स्त्रीपुरुषांच्या सममूल्यतेचे ‘मानवसत्ताक’
.png)
माध्यमांतर ज्येष्ठ विचारवंत यशवंत मनोहर यांनी स्त्री-पुरुष समतेचा मुद्दा साध्या आणि अगदी स्पष्ट भाषेत प्रभावीपणे मांडला आहे. निसर्गानं स्त्री-पुरुषांना परस्परपूरक स्थान दिलं असलं तरी समाजरचनेतून निर्माण झालेल्या चातुर्वर्णाधिष्ठित पुरुषसत्ताक रचनेमुळे विषमता कशी निर्माण झाली, हे आपल्याला दाखवून देतात. त्याच्या तुलनेत भारतीय संविधानावर आधारलेलं मानवसत्ताकच खऱ्या अर्थानं न्याय आणि समता देणारं तत्त्व आहे, असंही ते ठामपणे मांडतात. हा लेख वाचकांना त्यांच्या सामाजिक जाणिवा वाढवून संवैधानिक मूल्यांची कास धरत समतेकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करेल असा विश्वास वाटतो. (पुरुष उवाच दिवाळी 2024 मधून साभार.)
स्त्री आणि पुरुष ही परस्परपूरक स्वातंत्र्ये निसर्गातूनच उगवली. या स्वातंत्र्यांनी सामंजस्याचा वा शहाणीवेचा हात सुटू दिला नाही तर ही स्वातंत्र्ये परस्परसंवर्धकच होत राहतात. ही स्वातंत्र्येच मग माणूसमयतेचा नवनवा सौंदर्याविष्कार ठरतात.
कोट्यवधी वर्षे पृथ्वी स्त्रियांशिवाय आणि पुरुषांशिवायच होती. माती होती, पाणी होते, प्रकाश होता, हवा होती. तरी या सर्वांनाही स्त्रीपुरुष माहीतच नव्हते. परंतु त्यांच्याही नकळत वा त्यांची अनुमती न घेताच, त्यांच्यातूनच सजीवांची निर्मिती होत गेली. त्यातून उत्क्रांती मार्गाने मानवप्राण्यांची निर्मिती होत गेली. सजीवांमध्ये नर आणि माद्या होत्याच. तशा या त्यांच्यातूनच उत्क्रांत झालेल्या मानवी प्राण्यांमध्येही होत्या. इथपर्यंतचा काळही आपल्या अंदाजात बसणार नाही एवढा प्रदीर्घ आहे.
या मानवी नरमाद्यांना पुढे स्त्री-पुरुष म्हटले गेले. स्त्रीपुरुष हे नुसते शब्द नाहीत. ती दोन पायाभूत निर्मितीशील तत्त्वे आहेत. मानवी जीवनाची सुरुवात आणि आजवरच्या विकासाचे विराट या दोन तत्त्वांच्या पोटीच जन्माला आले. त्यांच्यात शारीरपातळीवरचा थोडा पण जीवनसर्जक वेगळेपणा आहे. तो विरोध नव्हे. ती विषमताही नव्हे. ते द्वंद्वही नव्हे वा द्विपदांकितताही नव्हे. हे विषमताविहीन वेगळेपणच मानवी जीवनाच्या निर्मितीच्या मुळाशी आहे.
