्यांदा त्याच्या स्वतंत्र ओळखीची व्याख्या मिळते तेव्हा त्याच्या भानामध्ये एक मूलभूत दुभंगलेपण जन्माला येते. उदाहरणार्थ इतर लोक जेव्हा लहानपणी आनंदाने आरशातली माझी छबी दाखवत माझ्या ओळखीची खूण पटवून देतात तेव्हा समाजाने केलेला माझ्या अस्तित्वाचा आनंद मलाही सुखावून जातो. मात्र त्याच क्षणी माझ्या भानामध्ये ‘आरशात दिसणारा हा कोण आहे?’ ही पालसुद्धा चुकचुकते. लोक ज्याप्रमाणे माझ्या ‘मी’ची खात्री देतात तशी खात्री मी माझ्यात अनुभवत नसतो. परंतु अशा क्षणांमध्ये माणसाचा मी एक निर्णय घेतो, हा आतला शंका करणारा मी आणि इतरांना वाटणारा मी हे दोन्ही व्यक्तित्व आपले सत्य आहे, आतल्याला नियंत्रित करत राहायचे आणि बाहेरच्याला यशस्वीपणे वठवत राहायचे. जेवढे समाजमान्य चौकटीत चालते तेवढेच व्यक्त व्हायचे, बाकीचे मात्र आपल्या आतच साठवत राहायचे. आपल्या आत तयार होणाऱ्या ह्याच संचिताचे अवचेतन तयार होते. जेव्हा जेव्हा आपण समाजाच्या नियमांना झुगारतो किंवा त्यांच्यामुळे निराश होतो, हतबल होतो तेव्हा तेव्हा आपले मन अस्वस्थ होते. ह्या नैराश्येचे टोक काहीही होऊ शकते, कधी आत्महत्या तर कधी ‘बहुव्यक्तित्व’. स्त्रीवादी दृष्टिकोनातून पुरुषांच्या मनःशांतीसाठी ‘नवं पुरुषभान’ नाही तर केवळ भान आले पाहिजे. आणि हे भान केवळ पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना, पारलिंगी व्यक्तींना, सगळ्यांनाच आले पाहिजे. शांती, समता, करुणा, माणुसकी, चांगुलपणा ही नैतिकता समाजमान्य नियम म्हणून लादले जाऊ नयेत. ही नैतिकता आपल्यालाच आपल्या भानातून सापडली पाहिजे तेव्हाच ती टिकू शकेल. नाहीतर स्त्रीवादी पुरुषसुद्धा नैराश्येच्या टोकाच्या क्षणांमध्ये आत्महत्याही करू शकतो, हिंसाही करू शकतो. विचारसरणीला मनोविश्लेषणाची जोड देणं आज अत्यंत गरजेचे आहे.

गौतम बुद्धाच्या धम्मपदाचेही हेच म्हणणे आहे. बुद्ध आता मानसशास्त्रालाही साद घालू लागला आहे. बुद्धिस्ट मानसशास्त्र ही ज्ञानशाखाही आता प्रचलित होऊ लागली आहे. धम्मपदात बुद्ध म्हणतो, ‘मी’ माझ्या विचारांची कल्पना आहे. मी म्हणजेच मन. ‘मी’ आणि ‘मन’ दोघेही रचिते आहेत. म्हणून बुद्ध अनात्ताची संकल्पना मांडतो. निरोगी जगण्यासाठी किंवा दुःखाच्या निर्मूलनासाठी ‘मी’ आणि ‘मन’ ह्या दोन्ही असत्यांकडे तटस्थपणे पाहायला शिकले पाहिजे. हा पाहणारा मी माझे भान आहे, ज्याला बुद्ध साक्षीभाव म्हणतो. लाकानने मानसोपचाराच्या पद्धतींवर आरोप केला होता की ह्या पद्धती समाजातील दुकाने चालू ठेवण्यासाठीचे एक दुकान आहे. मानसशास्त्राने माणसाला समाजमान्य शहाणपणाच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न न करता, तथाकथित (सामाजिक) वास्तवाचं (?) भान न देता, माणसाला भानावर आणण्याचे काम केले पाहिजे. जसे मानसशास्त्राने भानावर यायची गरज आहे तसेच स्त्रीवादाला आणि पौरुष्य अभ्यासालाही भानावर यायची गरज आहे. पुरुषातला पुरुष उरताच कामा नये, कारण ‘पुरुष’ मनाची कल्पना आहे, मनोरा आहे, मनघडंत कहाणी आहे. स्त्रीतलीही स्त्री उरू नये. शेवटी सर्वांनाच आपल्या सगळ्याच ओळखींचे, त्यांच्या बाहेरील आणि आतील राजकारणाचे, असत्याचे तटस्थपणे आणि साक्षीभावाने भान यावे हीच मनापासून इच्छा!