पाण्याची खरमरीत बौद्धिक

१२ फेब्रुवारी २०२६

“पाण्याशप्पथ भाग २" या प्रदीप पुरंदरे यांच्या पुस्तकाचा परिचय करून द्यायचा म्हणून पुस्तकातली नुसती शीर्षके जरी द्यायची म्हटलं, तरी त्याची शब्दसंख्या सहज हजारच्या पुढे जाईल. या पुस्तकात पुरंदरे यांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक करणारी नंदा खरे यांची प्रस्तावना आहे. पुस्तकात एकूण १५ प्रकरणे असून उपप्रकरणे लक्षात घेता ती एकूण ४२ होतात. यात पुरंदरे यांनी पाणी या विषयासंदर्भात लिहिलेल्या २०१७ ते २०२० या कालावधीतील निवडक लेखांचा समावेश करण्यात आल आहे. एका विषयावरील लेखन एकत्रित वाचता यावे म्हणून ते लेख उपप्रकरण या पद्धतीने आले आहेत. या लेखांना सर्व प्रमुख नियत – अनियतकालिके, पत्रके, वर्तमानपत्रे यातून आलेले असून पुस्तकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा (अमेरिका) पुरस्कार कुठल्याही अर्जाशिवाय मिळालेलं आहे, हे विशेष.

पाणी प्रश्न कायम राहण्यासंदर्भात अनेक बाबी महत्वाची भूमिका बजावतात. भांडवलशाही आणि सरंजामशाहीची युती, सिंचन घोटाळे, असमान वा अन्याय पाणीवाटप, नव्या काळाची आव्हाने समजून न घेणं, कायदयांबाबत अनभिज्ञता, संकल्पनेतच अस्पषटता, अंमलबजावणीतल्या त्रुटी, अर्धवट कामे, अधिकारी न नेमणे, वस्तु म्हणून पाण्याची बोली लावणे, पाण्याचे सौदे, पाणीपट्टीचे गरजेपेक्षा मागणीला महत्व, बाटलीबंदमुळे वाया जाणे, खाजगीकरण, बाष्पीभवन जास्त दाखवून चोरी होणे, नव्या भव्यदिव्य खर्चीक योजना, प्रादेशिक वाद, देखभाल – दुरूस्तीचा अजेंडा नाही, नद्यांचे भयावह प्रदूषण, बदलेलं केंद्र – राज्य संबंध, हवामान बदलाचे संकट, अमर्याद असं क्षेत्र, त्यासाठी कालव्यांचा वापर, धरणात पूर्व नियोजनाची योग्य तरतूद नसणे या बाबींचा उदाहरणादाखल उल्लेख करता येईल. व्यवस्था दोष, देखभाल – दुरुस्तीकडे दुर्लक्ष, अनियमितता, जल कारभाराचा अभाव, अकार्यक्षमता यांचाही यात समावेश होतो.

आणखी काही गोष्टींचा लेखक विशेष उल्लेख करतो. सिंचन घोटाळ्यावर कारवाई म्हणजे कायद्याची अंमलबजावणी, पाण्याचे विश्वासार्ह हिशोब, बिगर सिंचनाकरता शेतीचे पाणी वळवण्यावर निर्बंध, प्रकल्पांचे व्यवस्थापन याचा समावेश होतो. पाणी कमी लागणाऱ्या आणि चांगला बाजारभाव देणाऱ्या उत्तपन्नावर भर देणे तसेच डाळी, तेल बियांचे भाव वाढवणे आवश्यक. शेतकऱ्यांनी वृक्ष लागवड, सौर ऊर्जा, सौरपिके याकडे लक्ष द्यायला हवे, आठमाही सिंचन आवश्यक, रब्बी पिकांना पाणी पुरवल्यावर ते उन्हाळी पिकांना द्यावे, उसाला नव्हे. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी विविध योजना करण्यामध्ये लोकसंख्या नियंत्रण, मृदुसंधारण, पाण्याचा फेरवापर वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण, पीकरचनेतील बदल या गोष्टींचा अंतर्भाव करण्यास लेखकाने सुचवले आहे. जललेखामध्ये पाणी नियंत्रण, नियमन, वॉटरमीटर, विश्वासार्ह नोंदी आवश्यक आहेत. या सर्वांमागे लेखकाचा भक्कम अभ्यास आहे. तो प्रत्यक्ष क्षेत्रावरचा, कागदपत्रे – कायद्यांचा अचूक संदर्भासाठी त्यांनी साठपेक्षा अधिक पुस्तके पालथी घातली आहेत. १८८३ पासून म. फुलेंसारख्या माणसाने शेतकऱ्याला पुरेसे पाणी मिळावे म्हणून सूचना केलेल्या दिसतात म्हणजे दुर्लक्ष तेव्हापासूनच होत आले आहे असे म्हणण्यास वाव आहे.

प्रस्तावनेमध्ये नंदा खरे म्हणतात, “पाण्याची वाफ होऊन मग ते पाणी हिम स्वरूपात परत मिळते, हे आपण लहानपणी शिकतो. वनस्पतीसुद्धा भूजल शोषून जास्तीचे पाणी हवेत सोडतात. भारत पाण्याबाबत आत्मघातकी झाला आहे. महाराष्ट्रातला सगळा जलअडाणीपणा, आत्मघातकीपणा सातत्याने लोकांपुढे मांडत बौद्धिक स्वातंत्र्य आणि सचोटी राखणारे, जपणारे (समविचारी, ज्ञानप्रसारक) एक महाभाग पुण्यात आहेत; प्रदीप पुरंदरे नावाचे.” अशा गौरवोद्गारांचा पुरंदरे यांना अभिमान वाटतो.

पुस्तक तज्ञासाठी, विद्वानांसाठी किंवा योजना करणाऱ्यांसाठीच नव्हे तर प्रत्येक सर्वसामान्य माणसासाठी आहे.