अनंतकाळापासून पृथ्वीवर स्त्रीपुरुष आहेत. स्थलपरत्वे त्यांच्या भाषा, पेहराव, अन्न, रीतिरिवाज वेगवेगळे आहेत, पण स्त्रीत्व आणि पुरुषत्व या पायाभूत गोष्टी इथूनतिथून सारख्याच आहेत. काळे आणि गोरे स्त्रीपुरुष आहेत. उंच आणि ठेंगणे स्त्रीपुरुष आहेत. काही स्त्रीपुरुष लठ्ठ वा सडपातळ आहेत. नाक, डोळे आणि आवाज याही पातळीवरचे वेगळेपण त्यांच्यात आहे. परंतु या सर्वच वैविध्यांनी नटलेल्या त्यांच्या सर्व वर्णनांमध्ये त्यांची स्त्रीमने वा पुरुषमने मावतच नाहीत. त्याच्या मूळ मानसघटना समानच असतात आणि बाकीच्या सर्व वैविध्यामधून त्याच व्यक्त होत असतात. या सर्व आविष्कारांमधून साकार होणारे मूलभूत भावनांचे मुद्दल सारखेच असते. झाडांना पानेफुले बदलता येतात. मुळे बदलता येत नाहीत. असेच मूलभूत भावनांचे आहे. मुळांचा वैविध्यपूर्ण आविष्कार म्हणजे झाडे तर मूलभूत भावनांचा वैविध्यपूर्ण आविष्कार म्हणजे स्त्रीपुरुष! गायींचे काळा, लाल वा पांढरा हे रंग वेगवेगळे पण दूध सारखेच असते तसे हे आहे.

सकल स्त्रीपुरुषांचे भावनिक मुद्दल सारखेच असते. त्यात भेदभाव नसतो, पण थोडा आणि मूलभूत वेगळेपणा वेठीला धरून स्त्रीपुरुष असा भेदभाव समाजातील वर्चस्वसत्ताक निर्माण करते. पुरुषसत्ताक प्रकृतितः वर्चस्वसत्ताकच असते आणि वर्चस्वसत्ताक हे शोषणसत्ताकच असते. ही सर्वच सत्ताके मालकपणाच्या लोभातून निर्माण होतात. मुळात निसर्गाच्या कुशीतून उगवलेले स्त्रीपुरुष असे नसतात. ती स्वातंत्र्ये म्हणूनच जन्माला येतात. त्यांचे वेगळेपण आवश्यकही असते आणि उपकारकही असते. त्यांच्यातील भेदभाव व वैषम्यभाव निसर्गातून उगवत नाहीत. विषमता व शोषण या गोष्टी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वर्चस्वसत्ताकाच्या डोक्यातून उगवतात. पुरुषी शोषणसत्ताकाला उपकारक स्त्री घडवली जाते आणि मूठभरांचे हे पुरुषी शोषणसत्ताक त्याला हस्तक्षेप करणार नाही अशा निर्विचार स्त्रीपुरुषांचेही निर्माण करते. त्यांना केंद्रापासून दूर परिघावर आणि परिघाबाहेर थांबवले जाते. जीवन असे द्विपदांकित आणि अनेक पदांकितही केले जाते. मालक-सेवक हे संबंध अबाधित केले जातात. म्हणजे पुरुषी शोषणसत्ताक बहुसंख्याकांच्या मुळातील स्वातंत्र्याचे रूपांतर पारतंत्र्यात करते. हा मालक आणि सेवक या सर्वांच्याच संस्कृतीचा मृत्युक्षण असतो.
निसर्गतः स्त्री पुरुषाइतकीच बुद्धिमान आहे. अफाट बौद्धिक क्षमता आणि साहस असलेल्या अनेक जीनीअस स्त्रिया जगाने बघितल्या आहेत, पण पुरुषसत्ताकाने केलेल्या भयंकर कोंडीमुळे तिचे जीनीअसपण खुरटले. यासाठी तिला पुरुषावलंबी केले गेले. ही तिच्या बौद्धिक क्षमतेची आणि स्वातंत्र्याचीच नाकेबंदी होती. स्त्री दुय्यम नाही. दुय्यमत्व घडवणाèया पुरुषीसत्ताकाच्या कार्यशाळेत तिला घडवले गेले आणि मढवले गेले. भारतातील चातुर्वर्ण्याधिष्ठित पुरुषसत्ताकाच्या जन्माचा क्षण पंच्याएेंशी टक्के स्त्रीपुरुषांच्या स्वातंत्र्याचा आणि माणूसमयतेच्या वाताहतीचाच क्षण होता.
सर्वसत्ताधीश आणि सर्वोच्चवर्णीय पुरुषसत्ताकाची रचना मनुस्मृतीत आहे. त्याचे बीजरूप वेदांमध्ये आहे. कर्मविपाक, चातुर्वर्ण्य आणि पवित्र विषमता हे या पुरुषसत्ताकाचे खलराजकारणच आहे. या पुरुषसत्ताकात पंचाऐंशी टक्के स्त्रीपुरुषांचा कुठे अंतर्भावच नाही. चातुर्वर्ण्य सर्वच स्त्रियांची आणि पुरुषांचीही उतरंडीतील मडक्यांप्रमाणे एकावर एक अशी उभी म्हणजे विषमस्तर (व्हर्टिकल) रचना करते.
या चातुर्वर्ण्याच्या पुरुषसत्ताकाआधी भारतात समस्तर (हॉरिझॉन्टल) वा समतोल समाज होता. तो समाज चातुर्वर्ण्यनियंत्रित पुरुषसत्ताकाला अजिबात मान्य नाही. या खल पुरुषसत्ताकाला सर्व पुरुषांचे एकसंध, एकमय पुरुषसत्ताक नकोच आहे. ते त्या पुरुषसत्ताकाच्या उद्दिष्टातच बसत नाही. हे पंचाऐंशी टक्के स्त्रीपुरुष चातुर्वर्ण्यनिर्मित पुरुषसत्ताकाच्या बाहेरच आहेत. चातुर्वर्ण्य केवळच स्त्रीपुरुष असे विभाजन नव्हते तर ते ब्राह्मणवर्णवर्चस्वावर उभारलेले पुरुषसत्ताक होते. बाकीच्या सर्वच स्त्रीपुरुषांना वेगवेगळ्या वर्णाजातींमध्ये विभागून त्यांच्यावर वर्चस्व गाजवणारे हे पुरुषसत्ताक होते. म्हणजे केंद्र, परिघ आणि परिघाबाहेर अशी ही रचना होती. या त्रिविध रचनेमध्ये स्त्री दुय्यमस्थानीच होती. स्त्री या रचनेत दुय्यम आणि मानसिकदृष्ट्या परिघावर आणि परिघाबाहेर होती. या पुरुषसत्ताकाने त्याच्या प्रस्थापनेसाठी आणि सर्वमान्यतेसाठी ईश्वर, ब्रह्म, कर्मविपाक, पूर्वपुनर्जन्म, स्वर्ग, नरक, परलोक, आत्मा, मोक्ष आणि अमृत अशा तद्दन खोट्या कथनांची निर्मिती केली. या सर्वच दहशतवादी कथनांनी स्वातंत्र्याचे, समतेचे, माणूसमयतेचे आणि सलोखासंस्कृतीचे उगमच बंद केले.
वर्चस्वमनस्कता, सत्तास्वामित्वता आणि मालकमनस्कता म्हणजे चातुर्वर्णी पुरुषसत्ताक! हे पुरुषसत्ताक सर्वत्र वेठबिगारांचीच निर्मिती करते. शूद्र परिघावर ठेवला जातो. अतिशूद्राला परिघाबाहेर ढकलले जाते, पण स्त्री केंद्रातही, परिघावरही आणि परिघाबाहेरही वेठबिगारच असते. आदिवासी, भटकेविमुक्त यांनाही या चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाने वेठबिगारच मानलेले असते. हे वेठबिगारपण असे दुर्बोध आहे की अनेकदा वेठबिगारांनाही ते कळत नाही.
हे सेवकत्व अनैसर्गिक आणि अन्याय्य आहे. हे सेवकत्व अपरिहार्य नाही हे कळत नाही तोवर हे वेठबिगारपण संपत नाही. पुरुषसत्ताकाचे मूठभर चलाख लाभार्थी सोडले तर स्त्रियांसकट सर्व पंचाऐंशी टक्के लोक सेवकच असतात. पुरुषसत्ताकाचा देश वेगळा असतो आणि पंचाऐंशी टक्के सेवकांचा देश वेगळाच असतो. आदिवासी, भटके-विमुक्त, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया हे चातुर्वर्णी पुरुषीसत्ताकाने मानवाधिकाराच्या सरहद्दीबाहेर फेकलेलेच लोक असतात.
वरील सर्वच समूहांमधील स्त्रियांचे दास्य मात्र दुहेरी असते. त्या पुरुषसत्ताकाच्या ‘ए’ टीमच्याही दास असतात आणि ‘बी’ टीमच्याही दास असतात.
काळाच्या ओघात चातुर्वर्ण्याच्या पुरुषसत्ताकाबाहेर असलेले पुरुष आणि स्त्रियाही या पुरुषसत्ताकाच्या कडव्या समर्थक झाल्या. मनुस्मृतीचे ऐकत त्यांनी त्यांचे पारतंत्र्य वृद्धिंगत करण्याचा महाउद्योग इतिहासात अनेकदा केला. वेदांमधून निर्माण झालेले चातुर्वर्णी पुरुषसत्ताक होते तसेच ‘मानवसत्ताकही’ भारतामध्ये होते. या स्वातंत्र्यसत्ताकाने स्त्रियांसह सर्वच पंचाऐंशी टक्के लोकांना चातुर्वर्णी पुरुषीसत्ताकाच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. सिंधुश्रमणसंस्कृतीमधील गणसत्ताके, या सत्ताकांचे लोकायत तत्त्वज्ञान, बुद्ध, बसवण्णा, जोतीराव फुले, शाहू राजे, बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान अशी मानवसत्ताकाची वा स्वातंत्र्यसत्ताकाची भारतीय परंपरा आहे. या सत्ताकाने रीझन आणि मोरॅलिटी यांची प्रस्थापना करण्यासाठी आणि सर्वच स्त्रीपुरुषांना चैतन्यवादी पुरुषसत्ताकाच्या तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मोठा संघर्ष केला. भारताचा इतिहास हा चातुर्वर्णी पुरुषसत्ताक आणि सममूल्यतावादी मानवसत्ताक यांच्यातील निर्णायक संघर्षाचाच इतिहास आहे.
मनुस्मृती हा चातुर्वर्ण्याचे पुरुषसत्ताक पवित्र आणि चिरंतन करणाराच प्रकल्प आहे तर हे पुरुषसत्ताक नाकारणारी सिंधुश्रमण गणसत्ताकापासून चालत आलेली हिंदू कोडबिल, संविधान ही भारतीय परंपरा आहे. हा प्रकल्प चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाच्या निर्मूलनाचाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाला मी एकूणच पुरुषांच्या आणि स्त्रियांच्याही माणूसमयतेचे व्याकरण मानतो. स्त्रीपुरुषांमधील सभ्य संबंधांची सर्वश्रेष्ठ नीती मानतो. या संदर्भात अभारतीय चातुर्वर्णीय पुरुषसत्ताकाच्या तुलनेत संविधानात वास्तव्याला असलेले भारतीय मानवसत्ताक वा सममूल्यतासत्ताक समजावून घेण्याची आता नितांत गरज आहे. हे झाले तरच सर्वांच्याच सममूल्यतेचे निरुपाधिक मानवसत्ताक निर्माण होईल.
चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाने प्रथम स्वतःची माणूसमयता उद्ध्वस्त केली. त्यानंतरच त्याला स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र, आदिवासी आणि भटकेविमुक्त यांच्या माणूसमयतेची हत्या करता आली. चातुर्वर्णी पुरुषसत्ताक कोणतीही संस्कृती, सभ्यता वा सुजनता जन्माला घालू शकत नाही. म्हणूनच चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाचे निर्मूलन करण्याची आवश्यकता आता आहे. आता मुळापासूनच सर्व बदलायला हवे आहे. विषाचीच फुले आणि फळे येत असतील तर आता अशा झाडांची मुळे बदलायला हवीत. जीवनाचे चुकीचे ध्येय, चुकीचा मार्ग वा जीवनाचे चुकीचे आकलन या गोष्टींमधून स्त्रियांचीही आणि पुरुषांची माणूसमयता संभवणारच नाही. विविधता वा वेगळेपणा म्हणजे विषमता नव्हे वा भेदभाव नव्हे. एकूणच जगातली विषमता आणि शोषण या गोष्टी चुकीच्या कथनांनी निर्माण केल्या आहेत. संभ्रमात टाकणाऱ्या कथनांनी लोकांना सत्याकडे जाऊ दिले नाही. विषमता, शोषण, द्वेष, क्रौर्य आणि हिंसा हे रोग आहेत. चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाने निर्माण केलेल्या विघातक कथनांनी ही रोगमयता बहुसंख्य स्त्रियांना आणि पुरुषांना पवित्र मानायला शिकविले. या पावित्र्याने चिकित्सेचे उगम बंद केले. माणूसमयतेच्या वाताहतीचा उगम इथे आहे. ही वाताहत उल्लंघून सर्वांनीच आता आपली माणूसमयता पुन्हा प्रस्थापित करायची गरज आहे.

प्रत्यक्षात असे दिसते की काळाच्या ओघात पंचाऐंशी टक्के लोकांमधील बहुसंख्य स्त्रियां-पुरुषही चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाचे कडवे समर्थक झाले. स्त्रीला सार्वभौम करू इच्छिणाèया हिंदू कोड बिलाच्या विरोधात 17 सप्टेंबर 1951 रोजी चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाने दिल्लीत स्त्रियांचा मोर्चा काढला. हिंदू कोड बिल संसदेत मंजूर झाले नाही. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 11 ऑक्टोबर 1951 रोजी केंद्रिय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे लक्षात घेतले तर एक महासत्य पुढे येते ते हे की चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाने स्त्रीला तिच्याच मुक्तीच्या विरोधात लढायला लावले.
मुलांची मुंज करणाऱ्या स्त्रिया मुलांना द्विजन्मा करतात आणि स्वतः एकजन्मा शूद्रच राहतात. चातुर्वर्णी पुरुषसत्ताक दुय्यमांना त्यांच्या दास्याचा दुर्दम्य अहंकार शिकविते. म्हणूनच पुरुषसत्ताक तोडून बाहेर येणारा पुरुषच माणूसमयतेच्या व्याकरणाकडे जाऊ शकतो असे म्हणायला हवे. वडाला दोरे गुंडाळण्यासारखी शेकडो व्रते करणारी स्त्री ही चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाचीच लाडकी इच्छा आहे. ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ हे चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाचे आणि हे सत्ताक डोक्यात वागवणाèया पुरुषांचेही दूरदर्शी स्वप्न आहे. स्त्रियांच्या पारतंत्र्याचा जयजयकार काही निवडक पुरुषच करतात असे नाही तर काही निवडक स्त्रियाही करतात.
हे सर्वच निवडक स्त्रीपुरुष असे मानतात की हे पुरुषसत्ताक खुद्द ईश्वरानेच निर्माण केले आहे. पण खरे हे आहे की ईश्वरही या पुरुषसत्ताकानेच निर्माण केलेले आहेत आणि त्यांच्या मुखातून चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाचे पावित्र्य लोकांच्या मनावर ठसवले आहे. हे पुरुषसत्ताक त्यामुळेच सहजी नष्ट करता येत नाही. कारण या पुरुषसत्ताकानेच नरक, पुनर्जन्म, परलोक या कथनांच्याद्वारा स्वतःची ‘सर्वोच्च’ सुरक्षा निर्माण केलेली असते. धर्म ही त्याची अशीच सुरक्षायंत्रणा असते. धर्म श्रद्धांचे डोंगर उभे करतो. त्यामुळे चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाने निर्माण केलेले स्त्रीपुरुषांचे समूहच या पुरुषसत्ताकाचे सैनिक म्हणून भूमिका करीत असतात.
चातुर्वर्णी पुरुषसत्ताक त्याच्या सरहद्दी कोणाला ओलांडू देत नाही. अशा सरहद्दी ओलांडणारांना त्याची किंमत मोजावी लागते. या पुरुषसत्ताकाचे एक अभेद्य तत्त्वज्ञान असते. समाज, अर्थ आणि राजकारण या सर्वच गोष्टी ते आपल्या हातातून सुटू देत नाही. ते विषमतेला अनिवार्य मानते आणि शोषणाला पवित्र नीती मानते. अर्थात चातुर्वर्णी पुरुषसत्ताकाचे निर्मूलन म्हणजे स्त्रीसत्ताकाची स्थापना नव्हे. सर्वांना समान न्याय, समान मूल्य आणि समान सन्मान देणारे मानवसत्ताक हे आपले सर्वांचेच ध्येय असायला हवे आणि ‘भारतीय’ संविधान हा या मानवसत्ताकाचा बीजग्रंथ आहे असे मी मानतो. जे स्त्रीपुरुष या मानवसत्ताकाला आपले जगणे मानीत नाहीत त्यांचा प्रवास नरमादीपणाकडे होणे अटळ असते. नरमादीपणाच्या वा जनावरीकरणाच्या पातळीवर जगणारे लोक भूतकाळातही होते. आजही आहेत आणि यांच्यामुळे समाज रानटी, असभ्य आणि केवळ वासनांधच कसा होतो तेही आपण भोवती बघतो.
नरमादी, स्त्रीपुरुष हा मार्ग आता शहाण्या मानवत्वाकडे जायला हवा. असे शहाणे मानवत्व ज्यांच्यामध्ये गौरवाने वसते असेही स्त्रीपुरुष आज आपल्या समाजात आहेत याची आपण सर्वांनीच नोंद घ्यायला हवी. या संविधाननिर्मित मानवसत्ताकाची साक्षात उदाहरणे म्हणता येतील असे अनेक स्त्रीपुरुष आपल्याभोवती आहेत. ही उदाहरणे मोठीच आश्वासक आहेत. या उदाहरणांची संख्याच केवळ वाढावी असे नाही तर भारत अशा शहाण्या आणि परस्परोपकारक उदाहरणांचाच देश व्हावा असे मला वाटते.
भारतीय संविधान म्हणजे जगातल्या सर्वोत्तम आणि सुसंस्कृत मानवी संबंधाचे महाकथन! या महाकथनात उजेडाची अनेक कथने आहेत. या सममूल्यतावादी कथनांची सर्वच विषमतावादी चातुर्वर्णी कथनांनी धाक घेतलेला आहे. धर्म, देव, दैव या चैतन्यवादी पुरुषसत्ताकाने लोकांच्या मनांना घातलेल्या सर्व बेड्या संविधानाने पार तोडूनच फेकलेल्या आहेत. संविधानाच्या मनाने या सर्व बेड्या तोडणारा पुरुषच खèया अर्थाने माणूसमयतेचा धनी ठरू शकतो. माणसाच्या माणूसमय जगण्याचा निकष माणूसच असायला हवा. स्त्रियांना आणि पुरुषांनाही लोकांनी माणुसमयतेचे प्रमाणशास्त्र म्हटले पाहिजे. या प्रमाणशास्त्राच्या विरोधातले खलप्रमाणशास्त्र उद्ध्वस्त करणारे स्त्रीपुरुषच माणूसमयतेचे अनन्य मानदंड निर्माण करू शकतात. असा माणूसमय पुरुषच स्त्रीच्या माणूसमयतेचा सन्मान करू शकेल आणि अशी माणूसमय स्त्रीच पुरुषाच्या माणूसमयतेचा सन्मान करू शकेल असे शहाणे मानवसत्ताक आपल्या संविधानात शिगोशिग भरलेले आहे. इतके सर्वव्यापी, इतके निरामय आणि इतके प्रस्तुत मानवसत्ताक आता जगाजवळ दुसरे नाही.